मंगरूळ यात्रेनिमित्त खास
नमस्कार मित्रांनो थोड्याच दिवसात आपल्या गावची यात्रा येणार आहे. खरंतर यात्रा म्हटलं की आनंद आणि जवळपास पोटापाण्यासाठी बाहेर गेलेल्या सर्वच गावकऱ्यांचे त्यानिमित्ताने आपल्या गावाकडे येणं होतं. गावात सगळेच बाहेरगावी गेलेले मुळ गावात आल्याने एक आनंद निर्माण होतो. खरंतर यात्रा यासाठीच केल्या जातात. पै, पाहुणे, मित्रमंडळी आजूबाजूच्या गावातील आपल्या ग्रामदैवतावर प्रेम करणारे अनेक भक्तगण असे सर्वच या दिवशी आपल्या गावात खरोखर एक आनंदाचं वातावरण असतं. मला आपणाला सांगायचे एवढेच आहे आज यात्रेच्या नावाखाली आपण वर्गणी जमा करतो. खरंतर गोळा केलेली वर्गणी आपण कोणतेही चांगल्या कामासाठी वापरतो का? याचा गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. बाहेरील पैलवान आणून आपल्या गावात लढवायचे आणि लाखो रुपये त्यांच्यावरती उधळायचे ही गोष्ट तात्पुरता आनंद देणारी असेल कदाचित परंतु आपल्याच गावातील शाळेतील मुलांना आपण बऱ्यापैकी सोयीसुविधा पुरवतोय का? हेही पाहणं गरजेचं आहे की नाही. मला वाटतं कदाचित आपण गोळा केलेली रक्कम मंदिर परिसरातील सुशोभीकरणासाठी आपण वापरतोय का? किंवा बाहेरून येणाऱ्या भक्तगणांना आपण त्या स्वरूपाच्या सेवा सुविधा पुरवतो का? प्रामुख्याने पाहणे गरजेचे आहे. मग आपण हे करत नसेल तर आपण नेमकं काय करतोय हे थोडं पाहणं गरजेचं आहे. गावच्या यात्रेचे पोस्टर पाहिले की अनेक दानतदार व्यक्ती त्याच्यावरती मोठाल्या रकमा देताना दिसतात. मला वाटतं त्यांनाही आपल्या गावातील काही ठराविक प्रश्न दिसले पाहिजेत की नाही. गावच्या यात्रेची रक्कम जवळपास तीन चार लाखाच्या आसपास जमा होत असेल. मग गाव पुढाऱ्यांनी ठरवायचं या रकमेचं काय करायचं. बरं गावातली जमा झालेली वर्गणी अवघ्या दोन तासात स्मारक मधल्या आखाड्यातल्या मातीत संपून जाते याव्यतिरिक्त यात्रेत आपण कोणत्या गोष्टीवर खर्च करतो. मला वाटतं यातील थोडी रक्कम आपण चिंचेश्वर मंदिराच्या मागील बाजूस परगावाहून येणाऱ्या लोकांना उजेड करून दिला तर चालणार नाही का? हुतात्मा स्मारकात यात्रे दिवशी लाईटची व्यवस्था करून एक व्यक्ती पगारावर देऊन पार्किंग व्यवस्थित लावून घेतलं तर चालणार नाही का? प्रत्येक वर्षी यात्रेतील दुकानदारांची जागेवरून भांडण असतात प्रत्येकाला नियमाप्रमाणे आखून जागा दिली आणि यात्रा कमिटीने एक ठराविक वर्गणी ठेवली तर चालणार नाही का? मंदिरामध्ये परगावावरून येणारी लोक नैवेद्य घेऊन गर्दी करत असतात व्यवस्थित रांग लावली तर ती चालणार नाही का? यात्रेच्या दुसऱ्या दिवशी माता भगिनी दर्शनासाठी जात असतात त्यावेळी गावातील अनेक तरुण दमदाटी करत मोटरसायकल घेऊन जातात यावेळी अनेकांना त्याचा त्रास होतो मग या गोष्टी यात्रा कमिटीतील लोकांना दिसत नाहीत का? या सर्व गोष्टी यात्रा कमिटी का करत नाही. शिवाय गावातील वर्गणीतील काही रक्कम एखादा चांगला आणि सर्वांना पाहता येईल असा सांस्कृतिक कार्यक्रम घेणे गरजेचे असताना याकडे का दुर्लक्ष केले जाते. एवढ्या वर्षात यावर कधी विचार झाला नाही किमान यावर्षी तरी या सर्व गोष्टींवर ती विचार होईल का? आणि हो काहींना लागेल पण बोलणं गरजेचं आहे गावातील अनेक पैलवान खर्चो अभावी बाहेर खेळू शकत नाहीत त्या मुलांना गावात तालीम आणि तीही सर्व सोयनियुक्त असावी असं गावकऱ्यांना वाटत नाही का? आणि जर वाटत असेल तर यात्रेत एक लाख रुपये ची कुस्ती लावून साध्य होणार आहे का? गांभीर्याने विचार करा आणि जसं हवं तसं वागा धन्यवाद!
निलेश मस्के पाटील
सामाजिक कार्यकर्ते
Comments
Post a Comment