भावपूर्ण श्रद्धांजली – अॅ. के. डी. पाटील दादा

*भावपूर्ण श्रद्धांजली – अॅ. के. डी. पाटील दादा*

*मनोजकुमार मस्के, मांगरूळ* 
मांगरूळ गावात एखाद्या व्यक्तीच्या जाण्याने इतकं मोठं पोकळी निर्माण होऊ शकते, याचा अनुभव आज संपूर्ण गाव घेत आहे. आमचे सर्वांचे मार्गदर्शक, प्रामाणिक, सडेतोड स्वभावाचे आणि प्रत्येकाच्या अडचणीत धावून जाणारे अॅड. के. डी. पाटील दादा अचानक आपल्यातून निघून गेले आणि मांगरूळ गावावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांच्या जाण्याची बातमी ऐकून प्रत्येकाच्या मनाला धक्का बसला. ज्या माणसाने आयुष्यभर इतरांसाठी उभं राहून न्याय मिळवून दिला, तो माणूस आज अचानक सगळ्यांना सोडून गेला, ही गोष्ट अजूनही मन मान्य करायला तयार नाही.
दादा म्हणजे प्रामाणिकपणाचं दुसरं नाव. मनात असेल ते थेट ओठावर आणणारा त्यांचा स्वभाव. कुणाचं वाईट नको, पण चूक असेल तर ती चूक आहे असं सरळ सांगायचं धाडस फार थोड्या लोकांमध्ये असतं. दादांकडे ते धाडस होतं. गावातील अनेक मोठे पुढारीसुद्धा त्यांच्या स्पष्ट आणि अभ्यासू बोलण्यापुढे दबकून असायचे. कारण दादा कोणताही विषय फक्त ऐकीव माहितीवर बोलत नसत; त्या विषयाचा सखोल अभ्यास करून, पुरावे आणि संदर्भ घेऊनच ते आपली भूमिका मांडायचे.
गावातील हुतात्मा स्मारकाच्या संदर्भात त्यांनी कितीतरी पुस्तके चाळली, जुने संदर्भ शोधले आणि त्या आधारे गावातील एका व्यक्तीला स्वातंत्र्यसैनिक म्हणून पेन्शन सुरू करून दिली. एखाद्या विषयासाठी इतका प्रामाणिक अभ्यास करून काम करणारी माणसं आज फारच कमी दिसतात. पण दादा असेच होते – अभ्यासू, चिकाटीने काम करणारे आणि न्याय मिळवून देण्यासाठी लढणारे.
दादांच्या आयुष्यातही अनेक दुःखाचे प्रसंग आले. त्यांच्या धर्मपत्नी त्यांना अगोदरच सोडून गेल्या होत्या. अनेक वर्ष दादांनी आपल्या पत्नीची अतिशय मनापासून सेवा केली होती. त्या गेल्यानंतरही त्यांनी आयुष्य धैर्याने पुढे नेले. त्यांच्या दोन मुलांनीही वडिलांचे संस्कार जपले. मिलिंद आणि मकरंद – दोघेही सभ्य आणि संस्कारी. मिलिंद तर वडिलांची सेवा म्हणजे काय असते याचं जिवंत उदाहरण आहे. डायबिटीजसारख्या आजाराने त्रस्त असलेल्या वडिलांची त्याने मनापासून सेवा केली. स्वतःच्या आयुष्याची वाटचाल करत असतानाच त्याने वडिलांची काळजी घेतली. त्या सेवेमागची भावना शब्दांत सांगणे कठीण आहे.
दादा काही दिवसांपासून आजारी असल्यामुळे कोल्हापुरात राहात होते. पण आजारपणातही त्यांचं मन गावातच असायचं. गावातील प्रत्येक हालचालीवर त्यांचं लक्ष असायचं. एखादी बातमी वाचली की लगेच फोन करून म्हणायचे, “पत्रकार, मुद्दा चांगला लिहिलाय, पण अजून हा बदल केला असता तर अजून छान झाला असता.” कधी एखादा मुद्दा चुकीचा वाटला तर तेही स्पष्टपणे सांगायचे. त्यांचा फोन आला की तासन्तास गप्पा रंगायच्या. जुन्या आठवणी, गावातील घडामोडी, इतिहास – सगळ्यावर चर्चा व्हायची. त्या गप्पांमध्ये वेळ कसा जायचा कळतही नसे.
आज त्या गप्पा थांबल्या आहेत…
आज तो फोन येणार नाही…
“पत्रकार, ही बातमी अजून चांगली होऊ शकते” असं सांगणारं माणूस आज आपल्या सोबत नाही.
आयुष्यात आपण किती कमावलो, किती पदं मिळवली यापेक्षा आयुष्यात चांगली माणसं गमावण्याचं दुःख खूप मोठं असतं. दादा हे असंच एक चांगलं, मनमिळावू आणि धाडसी व्यक्तिमत्त्व होतं. त्यांच्या जाण्याने मांगरूळ गावाने एक मार्गदर्शक गमावला आहे.
यापुढे लिहिलेल्या बातमीला दाद देणारा माणूस नसेल. “हे तुमच्याशिवाय कोण करू शकणार नाही” असं प्रेमाने सांगणारा आवाजही नसेल. पण त्यांच्या आठवणी मात्र कायम जिवंत राहतील. त्यांनी दिलेला सल्ला, त्यांनी दाखवलेला प्रामाणिकपणाचा मार्ग आणि गावासाठी केलेले कार्य हे सगळं कायम स्मरणात राहील.
दादा, तुमची उणीव प्रत्येक क्षणी जाणवेल.
तुमची आठवण येत राहील… आणि येतच राहील.
अॅड. के. डी. पाटील दादा यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

Comments

Popular posts from this blog

शिरशी गावच्या लोकनियुक्त पहिल्या सरपंच – सौ. स्मिताताई बापूराव भोसले

*शिराळा उत्तरच्या मातीत दोन दिवसांपूर्वी जे घडलं, ते फक्त निवडणूक नव्हतं*… *तो विश्वासाचा, नात्याचा आणि घराण्याच्या संस्कारांचा विजय होता*.

*सोंडोलीमध्ये रंगणार दोन महाराष्ट्र केसरींची तुफानी दंगल देवा थापा स्पर्धेचे खास आकर्षण*