“पेरीडची माती, पैलवानांची शान – १२७ वर्षांची कुस्ती परंपरेचा भव्य कुंभमेळा!” 💪🔥

“पेरीडची माती, पैलवानांची शान – १२७ वर्षांची कुस्ती परंपरेचा भव्य कुंभमेळा!” 💪🔥
*मनोजकुमार मस्के, मांगरूळ* 
शाहूवाडी तालुक्यात सह्याद्रीच्या कुशीत विसावलेलं, कोकणाला लागून असलेलं आणि मातीचा गंध अंगात भिनलेलं पेरीड गाव म्हणजे खरंच रगेल-रांगड्या महाराष्ट्राची शान! *“पैलवानांचं गाव”* म्हणून ओळख मिळवलेलं हे गाव फक्त नावालाच नाही, तर परंपरा, ताकद आणि मातब्बरपणाचं जिवंत उदाहरण आहे.
डोंगरांच्या पायथ्याशी वसलेलं हे गाव जसं निसर्गाने श्रीमंत, तसंच माणसांनीही दमदार आहे. इथं पैशाची कमतरता नाही, पण त्याहून मोठं म्हणजे इथल्या लोकांच्या मनाचा श्रीमंतीपणा. “कुस्ती” म्हणजे जीव तोडून लढणं – ती इथल्या मातीची ओळखच बनली आहे. पेरीडमध्ये लागणारी प्रत्येक कुस्ती म्हणजे फक्त सामना नसतो, तर तो असतो जिगर, प्रतिष्ठा आणि परंपरेचा थरारक संग्राम!
*गावाची ग्रामपंचायतही काही साधी नाही* – थेट विधानभवनाची प्रतिकृती उभी केलेली आहे. हेच दाखवून देतं की पेरीड गाव फक्त कुस्तीपुरतं मर्यादित नाही, तर विकासाच्या बाबतीतही आघाडीवर आहे. सर्जेराव पेरीडकर दादा, पोलीस अधिकारी बाजीराव पाटील दादा, पै. रंगराव पेरीडकर दादा, सचिन पाटील भाऊ (मुंबई पोलीस), भगवान कुंभार (वस्ताद) यांसारख्या अनेक मान्यवरांनी गावाचा चेहरा मोहरा बदलून टाकला. योजनांचा वर्षाव, सुविधा गावातच उपलब्ध – आणि तेही सर्वसामान्यांच्या भल्यासाठी!
आता येतो मुख्य विषय – *गोरक्षनाथ यात्रेनिमित्त कै. पै. मारुती भाऊ पाटील कुस्ती आखाडा, श्रीक्षेत्र पेरीड येथे भरवला जाणारा कुस्त्यांचा कुंभमेळा*! हे भव्य मैदान 15 एप्रिल 2026 रोजी दुपारी 3 वाजता आयोजित करण्यात येणार आहे.
गेली तब्बल १२७ वर्षांची परंपरा असलेलं हे मैदान म्हणजे महाराष्ट्रातील कुस्तीप्रेमींसाठी जत्रा नव्हे, तर खरी पर्वणीच. दरवर्षी मुंबईकर आणि गावकरी, त्याचबरोबर सेवा सोसायटी, ग्रामपंचायतचे सरपंच-उपसरपंच व सर्व सदस्य, तसेच गावातील मंडळे एकत्र येऊन “महाराष्ट्र केसरी” ला टक्कर देईल असं भव्य आणि दिमाखदार मैदान उभं करतात. इथं कुस्त्या असतात त्या थेट ५०० पासून ५ लाखांपर्यंत! महाराष्ट्रातील नामांकित, अव्वल नंबरचे पैलवान या मैदानात उतरतात. धुळीचा सुगंध, नगाऱ्यांचा गजर आणि हजारोंच्या गर्दीतून उठणारा जल्लोष – हे सगळं अनुभवणं म्हणजे आयुष्यभर लक्षात राहील असा सोहळा!
या मैदानासाठी गावकरी मनापासून पैसा खर्च करतात. अनेक दानशूर व्यक्ती पुढे येतात आणि या परंपरेला हातभार लावतात. यावर्षीही खास आकर्षण ठरणार आहे ते म्हणजे एक नंबरची कुस्ती – महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील विरुद्ध दिल्लीचा अभिनय सिंग यांच्यातील जबरदस्त लढत! ही झुंज पहिल्यांदाच शाहूवाडी-शिराळा तालुका तसेच सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातील कुस्तीप्रेमींना पाहायला मिळणार आहे. त्यानंतर नंबर दोनची कुस्ती – महाराष्ट्र चॅम्पियन सनी मदने विरुद्ध यूपी केसरी बंटी कुमार यांच्यात रंगणार आहे. अशा अनेक काटाजोड, दमदार आणि श्वास रोखून धरणाऱ्या कुस्त्या याच मैदानात पाहायला मिळणार आहेत. त्याचबरोबर शाहूवाडी तालुक्यातील नेर्ले येथील दिग्गज पैलवान सर्जेराव गणपती पाटील – *ज्यांनी 1962 ते 1970 या काळात* कुस्ती क्षेत्र गाजवलं आणि राष्ट्रीय पातळीवर सलग तीन वर्षे सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकं मिळवून महाराष्ट्राचा नावलौकिक वाढवला – त्यांचा सन्मानपत्र देऊन भव्य गौरव करण्यात येणार आहे. त्यांच्या झुंजी, त्यांचा दबदबा आणि त्यांची कर्तबगारी – या सगळ्यांना या मैदानात मानवंदना दिली जाणार आहे. याचसोबत शाहूवाडी तालुक्यातील उदगीर गावची लेक अपेक्षा पाटील – जिने आंतरराष्ट्रीय स्तरावर कुस्तीमध्ये आपलं नाव कोरलं! हलाखीच्या परिस्थितीतून पुढे येत तिने गावाचं, तालुक्याचं आणि देशाचं नाव उंचावलं. तिच्या या कर्तृत्वाचा सन्मान म्हणून पेरीड गावकऱ्यांच्या वतीने तब्बल ₹५१,००० हजार रुपयांचे रोख बक्षीस व भव्य सत्कार या मैदानात होणार आहे. ही केवळ सन्मानाची गोष्ट नाही, तर प्रत्येक ग्रामीण मुलीला उभारी देणारी प्रेरणादायी घटना आहे. पेरीडचं मैदान म्हणजे फक्त कुस्ती नाही –ते आहे परंपरेचं जतन, गावकऱ्यांच्या एकतेचं प्रतीक आणि मातीशी असलेल्या घट्ट नात्याचं जिवंत दर्शन! या भव्य सोहळ्यासाठी सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक उद्योगपती, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील दिग्गज मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
सह्याद्रीच्या साक्षीने, डोंगरांच्या कुशीत, धुळीत लोळत घडणाऱ्या या कुस्त्या म्हणजे खरी “मर्दानी महाराष्ट्राची” ओळख!
*एकदा तरी या पेरीडच्या मैदानात जाऊन पाहा* –
*रक्त तापेल, अंगावर शहारे येतील आणि मन अभिमानाने भरून येईल*! 💪🔥

Comments

Popular posts from this blog

शिरशी गावच्या लोकनियुक्त पहिल्या सरपंच – सौ. स्मिताताई बापूराव भोसले

*शिराळा उत्तरच्या मातीत दोन दिवसांपूर्वी जे घडलं, ते फक्त निवडणूक नव्हतं*… *तो विश्वासाचा, नात्याचा आणि घराण्याच्या संस्कारांचा विजय होता*.

*सोंडोलीमध्ये रंगणार दोन महाराष्ट्र केसरींची तुफानी दंगल देवा थापा स्पर्धेचे खास आकर्षण*