कै. बबन नाना मस्केभावपूर्ण श्रद्धांजली
*कै. बबन नाना मस्के
भावपूर्ण श्रद्धांजली*
आज आमच्या आयुष्यातील सर्वात वेदनादायी दिवसांपैकी एक दिवस…
आमचे वडील कै. बबन नाना मस्के यांना आम्हाला सोडून जाऊन तब्बल सोळा वर्षे पूर्ण झाली. खरंतर वर्षे मोजली जातात, पण आई-वडिलांच्या आठवणींचा काळ कधीच संपत नसतो. प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण त्यांच्या आठवणींनी भरलेला असतो. आजही घरातील प्रत्येक कोपऱ्यात त्यांचा आवाज, त्यांचे संस्कार आणि त्यांचे अस्तित्व जाणवत राहते.
एका सामान्य कुटुंबातून, अत्यंत कष्टाने आणि संघर्षातून स्वतःचं आयुष्य उभं करणारा हा माणूस केवळ आमचे वडील नव्हते, तर संपूर्ण गावासाठी आधारवड होते. आई-वडील, पत्नी, चार मुलं, दोन बहिणी अशा मोठ्या संसाराचा डोलारा त्यांनी आपल्या खांद्यावर समर्थपणे उभा केला. स्वतः कितीही संकटात असले तरी दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणं, हेच त्यांचं आयुष्य होतं.
त्यांच्या आयुष्यात माणुसकी हीच सर्वात मोठी पूजा होती. अनेक देव-देवतांवर त्यांनी सुंदर गाणी लिहिली. तालमीमध्ये अनेक मल्ल घडवले. गावातील बारशांमध्ये प्रेमाने पाळणा म्हणणारे, लग्नसमारंभात मंगलाष्टक म्हणताना प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आणणारे ते स्वर आजही कानात घुमतात. ग्रंथ वाचन करून त्यातील अर्थ लोकांना समजावून सांगणं, ही त्यांची खासियत होती.
गावाच्या सामाजिक आणि धार्मिक कार्यात ते कायम अग्रेसर असायचे. नवरात्रीमध्ये नऊ दिवस फराळ वाटप करणे, चिंचेश्वर मंदिरात ५० किलोची घंटा बांधणे, महाशिवरात्रीचा भंडारा पुढे होऊन करणे, शाळेतील मुलांना खाऊ व वह्यांचे वाटप करणे अशा असंख्य उपक्रमांत त्यांनी स्वतःहून सहभाग घेतला.
पैशाची मदत असो किंवा कष्टाची मदत — “मी आहे” हे शब्द ते प्रत्येकासाठी जगले. म्हणूनच आजही गावातील अनेकांच्या तोंडात त्यांचं नाव मोठ्या आदराने घेतलं जातं. इतकी वर्षे उलटून गेली तरी त्यांच्या आठवणीने अनेकांच्या डोळ्यात अश्रू येतात आणि लोक आजही त्यांच्या कर्तृत्वाचा पाढा अभिमानाने वाचतात.
आम्ही खरोखर भाग्यवान आहोत की अशा देवमाणसाच्या पोटी आम्हाला जन्म मिळाला. त्यांच्या इतकं महान होणं कदाचित शक्य नाही, पण त्यांच्या नावाला कधीही गालबोट लागू नये, एवढं चांगलं जगण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करत राहू.
आज आम्ही तीन मुलं आणि एक मुलगी — अजूनही वडिलांच्या आठवणींनी भावूक होतो. त्यांनी आखून दिलेल्या संस्कारांच्या रेषेबाहेर आम्ही कधी गेलो नाही आणि भविष्यातही जाणार नाही. दुसऱ्याचं भलं करायचं आणि स्वतः दुःख सहन करायचं, हे आम्ही त्यांच्याकडूनच शिकलो.
आज त्यांच्या सतराव्या पुण्यतिथीनिमित्त…
आमच्या काळजाचा तुकडा, आमचा अभिमान, आमचे प्रेरणास्थान कै. बबन नाना मस्के यांना भावपूर्ण श्रद्धांजली…
“माणूस शरीराने जातो,
पण त्याचे संस्कार, त्याची माया आणि त्याचे कार्य
हे कायम जिवंत राहतात…”
॥ भावपूर्ण श्रद्धांजली ॥
Comments
Post a Comment