मा मंत्री मा. शिवाजीराव नाईक (साहेब) वाढदिवस विशेष*....
*माजी राज्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष, शिराळा तालुक्याचे भाग्यविधाते मा. शिवाजीराव नाईक (साहेब) वाढदिवस विशेष*
✍️ पै. मनोज मस्के, पत्रकार
शिराळा तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात "नाईक साहेब" म्हटलं की डोळ्यासमोर उभं राहतं ते एक कणखर, अभ्यासू, पण तितकंच हळवं नेतृत्व. आज त्या लढवय्या नेत्याचा वाढदिवस. हा दिवस म्हणजे फक्त वाढदिवस नाही, तर एका संघर्षमय प्रवासाचा उत्सव आहे.
१९९५ साल… तालुक्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. एक नेता आणि एक जिवाभावाचा कार्यकर्ता – दोघांच्या वाटा वेगळ्या झाल्या. त्या वेळी अनेकांनी एका प्रामाणिक कार्यकर्त्याला सहज बाजूला करण्याचा प्रयत्न केला. “हा काय पुढे जाणार?” असा सवालही झाला. पण अपमानाची ज्वाला किती भयंकर असते, याचा प्रत्यय तालुक्याने पहिल्यांदाच घेतला.
चिमटीत धरून बाहेर काढलेला तो कार्यकर्ता शांत बसणाऱ्यांपैकी नव्हता. जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास या भांडवलावर तो उभा राहिला. संघर्षाच्या आगीत तावून सुलाखून निघाला. आणि मग जे व्हायचं तेच झालं…
कार्यकर्ता आमदार झाला, आमदार मंत्री झाला!
नाव तेच – पण ओळख वेगळी झाली. निवडणूक तीच – पण पक्ष वेगळे. संघर्ष तोच – पण विजय ऐतिहासिक!
तालुक्याच्या विकासासाठी त्यांनी घेतलेली धडपड आजही लोकांच्या स्मरणात आहे. वाकुर्डे बुद्रुक योजनेला गती देणं असो, उद्योगधंद्यांना चालना देणं असो – शिवाजी केन, यशवंत ग्लुकोज कारखाना, सुनंदा दूध यांसारख्या उपक्रमांनी अनेकांच्या घरात चूल पेटती ठेवली. शेतकरी, कामगार, युवक – प्रत्येकाच्या हाताला काम देण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांनी केला.
राजकारणात वादळं आली नाहीत असं नाही. टीका झाली, अडथळे आले, संकटं डोळ्यासमोर उभी राहिली. पण या माणसाची ताकद मनगटात नव्हती – ती बुद्धीत होती. परिस्थितीचं अचूक आकलन, अभ्यासपूर्ण निर्णय आणि योग्य वेळी घेतलेली भूमिका यामुळे त्यांनी स्वतःचं स्वतंत्र वलय निर्माण केलं.
कधी कधी वाघ दोन पावलं मागे सरकतो, ते भ्याडपणामुळे नसतं – तर पुढच्या झेपेसाठी तयारी असते. संघर्षातून घडलेला नेता पराभवाला घाबरत नाही. तो पुन्हा उभा राहण्याची ताकद ठेवतो. आणि ही ताकदच शिवाजीराव नाईक साहेबांच्या व्यक्तिमत्त्वात दिसून येते.
राजकारणातला त्यांचा अनुभव तगडा आहे. लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा हा नेता कार्यकर्त्याला कधीही दूर लोटत नाही. एखादं काम लगेच झालं नाही तरी चालेल, पण कार्यकर्त्याला वेळ देणं – त्याचं म्हणणं शांतपणे ऐकणं – हे त्यांचं वैशिष्ट्य. छोट्या माणसाच्या खांद्यावर हात ठेवून, त्याच्याजवळ बसून चटणी-भाकरी खाणारा नेता म्हणजे आपलाच माणूस वाटतो.
प्रत्येक गावात पाच-पन्नास कार्यकर्त्यांना नावानिशी हाक मारणं, त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणं – ही त्यांची खरी श्रीमंती आहे. म्हणूनच शिवाजीराव नाईक हे फक्त नेता नाहीत, तर घरातले ज्येष्ठ वाटतात.
१ मार्चला माझा वाढदिवस होता. साहेबांनी आवर्जून फोन करून शुभेच्छा दिल्या. त्या चार आपुलकीच्या शब्दांनी मन भरून आलं. मोठेपण पदात नसतं, ते मनात असतं – याचा अनुभव पुन्हा आला.
आज २ मार्च – साहेबांचा वाढदिवस. ईश्वरचरणी एकच प्रार्थना – या लढवय्या, अभ्यासू, सर्वसामान्यांच्या मनात घर करणाऱ्या नेत्याला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि नव्या उमेदीने काम करण्याची शक्ती लाभो.
अशा या सामान्यातल्या सामान्य, पण कर्तृत्वातल्या असामान्य नेत्याला वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! 🌺
Comments
Post a Comment