कष्टकरी आईच्या लेकीची केंद्र सरकारमध्ये दुसऱ्यांदा भरारी!


कष्टकरी आईच्या लेकीची केंद्र सरकारमध्ये दुसऱ्यांदा भरारी!

आधी आरोग्य विभागात लॅबोरेटरी असिस्टंट ऑफिसर, आता अर्थ मंत्रालयात 'ज्युनियर हिंदी ट्रान्सलेटर' अधिकारी; जया मस्केच्या संघर्षमय यशाने मांगरूळचा अभिमान उंचावला!
मनोजकुमार मस्के, मांगरूळ

शिराळा तालुक्यातील मांगरूळसारख्या छोट्याशा गावातून प्रतिकूल परिस्थितीवर मात करत केंद्र शासनाच्या सेवेत दोन वेळा यश संपादन करणाऱ्या जया हिम्मतराव मस्के ऊर्फ प्रज्ञा सचिन पवार हिच्या यशाने संपूर्ण परिसराची मान अभिमानाने उंचावली आहे. लोकांची धुणीभांडी करून, शेतमजुरी करून आपल्या मुलीला शिकवणाऱ्या आईच्या कष्टाचे चीज करत जयाने आधी केंद्र शासनाच्या आरोग्य विभागात लॅबोरेटरी असिस्टंट ऑफिसर पद मिळवले आणि आता कर्मचारी निवड आयोगाच्या (SSC) संयुक्त हिंदी अनुवादक परीक्षा २०२५ मध्ये यश संपादन करून भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयांतर्गत केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळात (CBDT) 'ज्युनियर हिंदी ट्रान्सलेटर' (गट-ब अधिकारी) पदावर निवड मिळवली आहे. एका ग्रामीण मुलीने दोन वेळा मिळवलेले हे यश अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

जयाचा हा प्रवास अत्यंत संघर्षमय आहे. ती अगदी लहान असतानाच तिच्या वडिलांचे छत्र हरपले. घरात कमावणारे कोणी नसताना आई सुरेखा मस्के यांच्यावर संसाराचा आणि मुलीच्या संगोपनाचा संपूर्ण भार आला. मात्र परिस्थितीपुढे हार न मानता त्यांनी लोकांची धुणीभांडी, शेतमजुरी आणि मिळेल ती कामे करून आपल्या मुलीला मोठे करण्याचा निर्धार केला. अनेकदा घरात दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत असायची. अशा परिस्थितीत जयाने शाळेतील जेवणाच्या कामातून आधार घेत शिक्षण सुरू ठेवले.

जयाची अभ्यासातील गुणवत्ता आणि घरची परिस्थिती लक्षात घेऊन दत्तसेवा विद्यालयाने तिला दहावीपर्यंत संपूर्ण शिक्षण शुल्क माफ करून मोलाची मदत केली. आईचे कष्ट, शाळेचा आधार आणि स्वतःची जिद्द यांच्या बळावर तिने दहावीपर्यंतचे शिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले. पुढे सन २०२४ मध्ये तिने कर्मचारी निवड आयोगाची (SSC) परीक्षा दिली. याच काळात वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी तिचा विवाह झाला. लग्नानंतर ती पवारवाडी येथील पवार कुटुंबाची सून झाली. मात्र संसाराची जबाबदारी स्वीकारतानाही तिने शिक्षणाची वाट सोडली नाही. माहेर आणि सासरच्या कुटुंबीयांच्या सहकार्याने तिने बी.एस्सी. आणि एम.एस्सी.पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षणासोबतच तिने स्वतःचे 'टार्गेट क्लासेस' सुरू करून विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन आणि कौन्सिलिंगचे कामही सुरू ठेवले.

दरम्यान, २०२४ मध्ये दिलेल्या एसएससी परीक्षेच्या निकालातून तिची नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ ट्रेनिंग अँड रिसर्च येथे लॅबोरेटरी असिस्टंट ऑफिसर पदावर निवड झाली. पहिल्याच यशाने तिच्या संघर्षाला मोठे बळ मिळाले. मात्र एवढ्यावर समाधान न मानता तिने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरूच ठेवला.
आता कर्मचारी निवड आयोगाच्या संयुक्त हिंदी अनुवादक परीक्षा २०२५ (CHTE-2025) मध्ये तिने देशपातळीवर यश मिळवले आहे. या परीक्षेची जाहिरात जून २०२५ मध्ये प्रसिद्ध झाली होती. १२ ऑगस्ट २०२५ रोजी पूर्वपरीक्षा, तर १४ डिसेंबर २०२५ रोजी मुख्य वर्णनात्मक परीक्षा पार पडली. या परीक्षेची अंतिम निवड यादी ५ नोव्हेंबर २०२६ रोजी जाहीर झाली. देशभरातून निवड झालेल्या ५३२ उमेदवारांमध्ये जयाने आपले स्थान निश्चित केले. विशेष म्हणजे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या (CBDT) केवळ २४ जागांपैकी एका जागेवर तिची निवड झाली आहे. भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयांतर्गत 'ज्युनियर हिंदी ट्रान्सलेटर' या गट-ब अधिकारी पदावर तिची निवड होणे ही मांगरूळसह संपूर्ण शिराळा तालुक्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.

एका बाजूला संसार, दुसऱ्या बाजूला शिक्षण, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास आणि स्वतःच्या क्लासेसची जबाबदारी अशा अनेक आघाड्यांवर लढत जयाने हे यश मिळवले आहे. विशेष म्हणजे ज्या आईने लोकांची कामे करून, स्वतःच्या सुखाचा त्याग करून मुलीच्या शिक्षणासाठी आयुष्य खर्ची घातले, त्याच आईच्या कष्टांना आज खऱ्या अर्थाने यशाचे फळ मिळाले आहे.

लोकांच्या घरची कामे करून आपल्या मुलीचे भविष्य घडवणाऱ्या आईच्या लेकीने आज केंद्र सरकारच्या दोन महत्त्वाच्या पदांवर निवड मिळवून आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. गरिबी, परिस्थिती आणि संकटे ही यशाच्या मार्गातील अडथळे नसून जिद्द, शिक्षण आणि मेहनतीच्या जोरावर त्यांच्यावर मात करता येते, हे जयाने आपल्या कर्तृत्वातून सिद्ध केले आहे.

जयाच्या या दुहेरी यशाबद्दल मांगरूळ, पवारवाडी आणि संपूर्ण शिराळा तालुक्यातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आई सुरेखा मस्के, कुटुंबीय, दत्तसेवा विद्यालय तसेच तिच्या यशात हातभार लावणाऱ्या सर्वांचे कौतुक होत आहे. ग्रामीण भागातील मुलींनीही मोठी स्वप्ने पाहावीत आणि ती पूर्ण करण्यासाठी जिद्दीने प्रयत्न करावेत, असा प्रेरणादायी संदेश जयाच्या यशाने दिला आहे.

Comments

Popular posts from this blog

उरीतील स्फोटात शाहुवाडीचा सुपुत्र शहीद; गोंडोली गावावर शोककळा

आटूगडेवाडीत शालेय विद्यार्थ्यांच्या वाहनाचा अपघात; पाच वर्षांच्या चिमुकलीचा जागीच मृत्यू

*शिराळा उत्तरच्या मातीत दोन दिवसांपूर्वी जे घडलं, ते फक्त निवडणूक नव्हतं*… *तो विश्वासाचा, नात्याचा आणि घराण्याच्या संस्कारांचा विजय होता*.