महाराष्ट्र केसरी : कुस्तीच्या भविष्याचा विचार कधी होणार?
"महाराष्ट्र केसरी : कुस्तीच्या भविष्याचा विचार कधी होणार?"
मनोजकुमार मस्के, मांगरूळ
९८९०२९१०६५
महाराष्ट्रातील पैलवानांसाठी महाराष्ट्र केसरी स्पर्धा जागतिक स्पर्धेपेक्षा मोठी वाटू लागली आहे. कुस्तीचीच तालीम, त्यांचेच गुरुजी, तेच आयोजक आणि तेच पैलवान मग वाद का होतो? ही बाब संशोधनाचा विषय असली, तरी त्यात पडण्याची गरज नाही. खरं तर खेळाडूंनी मैदानाबरोबरच स्पर्धाही खेळणे महत्त्वाचे आहे. जगभरात कुस्ती खेळणाऱ्या देशांची संख्या २०० च्या वर आहे, तर केवळ १६ देश क्रिकेट खेळतात. तरीसुद्धा भारतात क्रिकेटला अधिक महत्त्व दिले जाते.
पूर्वीच्या काळात कुस्तीला विशेष मान होता. महाराष्ट्रातील मल्ल देश-विदेशात ख्यातीस पात्र ठरले होते. दिल्लीतून कोणी पैलवान महाराष्ट्रात कुस्तीसाठी आला की, महाराष्ट्राच्या मल्लांनी त्याला पराभूत केल्याचे अनेक उदाहरणे आहेत. मात्र, आज परिस्थिती वेगळी आहे. *महाराष्ट्र केसरी स्पर्धेला आंतरराष्ट्रीय दर्जाचा सन्मान मिळत असला, तरी आंतरराष्ट्रीय कुस्तीपेक्षा महाराष्ट्र केसरी स्पर्धेचेच अधिक कौतुक होत आहे, हे दुर्दैव आहे*. महाराष्ट्रातील पैलवानांनी देशातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही नावलौकिक मिळवला आहे. एकेकाळी हरियाणातील पैलवान महाराष्ट्राच्या मल्लांना घाबरायचे. मात्र, सध्या महाराष्ट्राची कुस्ती कुठेही दिसत नाही. राज्यात कुस्तीला वाहिलेल्या अनेक स्वयंघोशीत कुस्ती संघटक, प्रसारमाध्यमे, फेसबुक-यूट्यूब चॅनेल्स आहेत. पण, यामुळे कुस्तीचा विकास होतोय कि कोणाचे खिसे भारत आहेत हे तपासणे गरजेचे आहे.
*यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेत महाराष्ट्रातील कुस्तीपटूंना स्थान मिळाले नाही, याचे कारण काय? महाराष्ट्र केसरी जिंकणे हेच अंतिम ध्येय का? राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याची महत्त्वाकांक्षा का नाही? महाराष्ट्रातील बहुतांश पैलवान फक्त पैसा कमावण्याच्या उद्देशाने कुस्तीत उतरतात. त्यांना देशासाठी पदक जिंकण्याचे महत्त्व कुणीच पटवून दिलेले नाही*. ईतर राज्यांमध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर यश मिळवणाऱ्या खेळाडूंना सरकारी सेवेत भरती केले जाते. मात्र, महाराष्ट्रात केवळ स्पर्धा आयोजित केल्या जातात आणि प्रेक्षकांनी पाहत राहायचे! महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा ओपन गटासाठी जितकी महत्त्वाची आहे, तितकीच ती अन्य गटांसाठीही महत्त्वाची का नाही? एकदा महाराष्ट्र केसरी झालेल्या पैलवानाने पुन्हा स्पर्धेत भाग घेण्याऐवजी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकण्याचा प्रयत्न का करावा लागत नाही?
महाराष्ट्रातील कुस्तीला पैसा कमावण्याच्या मानसिकतेची कीड लागली आहे. मैदानावरच्या कुस्त्या यूट्यूब, फेसबुकवर व्हायरल करण्यापेक्षा खेळाडूंनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचण्यावर भर द्यावा. आयोजक, कुस्तीप्रेमी आणि संघटनांनी या बाबी गांभीर्याने लक्षात घेण्याची गरज आहे. जर वेळेत उपाययोजना केल्या नाहीत, तर महाराष्ट्राची कुस्ती संपूर्णपणे नामशेष होईल. त्यामुळे, स्पर्धांना मर्यादा घालून पैलवानांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधी द्यावी. पैलवानांनी मैदानातच नव्हे, तर संपूर्ण जगासमोर आपल्या कुस्तीचा झेंडा फडकवावा. "कुस्तीला जिवंत ठेवायचे असेल, तर हे प्रलोभनांचे खेळ बंद करा! पैलवानांना खेळू द्या, त्यांना प्रोत्साहन द्या आणि ते कुठपर्यंत पोहोचले यावर भर द्या." महाराष्ट्र शासनाने कुस्ती संघटनेच्या माध्यमातून प्रत्येक वजनी गटातील १० पैलवान नोकरीची हमी घेतली तर इथले खेळाडू महाराष्ट्र केसरी सोबत जागतिक कुस्ती स्पर्धेत आणि ऑलिम्पिक मेडल यायला वेळ लागणार नाही.
महाराष्ट्राच्या कुस्तीला नवी दिशा देण्याची गरज
महाराष्ट्रात सर्वाधिक कुस्ती आखाडे असले तरी ऑलिम्पिकमध्ये पोहोचणाऱ्या खेळाडूंची संख्या नगण्य आहे. खाशाबा जाधव, बंडा पाटील मामा रेठरेकर, गणपतराव आंदळकर, मारुती आडकर, मारुती माने यांसारख्या कुस्तीपटूंनी जेव्हा मैदान गाजवले, तेव्हा महाराष्ट्रात फारशा तालमी नव्हत्या. जे काही आखाडे होते, ते केवळ कुस्तीच्या वृद्धीकरिता कार्यरत होते, पैसा कमावण्याचा उद्योग नव्हते. मात्र, आज परिस्थिती बदलली आहे. बहुतेक तालमी कमाईचा अड्डा बनल्या आहेत. त्यात काहींना अंतर्गत राजकारणाचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्रातील कुस्तीला योग्य दिशा देणे अत्यंत आवश्यक आहे. एक कुस्तीपटू संपूर्ण समर्पणाने घडवण्याची गरज आहे. कितीही मोठे राजकारण असले, तरी आमचा खेळच त्याला उत्तर देऊ शकतो. त्यामुळे महाराष्ट्रातील मल्लांना ऑलिम्पिकचे स्वप्न दाखवण्याची गरज आहे. मात्र, प्रत्यक्षात महाराष्ट्र केसरीच्या पुढे कोणीही जात नाही, ही मोठी शोकांतिका आहे.
महाराष्ट्रात कुस्ती जगभर प्रसिद्ध आहे, पण प्रसिद्धी आणि संघटन नसलेल्या अन्य खेळांचे खेळाडू मात्र ऑलिम्पिकमध्ये पोहोचतात. कोल्हापूर, सातारा, बीड, सोलापूर येथील खेळाडू महाराष्ट्राचे नाव ऑलिम्पिकमध्ये नेतात. मग, आपण कुस्तीला मिळणाऱ्या प्रसिद्धीबाबत कुठे तरी चूक तर करत नाही ना? हा प्रश्न मनात येतो. गावोगावी कुस्तीच्या तालमी आहेत, पण महाराष्ट्राची कुस्ती महाराष्ट्राबाहेर मात्र पोहोचत नाही. इथेच आम्ही *डबल महाराष्ट्र केसरी, ट्रिपल महाराष्ट्र केसरी* म्हणून मिरवत राहिलो, पण राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळलोच नाही. याला जबाबदार कोण?
आज महाराष्ट्रातील अनेक प्रसारमाध्यमे कुस्तीच्या प्रचारासाठी आहेत, पण त्यांचा हेतू फक्त दुकानदारी चालवणे हाच आहे. कुस्ती पिढ्यान्पिढ्या चालत आली, पण ही दुकानदारी तिला महाराष्ट्राच्या बाहेर नेऊ शकली नाही. मात्र, या चक्रव्यूहातून बाहेर पडणाऱ्या काही खेळाडूंमध्ये राहुल आवारे यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. महाराष्ट्र आणि देशातील राजकीय डावपेचांवर मात करत त्यांनी आपल्या कुस्तीतून महाराष्ट्राचे नाव उंचावले. अडचणींचा सामना कसा करावा, हे राहुल आवारेसारख्या मल्लाकडून शिकावे.
*शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांना कुस्तीच्या समस्यांची पूर्ण जाणीव आहे. अनेकदा त्यांनी यात लक्ष घातले आहे. सध्याच्या काळात महाराष्ट्र केसरीसाठी होणाऱ्या स्पर्धांऐवजी कमी वजन गटातील खेळाडूंवर अधिक लक्ष देणे आवश्यक आहे. कारण आजवर ऑलिम्पिकपर्यंत पोहोचलेले बहुतेक खेळाडू हलक्या वजन गटातील आहेत. आता महाराष्ट्राच्या कुस्तीचा डंका संपूर्ण जगभर वाजणे गरजेचे आहे*. महाराष्ट्रातील माती ही मल्लांचा जन्म घेण्यासाठी सुपीक आहे. गरज आहे ती फक्त त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्याची आणि त्यांना योग्य संधी उपलब्ध करून देण्याची.
महाराष्ट्रातील कुस्ती आंतरराष्ट्रीय स्तरावर मागे राहिली, त्याचे कारण खेळ नाही, तर खेळातील राजकारण आहे. नाहीतर राहुल आवारे आज ऑलिम्पिकचे सुवर्णपदक जिंकण्यासाठी सक्षम असते. ऑलिम्पिकमध्ये भारताचे पहिले कांस्यपदक महाराष्ट्रातील खाशाबा जाधव यांनी मिळवले आणि त्यानंतर दुसरे पदक मिळवायला तब्बल ५२ वर्षे लागली.
पवार साहेब, महाराष्ट्रातील पैलवानच ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवू शकतो. त्यासाठी तुम्ही वैयक्तिक लक्ष घालावे. मुख्यमंत्री साहेब, तुम्ही यामध्ये जातीने लक्ष घालून कुस्तीत बदल घडवावा. राजकारणविरहित आणि स्टेरॉईडमुक्त कुस्ती हीच महाराष्ट्राला पुढे घेऊन जाईल. ऑलिम्पिकमध्ये नेतृत्व करणारे खेळाडू महाराष्ट्रात घडू द्या. महाराष्ट्राची कुस्ती जाणणारा एकमेव नेता म्हणून तुम्हीच पुढाकार घ्यावा, अशी संपूर्ण महाराष्ट्रातील कुस्तीप्रेमींची तुम्हाला विनंती आहे.
Comments
Post a Comment