मनापासून श्रद्धा असेल तर परमेश्वर देवळात न जाता घरी येऊन भेटतो
मनापासून श्रद्धा असेल तर परमेश्वर देवळात न जाता घरी येऊन भेटतो
मनापासून श्रद्धा असेल तर परमेश्वर देवळात न जाता घरी येऊन भेटतो... हे अनेक वेळा वाचलं आहे. परंतु श्रद्धा असेल आणि तीही प्रामाणिक असेल तर घडू शकतं याचं उदाहरण म्हणजे साक्षात माझ्या दैवताने मला दर्शन दिले.. ते ही आमच्या घरात खरंच मी धन्य झालो. दिनांक 12/ 10 /2023 रोजी महाराष्ट्राचा चालता बोलता इतिहास व माझे गुरु, माझे दैवत असणारे ज्येष्ठ पत्रकार आदरणीय मधुकरजी भावे साहेब यांनी आमच्या घरी येऊन मला व माझ्या कुटुंबाला आशीर्वाद दिले. माझ्या आयुष्यातील हा सगळ्यात मोठा क्षण होता. आज साहेबांचे 85 वर्ष वय असताना देखील आमच्या घरातील उंच असणाऱ्या पायऱ्या चढून आमच्या घरात येऊन आमच्या कुटुंबाला जवळ घेऊन जो मायेचा हात त्यांनी पाठीवरून फिरवला त्या हाताच्या स्पर्शाने आमच्या आनंदाला पाराच उरला नाही. आमचे कुटंब मुलं, माझी पत्नी आम्ही सारे अगदी भारावून गेलो.
माझ्या आयुष्यात भावे साहेब माझं दैवत बनून आले. समाजात जगत असताना प्रामाणिकपणा कसा जपायचा हे त्यांनी मला शिकवले. अनेक मोठमोठ्या लोकांना साहेबांनमुळेच मला भेटता आले. मंत्रालय असो, विधानभवन असो, मंत्री असो, आमदार असो की खासदार, हे सर्व या माझ्या गुरूमुळेच मला पाहायला मिळाले. समाजातील प्रतिष्ठित माणसांच्या जवळ जाता आलं. मोठ्या लोकांचा स्पर्श जरी झाला तरी त्यातील थोडी का होईना उर्जा आपल्यामध्ये सहवास करते असं जुनी जाणती माणसं म्हणतात.
भावे साहेबांनी कोणत्याच गोष्टीचा गर्व कधीच बाळगला नाही. उलट समाजातील तळाच्या माणसाला प्रतिष्ठेच्या जागेवर बसवलं हे मी स्वतः अनेक वेळा पाहिले. अनेकांना नगरसेवक, आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री इथपर्यंत नेऊन ठेवलं. दुसऱ्याला मोठे करण्यात या माणसाने आपलं आयुष्य झिजवलं ! खरं पाहता अचार्य अत्रे साहेब यांना मी भावे साहेबांच्या तोंडून अनेक वेळा ऐकले आहे.. मात्र अत्रे साहेब कसे असतील हे मी भावे साहेबांच्या रूपातच पाहिले आहे. मधुकर भावे साहेब हे हल्लीच्या काळातील दुसऱे आचार्य अत्रे म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
जवळपास 2004 पासून मी भावे साहेबांच्या कार्यालयात कामाला होतो. 2006 साली माझा विवाह झाला त्या वेळी माझ्या लग्नाला भावे साहेब मुंबईवरून माझ्या गावी मांगरूळला आले होते. आम्हा उभयंतांना ते ज्यावेळी आशीर्वाद देण्यासाठी पुढे आले त्याचवेळी त्यांनी सांगितले आजपासून तुझा पगार 1000 रुपयांनी वाढवून दिला सुखाने संसार करा... मी आजही तो क्षण विसरू शकत नाही.. साहेबांनी आम्हाला कामगार असं कधी समजलच नाही . घरचा सदस्यच आहे असंच ते आमच्याशी आजही वावरतात. साहेबांनी जे प्रेम दिलं त्या प्रेमाच्या आशिर्वादामुळे साहेब सदैव आमच्या हृदयात राहीलेत . 2009 पासून मी आज गावी वास्तव्यास आहे. पण साहेबांचा कराड, शिराळा, सांगली, कोल्हापूर या ठिकाणी कधीही दौरा असेल तर साहेब मला आवर्जून संपर्क करतात, मला सोबत घेतात, यामुळे का होईना अधुन मधुन माझ्या दैवताचं मला दर्शन आजही घडत असते. हीच मी कमवलेली माझ्यासाठी करोडोंची संपत्ती आहे.
साहेबांच्यावर प्रेम करणारे माझे सवंगडी मग कराडचे जगदीश पाटील असतील, शाहुवाडीचे दत्ता जाधव असतील, शिराळचे संदीप पवार असतील किंवा मी व माझे कुटुंब असेल यांच्या सगळ्यांच्या हृदयात भावे साहेबांनी ऐक जागा करून ठेवली आहे. खर तर माझ्या आयुष्यात भावे साहेब आलेच नसते तर मी मात्र भरकटलो असतो. योग्य वयात चांगले विचार आणि चांगली माणसं मला मिळाली. म्हणूनच आज मी, कमवत जरी नसलो तरी माणसं मात्र टिकवून ठेवली एवढं मात्र नक्की... माझ्या आई-वडिलांच्या बरोबरीत ज्यांनी माझ्या हृदयात स्थान निर्माण केलं ते म्हणजे माझं दैवत मधुकरजी भावे साहेब. साहेबांना परमेश्वर उदंड आयुष्य देवो हीच श्री स्वामी समर्थ यांच्या चरणी प्रार्थना.....
आपला शिष्य - मनोज मस्के, मांगरूळ ९८९०२९१०६५
Comments
Post a Comment