श्री संत बाळूमामांच्या भंडारा उत्सवाला लाखो भाविकांची उपस्थिती ; शिरशी परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमला
श्री संत बाळूमामांच्या भंडारा उत्सवाला लाखो भाविकांची उपस्थिती ; शिरशी परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमला
*मनोजकुमार मस्के, मांगरूळ*
,
शिराळा तालुक्यातील शिरशी व परिसरामध्ये श्री संत बाळूमामांचा भंडारा उत्सव २०२६ अत्यंत उत्साहात, भक्तिमय वातावरणात आणि पारंपरिक जल्लोषात पार पडला. “जय बाळूमामा”च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. लेझीम, हलगी, धनगरी ढोल, टाळ-मृदंग यांच्या गजरात तसेच भंडाऱ्याच्या उधळणीत निघालेली भव्य पालखी मिरवणूक हे या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरले.
यावेळी प्रसिद्ध भाकणूककार कृष्णात डोणे महाराज यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला विशेष धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व प्राप्त झाले. त्यांच्या दर्शनासाठी आणि आशीर्वादासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या धनगर समाजातील युवकांनी सादर केलेल्या ढोल-हलगी व लेझीमच्या तालावर संपूर्ण वातावरण भक्तिरसात न्हाऊन निघाले.
या भंडारा उत्सवासाठी शिराळा, वाळवा, कराड, शाहूवाडी आदी तालुक्यांसह परिसरातील लाखो भाविकांनी मोठ्या श्रद्धेने हजेरी लावली. पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. महिलावर्ग, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच लहान मुलांनीही मोठ्या उत्साहाने या सोहळ्यात सहभाग घेतला.
उत्सवादरम्यान विविध राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाविकांच्या सेवेसाठी स्वयंसेवकांनी उत्कृष्ट नियोजन केले होते. वाहतूक व्यवस्था, पिण्याचे पाणी, महाप्रसाद, वैद्यकीय मदत तसेच शिस्तबद्ध दर्शन व्यवस्था यामुळे भाविकांनी समाधान व्यक्त केले.
हा संपूर्ण भंडारा उत्सव कृष्णा पडवळ मामा, वाघापूर यांच्या अधिपत्याखाली सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पार पडला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी अनेक दिवस मेहनत घेतली होती.
“भंडारा म्हणजे महाप्रसाद आणि अन्नदान” ही संत परंपरा आजही भाविक अत्यंत निष्ठेने आणि श्रद्धेने जपत असल्याचे या उत्सवातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले. भक्ती, सेवा, परंपरा आणि सामाजिक एकोपा यांचे दर्शन घडविणारा हा भंडारा उत्सव भाविकांच्या कायम स्मरणात राहणारा ठरला.
फोटो - प्रसिद्ध भाकनुकार संत श्री कृष्णात डोणे महाराज व कृष्णा पडवळ महाराज
Comments
Post a Comment