जनांचा प्रवाह चालला...’


मधुकर भावे

पवारसाहेब येत्या रविवारी ८२ वर्षांत पाउल ठेवतील. ८ डिसेंबरला, बुधवारी दिल्लीत ६,जनपथला त्यांच्या निवासस्थानी भेट झाली. निवांत वेळ होता. १२ डिसेंबरला शुभेच्छा देणाºयांची गर्दीच गर्दी असेल, त्यांना सहज म्हणालो... आजच, चार दिवस आधी  वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. माझ्यासोबत दिल्ली लोकमतचे संपादक विकास झाडे होते, त्यांनीही शुभेच्छा दिल्या.
दिल्लीमध्ये दोन वर्षांनंतर गेलो.  पहिल्यांदा ९0/९१/९२ दोन वर्ष दिल्लीमध्ये लोकमतचा दिल्ली प्रतिनिधी म्हणून काम करतानाची दिल्ली आता राहीली नाही. राजपथ उद्ध्वस्त झालेलं आहे. शास्त्रीभवन, उद्योग भवन यावर बुलडोझर फिरला आहे. रेल भवनसुध्दा आता पाडलं जाणार. संसदभवनसुध्दा. होत्याच नव्हत झाल्यासारखी दिल्ली दिसत आहे. ब्रिटीशांनी जगावर राज्य केलं पण राष्ट्रपती भवन ते इंडिया गेट असा भव्य रस्ता आणि परिसर जगात कुठेही नाही. आता ते सगळ उद्ध्वस्त झालेलं आहे. ३000 कोटींचा प्रकल्प मोदी सरकारने हाती घेतलाय म्हणे. उद्या शास्त्रीभवन आणि उद्योग भवन उखडलं जाणार आहे. काय, काय होईल ते बघत रहायचं.  नवीन वास्तू कशी उभी राहील आणि कधी उभी राहीलं. ही दिल्ली बघवत नव्हती. घाणेरडी हवा, बोचरी थंडी, प्रदुषण, धूळ, सर्व काही. अशा या दिल्लीत महाराष्ट्राचा एक दणकट नेता ३0 वर्षे टिकून आहे. यशवंतराव चव्हाण २२ वर्षे दिल्लीत होते, शंकरराव चव्हाण नेमके २२ वर्षेच दिल्लीत होते. या दोनही नेत्यांच दिल्लीत नाव घेतलं जातं. त्यानंतर सलग ३0 वर्षे दिल्लीच्या आणि देशाच्या राजकारणात घट्ट मांड पकडून कोण बसलेला असेल तर ते पवारसाहेब आहेत. मुंबईत, पुण्यात ते जिथे असतील तिथे गर्दी असते. बेल वाजली की, सकाळचे ८ वाजले असं समजावं. गेली ५0-६0 वर्षे या वेळापत्रकात फरक झालेला नाही. राजकीय नेते जेव्हा उठून तयार होत असतात तेव्हा पवारसाहेबांच चार तासांच काम झालेलं असतं. पेपर वाचून झालेले असतात. महाराष्ट्रात, देशात कोण लवकर उठत, त्यांना बरोबर माहित असतं. अशा अनेकजणांशी फोनवर चर्चा झालेल्या असतात. सूर्य आणि पवारसाहेब हे या दोघांच काम एकाचवेळी सुरु होतं. आज एवढा एकही नेता देशात नसेल... ज्याची अपॉयन्टमेंटशिवाय सहज भेट होवू शकते. पण ही भेट कामापुरतीच असली पाहिजे. ८ डिसेंबरला सकाळी ८ ते ११.३0 वाजेपर्यंत १४0 लोकांना ते भेटले असं श्री. शिंपी सांगत होते.  या भेटीमध्ये पवारसाहेब वायफळ गप्पा मारत बसलेत, असं कधी नसतं. काम सांगायच, त्यांनी ते दोन मिनीटात मार्गी लावून द्यायच. लगेच पुढचा माणूस. जनांचा प्रवाह चालला... हे कुठ पहायच असेल तर पवारसाहेब जिथं असतील तिथं जावून बसा आणि बघा. एक विलक्षण झपाटा या माणसाजवळ आहे. न थकता काम करण्याची जिद्द आहे. नवा पक्ष उभा करुन त्या पक्षाला महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात प्रतिष्ठा देण्याची क्षमता आहे. या सर्वांसाठी लागणारी एक प्रचंड इच्छाशक्ती त्यांच्याजवळ आहे. ५0/६0 वर्षे ही ऊर्जा टिकवणं ही सोपी गोष्ट नाही.
माझी सायंकाळी ४ ची वेळ होती. थोडा आधीच पोहोचलो. श्री.शिंपीजवळ बोलत बसलो.  पवारसाहेबांचाच विषय निघाला. ते म्हणाले, एखादी अशी आठवण सांगा.... पवारसाहेब १९६२ साली राजकारणात आले. यशवंंतराव चव्हाण काट्याच्या वाडीला त्यांच्या घरी गेले. पवारसाहेबांच्या मातोश्रींना म्हणाले,... ‘तुमचा हा मुलगा कॉंग्रेससाठी राजकारणात द्या...’ मातोश्री शारदाबाईंनी मुलगा यशवंतरावांना दिला. पहिली निवडणुक १९६७ ला आली. बारामतीतून विधानसभेच तिकीट द्यायला, कॉंग्रेस संसदीय मंडळात इंदापूरच्या शंकरराव बाजीराव पाटील यांनीच विरोध केला. ‘हा मुलगा निवडून येणार नाही, कारण समोर बाबालाल काकडे उभे राहणार आहेत..’ यशवंतराव म्हणाले, कॉंग्रेसच्या किती जागा येणार आहेत... अंदाजांन सांगण्यात आलं १५0. यशवंतराव म्हणाले, ‘१४९ आल्या अस समजा, एक जागा पडेल, पडु द्या..’ निवडणुक झाली. बाबालाल काकडे पडले. तरुण शरद पवार २८ हजार मतांच्या फरकाने निवडून आले... त्यानंतर एकही निवडणूक हरले नाहीत. विधानसभेची असो नाहीतर लोकसभेची १९८४ च्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीत राजीव गांधी देशात सर्वाधिक मताच्या फरकाने, (५ लाख २0 हजार) निवडून आले होते.  इंदिराजींच्या हत्येनंतरची ती निवडणूक होती. त्या निवडणुकीत इंदिरा कॉंग्रेसच्या विरोधात उभं राहून बारामती लोकसभा मतदारसंघातून शरद पवार साहेब राजीव गांधींच्या खालोखाल मतांच्या फरकाने निवडून आले होते.
आयुष्यात एकही निवडणूक न हरलेला हा नेता दिल्लीत महाराष्ट्राचा आवाज आहे. सगळ्या पक्षाचे लोक ज्या नेत्याकडे भेटतात ते घर शरद पवार यांचंच आहे. कामात मदत करताना पवारसाहेबांनी पक्ष बघितलेला नाही.  राजकारणातली सभ्यता आणि सूचिता त्यांनी सतत पाळली आहे. इंग्रजीमध्ये ज्याला ‘प्रोटोकॉल’ म्हणतात तो त्यांनी कधी मोडलेला नाही. त्यांच्यासोबत जिथे-जिथे मुख्यमंत्री असतील अशा प्रत्येक सभेत त्यांनी आपली ज्येष्ठता आहे म्हणून शेवटच भाषण कधीही केलं नाही. सर्व पथ्य पाळून राजकारण कसं करावं याचाही ते आदर्श आहेत.
विधानसभा, विधानपरिषद, लोकसभा, राज्यसभा अशा सर्व सभागृहात त्यांचा संचार झाला, असा हा अपवादात्मक नेता आहे.
४ वाजता बरोबर भेट झाली. देशपातळीवरच्या आजच्या राजकारणाची चर्चा झाली.  मी म्हणालो, ‘प्रश्न विचारला जातो की, सध्याच्या देशाच्या नेतृत्वाला पर्याय काय?’... आणि या प्रश्नांच उत्तर देताना मीच म्हंटल की... ‘तुम्हीच पर्याय आहात’... उजवा हात हलवत... ‘नाही नाही’ असं म्हणतं.. ते म्हणाले... ‘सध्या पर्यायापेक्षा सर्वांनी एकत्र येवून भाजपाच्या राजवटीला पराभूत करणं सगळ्यात महत्वाचंं पर्याय नंतर निघतोच आणि सगळ्यांना बरोबर घेवूनच हे होईल..’ ८२ वर्षांतली त्यांची ती जिद्द अफाट आहे.
... पण माझ्या मनात विचार येत होता... उद्याच्या नेतृत्वासाठी पवारसाहेब का नकोत... यशवंतराव चव्हाण साहेबांनी त्यांना मिळत असलेली संधी घालवली. संसदीय कॉंग्रेस पक्षानं सभागृहाचा नेता म्हणून त्यांची निवड केली होती (१९६६- शास्त्रीजींच्या आकस्मात निधनानंतर) पण यशवंतराव म्हणाले... ‘ मी पंडितजींच बोट धरुन दिल्लीत आलो.. त्यांच्या वारसदार इंदिरा गांधी आहेत. त्यांच्याशी चर्चा करुन निर्णय सांगतो.’ यशवंतराव इंदिराजींना भेटले. त्या म्हणाल्या, ‘मी दोन तासांनी तुम्हाला सांगते’. दोन तासांनी त्यांनी निर्णय जाहीर केला.... ‘ नेतेपदासाठी मीच उभी राहणार आहे.’
यशवंतरावांची संधी गेली. त्यांनी तक्रार केली नाही. शरद पवारसाहेब संधी मागतही नाहीत. मात्र विचार मनात येतो की, एवढ्या मोठय देशाला धार्मिक उन्मादाच्या कडेलोटावर आणि मुठभर लोकांना देश विकून टाकायच्या आताच्या परिस्थिातीत हे सगळं सांभाळणारा दुसरा नेता कोण? जर  व्ही.पी.सिंग, इंद्रकुमार गुजराल, देवेगौडा, चंद्रशेखर, पंतप्रधान होवू शकतात तर हजारपटीने जास्त कुवत असलेल्या पवारसाहेब का नाही? माझ्या मनातच मी प्रश्न विचारला. त्यांच्याकडून उत्तर अपेक्षित नव्हतं. पण देशाच उद्याच चित्र फार विचित्र वाटतयं. उद्ध्वस्त झालेली दिल्ली पाहताना कसंसंच वाटत होतं.
२६ जानेवारी, प्रजासत्ताक दिनाचे ते देशाची शान असलेली परेड आता त्या उद्ध्वस्त रस्त्यावर कशी होणार.. ही दिल्ली वसवायला ब्रिटीशांना ३२ वर्षे लागली होती. हा देश सोडून जाताना त्यांनी एकाही वास्तूला नामशेष केलं नाही. चिमूटभर गोवा सोडून जाताना पोर्तूगिजांनी सगळे पूल, इमारती उद्ध्वस्त केल्या. ब्रिटीश आणि पोर्तूगीज यांच्या संस्कृतीतला हा फरक आहे. आता उद्ध्वस्त झालेली दिल्ली ३000 कोटी खर्च होवून जेव्हा उभी राहील तेव्हा किती वर्ष लागलेली असतील? ती दिल्ली बघायला माझी पिढी नसेलचं. पण, एकच चांगली बातमी ऐकली की,  हे काम टाटा कंपनीला दिलंय... नशिब देशाचं.. नाहीतर तिथेही अंबानी, अदानी टपकले असते.
पवारसाहेब ८२ वर्षे पूर्ण करीत असताना सगळा महाराष्ट्र त्यांना बिनबाद शतकासाठी मन:पूर्वक शुभेच्छा देईलच...
शेवटी एवढचं... पवारसाहेबांच्या घरचा, दारचा.. हा जनांचा प्रवाह असाच शतकोत्तर चालत रहावा...
रामदास स्वामींनी म्हटलचं आहे..
‘जनांचा प्रवाह चालला...
म्हणजे कार्यभाग यशस्वी जाहला...
जन ठायी ठायी तुंबला
म्हणजे खोटे ’

Comments

  1. न थकता काम करण्याची जिद्द आहे. नवा पक्ष उभा करुन त्या पक्षाला महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात प्रतिष्ठा देण्याची क्षमता आहे. या सर्वांसाठी लागणारी एक प्रचंड इच्छाशक्ती पवार साहेबांजवळ आहे.यात तीळमात्र शंका नाही.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

अभ्यास करून पोराला IAS, IPS बनवायचं अन् कराड-खोक्याभाई त्याची नियुक्ती करणार?, मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र व्हायरल

शिरशी गावच्या लोकनियुक्त पहिल्या सरपंच – सौ. स्मिताताई बापूराव भोसले

*शिराळा उत्तरच्या मातीत दोन दिवसांपूर्वी जे घडलं, ते फक्त निवडणूक नव्हतं*… *तो विश्वासाचा, नात्याचा आणि घराण्याच्या संस्कारांचा विजय होता*.