उसापेक्षा वाडे महाग, उसाचे वाडे ३०० रुपये शेकडा....
उसापेक्षा वाडे महाग, उसाचे वाडे ३०० रुपये शेकडा....
मनोजकुमार मस्के-मांगरूळ
शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागात चारा टंचाईमुळे उसाच्या वाड्याला मोठी मागणी वाढली आहे. आता उसाच्या वाड्याला शेकडा ३०० रुपये मोजावे लागत आहे. ऊस तोडीचे हंगामाच्या सुरुवातीलाच हा दर अधिक आहे. परंतु चारा टंचाईमुळे शेतकरी जादा दर असताना देखील उसाचे वाडे मोठ्या प्रमाणात खरेदी करताना दिसत आहे.
तालुक्याच्या पश्चिम भागात सध्या ऊस तोडी जोरात चालू आहे. उसतोडी चालू झाल्यामुळे उसाचे हिरवेगार वाडे शेतकरी मोठ्या प्रमाणात आपल्या जनावरांना घालतात. फेब्रुवारी महिन्यानंतर उन्हाळ्याच्या चाराटंचाई दिवसांमध्ये उसाच्या वाड्याला मागणी वाढते. परंतु यंदा अति पावसामुळे चारा खराब झाला असल्याने आतापासूनच चारा टंचाईचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. सध्या जनावरांना ओला चारा खायला नाही. या परिसरात ऊसतोड चालू झाल्याने हिरवेगार वाडे मिळत आहे. परंतु मागणी अधिक होत असल्याने उसाच्या वाड्याने देखील भाव खाल्ला आहे. उसाच्या वाड्याला आत्तापासूनच शेकडा ३०० रुपये मोजले जात आहेत. यापुढे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये यामध्ये अधिक वाढ होणार आहे. त्यामुळे शेतकरी आतापासूनच वाडे खरेदी करून साठवून ठेवत आहेत.
चैकट-
या परिसरात दूध उत्पादक शेतकरी सर्वाधिक आहेत. प्रत्येक शेतकऱ्याकडे अधिक दूध देणाऱ्या संकरीत गाई म्हैशी आहेत. या गाई म्हैशींना हिरवा चारा अधिक प्रमाणात खायला लागतो. परंतु सध्याच्या चारा टंचाईमुळे जनावरांना हिरवा चारा खायला मिळेनासा झाला आहे. त्यामुळे दूध उत्पादन सुद्धा घटत चालले आहे. म्हणूनच तर शेतकऱ्यांनी दुपत्या जनावरांना वाडे घालण्यास सुरुवात केली आहे. महागाईमुळे तेही परवडत नाही.
- शेतकरी गणेश जाधव
Comments
Post a Comment