आजच रात्री १२ वाजता प्रज्वलीत झालेले ‘महाराष्ट्र राज्य’ नेमके कुठे आहे?
आजच रात्री १२ वाजता प्रज्वलीत
झालेले ‘महाराष्ट्र राज्य’ नेमके कुठे आहे?
- मधुकर भावे
आज रात्री १२ वाजता महाराष्ट्र राज्याला ६४ वर्षे पूर्ण होतील. ६५ व्या वर्षात महाराष्ट्र पाऊल ठेवेल. बरोबर ६४ वर्षांपूर्वी आजच्याच रात्री १२ वाजता देशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र राज्याचा नकाशा विद्युत डदीपांनी राजभवनवर प्रज्वलीत केला. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे पंडितजींच्या शेजारी होते. महाराष्ट्रचे महनीय राज्यपाल श्री. श्रीप्रकाश हे ही यावेळी होते. यापूर्वी त्याच दिवशी सायंकाळी शिवाजी पार्क येथे प्रचंड सभेत संयुक्त महाराष्ट्राच्या िनर्मितीची घोषणा झालीच होती. पाच वर्षांच्या अथक लढाईनंतर मराठी भाषिकांना ‘मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र’ या घोषणेप्रमाणे मराठी भाषिकांचे राज्य मिळाले. ते सुखासुखी मिळाले नाही. इतर राज्यांना जसे भाषिक तत्त्वाने सहजपणे मिळाले तसे महाराष्ट्राला मिळाले नाही. खूप मोठा लढा झाला. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा या देशातील लोकशाहीच्या मार्गाने लढवलेला, तो सगळ्यात मोठा लढा म्हणून नोंदवला गेला. जात-धर्म-पंथ-पक्ष.... व्यक्ती या कोणाचाही विचार न करता, केवळ आणि केवळ संयुक्त ‘महाराष्ट्र समितीचा उमेदवार’ हा एकच निकष मतदारांच्या मनात निर्धारासारखा पक्का होता. यासाठी पाच वर्षांच्या लढाईत महाराष्ट्रातील सामान्य माणूस एकवटला होता. त्यात ग्रामीण भागातील शेतकरी आघाडीवर होता. मुंबई आणि पुणेशहर परिसरातील कामगार आघाडीवर होता. हे राज्य मिळवून देण्यात शेतकरी आणि कामगार हेच आघाडीवर होते. १०६ जणांचे बलिदान आणि अनेकजणांच्या जखमा आता लोक विसरून गेले... पण, एका ध्येयासाठी महाराष्ट्र एकाच विचाराने एकवटून किती प्रभावीपणे सरकारविरोधात उभा राहू शकतो, त्याचे ते दर्शन होते. त्यामुळे भले-भले नेते पडले. आणि ही लढाई सामान्य शेतकरी आणि कामगारांनी जिंकली.
या लढ्याचे सगळेच मोठे नेते मोठ्या मनाने आपले पक्ष विसरून त्यात सामील झाले होते. समर्पणाशिवाय यश मिळत नाही... हेही या लढ्यात दिसले. आचार्य अत्रे आणि त्यांचा ‘मराठा’, एक नेता म्हणून आणि एक वृत्तपत्र म्हणून, दोन हातांत दोन दांडपट्टे घ्यावे व त्या नेत्याने लढायला उभे रहावे, अशी ही लढाई अत्रेसाहेबांनी लढवली. जो-जो महाराष्ट्राचा विरोधक त्याच्या विरोधात ही लढाई होती. त्यात व्यक्तीद्वेष नव्हता. महाराष्ट्राच्या आणि मराठी भाषेच्या प्रेमाने वेडी झालेली ही सगळी मंडळी त्या ध्येयाने झपाटलेली होती. त्यामुळे सहा-सहा महिन्यांचा तुरुंगवास झाला तरीही कशाचीही पर्वा न करता पाच वर्षांचे हे एक ‘ध्यासपर्व’ होते. त्यात अत्रे, डांगे, एस.एम. जोशी, सेनापती बापट, क्रांतिसिंह नाना पाटील, उद्धवराव पाटील, दादासाहेब गायकवाड, प्रबोधनकार ठाकरे नेत्यांची यादी एवढी मोठी आहे... त्यापेक्षाही कार्यकर्त्यांची यादी तिप्पट आहे. नेता स्वत:ला नेता समजत नव्हता. ‘महाराष्ट्रासाठी लढायचे आहे’, या एकाच ध्येयासाठी पैसा जवळ नसताना झालेली ही या देशातील एकमेव निवडणूक आहे. अॅड. बी. सी. कांबळे मुंबईचे. निवडून येतात अहमदनगर जिल्ह्यातून... तेही लोकसभेसाठी.. केंद्रीय कायदामंत्री हरिभाऊ पाटसकर जळगावचे त्यांचा पराभव करतो ताडदेवच्या तुळशीवाडीतील एक पारशी नौशेर भरूचा... अशी लढाई पुन्हा होणे नाही. तो महाराष्ट्र आता पुन्हा दिसणार नाही. ते नेतृत्त्वही नाही.
संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतर दुर्दैवाने समिती फुटली. आणि ४० लाख मराठी भाषिक सीमा भाग महाराष्ट्रात सामील करण्यात अपयश आले. आता तो लढा पुन्हा होणारही नाही. तसे नेतृत्त्व नाही. सगळे जुने नेते निसर्ग नियमाने गेले. जे आहेत ते थकले आहेत. नवीन नेतृत्त्वाला आज ‘त्याग-सेवा-समर्पण’ या शब्दांशी काही देणे-घेणे नाही. त्यामुळे आता उद्या १ मे रोजी कामगार दिनही असला तरी या देशात आणि महाराष्ट्रात कामगार कुणाच्या जमेत तरी आहे का? हाच कामगार संयुक्त महाराष्ट्रासाठी लढला होता. याच िगरणगावात सर्वात मोठा लढा लढला गेला. तोच कामगार गेल्या ५० वर्षांत चिरडला गेला. ज्या गिरणगावात मुख्य लढाई झाली त्याच गिरणगावात आज ‘मॉल’ उभे राहिले... कामगारांची वाताहात झाली. त्यांच्या प्रश्नांची वाताहात झाली. जो शेतकरी आणि कामगार महाराष्ट्रासाठी लढला तोच अाज ६४ व्या वाढदिवसाला सगळ्यात मोठ्या संकटात आहे. या ६५ वर्षांत शहरात झगमगाट झाला... शहरे सजली... दुकाने फुलून गेली... शोरुम्स झाली... गाड्यांची संख्या तर एवढी झाली की, सामान्य माणसाला रस्त्यावरून चालायला रस्ताच शिल्लक नाही. ‘मुंबईतला फूटपाथ कुणीतरी दाखवा,’ असे म्हणण्याची वेळ आलेली आहे. सगळ्यात केविलवाणी अवस्था पायी चालणाऱ्यांची आहे. रस्ता ओलांडणाऱ्यांची आहे. एकदा वांद्रे येथील एस. व्ही. रोड येथील सिग्नलवर जाऊन उभे रहा.... आणि रस्ता ओलांडणाऱ्या भगिनींची काय अवस्था आहे ते पहा... उड्डाणपूल शेकड्यांनी झाले... पण ते गाडीवाल्यांसाठी झाले. चालत जाणाऱ्यांसाठी एखादातरी उड्डाणपूल आहे का? वांद्रे, कालिनाच्या सिग्नलवर काय स्थिती आहे, एकदा पहा... सामान्य माणसांना वालीच नाही, असे चित्र आहे. या मुंबईत चालणाऱ्यांची संख्या लाखांेनी आहे. याचा सगळ्यांनाच विसर पडला आहे. सामान्य माणसाच्या प्रश्नांना कुठेच प्राधान्य नाही. झटकन श्रीमंत झालेली एक जमात आज धटींगणपणाला कारणीभूत ठरत आहे. ‘कायदा सुव्यवस्था पाळली पाहिजे,’ असे न माननारा, एक झटकन श्रीमंत झालेला वर्ग शहरात तयार झालेला आहे. उलटी वाहने चालवण्यात त्याला फिकीर वाटत नाही. हा धटींगणपणा उद्याच्या सामाजिक जीवनात अतिशय घातक ठरणारा आहे. पण, सांगणार कोण?.... आणि ऐकणार कोण? ५० वर्षांपूर्वी शाळेत विद्यार्थ्याला शिक्षकाचा धाक होता... घरात अाई-वडीलांचा धाक होता... आदर होता.. समाजातील नेत्यांकडे खूप आदराने पाहिले जात होते. नेत्यांनी सांगावे आणि कार्यकर्त्यांनी ऐकावे... कारण नेता कार्यकर्ता म्हणूनच काम करत होता... या महाराष्ट्राची बांधणी कशी झाली, ते समजून घ्यायचे असेल तर ५० वर्षांपूर्वीच्या नेतृत्त्वाने िकती विचारपूर्वक िनर्णय केले... आज आठवते... १९६१ सालातील महाबळेश्वर येथील काँग्रेस शिबीर... त्या शिबिरातील तीन दिवसांत राजकीय विचारांचा कार्यकर्ता कसा तयार होतो, ते ऐकता आले... आणि तसे कार्यकर्ते पाहता आले. कृषी औद्योगिक निर्णयांचा विषय त्या शिबिरात चर्चेला आला आणि ग्रामीण भागातील आर्थिक क्रांतीला तेव्हापासून सुरुवात झाली. पण, ५० वर्षांनंतर शेती उद्धवस्त होऊन शेतकऱ्यांना आपण ‘उद्योजक’ करू शकलेलो नाही. त्यामुळे ६४ वर्षांच्या वाढदिवसात आनंद असला तरी ज्या शेतकरी आणि कामगारांनी हे राज्य मिळवून दिले तेच दोन्ही घटक आज मातीत घातले गेलेले आहेत. संयुक्त महाराष्ट्रासाठी लढलेले कोण आहेत.... मेलेले कोण आहेत... आणि आज गब्बर झालेले कोण आहेत... याचा जमा-खर्च पाहिला तर ही लढाई विषम झालेली आहे. आज सामान्य माणसांचे प्रश्न बाजूला पडलेले अाहेत. बेरोजगारी, मजुरी, शेती आणि परवडणारी शेती, स्पर्धेतील महाग शिक्षण यामुळे ग्रामीण भागात पूर्वीची मन:शांती राहिलेली नाही. मुंबई-पुण्याच्या तोडीचा झगमगाट जिल्हा पातळीवर वाढला असेल... तालुक्याची आणि जिल्ह्याची ठिकाणे लखलखाट होऊन सजलेली आहेत. तरीसुद्धा ग्रामीण भागाला मोठ्या संकटांना सामोरे जावे लागणार आहे. यात शेतीसाठी मोठी धरणे बांधली. त्यातील ७० ते ८० टक्के धरणे शेतीला पाणी पुरवतच नाहीत. ते पाणी शहरालाच पुरवावे लागत आहे. ‘पिण्याच्या पाण्याला प्राधान्य’ या नियमामुळे शेतीसाठी बांधलेली धरणे शहरांना पाणी पाजत आहेत. मग शेतीला पाणी मिळणार कधी आणि देणार कोण? शेती का तोट्यात जात अाहे... उजनी धरण बांधले तेव्हा सांगण्यात आले की, ‘दोन लाख हेक्टर कोरडवाहू शेतीला पाणी मिळणार...’ आज ‘उजनी’ कोरडेठाक पडत आहे.. उजनीचेच पाणी सोलापूरला पुरवले जात आहे. पुढच्या पिढ्यांना फार विपरित परिस्थितीला तोंड द्यावे लागेल.... दुसरीकडे १ मे १९६० रोजी महाराष्ट्र ३ कोटी लोकसंख्येचा होता. आज साडेबारा कोटी लोकसंख्येचा महाराष्ट्र आहे. त्यावेळी ८० टक्के जंगले महाराष्ट्रात होती. त्यातील ४० टक्के झाडे तुटली. शहरात सिमेंटची जंगले झाली. लोकसंख्या वाढली... पाण्याच्या गरजा वाढल्या... त्याचे नियोजन कमी झाले... ८० सालानंतर बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नांमुळे झालेले निळवंडे धरण सोडले तर, दुसऱ्या नवीन धरणांची नावे सांगा... रस्ते खूप झाले... उड्डाणपूल झालेत... पण, औष्णिक वीजकेंद्रे किती झाली. प्रश्नांचे स्वरूप बदलत गेले आहे. त्यावर उपाय होत नाही. २४९ नद्या प्रदूषित झाल्या... त्याचे पाणी विषारी होत चालले आहे. त्याच्याबद्दल कोणाला काहीही पडलेले नाही. एकीकडे होणारी औद्योगिक प्रगती यामध्ये आपण खूष आहोत. पण त्यातून िनर्माण होणारे दुष्परिणाम किती भयानक आहेत... त्याचा विचार करू शकणारे आणि त्याला पर्याय शोधण्यासाठी जो राजकीय शहाणपणा लागतो त्याचाही अभाव आहे. त्यामुळे आता विरोधी पक्षात असलेल्या त्यावेळच्या नेत्यांसारखे लढाऊ नेते होणार नाहीत. अत्रे, डांगे, एस. एम., उद्धराव, दादासाहेब गायकवाड पुन्हा होणार नाहीत. त्याचप्रमाणे यशवंतराव, वसंतदादा, राजाराम बापू, यशवंतराव मोहिते, मधुकरराव चौधरी आणि अगदी विलासराव देशमुख यांच्यापर्यंत ज्यांनी महाराष्ट्राच्या बांधणीत मोठा वाटा उचलला त्या कुवतीचे नेतृत्त्व आता शिल्लक नाही. ज्या पवारसाहेबांची एक आशा शिल्लक अाहे, त्यांचेही घर फोडण्याचा प्रयत्न झाला. एकूणच महाराष्ट्राचे सगळ्या बाजूंनी राजकीय धिंदवडे झालेले आहेत. असा राजकारणाचा चिखल पूर्वी कधीही नव्हता. यासगळ्या राजकीय पाडापाडी-फोडाफोडीत महाराष्ट्रातील सामान्य माणूस हताश-निराश आणि शांतपणे सगळे पहात आहे. त्यामुळे ६४ व्या महाराष्ट्र राज्याच्या वाढदिवसाचा उत्साह जरातरी कुठेतरी दिसतो आहे का? निवडणुका येतील अाणि जातील... पण, उद्या महाराष्ट्राचा ६४ वा वर्धापन दिन आहे.... याची आठवण कुठेतरी दिसते आहे का? एका दिवसापुरत्या उद्या (१ मे) जाहिराती प्रसिद्ध होतील... फोटो प्रसिद्ध होतील... ज्यांना महाराष्ट्र कसा घडला हेच माहिती नाही, त्यांचेच फोटो जाहिरातीत छापून येणार आहेत. आणि मुख्य प्रश्न बाजूला पडलेले असताना नसलेल्या प्रश्नांची जाहिरात होणार आहे. महाराष्ट्रावर हे दिवस येतील, असे १ मे १९६० ला कोणालाही वाटले नसेल.... बरे झाले... हे दिवस पहायला ती लढाऊ पिढी नाही.
तरीसुद्दा ज्यांच्या लढ्यातून हे महाराष्ट्र राज्य मिळाले त्या सर्व तमाम नेत्यांना अभिवादन करून महाराष्ट्र कृतज्ञा आहे, हे सांगायलाच हवे. ते कामगार, ते शेतकरी, बलिदान झालेले ते १०६ हुतात्मे... माईक नसताना कंदिलाच्या प्रकाशात लाखो लोकांना ज्यांचा आवाज पोहाेचत होता. ते शाहीर अमरशेख.... आत्माराम पाटील... आण्णाभाऊ या सर्वांची आठवण केल्याशिवाय आज चैन पडेल का? या महाराष्ट्राच्या चळवळीला आणि नेत्यांना साष्टांग दंडवत.... हे महाराष्ट्र राज्य चिरायु होओ.... आणि शेतकरी-कामगार पुन्हा एकदा नैराश्यातून बाहेर येवोत... त्यांच्या जीवनात सुख-समृद्धी येवो.... एवढीच प्रार्थना आज आपण करू या...
१ मे १९६० ला एकही शेतकरी आत्महत्या करत नव्हता... आमच्या शेतकऱ्यांवर ही वेळ पुन्हा येऊ नये... एवढीच प्रार्थना... त्याच्याच कष्टाने महाराष्ट्र अन्नधान्यात स्वलंबी झालेला आहे. त्याला तरी विसरू नका....
सध्या एवढेच
Comments
Post a Comment