बंदुका झाडल्या... रक्त सांडले... पण मांगरूळची माती झुकली नाही!
बंदुका झाडल्या... रक्त सांडले... पण मांगरूळची माती झुकली नाही!
मनोजकुमार मस्के --
बिळाशी बंडाच्या रणसंग्रामात भारतमातेसाठी हुतात्मा झाले धोंडी संतू कुंभार आणि शंकर भाऊ चांभार; स्वातंत्र्याच्या इतिहासातील हा रक्तरंजित अध्याय आजही काळजात धडकी भरवतो!
शिराळा तालुक्याच्या मातीत स्वातंत्र्याची अशी एक ठिणगी पेटली होती, जिच्या ज्वाळांनी ब्रिटिश सत्तेच्या छातीत धडकी भरली होती. ही कहाणी आहे बिळाशीच्या बंडाची... आणि त्या बंडाच्या ज्वालेत स्वतःचे प्राण अर्पण करणाऱ्या मांगरूळच्या दोन नरवीरांची!
भारत पारतंत्र्यात होता. देशाच्या कानाकोपऱ्यात स्वातंत्र्याची आस धगधगत होती. महात्मा गांधींनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध सत्याग्रहाची हाक दिली. समुद्रकिनारी भागात मिठाचा सत्याग्रह आणि इतर भागात जंगल सत्याग्रहाची चळवळ उभी राहिली. अनेक ठिकाणी ब्रिटिशांनी पोलिसी बळाचा वापर करून आंदोलने चिरडली. पण बिळाशीमध्ये काहीतरी वेगळे घडत होते.
येथे आंदोलन काही मोजक्या कार्यकर्त्यांच्या हातात राहिले नव्हते. बिळाशीच्या सामान्य जनतेनेच स्वातंत्र्यलढ्याची मशाल आपल्या हातात घेतली होती.
गरीब होते... अशिक्षित होते... कष्टकरी होते... शेतकरी होते...
पोटाची खळगी भरण्यासाठी दिवसभर राबणारे हे लोक मिळेल तो तुकडा खाऊन जगत होते. पण देशासाठी लढताना त्यांच्या मनात एक विलक्षण श्रीमंती होती—देशभक्तीची!
त्यांना मोबदला नको होता. प्रसिद्धी नको होती. पद नको होते. सत्ता नको होती.
त्यांचा एकच स्वार्थ होता—
“ब्रिटिशांची गुलामी जाऊ दे... भारतमातेला स्वातंत्र्य मिळू दे!”
आणि त्यासाठी... “प्राण गेले तरी बेहत्तर!”
ही भावना बिळाशीच्या प्रत्येक घरात पोहोचली होती.
बिळाशीच्या बंडाची बातमी साताऱ्याच्या ब्रिटिश प्रशासनापर्यंत पोहोचली. बंड मोडून काढण्यासाठी कठोर शिस्तीचा अधिकारी बंकटसिंग याला पाठविण्यात आले.
१ ऑगस्ट १९३०!
५० ते ६० पोलिसांचा फौजफाटा घेऊन बंकटसिंग बिळाशीत दाखल झाला.
त्याला वाटले असेल—दंडुका दाखवला की जनता पळून जाईल!
पण त्याला ठाऊक नव्हते...
समोरची जनता नुसती जनता नव्हती; ती स्वातंत्र्याची भिंत होती!
गावाच्या प्रवेशद्वारावर तिरंगा फडकत होता. त्या तिरंग्याला आधार देणाऱ्या सागवानी सोटाभोवती जनतेने एकामागोमाग एक अशा सहा कड्या उभ्या केल्या होत्या.
एक कडी तुटली तर दुसरी उभी राहणार...
दुसरी तुटली तर तिसरी...
आणि शेवटच्या माणसापर्यंत ही लढाई सुरू राहणार!
पोलिसांनी दंडुके उगारले. दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण जनतेच्या डोळ्यांत भीती नव्हती.
होती ती फक्त एकच आग—
स्वातंत्र्याची!
बंकटसिंग संतापला. मात्र परिस्थिती त्याच्या हाताबाहेर जात होती. धो धो पाऊस पडत होता . घोड्यांची उपासमार होऊ लागली. पोलिसांच्या फौजेतही चलबिचल सुरू झाली. अखेर त्याला माघारी फिरावे लागले.
त्या दिवशी बिळाशीच्या जनतेने ब्रिटिश सत्तेला दाखवून दिले— बंदुकीपेक्षा जनतेचा निर्धार मोठा असतो!
पण ब्रिटिश एवढ्यावर थांबणार नव्हते.
पावलेवाडीच्या खिंडीतून अचानक पोलिसांच्या ताफ्याची रिघ दिसू लागली. सुरुवातीला ती अंतहीन रांग वाटली.
आणि मग सत्य समोर आले...
शेकडो पोलिस!
५ सप्टेंबर १९३० ला सुमारे ५०० ते ७०० जवानांचा प्रचंड फौजफाटा बिळाशीचे बंड चिरडण्यासाठी पाठवण्यात आला होता.
मोटारी गावात घुसल्या...
आणि पाहता पाहता बिळाशीचे रस्ते रणभूमी झाले!
एका बाजूला बंदुका...
दुसऱ्या बाजूला निःशस्त्र जनता!
पण त्या जनतेच्या छातीत बंदुकीपेक्षाही भयंकर शस्त्र होते— मातृभूमीवरील प्रेम!
हाणामारी सुरू झाली. दगड उडू लागले. लाठ्या फिरू लागल्या. पोलिसांचे दंडुके बरसू लागले. अनेकजण जखमी झाले.
पण जनता मागे हटत नव्हती.
शेवटच्या क्षणापर्यंत लढत होती!
शेवटी ब्रिटिशांनी शस्त्रांचा आधार घेतला. बंड दडपले गेले. पण...
खरी कहाणी तर त्यानंतर सुरू झाली!
बंड मोडल्याच्या उन्मादात पोलिसांचा ताफा शिराळ्याच्या दिशेने निघाला. मांगरूळच्या डोंगरकडेला असलेल्या रस्त्यावरून मोटारी पुढे सरकत होत्या.
मांगरूळ शांत दिसत होते...
पण ती शांतता वादळापूर्वीची होती!
अचानक... धाडकन्!
एक मोठा दगड रस्त्यावर येऊन पडला.
पोलिसांची वाहने थांबली.
पुन्हा दगड!
आणि मग डोंगरावरून दगडांचा वर्षाव सुरू झाला.
पोलिसांच्या गाड्यांवर दगडफेक करणारे कोण होते?
ते नव्हते मोठे नेते... ते नव्हते प्रशिक्षित सैनिक...
ते होते मांगरूळचे तरुण! मिशीही फुटल्या नसतील अशी कोवळी पोरं...
पण छातीत भारतमाता होती!
बंकटसिंगचा संताप अनावर झाला. त्याच्या आदेशाने पोलिसांनी बंदुका उगारल्या.
त्या तरुणांवर! क्षणभर वेळ थांबला... डोंगर शांत झाला... रस्त्यावरचे दगड शांत झाले...
आणि मग— धाड! धाड! धाड!
बंदुकांच्या फैरींनी मांगरूळच्या डोंगरकड्यांना हादरवून सोडले. गोळ्या तरुणांच्या देहात घुसल्या.
रक्ताचे थेंब जमिनीवर पडले...
आणि त्या क्षणी मांगरूळची माती लाल झाली!
त्या रक्तात दोन नावे कायमची कोरली गेली—
हुतात्मा धोंडी संतू कुंभार
हुतात्मा शंकर भाऊ चांभार हे दोन तरुण पडले...
पण इतिहास उभा राहिला!
त्यांच्या देहातून रक्त वाहत होते; पण त्यांच्या बलिदानातून स्वातंत्र्याची मशाल अधिक तेजाने पेटत होती. भारताच्या स्वातंत्र्यासाठी मांगरूळच्या मातीत दोन तरुणांनी आपल्या तारुण्याची आहुती दिली!
कल्पना करा...
एका बाजूला बंदुका...
आणि दुसऱ्या बाजूला हातात दगड घेऊन उभे असलेले कोवळे तरुण! त्यांना माहीत होते का की समोरच्या बंदुकीतून गोळी सुटणार आहे? कदाचित माहीत होते...
मग ते मागे का हटले नाहीत?
कारण त्यांच्या मनात एकच आवाज घुमत होता-“भारत स्वतंत्र झाला पाहिजे!”
त्या एका विचारासाठी त्यांनी मृत्यूला कवटाळले.
इतक्यावरही ब्रिटिशांची क्रूरता थांबली नाही.
या हुतात्म्यांचे मृतदेह अमानुषपणे गावापर्यंत फरफटत नेण्यात आले.
इतिहासातील हा प्रसंग आठवला तरी काळीज चिरते.
मांगरूळच्या मातीवर रक्त सांडले होते...
एका आईच्या कुशीतला मुलगा परतणार नव्हता...
एका घराचा आधार कायमचा हिरावला गेला होता...
पण त्या मातांनी अश्रू ढाळले असतील, तरी त्यांच्या अश्रूंमध्ये एक अभिमानही मिसळलेला होता—
“माझा मुलगा भारतमातेसाठी गेला!”
गोळीबारात ज्ञानू बाळा लुगडे यांच्या डाव्या पायाच्या मांडीत गोळी लागली. ते जखमी झाले.
त्यानंतर पोलिसांनी मोठी धरपकड सुरू केली. गावात पुन्हा धुमश्चक्री उडाली. ३९ प्रमुख कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली.
ब्रिटिशांना वाटले होते की आता बंडाची धग विझेल.
पण... धग विझली नाही!
कारण ही धग एखाद्या मशालीत नव्हती.
ती धग होती माणसांच्या रक्तात!
धोंडी संतू कुंभार आणि शंकर भाऊ चांभार यांचे बलिदान व्यर्थ गेले नाही. त्यांच्या रक्ताने मांगरूळच्या मातीला हुतात्म्यांची ओळख दिली. बिळाशीच्या बंडाने ब्रिटिशांच्या सत्तेला ग्रामीण महाराष्ट्रातील सामान्य माणूसही आव्हान देऊ शकतो, हे दाखवून दिले.
आज आपण स्वातंत्र्याचा श्वास घेतो.
मोकळेपणाने बोलतो. मोकळेपणाने फिरतो.
आपल्या देशाचा तिरंगा अभिमानाने फडकवतो.
पण या स्वातंत्र्याची किंमत काय होती?
कुठेतरी एखाद्या आईने आपला मुलगा गमावला होता...
कुठेतरी एखाद्या पत्नीने आपल्या पतीला गमावले होते... कुठेतरी एखाद्या घराचा चूल-धुराच कायमचा थांबला होता...
आणि मांगरूळच्या मातीत धोंडी संतू कुंभार आणि शंकर भाऊ चांभार यांचे रक्त सांडले होते!
आज त्यांच्या बलिदानाची आठवण झाली की एक प्रश्न मनाला छेदून जातो— आपण त्यांच्या त्यागाला न्याय देतोय का?
ज्या तरुणांनी स्वतःचे उद्याचे आयुष्य देशाच्या स्वातंत्र्यासाठी संपवले, त्या हुतात्म्यांचे स्मरण करणे ही केवळ औपचारिकता नाही.
तो आपला इतिहासाशी असलेला ऋणानुबंध आहे!
मांगरूळच्या डोंगरावर कधीतरी त्या गोळ्यांचा आवाज घुमला होता...
तो आवाज आजही इतिहासाच्या कानात घुमतो आहे.
त्या रस्त्यावर कधीतरी दोन तरुणांचे रक्त सांडले होते...
त्या रक्ताचा प्रत्येक थेंब आजही सांगतो आहे—
“भारतभूमीसाठी आम्ही मेलो; म्हणून तुम्ही आज स्वातंत्र्यात जगत आहात!”
म्हणूनच... मांगरूळच्या हुतात्म्यांना विसरू नका!
धोंडी संतू कुंभार आणि शंकर भाऊ चांभार यांची नावे केवळ इतिहासाच्या पानांवर राहू देऊ नका; ती प्रत्येक देशभक्ताच्या हृदयात जिवंत ठेवा!
बिळाशीच्या बंडातील प्रत्येक ज्ञात-अज्ञात क्रांतिकारकाला मानाचा मुजरा!
आणि... भारताच्या स्वातंत्र्यासाठी रक्ताचा शेवटचा थेंब अर्पण करणाऱ्या मांगरूळच्या त्या दोन नरवीरांना—
शतशः नमन! विनम्र अभिवादन!
जय हिंद!
Comments
Post a Comment