भाजप महाराष्ट्र राज्य परिषद सदस्यपदी पाडळेवाडीचे कृष्णा पाटील यांची नियुक्ती.


भाजप महाराष्ट्र राज्य परिषद सदस्यपदी पाडळेवाडीचे कृष्णा पाटील यांची नियुक्ती 


मांगरूळ, वार्ताहर:
शिराळा तालुक्यातील पाडळेवाडी गावचे सुपुत्र, सध्या मुंबईतील घणसोली येथील रहिवासी आणि भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते तसेच माजी महामंत्री कृष्णा बापू पाटील यांची भाजप महाराष्ट्र राज्य परिषदेच्या सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. बुधवारी जाहीर करण्यात आलेल्या भाजप राज्य परिषदेच्या ४५४ सदस्यांच्या यादीत त्यांच्या नावाचा समावेश आहे.

या नियुक्तीनंतर पाटील यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून, भाजपचे पदाधिकारी गणेश सकपाळ तसेच सामाजिक कार्यकर्ते अभिजीत पाटील यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

राजकारणात १५ वर्षांची निष्ठावान सेवा

कृष्णा पाटील हे मागील १५ वर्षांपासून भाजपमध्ये कार्यरत असून, संघटनेच्या विविध पदांवर त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे. त्यांच्या पत्नीही भाजपच्या तिकिटावर निवडून नगरसेविका झाल्या होत्या. त्यांच्या कार्यकाळात रात्र निवारा केंद्र, ग्रंथालय, नागरी आरोग्य केंद्र अशा मूलभूत सुविधांची उभारणी करण्यात आली, ज्याचा थेट फायदा सामान्य जनतेला झाला.

सामाजिक, आध्यात्मिक आणि पर्यावरणपूरक उपक्रमांत पुढाकार

कृष्णा पाटील यांनी राजकीय जबाबदाऱ्यांबरोबरच सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्रातही मोठे योगदान दिले आहे. हरिनाम सप्ताह यासारख्या धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून त्यांनी समाजातील सर्व घटकांना एकत्र आणण्याचे कार्य केले आहे.
स्वच्छता अभियान, वृक्षलागवड, पाणी वाचवा मोहिम, जनजागृती शिबिरे अशा उपक्रमांद्वारे त्यांनी जनतेमध्ये पर्यावरण व सामाजिक विषयांबद्दल जागरूकता निर्माण केली आहे.

घणसोली व नवी मुंबईत मजबूत संपर्क जाळं

घणसोली परिसरातील तसेच संपूर्ण नवी मुंबईतील अनेक घटकांशी पाटील यांचे सलोख्याचे संबंध आहेत. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे स्थानिक पातळीवर भाजपचा प्रभाव वाढल्याचे स्पष्टपणे दिसून येते. त्यांचे नेतृत्व, कार्यकुशलता आणि जनसंपर्क कौशल्य यामुळेच त्यांची राज्य पातळीवर दखल घेतली गेली आहे.

कृष्णा पाटील यांची प्रतिक्रिया

आपल्या निवडीबाबत प्रतिक्रिया देताना कृष्णा पाटील म्हणाले,
"ही निवड माझ्या आजवरच्या सामाजिक कार्याची पावती आहे. मी आणखी जोमाने समाजकार्य करणार आहे. गरजू आणि उपेक्षित लोकांपर्यंत पोहोचून त्यांना न्याय देणे हे माझे प्रमुख ध्येय राहील."
त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, प्रदेश कार्यकारी मंडळ, वनमंत्री गणेश नाईक, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष आभार मानले.
ही निवड केवळ त्यांच्या कार्याची दाद नाही, तर भविष्यात अधिक मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडण्याचा विश्वास पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर दाखवलेला आहे. 

Comments

Popular posts from this blog

अभ्यास करून पोराला IAS, IPS बनवायचं अन् कराड-खोक्याभाई त्याची नियुक्ती करणार?, मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र व्हायरल

शिरशी गावच्या लोकनियुक्त पहिल्या सरपंच – सौ. स्मिताताई बापूराव भोसले

*शिराळा उत्तरच्या मातीत दोन दिवसांपूर्वी जे घडलं, ते फक्त निवडणूक नव्हतं*… *तो विश्वासाचा, नात्याचा आणि घराण्याच्या संस्कारांचा विजय होता*.