हुतात्म्यांची स्मारके धोकादायक अवस्थेत – ९ ऑगस्टला ध्वजारोहण की नवसंजीवनी?


हुतात्म्यांची स्मारके धोकादायक अवस्थेत – ९ ऑगस्टला ध्वजारोहण की नवसंजीवनी?

शिराळा तालुक्यातील इतिहासाला साजेसा सन्मान कधी मिळणार?
मनोजकुमार मस्के मांगरुळ  : 890291065

शिराळा तालुका महाराष्ट्राच्या स्वातंत्र्य संग्रामातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. १९४२ च्या ‘भारत छोडो’ आंदोलनात येथील असंख्य क्रांतिकारकांनी देशासाठी आपले प्राण अर्पण केले. या हुतात्म्यांच्या स्मृती जपण्यासाठी उभारण्यात आलेली स्मारके आज मात्र दुर्लक्षित, मोडकळीस आलेली आणि धोकादायक अवस्थेत उभी आहेत.

विशेषतः मांगरुळ गावातील दोन हुतात्म्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ उभारलेले स्मारक — जिथे दरवर्षी ९ ऑगस्टला ‘क्रांती दिना’निमित्त ध्वजारोहण होते — ते स्मारक सध्या जीर्ण, तडे गेलेले असून त्यावर उभारलेली क्रांतीज्योत कोणत्याही क्षणी कोसळू शकते. या स्मारकाभोवतीची संरक्षक भिंतदेखील पडलेली आहे.

प्रशासनाचे दुर्लक्ष – स्मारके धोकादायक स्थितीत

जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्ह्याचा कारभार सुरु असतानाही, शिराळा तालुक्यातील ऐतिहासिक स्मारकांकडे ना प्रशासनाचे, ना स्थानिक स्वराज्य संस्थांचे लक्ष आहे. काही स्मारके झुडपांनी झाकली गेली आहेत, तर अनेक ठिकाणी त्यांचे संरक्षक कठडे गडगडलेले आहेत.

"मांगरुळ गावातील हुतात्मा स्तंभ कधी पडेल सांगता येत नाही. दरवर्षी ध्वजारोहण होते, पण कोणत्याही अधिकार्‍याने त्याकडे लक्ष दिलं नाही," अशी तीव्र टीका स्थानिक रहिवासी निलेश मस्के पाटील यांनी केली. त्यांनी ही माहिती लेखी स्वरूपात प्रशासन व पालकमंत्र्यांपर्यंतही पोहोचवली आहे.

"विद्यार्थ्यांसमोर लाजिरवाणी स्थिती"

प्राचार्य सुवर्णसिंग मस्के म्हणतात, "विद्यार्थ्यांना घेऊन स्मारकाजवळ गेल्यावर त्यांना सांगतो की ही आपली शौर्यगाथा. पण प्रत्यक्षात जी परिस्थिती आहे ती पाहून मन हेलावून जातं. लाज वाटते!"

‘सन्मान’ की केवळ औपचारिकता?

यंदा ९ ऑगस्टला क्रांती दिनानिमित्त या जीर्ण स्मारकांसमोर ध्वजारोहणाचे कार्यक्रम होणार आहेत. पण प्रश्न असा आहे की, ही स्मारके जर धोकादायक अवस्थेत असतील तर अशा ठिकाणी होणारा ध्वजारोहण सोहळा केवळ औपचारिकतेपुरता मर्यादित राहणार का?

स्थानिक नागरिक, इतिहासप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये त्यामुळे प्रचंड असंतोष आहे. अनेकांनी प्रशासनाच्या असंवेदनशीलतेवर टीका केली असून, पालकमंत्र्यांनी तातडीने हस्तक्षेप करून स्मारकांचे नुतनीकरण, दुरुस्ती व जतन करण्याची मागणी केली आहे.

पालकमंत्र्यांनी लक्ष घालावे – इतिहासाचा सन्मान राखावा

सांगली जिल्ह्याच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदान मोठं आहे. त्या इतिहासाचा सन्मान राखण्यासाठी हुतात्मा स्मारकांचे जतन हे केवळ गरजेचेच नव्हे, तर काळाची गरज आहे.

सध्या शिराळा तालुक्यात एकूण चार हुतात्मा स्मारके आहेत, आणि सर्वांचीच स्थिती अत्यंत दयनीय आहे. मांगरुळ येथील स्मारकाची "विजयज्योत" सुद्धा कोसळण्याच्या मार्गावर आहे. अशा दुर्घटनेत मानवी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ‘क्रांती दिना’च्या निमित्ताने केवळ ध्वजारोहण नव्हे, तर या स्मारकांना नवसंजीवनी देण्यासाठी ठोस पावले उचलण्याची वेळ आली आहे.


Comments

Popular posts from this blog

अभ्यास करून पोराला IAS, IPS बनवायचं अन् कराड-खोक्याभाई त्याची नियुक्ती करणार?, मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र व्हायरल

शिरशी गावच्या लोकनियुक्त पहिल्या सरपंच – सौ. स्मिताताई बापूराव भोसले

*केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याशी झालेली भेट आणि आलेला अनुभव*....