*३७ वर्षांची शिवशक्ती… गणपती मंडळ नव्हे, तर एकजुटीचा जिवंत इतिहास*!
*३७ वर्षांची शिवशक्ती… गणपती मंडळ नव्हे, तर एकजुटीचा जिवंत इतिहास*! मनोजकुमार मस्के, मांगरूळ १९८९ साल… गावातील कुंभारवाडा… हातात पैसा नव्हता, खिशात मोबाईल नव्हता, मोठमोठी साधनं नव्हती; पण मनात एक स्वप्न होतं… आपलं स्वतःचं गणपती मंडळ उभं करायचं! गावातील विविध जाती-धर्मातील काही मुलं एकत्र आली आणि ‘शिवशक्ती गणेश मंडळा’ची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्या वेळी मंडळाकडे पैशांपेक्षा मोठी गोष्ट होती… ती म्हणजे एकी, प्रेम, आपुलकी आणि एकमेकांविषयीचा आदर! आज मागे वळून पाहिलं की त्या काळातील आठवणी अक्षरशः डोळ्यांसमोर उभ्या राहतात. त्या काळात मोबाईल नव्हते. सोशल मीडिया नव्हता. व्हॉट्सॲप ग्रुप नव्हते. प्रसिद्धीसाठी पोस्टरबाजी नव्हती. पण एकमेकांना भेटण्यासाठी वेळ होता. दिवसभर काम करून झालं की सगळी पोरं एकत्र जमायची. कुणाच्या हातात पुस्तक, कुणाच्या हातात पत्ते, तर कुणाच्या डोक्यात नवीन कल्पना! ‘यावर्षी काय करायचं?’ ‘नाटक कोणतं बसवायचं?’ ‘देखावा कोणता करायचा?’ ‘गणपतीची मिरवणूक कशी काढायची?’ अशा चर्चा सुरू व्हायच्या आणि गणपतीच्या सहा महिने आधीपासूनच देखाव्याचं काम सुरू व्हायचं. दोन-दोन महिने नाट...