पुण्यनगरीचे पत्रकार पै. मनोज मस्के सर – वाढदिवस विशेष लेख
पुण्यनगरीचे पत्रकार पै. मनोज मस्के सर – वाढदिवस विशेष लेख
✍️ पै. अशोक सावंत पाटील
— सोंडोली —
शिराळा तालुक्यातल्या मांगरूळ या आपल्या छोट्याशा खेड्यात जन्मलेलं एक लेकरू… पण मन मात्र डोंगराएवढं मोठं. कुस्ती भूषण पुरस्काराचे मानकरी, दै. पुण्यनगरी चे पत्रकार, “कुस्ती हेच जीवन”चे शिराळा तालुका अध्यक्ष व राज्य प्रतिनिधी, श्री स्वामी समर्थ सामाजिक संस्था मांगरूळ चे संस्थापक अध्यक्ष, शिराळा तालुका मराठी पत्रकार संघाचे सदस्य, संत रोहिदास चर्मकार संघटनेकडून जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित… आणि दोस्तीतला अगदी जिवाभावाचा, पोटातलं ओठावर बोलणारा सरळ माणूस — आपले पै. मनोज मस्के सर! आज त्यांचा वाढदिवस.
हा लेख फक्त वाढदिवसाच्या शुभेच्छांचा नाही; तर एका लेकराच्या संघर्षाचा, वडिलांच्या सावलीत वाढलेल्या संस्कारांचा आणि एका कुटुंबाचा कणा बनलेल्या माणसाचा आहे.
तालमीत वाढलेलं बालपण
मस्के सरांचं बालपण मुंबईत गेलं, पण त्यांच्या अंगातली माती गावाकडचीच. मुंबईतील श्री राजाशिवछत्रपती व्यायाम शाळा इथेच त्यांचं लहानपण घडत गेलं. त्यांचे वडील कै. बबन मस्के (आण्णा) तिथे वस्ताद होते. फारच शिस्तीचे. त्यांच्या नजरेतून काही सुटायचं नाही.
घरातसुद्धा तालमीचीच शिस्त. वेळेवर उठायचं, सराव करायचा, अभ्यास करायचा. त्यामुळे शिस्त, मेहनत आणि प्रामाणिकपणा हे गुण मनोज सरांना आपोआप अंगवळणी पडले. वडील स्वतः सराव घ्यायचे, म्हणून मुंबईत त्यांनी अनेक कुस्ती स्पर्धा खेळल्या. हरलो तरी चालेल, पण झुकायचं नाही — हा बाणा त्यांना तिथेच मिळाला.
आयुष्य बदलून टाकणारा प्रसंग
सन 2009 साली वडील बीएसटीमधून निवृत्त झाले. घरात सगळं सुरळीत चाललं होतं. पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं. अवघ्या काही दिवसांत हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने वडिलांचं निधन झालं.
तालमीत व्यायाम करताना त्यांना ब्रेन ट्यूमरचा झटका आला. लंगोट लावून, अंगावर माती घेतलेले आण्णा त्या मातीतच कोसळले… आयुष्यभर ज्या मातीत घाम गाळला, त्याच मातीत त्यांनी शेवटचा श्वास घेतला.
तो प्रसंग मस्के सरांच्या आयुष्यात काळ्या अक्षरांनी कोरला गेला. एका क्षणात डोक्यावरचं वडिलांचं छत्र हरपलं. घरात शांतता… आईच्या डोळ्यात अश्रू… आणि मनोज सरांच्या मनात एकच विचार — “आता मीच घराचा आधार.”
क्षणात होत्याचं नव्हतं झालं, पण ते खचले नाहीत. डोळ्यातलं पाणी पुसलं आणि जबाबदारी खांद्यावर घेतली.
समाजसेवेची परंपरा जपणारा वारस
वडिलांना समाजसेवेचं वेड होतं. गावातले कार्यक्रम, नवरात्रीत नऊ दिवस फराळ वाटप, यात्रेत सरबत, अन्नदान, शाळकरी मुलांना वह्या — हे सगळं त्यांनी मनापासून केलं.
वडील गेल्यावर अनेकांना वाटलं, आता हे सगळं थांबेल. पण मनोज सरांनी एकही उपक्रम बंद पडू दिला नाही. उलट आणखी जोमाने ते पुढे चालू ठेवले.
गावातल्या गरीबांच्या चेहऱ्यावर हास्य यावं, एवढीच त्यांची अपेक्षा. कुणी मदतीला आलं की ते स्वतः पुढे. प्रसिद्धीची हाव नाही, फोटोची अपेक्षा नाही — मनापासून सेवा करायची, एवढंच तत्त्व.
कुटुंबासाठी घेतलेला मोठा निर्णय
वडिलांच्या निधनानंतर घरची संपूर्ण जबाबदारी मनोज सरांवर आली. बहिणीचं लग्न झालेलं होतं. दोन भाऊ — अमर मस्के इंडियन आर्मीत, आणि किरण मस्के मेडिकल क्षेत्रात.
मुंबईतील दैनिक पुढारी मधील चांगली नोकरी सोडून त्यांनी गावी राहण्याचा निर्णय घेतला. आजच्या काळात अशी त्यागाची तयारी क्वचितच दिसते.
भावांवर विश्वास ठेवून, कुटुंब एकत्र ठेवण्याचा निर्धार त्यांनी केला. आज त्या तिघा भावांमधलं प्रेम आणि विश्वास पाहिला की खरंच डोळ्यात पाणी येतं. एकमेकांच्या यशात आनंद मानणारी ही भावंडं म्हणजे खऱ्या अर्थाने कुटुंबाची ताकद.
कुस्ती हेच जीवन – त्यांचा ध्यास
गेल्या अनेक वर्षांपासून “कुस्ती हेच जीवन” या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रातल्या कुस्तीला व्यासपीठ दिलं. कुस्ती हेच जीवन महासंघ महाराष्ट्र राज्य चे संस्थापक पै. रामदास देसाई यांच्या खांद्याला खांदा लावून ते काम करत आहेत.
शिराळा, शाहूवाडी, वाळवा तालुक्यातील अनेक पैलवानांची कीर्ती समाजासमोर मांडली. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना “कुस्ती भूषण” पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. संत रोहिदास चर्मकार संघटनेकडून जीवन गौरव पुरस्कारही मिळाला.
पण खरं सांगायचं तर त्यांना पुरस्कारापेक्षा जास्त आनंद असतो तो एखाद्या गरीबाच्या चेहऱ्यावर उमटलेल्या समाधानाच्या हास्यात.
लेखणी आणि कॅमेऱ्याची ताकद
पत्रकार म्हणून त्यांनी अनेक प्रश्न समाजासमोर आणले. माळेवाडीतील चार अनाथ मुलांची व्यथा त्यांनी आपल्या यूट्यूब चॅनेल “वारणा एक्सप्रेस” व पेपरमधून जगासमोर मांडली. समाजातून मदतीचा ओघ आला आणि त्या मुलांना घर मिळालं.
गुढेपाचगणी येथील पवनचक्की कंपनीतील कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी आवाज उठवला. अन्यायाविरुद्ध उभं राहणं हेच त्यांचं ब्रीद.
मनाचा मोठेपणा
मस्के सरांचं खरं मोठेपण त्यांच्या साधेपणात आहे. ते स्पष्ट बोलतात, पण मन मात्र सोन्यासारखं आहे. मित्रासाठी धावून जाणारा, समाजासाठी झटणारा, आणि कुटुंबासाठी भक्कम उभा राहणारा हा माणूस खऱ्या अर्थाने प्रेरणादायी आहे.
आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त एवढीच मनापासून प्रार्थना —
पवनपुत्र हनुमानाच्या चरणी हात जोडून परमेश्वर त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि समाजसेवेची अजून ताकद देवो.
🎂 कुस्ती हेच जीवन महासंघाच्या वतीने पै. मनोज मस्के सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
तुम्ही शतायुषी व्हा…
तुमच्या कुटुंबातील एकी अशीच राहो…
आणि तुमच्या लेखणीतून समाजाचा आवाज कायम घुमत राहो…
धन्यवाद 🙏
✍️ पै. अशोक सावंत पाटील
अध्यक्ष – शाहूवाडी तालुका
कुस्ती हेच जीवन महासंघ महाराष्ट्र राज्य
मो. 9702984006
Comments
Post a Comment