*“जनशक्ती हरली, पण माणूस हरला नाही…”*


*“जनशक्ती हरली, पण माणूस हरला नाही…”*
*मनोजकुमार मस्के, मांगरूळ*

नुकत्याच हाती आलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निकालांनी मनाला अक्षरशः चटका लावला. कोकरूड जिल्हा परिषद उमेदवार विनोद पन्हाळकर आणि पंचायत समितीचे उमेदवार प्रमोद पाटील — सामान्य कुटुंबातून आलेली ही दोन नावं आज आकड्यांत हरली असली, तरी लोकांच्या हृदयात त्यांनी अढळ जागा निर्माण केली आहे.
ही केवळ निवडणूक नव्हती. हा दोन गरीब घरांत जन्मलेल्या पोरांचा स्वाभिमानाचा संघर्ष होता. गेले कित्येक दिवस पायाला भिंगरी बांधून, अंगातला जीव रानात घालून, कधी अन्नाचा कणही न खाता त्यांनी रात्रंदिवस एक केलं. गावागावांत फिरून, माणसांच्या डोळ्यात डोळे घालून त्यांनी मत नव्हे तर विश्वास मागितला. विकासाच्या गप्पा नव्हत्या, तर वेदनांची भाषा होती. आणि तरीही… निकाल वेगळाच लागला.
आज खरंच असं वाटतं — धनशक्तीपुढे जनशक्ती हरली. राजकीय वारसा आणि साठवून ठेवलेला पैसा यांच्या भिंतीपलीकडे सामान्य माणसाची किंमत किती नगण्य आहे, हे या निकालांनी पुन्हा एकदा ठसठशीतपणे दाखवून दिलं. जनता कितीही ठरवो, पण सत्तेच्या आणि पैशाच्या पुढे गरिबाला विचारणार तरी कोण?
मला इतर विजयी उमेदवारांविषयी फारसं बोलायचं नाही. कारण हा लेख विजयाचा नाही, तर पराभवातली आग सांगणारा आहे. या दोन लढवय्यांचा पराभव म्हणजे केवळ दोन उमेदवार पडले असं नाही, तर लोकशाही कुठेतरी अंधारात हरवते आहे, अशी भीती मनात घर करून बसली आहे.
आजही अनेकांच्या मनात हीच ठाम धारणा आहे की “सामान्य माणूस विकास करू शकत नाही.” पण गेल्या कित्येक दिवसांत आम्ही या दोन्ही मुलांना गावगाडा हाकताना पाहिलं आहे. लोकांची दुःखं ऐकताना, प्रश्न समजून घेताना, उपाय शोधताना पाहिलं आहे. पक्षानेही एकदा धाडस केलं होतं — सामान्यातल्या सामान्य माणसाला तिकीट दिलं होतं. पण निवडणूक म्हणजे केवळ विचारांची लढाई नसते, ती पैशांची रणभूमी असते, हे पुन्हा सिद्ध झालं.
निवडणुकीसाठी पैसा लागतो म्हणून घरातले दागिने गहाण ठेवून, बारीक-सारीक खर्च कसाबसा भागवणारी ही मुलं आज हरलीत. हे सत्य आहे. पण खरं सांगायचं तर ती पराभूत नाहीत. त्यांनी रणांगणावर आपला पराक्रम दाखवला. भित्र्या भागुबाईसारखं पळून न जाता, छत्रपतींच्या मावळ्यासारखी छातीची ढाल आणि पाठीची तलवार करून त्यांनी लढा दिला.
लढाईत त्यांचं “पाणी” झालं की “केलं” हा संशोधनाचा विषय असेल. पण एक गोष्ट निर्विवाद आहे — त्यांनी मैदान मारलं. त्यांनी प्रेक्षकांची, म्हणजेच जनतेची मनं जिंकली. आणि खरं तर यातच सर्व काही आहे.
आज पुन्हा एकदा पैसा आणि वारसा यांच्यापुढे सामान्य माणूस फिका पडला, हे कटू सत्य समोर आलं आहे. या निवडणुकींनी एक स्पष्ट संदेश दिला — तुमच्याकडे कर्तृत्व असो वा नसो, पण वारसा किंवा पैसा नसेल तर तुमची वाट अवघड आहे.
तरीही… डोळ्यांत पाणी आणणारी एकच आशा आहे. ही मुलं हरली असली तरी झुकलेली नाहीत. आज नाही तर उद्या, हीच जनशक्ती पुन्हा उभी राहील. कारण इतिहास सांगतो — प्रत्येक मोठा बदल आधी अश्रूंमधूनच जन्म घेतो.
आणि आज हे अश्रू केवळ दुःखाचे नाहीत… ते उद्याच्या संघर्षाचे बीज आहेत.

Comments

Popular posts from this blog

अभ्यास करून पोराला IAS, IPS बनवायचं अन् कराड-खोक्याभाई त्याची नियुक्ती करणार?, मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र व्हायरल

शिरशी गावच्या लोकनियुक्त पहिल्या सरपंच – सौ. स्मिताताई बापूराव भोसले

*केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याशी झालेली भेट आणि आलेला अनुभव*....