उरीतील स्फोटात शाहुवाडीचा सुपुत्र शहीद; गोंडोली गावावर शोककळा
उरीतील स्फोटात शाहुवाडीचा सुपुत्र शहीद; गोंडोली गावावर शोककळा
दोन वर्षांच्या चिमुकलीच्या डोक्यावरून पितृछत्र हरपले; पार्थिव कधी येणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष
मांगरूळ, वार्ताहर : जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टर येथे नियंत्रण रेषेजवळ (एलओसी) झालेल्या भीषण स्फोटात शाहुवाडी तालुक्यातील गोंडोली गावचा सुपुत्र विक्रम बाळकृष्ण चव्हाण (वय २९) यांना वीरमरण आले. भारतीय सैन्याच्या ८ राष्ट्रीय रायफल्स (8 Rashtriya Rifles) या युनिटमध्ये कार्यरत असलेले विक्रम चव्हाण देशसेवेचे कर्तव्य बजावत असतानाच शहीद झाले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच गोंडोली गावासह संपूर्ण शाहुवाडी तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
विक्रम चव्हाण यांची २०१८ मध्ये भारतीय सैन्य दलात निवड झाली होती. सैन्य भरतीनंतर त्यांनी अहमदनगर येथे कठोर प्रशिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांची पहिली नियुक्ती राजस्थानमधील सुरतगड येथे झाली. पुढे जम्मू-काश्मीरमधील अखनूर येथे त्यांनी देशसेवा बजावली. सध्या त्यांची तिसरी नियुक्ती उरी सेक्टरमध्ये ८ राष्ट्रीय रायफल्समध्ये होती. सीमावर्ती भागात देशाच्या सुरक्षेसाठी तैनात असताना झालेल्या स्फोटात त्यांना वीरमरण आले.
मिळालेल्या माहितीनुसार, उरी सेक्टरमधील कमलकोट परिसरात एलओसीजवळ अचानक झालेल्या स्फोटात विक्रम चव्हाण गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने लष्करी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. देशरक्षणासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या या वीर जवानाच्या बलिदानामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
विक्रम यांच्या पश्चात वडील बाळकृष्ण चव्हाण (वय ६६), मोठे बंधू सागर चव्हाण (वय ३६), पत्नी रूपाली विक्रम चव्हाण (वय २५) आणि अवघी दोन वर्षांची कन्या वीरा असा परिवार आहे. त्यांची आई छाया चव्हाण यांचे यापूर्वीच निधन झाले असून तीन विवाहित बहिणी आहेत. कुटुंबाचा आधारस्तंभ असलेल्या विक्रम यांच्या निधनाने संपूर्ण चव्हाण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
अवघ्या दोन वर्षांच्या मुलीच्या डोक्यावरून पितृछत्र हरपले असून तरुण पत्नीवर वैधव्याचे दुःख कोसळले आहे. वृद्ध वडिलांनी देशसेवेसाठी पाठविलेला मुलगा आता तिरंग्यात गुंडाळून परतणार असल्याची वेदना संपूर्ण गावाला अस्वस्थ करून सोडत आहे. गोंडोली गावातील शांत, संयमी आणि कर्तव्यनिष्ठ युवक म्हणून विक्रम चव्हाण यांची ओळख होती. त्यांच्या शौर्याचा आणि देशभक्तीचा अभिमान गावकऱ्यांना कायम राहणार आहे.
दरम्यान, शहीद विक्रम चव्हाण यांचे पार्थिव गोंडोली येथे कधी आणण्यात येणार याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही. पार्थिव गावात येण्याची बातमी समजताच अंतिम दर्शनासाठी आणि श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. कुटुंबीयांसह संपूर्ण गाव सध्या पार्थिवाच्या प्रतीक्षेत असून हळहळ व्यक्त केली जात आहे.
देशाच्या सीमांचे रक्षण करताना सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शहीद विक्रम चव्हाण यांच्या शौर्याला संपूर्ण शाहुवाडी तालुका अभिवादन करीत असून त्यांच्या बलिदानाची नोंद इतिहासात सुवर्णाक्षरांनी केली जाईल, अशा भावना नागरिकांतून व्यक्त होत आहेत.
Comments
Post a Comment