आईच्या किडनीमुळे जीवदान.. मोतीबिंदू शस्त्रक्रियेचा विक्रम... डॉ. तात्याराव लहाने
आईच्या किडनीमुळे जीवदान.. मोतीबिंदू शस्त्रक्रियेचा विक्रम... डॉ. तात्याराव लहाने
वयाच्या ३९ व्या वर्षी दोन्ही किडन्या नीकामी झाल्या, अन् डॉक्टरांनी तुमच्याकडे काहीच दिवस शिल्लक असल्याचे सांगितले, तुम्ही मरणार असे भाकीत केले. पण आईचा आशीर्वाद व आईने दिलेल्या किडनी मुळे मला पुनर्जन्म मिळाला. माझ्यासाठी आईने १६६ टाक्यांच्या वेदना सहन केल्या. अशा आयुष्यातील आलेल्या अडचणींवर मात करत "मी कसा घडलो" या विषयावर स्वर्गीय शिवाजीराव देशमुख व्याख्यानमालेत दुसरे पुष्प गुंफताना नेत्रतज्ञ पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी आपला जीवनप्रवास उलघडला.
शिक्षणाधिकारी मोहनराव गायकवाड निनाई साखरचे माजी चेअरमन फत्तेसिंगराव देशमुख माजी सभापती बाळासाहेब पाटील प्रमुख उपस्थित होते.
माकेगाव (ता. अहमदपूर, जि. लातूर) येथील एका गरीब घरात झालेला जन्म, आई-वडील, पाच बहिणी आणि दोन भाऊ असे तब्बल दहा माणसांचे कुटुंब, शेतमजूर वडील अशा प्रतिकूलतेवर मात करीत घरातील एकमेव शिक्षित मुलगा ते दोन लाख पाच हजार नेत्रशस्त्रक्रिया करणारा डॉक्टर असा जीवनप्रवास त्यांनी मांडला.
लहाने म्हणाले, दुसऱ्याच्या शेतावर एक रुपया हजरीवर दर रविवारी कापूस वेचणे आणि शेंगा काढणे ही कामे करून शिक्षण घेतले. शाळेची मान्यता टिकण्यासाठी दहा मुले असली पाहिजेत हा नियम असल्यामुळे शाळेत जाण्याचे नशिबी आले. दहावीपर्यंत चार महिन्यांपेक्षा जास्तकाळ शाळेतच गेलो नाही. चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत आणि दहावीला जिल्ह्य़ात पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झालो. गावाला येण्यासाठी लाल डब्याची गाडीही नव्हती. १४ किमी पायी जावे लागायचे. अडचणी येत गेल्या पण मागे हटलो नाही. डॉक्टर झालो, आईचा आशीर्वाद आणि रुग्णाचे प्रेम यामुळे मी घडलो. आशीर्वाद हे विज्ञानाच्या पलीकडे जाऊन काम करत असतात.
यावेळी शिक्षणाधिकारी मोहनराव गायकवाड यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. स्वागत,प्रास्ताविक विकास नांगरे,पाहुण्यांची ओळख बाबासाहेब परीट यांनी केली.
या कार्यक्रमास सरपंच अनिता देशमुख उपसरपंच अंकुश नांगरे,अनिलराव देशमुख,श्रीरंग नांगरे,सुजित देशमुख,विकासराव देशमुख, प्रा. ए.सी.पाटील,डॉ.एस.एन.पाटील नंदकुमार पाटील,मोहन पाटील,सुनील पाटील,सुरेश घोडे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment