*“संघर्षातून घडलेला अभिमानाचा वारसा”*

*“संघर्षातून घडलेला अभिमानाचा वारसा”*
मांगरूळ गावचा आधारवड, कष्टांची मूर्ती, संघर्षाचा जिवंत इतिहास असलेले *ज्ञानदेव रामचंद्र मस्के* — सर्वांचे लाडके *डी. आर. मस्के आप्पा*, शुक्रवार दि. 06/02/ 2026 रोजी, अल्पशा आजाराने आपल्यातून कायमचे निघून गेले. वय वर्षे 65. त्यांच्या जाण्याने मांगरूळ गावचं नव्हे तर एका संपूर्ण संघर्षयात्रेचं पान बंद झालं.
उंचीने थोडेसे ठेंगणे असले तरी विचारांनी, बुद्धीने आणि जिद्दीने ते डोंगराएवढे होते. शिक्षण फारसं झालं नव्हतं, पण अनुभव, अभ्यास आणि व्यवहारज्ञान इतकं प्रखर होतं की मोठमोठ्या शिकलेल्या अधिकाऱ्यांनाही लाजवेल असं त्यांचं बोलणं असायचं. आयुष्याची सुरुवात गिरणी कामगार म्हणून झाली. मेहनत केली, घाम गाळला… पण संपाच्या आंदोलनात नोकरी गेली. त्या क्षणी अनेकजण खचले असते, पण *डी. आर. आप्पा कधीच हार मानणाऱ्यातले नव्हते*.
नोकरी गेल्यावर ते गावी परतले. वडिलोपार्जित शेती कसू लागले. गरिबी होती, अडचणी होत्या, पण घरात परमेश्वराने दोन लक्ष्मी दिल्या — दोन मुली. त्यांच्या संगोपनाची जबाबदारी, आई-वडील, पत्नी… सगळ्यांचं ओझं एकट्या डी. आर. आप्पांच्या खांद्यावर होतं. घरात कधी पुरेसं अन्न नसे, अंगावर नीट वस्त्र नसे. मुलींना आवडेल असा ड्रेस घेता येत नसे, बायकोला आवडेल अशी साडी देता येत नसे… पण एक वाक्य ते नेहमी म्हणायचे —
*“आज नाही जमलं तरी चालेल, पण उद्या ही परिस्थिती बदलायचीच.”*
मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी स्वतःच्या वाट्याची जमीन विकली. घरात असलेलं-नसलेलं, थोडाफार बँक बॅलन्स, दागदागिने — सगळं पणाला लावलं. स्वतःसाठी काहीच उरवलं नाही.
पण मुलींनीही आपल्या बापाच्या घामाचं मोल ओळखलं. पैशांची चणचण असूनही त्यांनी मन लावून अभ्यास केला. आणि मग एक दिवस तो चमत्कार घडला…
एक मुलगी *राज्य विक्रीकर अधिकारी* परीक्षेत राज्यात *पहिली* आली. दुसरी मुलगी *राज्य विक्रीकर निरीक्षक* झाली.
तो दिवस डी. आर. आप्पांसाठी आयुष्यातला सर्वात मोठा विजय होता. डोळ्यात अश्रू, ओठांवर हसू आणि छातीत अभिमान…
ते अभिमानाने सांगायचे —
*“माझ्या मुली डेप्युटी कलेक्टरपेक्षा कमी नाहीत.”*
खरंतर तेव्हाच त्यांच्या सुखाचे दिवस सुरू व्हायला हवे होते. पण नियतीला ते मान्य नव्हतं. आयुष्यभर दुःखाचं ओझं वाहणाऱ्या या माणसाला थोडंसं सुख पाहायचं होतं… पण काळाने पुन्हा घाव घातला.
नेहमी चालत-फिरत असलेले, हसतमुख आप्पा अचानक आजारी पडले. हॉस्पिटल, उपचार, आशा… आणि मग निराशा. घरी आणल्यानंतर योग्य उपचार सुरू होते, पण शरीर साथ देईना. हळूहळू त्यांची तब्येत खालावत गेली.
आणि अखेर…
आपल्या पत्नीला, मुलींना, संपूर्ण परिवाराला आणि मांगरूळ गावाला रडवून डी. आर. आप्पा शांतपणे निघून गेले.
आज त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन कर्तबगार मुली असा परिवार आहे —
*राज्य विक्रीकर अधिकारी नम्रता मस्के आणि
विक्रीकर निरीक्षक श्रद्धा मस्के यांचे ते अभिमानी वडील होते*.

डी. आर. आप्पा गेले… पण त्यांनी दिलेली शिकवण, कष्टांची कहाणी आणि संघर्षातून उभं केलेलं यश *कधीच मरणार नाही*.
असा बाप प्रत्येकाला लाभावा…
असा संघर्ष फार थोड्यांच्या वाट्याला येतो…
आणि असा माणूस — *खरंच फार लवकर निघून गेला*.
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

Comments

Popular posts from this blog

अभ्यास करून पोराला IAS, IPS बनवायचं अन् कराड-खोक्याभाई त्याची नियुक्ती करणार?, मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र व्हायरल

शिरशी गावच्या लोकनियुक्त पहिल्या सरपंच – सौ. स्मिताताई बापूराव भोसले

*केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याशी झालेली भेट आणि आलेला अनुभव*....