ग्रामपंचायत सदस्य झालो, सरपंच झालो, आता पुढे काय?
नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत गावातील पात्र मतदाराकडून सरपंचपदाची थेट निवडणूक झालेली आहे. त्यामुळे निश्चितच स्थिरता येईल, अशी आशा करण्यास हरकत नाही. आता या सरपंचांनी ग्रामपंचायतीच्या कारभाराकडे लक्ष देणे गरजेचे आहे. गावाच्या लोकांचे हित ज्यात सामावलेले आहे त्यांना प्राधान्य देणे गरजेचे राहील.
घटनेने सर्वांसाठी कायद्याची चौकट दिली आहे. राज्यात महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ नुसार ग्रामपंचायतीचा कारभार करावा लागतो. सरपंच आणि सर्व सदस्यांना आधी ग्रामपंचायत समजून घेणे गरजेचे आहे. जे अनुभवी आहेत, त्यांना बऱ्यापैकी माहिती असेल. तथापि, नव्याने नियुक्त झालेले तरुण सरपंच, सदस्य मोठ्या प्रमाणावर निवडून आले आहेत. त्यांचा उत्साह आणि ऊर्जा दांडगी आहे. या लोकांनी ग्रामपंचायत आणि त्याचा कारभार समजून घेणे गरजेचे आहे. त्यांच्यासाठी यशदा आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रशिक्षणाची सोय उपलब्ध केलेली असते.
नवनियुक्त सरपंच आणि सदस्यांनी या प्रशिक्षणास जाणे क्रम प्राप्त आहे. महाराष्ट्रात त्रिस्तरीय पंचायत राज प्रणाली आहे. यामध्ये ग्रामपंचायत शीर्षस्थानी आहे, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदाही त्याच व्यवस्थेचा भाग आहेत. यात तीनही स्तरांनी एकत्रितपणे सुसंवाद साधून गावामध्ये सेवांच्या माध्यमातून गावाचा विकास करणे गरजेचे आहे.
नवनियुक्त सरपंच आणि सदस्यांनी ग्रामपंचायतीमध्ये पाऊल ठेवल्यानंतर अगदी मनाशी संवाद साधून आपण एका मंदिरामध्ये प्रवेश करतो आहोत ही भावना ठेवणे गरजेचे आहे. ग्रामपंचायत हा राजकारणाचा आखाडा नसून गाव विकासाच्या मंदिराचे आपण विश्वस्त आहोत ही भावना मनात ठेवून काम करणे गरजेचे आहे. तरच ते काम निश्चित प्रभावी आणि लोकाभिमुख ठरेल.
गावाच्या समस्यांची वार्डनिहाय यादी करावी. त्या समस्यांचा प्राधान्य क्रम ठरवावा लागेल. गावाची लोकसंख्या आणि इतर माहिती लिहून घ्यावी. गावातील वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या व समाजीक कामाचीआवड असणाऱ्या लोकांचे फोन नंबर प्रत्येक सदस्या जवळ घ्यावे.
गावातील शासकीय अधिकारी, कर्मचारी, परिसरातील उद्योग व्यवसाय याचे ज्ञान सरपंच आणि सदस्यांना असले पाहिजे. त्याचप्रमाणे तालुका आणि जिल्हा स्तरावरील विभाग आणि विभाग प्रमुख अधिकारी आणि पदाधिकारी यांची देखील माहिती आवश्यक आहे. त्यांचे फोन नंबर असणे गरजेचे आहे. काही यशस्वी सरपंचांच्या कामाचा अभ्यास केला असता त्यांच्या डायरीमध्ये या सर्व नोंदी असतात आणि त्या सातत्याने अद्ययावत देखील केल्या जातात.
*मनोजकुमार मस्के*-मांगरूळ
Comments
Post a Comment