दोस्तीतला राजा माणूस हरपला..,..

दोस्तीतला राजा माणूस हरपला..,..
आज सकाळीच अत्यंत वाईट एक वार्ता कळली संभाजी चंदर पवार हे आमच्या अत्यंत जवळचे मित्र अचानक आमच्यातून निघून गेले.  शांत स्वभावाचे, कुणालाही उलट न बोलणारे, अगदी सांगेल ते काम करणारे संभाजी पवार नाना हे अचानक आमच्यातून निघून गेले हा विश्वासच बसला नाही. हा माणूस अतिशय शांत होता. लहान पोराने जरी काम सांगितलं तरी ते ऐकणारी मानसिकता त्यांच्या मनात होती. आम्ही फार लहानपणापासून एकत्र, खरं पाहता स्वामी समर्थ बहुउद्देशीय सामाजिक संस्था, या संस्थेचे ते उपाध्यक्ष आहेत. आम्ही सगळे मिळून एकत्र काम करत होतो. नानांच्याच विचारातून पुढे आलेले काम ते म्हणजे थळपांढर देविचा चौथरा बांधने. आमच्याकडे त्यावेळेला पैसे नव्हते परंतु शिवा तांबिरे, विनोद सापते, मनोज मस्के अशी बरीचशी मंडळी आम्ही एकत्र आलो आणि अतिशय अडचणीत असणारी आमची थळपांढर देवी बाहेर काढून तिला चौथरा बांधायचं ठरवलं.संभाजी नानांनी फुकट काम करायचं सांगितलं, बाकीच्यांनी दगडाच्या ट्रॉल्या काढल्या, कुणी सिमेंट गोळा केलं प्रत्येक जण स्वत: कामावर राबत होता. स्वतः  संभाजी पवार हे बांधकाम करत होते. आज सुद्धा संभाजी पवार यांची आठवण या थळपांढर देवीचा चौथरा बघितला की आपोआप होते.  पुढे जाऊन यात्रेत सरबत वाटप कार्यक्रम संस्थेच्या माध्यमातून चालू केला याही कार्यक्रमात संभाजी नाना अग्रेसर होते. फराळ वाटपाचा कार्यक्रम चालू केला याही कार्यक्रमात संभाजी नानांनी डोक्यावरून केळाच्या पाट्या मंदिरापर्यंत नेलेले आहेत. केलेल्या कामाचा गाजावाजा करावा असं त्यांना कधीच वाटत नव्हतं. आपणाला पटतं ते बोलणं.. नाही पटत ते शांतपणे ऐकून घेणे.. असा या माणसाचा स्वभाव होता. आज अचानक पणे नाना... आम्हा सर्वांना कोणतीही चाहूल न लागता.. अलगद देवाघरी निघून गेले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो हीच प्रार्थना

*मानसिंग बोरगे* - सचिव
स्वामी समर्थ बहुउद्देशीय सामाजिक संस्था, मंगरूळ
9011451560

Comments

Popular posts from this blog

*अनाथ मुलांचे स्वीकारले स्वामी धामने पालकत्व*

संजय गणपती पाटील उर्फ संजू दादा भावपूर्ण श्रद्धांजली

*रात्री माझं गाव विकताना पाहिलं*