ऑलिंपिक वीर बंडा पाटील रेठरेकर – शासनाच्या दुर्लक्षामुळे सुविधांपासून वंचित, मातीचा मल्ल विस्मृतीत?

ऑलिंपिक वीर बंडा पाटील रेठरेकर – शासनाच्या दुर्लक्षामुळे सुविधांपासून वंचित, मातीचा मल्ल विस्मृतीत?


✍️ मनोजकुमार मस्के, मांगरूळ

ज्यांनी भारताला आंतरराष्ट्रीय मैदानावर ओळख मिळवून दिली…ते 1964  चे ऑलम्पिक वीर बंडा पाटील रेठरेकर मामा

कोल्हापूर जिल्हा शाहुवाडी तालुक्यातील रेठरे वारणा या लहानशा खेड्यातून उभा राहिलेला एक असामान्य मल्ल – बंडा पाटील रेठरेकर. कुस्तीच्या मैदानात त्यांनी घेतलेली झेप थेट ऑलिंपिक स्पर्धेपर्यंत पोहोचली होती. भारतात फारच थोडे मल्ल असे आहेत, जे ग्रामीण पार्श्वभूमीवरून येऊन ऑलिंपिकसारख्या सर्वोच्च क्रीडा स्पर्धेत उतरले. पण दुर्दैवाने, ज्या मातीने या मल्लाला घडवलं, त्याच मातीत आज तो शासनाच्या दुर्लक्षामुळे झाकोळला गेलाय.

शासनाची पाठ फिरली, ना सन्मान ना सुविधा

बंडा पाटील यांनी देशासाठी खेळताना स्वतःच्या आयुष्याचे सोने केले. पण त्याच्या बदल्यात त्यांना मिळालं ते फक्त खांद्यावरून उतरलेलं गौरवाचं ओझं आणि विस्मरण.
आजही त्यांच्या नावाने ना कोणी खेळ प्रशिक्षण केंद्र आहे,
ना कुठला कुस्ती आखाडा आहे, ना कुठला सरकारी गौरव पुरस्कार त्यांच्या योग्य त्या दर्ज्याने गवसला आहे.
त्यांना "ऑलिंपिक मल्ल" म्हणून सरकारने मोठ्या संख्येने गौरवायला हवं होतं, पण शासनाच्या अनेक बदलणाऱ्या सरकारांत त्यांचे योगदान फक्त कागदावरच उरले आहे.

ज्यांना सन्मान मिळायला हवा होता, तेच आज झगडत आहेत

बंडा पाटील हे केवळ एक ऑलिंपिकपटू नव्हते, तर गावोगावी कुस्तीचं बीज पेरणारे, नव्या पिढीचे गुरू, आणि आदर्श पुरुष आहेत. कुस्तीनंतर शेतात राबणारा हा पैलवान गडी आज ७० वर्षाकडे वाटचाल करत आहे.  मात्र, स्वतः बंडा पाटील आज आरोग्य सुविधा, निवृत्तीवेतन किंवा खेळाडूंसाठीच्या विशेष योजनांपासून वंचित आहेत हे मात्र नक्की..
गावात साधं स्मारकही उभं राहिलेलं नाही. त्यांच्या कार्याची आठवण सरकारला नसल्यासारखी वागणूक दिली जाते, जी पूर्णपणे अन्यायकारक आहे.

"सत्ताधाऱ्यांनी केवळ फोटोसाठी गौरव केला, नंतर विसरले!" – स्थानिकांची खंत

रेठरे परिसरातील स्थानिक कार्यकर्ते, कुस्तीप्रेमी व नागरिकांची एकच भावना आहे –
"सरकारने आणि नेत्यांनी यांचा वापर गौरवासाठी केला, पुरस्कार देऊ अशी आश्वासने दिली, पण नंतर पाठ फिरवली. आमचं मातीचं रत्न विस्मरणात चाललंय." किमान उत्तर त्या वयात तरी या पैलवानाला त्याचा योग्य तो गौरव मिळाला पाहिजे असं अनेकांचे मत आहे. मरणोत्तर अनेकांना पुरस्कार दिलेत परंतु जिवंतपणी पुरस्कार मिळावा अशी असंख्य पैलवानांची इच्छा आहे.

सरकारने आता तरी लक्ष द्यावं!

राज्य सरकार, क्रीडाविभाग आणि केंद्र सरकारकडून तत्काळ खालील गोष्टींची मागणी केली जात आहे:

बंडा पाटील यांच्या नावाने कुस्ती केंद्र/शाळा उभारावी
आर्थिक मदत व निवृत्ती वेतन योजना लागू करावी
गावात स्मारक उभारून त्यांना स्थानिक ओळख द्यावी
राज्यस्तरीय "बंडा पाटील कुस्ती गौरव पुरस्कार" सुरू करा

बंडा पाटील रेठरेकर हे फक्त एक मल्ल नव्हते, ते एका संपूर्ण पिढीचं प्रेरणास्थान आहेत. त्यांनी जागतिक पातळीवर महाराष्ट्राची आणि भारताची मान उंचावली. आणि आज तेच शासनाच्या दुर्लक्षामुळे उपेक्षित, दुर्लक्षित आणि विस्मरणाच्या वाटेवर आहेत.

“गौरव केवळ ट्रॉफी देऊन होत नाही, त्यासाठी स्मरण आणि सन्मान दोन्ही आवश्यक असतात.”

आता वेळ आली आहे – सरकारने डोळे उघडावे आणि या तांबड्या मातीच्या हिरोला त्याचा योग्य हक्क द्यावा.

चौकट
शासनाची मदत मिळो न मिळो परंतु सर्वसामान्य जनतेने मात्र ऑलम्पिक वीर बंडा मामा यांना मदतीचा हात पुढे केला आहे. वारणा पनुंब्रे येथील उद्योजक तानाजी पाटील पणुंब्रे कोमल इंजिनियरींग - यांनी ऑलम्पिक वीर बंडा पाटील मामा यांना नवी कोरी अल्टो गाडी बक्षीस दिली त्यांचं कौतुक संपूर्ण महाराष्ट्रात व शिराळ, शाहुवाडी पंचक्रोशीत होत आहे.

Comments

Popular posts from this blog

अभ्यास करून पोराला IAS, IPS बनवायचं अन् कराड-खोक्याभाई त्याची नियुक्ती करणार?, मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र व्हायरल

शिरशी गावच्या लोकनियुक्त पहिल्या सरपंच – सौ. स्मिताताई बापूराव भोसले

*केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याशी झालेली भेट आणि आलेला अनुभव*....