*मांगरूळचे आधारस्तंभ, लोकनेते आणि कुटुंबवत्सल व्यक्तिमत्त्व – रंगराव (बापू) भाऊराव पाटील यांना ९१व्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन*

*मांगरूळचे आधारस्तंभ, लोकनेते आणि कुटुंबवत्सल व्यक्तिमत्त्व – रंगराव (बापू) भाऊराव पाटील यांना ९१व्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन*


मनोजकुमार मस्के,मांगरूळ 

गावाचा इतिहास हा केवळ इमारती, रस्ते किंवा विकासकामांनी घडत नसतो; तर तो घडतो काही अशा व्यक्तिमत्त्वांमुळे, ज्यांच्या विचारांनी, निर्णयांनी, त्यागाने आणि माणुसकीने अनेक पिढ्या घडतात. मांगरूळ गावासाठी असेच एक अजातशत्रू, निस्वार्थी, रोखठोक, न्यायप्रिय आणि सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे *माजी तालुका पंचायत सदस्य श्री रंगराव (बापू) भाऊराव पाटील*.

आज बापूंनी आपल्या आयुष्याच्या *९१व्या वर्षात पदार्पण* केले आहे. त्यांच्या या वाढदिवसानिमित्त संपूर्ण मांगरूळ गावासाठी हा केवळ आनंदाचा दिवस नाही, तर एका प्रेरणादायी प्रवासाला सलाम करण्याचा क्षण आहे.

भारत स्वतंत्र होत असतानाचा काळ त्यांनी अनुभवला. स्वातंत्र्यानंतर देश उभा राहताना त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले. बदलत्या काळासोबत त्यांनी स्वतःला घडवले आणि गावाच्या विकासासाठी आयुष्य झोकून दिले. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावाच्या विकासाला दिशा दिली, अनेक लोकांना संधी दिली आणि नवीन नेतृत्व घडवण्याचे काम केले.

शिराळा पंचायत समितीचे माजी सदस्य म्हणून त्यांनी जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. मात्र पदाचा कधीही गर्व केला नाही. उलट अनेक पदे इतरांना देत स्वतः पडद्यामागे राहून गावाच्या हिताचे निर्णय घेत राहिले. त्यांच्या नेतृत्वशैलीची तुलना अनेकजण बाळासाहेब ठाकरे यांच्या 'रिमोट कंट्रोल' शैलीशी करतात. पद नसतानाही प्रभावी नेतृत्व कसे करायचे, याचे ते जिवंत उदाहरण आहेत.

बापूंची खरी ताकद म्हणजे *माणसं जोडण्याची कला*. गावातील अडीअडचणी, घरगुती वाद, कौटुंबिक प्रश्न किंवा सामाजिक तणाव—कोणतीही समस्या असो, बापूंनी ती शांतपणे, संयमाने आणि न्यायाने सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या निर्णयांवर गावकऱ्यांचा आजही तितकाच विश्वास आहे.

*पाच भाऊ आणि दोन बहिणींच्या मोठ्या कुटुंबाला* अनेक दशकांपासून एकसंघ ठेवणे हे आजच्या काळात अत्यंत दुर्मिळ उदाहरण आहे. एवढ्या मोठ्या परिवारात प्रेम, जिव्हाळा आणि एकोप्याची परंपरा टिकवून ठेवण्याचे श्रेय मोठ्या प्रमाणात बापूंना जाते. त्यांनी कधी कोणाकडून काही अपेक्षा ठेवली नाही; उलट प्रत्येक भावाच्या, कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या गरजा आणि सुख-दुःख स्वतःचे समजून आयुष्यभर साथ दिली.

बापू औपचारिक शिक्षणाने वकील नसले तरी गावात त्यांना *"न शिकलेले वकील"* म्हणून ओळखले जाते. कारण एखाद्या गुंतागुंतीच्या प्रश्नाचे मूळ समजून त्यावर न्याय्य आणि सर्वांना मान्य होईल असा तोडगा काढण्याचे विलक्षण कौशल्य त्यांच्याकडे आहे. त्यांच्या अनुभवाची, निरीक्षणशक्तीची आणि चाणक्यनीतीची आजही अनेकांना भुरळ पडते.

आज ९१ वर्षांच्या वयातही त्यांची स्मरणशक्ती तितकीच तल्लख आहे. त्यांनी आयुष्यात भेटलेल्या असंख्य व्यक्ती, घडलेल्या घटना, जुन्या आठवणी ते आजही अत्यंत रंगतदार आणि दिलखुलास शैलीत सांगतात. त्यांच्या अनुभवांच्या शिदोरीतून आजची तरुण पिढीही प्रेरणा घेत आहे.

मांगरूळ गावाने अनेक मान्यवर पाहिले, परंतु *"बापू"* हे नाव उच्चारताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आपुलकी, आदर आणि विश्वास दिसून येतो. त्यांनी आयुष्यभर माणुसकी जपली, समाजाला जोडले, न्याय दिला आणि निस्वार्थीपणे नेतृत्व केले. हेच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे सर्वात मोठे यश आहे.

*बापू, आपल्या आयुष्याचा हा प्रदीर्घ आणि प्रेरणादायी प्रवास आम्हा सर्वांसाठी दीपस्तंभ आहे. आपण निरोगी राहावे, आनंदी राहावे आणि आपल्या अनुभवांचा अमूल्य ठेवा पुढील पिढ्यांना लाभत राहावा, हीच ईश्वरचरणी प्रार्थना*.

*वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! शतायुषी व्हा, निरोगी राहा आणि आपले आशीर्वाद सदैव आम्हा सर्वांवर राहू द्या*.

Comments

Popular posts from this blog

उरीतील स्फोटात शाहुवाडीचा सुपुत्र शहीद; गोंडोली गावावर शोककळा

शिरशी गावच्या लोकनियुक्त पहिल्या सरपंच – सौ. स्मिताताई बापूराव भोसले

*शिराळा उत्तरच्या मातीत दोन दिवसांपूर्वी जे घडलं, ते फक्त निवडणूक नव्हतं*… *तो विश्वासाचा, नात्याचा आणि घराण्याच्या संस्कारांचा विजय होता*.