अमृत महोत्सवाच्या शासकीय उपचारात उपमुख्यमंत्री फडणवीस का नव्हते?- मधुकर भावे
अमृत महोत्सवाच्या शासकीय उपचारात उपमुख्यमंत्री फडणवीस का नव्हते?
- मधुकर भावे
मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा अमृत महोत्सव साजरा झाला. शासकीय पातळीवरच साजरा झाला. संपूर्ण मराठवाड्यात लोकांतर्फे हा महोत्सव ज्या पद्धतीने साजरा व्हायला पाहिजे होता, तसा झाला नाही. खरं म्हणजे तसं वाचतावरणच तयार केले गेले नाही. हे वातावरण नेत्यांनी करायचे असते. त्याकरिता नियोजन असावे लागते. सरकारच्या कल्पना आणि नियोजन मर्यादित आहे. त्यामुळे झेंडा फडकवला, राष्ट्रगीत गायले... मराठवाड्याच्या ‘मागास’ या शब्दाला पुसून टाकण्याचे आश्वासन देवून झाले... कार्यक्रम संपला. हा मुक्तीसंग्रामाचा महोत्सव अजिबात वाटला नाही. थोडासा अपवाद लातूरचा. तिथे एका चांगल्या ग्रंथाचे प्रकाशन झाले. त्या संबंधात
जनार्दन वाघमारे यांच्यासारख्या माजी कुलगुरुंची मुलाखत... असे कार्यक्रम वातावरण निर्मिती करत असतात. मी १५ अॅागस्ट १९९७ ला म्हणजे देशाच्या स्वातंत्र्याला ५० वर्षे झाली त्यावेळी, लातुरच्या ‘एकमत’ला संपादक म्हणून काम करत होतो. सुवर्ण महोत्सवाचा स्वातंत्र्यदिन साजरा केला. सकाळी ‘एकमत’ कार्यालयात ‘स्वातंत्र्य सुवर्णमहोत्सव ३०० पानी गौरव ग्रंथाचे’ प्रकाशन झाले. नंतर ‘एकमत’तर्फे आम्ही १५ अॅागस्टला सकाळी एका प्रभातफेरी आयोजन केले होते. या प्रभातफेरीत स्वच्छ पांढऱ्या पोशाखात किमान दहा हजार विद्यार्थी-विद्यार्थीनी... त्यानंतर त्यांच्या मागे मराठवाड्यातील स्वातंत्र्यसैनिक... त्यामध्ये विनायकराव चारठणकर, दादा वाजपेयी यांच्यासारखे त्यागी लोक... त्यानंतर लातूरचे नागरिक, महिला... आणि सगळ्यात शेवटी एका टेम्पोवर फडकता भारताचा झेंडा... प्रभातफेरीचा समारोप हुतात्मा स्मारकापाशीच झाला. त्याच दिवशी मराठवाड्यातील स्वातंत्र्यसैनिकांचा ‘एकमत’तर्फे सत्कार. लातुरचे लोक आजही सांगतात की, ‘लातुरच्या इितहासात अशी प्रभातफेरी निघालीच नव्हती.’ हे सगळं सांगण्याचा उद्देश असा की, नवीन पिढीला ना स्वातंत्र्य संग्राम माहिती... दोन शब्दांनी देश स्वतंत्र्य झाला.... ते शब्द होते.. ‘चले जाव...’ आणि सामान्य माणसांच्या लढ्यातून मराठवाडा स्वतंत्र झाला.. त्यासाठी फार मोठी किंमत चुकवावी लागली. अत्याचार सहन करावे लागले. त्यागाने मिळालेल्या या स्वातंत्र्याचे मोल नवीन पिढीपर्यंत पोहोचवणार कोण? आणि कोणत्या त्यागातून आपण स्वतंत्र झालो, हे नवीन पिढीला कळणार कसे? जगातल्या देशांनी आपले इितहास तळ हाताच्या फोडासारखे जपलेले आहेत. साहित्यिकांनासुद्धा जपलेले.... आम्ही काय हवे ते देवू... पण आमचा शेक्सपीअर देणार नाही, असेच युरोपमध्ये सांगतात. आमच्याकडे असे सांगितले जाते का? आजची पिढी नेमकं काय करतेय, हे आम्हालाच समजत नाही. त्यामुळे देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव ‘हर घर तिरंगा’ एवढ्यापुरताच मर्यादित राहिला आणि मराठवाड्याचा स्वातंत्रदिन शासकीय झेंडावंदनापुरताच मर्यादित राहिला. ना एक प्रभातफेरी निघाली... ना स्वातंत्र्य संग्रामातील लढाऊ नेत्यांच्या वारसांना सन्मानित केले गेले. किंवा ना स्वातंत्र्याचा दिवसभर गजर झाला. शासकीय उपचारापुरता हा कार्यक्रम वाटला. अाणि सगळ्यात अत्यंत अक्षेपार्ह गोष्ट म्हणजे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या अमृतमहोत्सव कार्यक्रमासाठी हजरसुद्धा राहिले नाहीत. कॅबिनेटची बैठक संपल्यावर ते रात्रीच संभाजीनगरहून गेले. त्यांचे जाणे अितशय खटकणारी गोष्ट आहे. नागपूरमध्ये त्यांचे कोणतेही कार्यक्रम असतील तरी ते मराठवाड्याच्याच अमृतमहोत्सवी स्वातंत्रदिनापेक्षा अजिबात महत्त्वाचे नाहीत. फडवीसांच्या या वागण्यातून मराठवाड्याबद्दलची एक बेफिकीरी चर्चेचा विषय झाली... अनेकजणांशी मी बोललो... दुसरे मुख्यमंत्री अजितदादा हे झेंडावंदन कार्यक्रमाला होते... पण त्यांनीही नुसती हजेरी लावली. बोलले ते मुख्यमंत्रीच बोलले. टाळी घेणारे वाक्य बोलले. ४० हजार कोटींची गोष्ट आदल्या दिवशीच त्यांनी सांगून टाकली होती. पण ते ४० हजार कोटी म्हणजे कापूसकोंड्याच्या गोष्टीसारखेच आहेत. आता शिंदेसाहेब मराठवाड्याचे ‘मागास’पण कधी पुसून टाकतात, ते पाहू या... पुढच्या स्वातंत्रदिनाच्या आत त्या मागासपणातील किती भाग पुसून झाला, हेही स्पष्टच होईल. पण तिथपर्यंत निवडणूका होऊन गेलेल्या असतील. वर्षानंतरचे महाराष्ट्राचे चित्र काय असेल... ते आज कोण सांगणार? कदाचित ‘रात गयी... बात गयी....’ असे शिंदे यांना पुन्हा एकदा सांगता येईल. आजतरी मागासलेपण हे त्यांनी मान्य केलेय, हे काय कमी आहे! अर्थात त्याला एकटे शिंदे कारणीभूत नाहीत. मराठवाडाच कारणीभूत आहे आणि नेते कारणीभूत आहेत. त्याची चर्चा परवाच्या लेखात झाली आहे. पण, नवीन पिढीसाठी अमृतमहोत्सवाने काय सांगितले, याचे उत्तर त्या दिवशीच्या कार्यक्रमातही मिळाले नाही. आणि दु:ख त्याचेच आहे.... तरुण मुलांना आपण नेमके काय सांगणार?
मराठवाडा विनाअट संयुक्त महाराष्ट्रात सामील झाला. संयुक्त महाराष्ट्राचे त्यावेळचे मराठवाड्यातील नेते उद्धवराव पाटील असतील... केशवराव धोंडगे असतील... व्ही. डी. देशपांडे असतील... आण्णासाहेब गव्हाणे असतील... अंकुशराव घारे असतील... खुशालराव मोताळे असतील... काशिनाथराव जाधव असतील... कॉम्रेड चंद्रगुप्त चौधरी... कॉम्रेड करुणा चौधरी... किसनराव देशमुख... बी. एन. देशमुख... भाऊसाहेब देशमुख (भोकरधन) या सर्व नेत्यांचे संयुक्त महाराष्ट्रासाठी खूप मोठे काम आहे. खासकरून उद्धवराव पाटील तर मराठवाड्यापुरते नव्हे तर त्यांनी महाराष्ट्र घुसळून काढला. आज या पिढीला खरेसुद्धा वाटणार नाही की, त्या काळात अनेक गावांत वीज नव्हती... त्यावेळी कंदिल लावून संयुक्त महाराष्ट्र समितीच्या सभा झाल्या. आणि एक सभा सुरू होताच.. पुढच्या सभेसाठी अमरशेख यांचे कलापथक, आत्माराम पाटील यांच्यासह पुढच्या सभेला जायचे. आणि मागच्या सभेचे नेते येईपर्यंत ही सभा खिळवून ठेवण्याचे सामर्थ्य त्या शाहिरांमध्ये होते. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात मराठवाड्याचा खूप मोठा त्याग आहे. खरं म्हणजे मराठवाडा अमृतमहोत्सव राज्य सरकारने महाराष्ट्रभर साजरा करायला हवा होता. पण, कुठेच उत्साह नाही. राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना एवढ्या मोठ्या कार्यक्रमाल हजर राहण्याचा राजशिष्टाचारसुद्धा पाळता आला नाही, अतिशय अशोभनिय अशी गोष्ट आहे. पदावरील नेत्यांनी कसं वागावं... हे आता सांगण्याची वेळ आली म्हणजे, कोणाला कशाचीच पर्वा राहिली नाही, असा त्याचा अर्थ आहे. औरंगाबाद हायकोर्टच्या ध्वजवंदनाला देशाचे सर न्यायाधीश श्री. धनंजयराव चंद्रचूडसाहेब दिल्लीहून येतात.. आणि संभाजीनगरमध्ये आदल्या रात्रीपर्यंत असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री सकाळच्या अमृतमहोत्सव कार्यक्रमाला गैरहजर राहतात. फडणवीसांची गैरहजेरी हा मराठवाड्याच्या अमृतमहोत्सवी लढ्याचा एकप्रकारचा अवमानच आहे.
मराठवाड्यातील काही जिल्ह्यांतील मित्रांकडून माहिती घेतली... शासकीय कार्यक्रमाच्या खेरीज फारसे मोठे वातावरण तयार झाले नाही. लातूरमध्ये रोषणाई चांगली झाली.... पण त्याहीपेक्षा गौरवग्रंथाचे प्रकाशन आणि जनार्दन वाघमारे यांची श्री.जयप्रकाश दगडे या ज्येष्ठ पत्रकाराने घेतलेली प्रकट मुलाखत प्रकट हे कार्यक्रम अधिक महत्त्वाचे वाटतात. मराठवाड्यात जनार्दन वाघमारे, नागोराव कुंभार, सुधीर रसाळ, सूर्यनारायण रणसुभे हे विद्वजन ज्यांनी मराठवाड्याची वैचारिक मशागत केली. साहित्यिकांमध्ये लक्ष्मीकांत तांबोळी, लक्ष्मीकांत देशमुख, दत्ता भगत, लक्ष्मण गायकवाड, जगदिश कदम, इंद्रजित भालेराव, आसाराम लोमटे, अतुल देऊळगावकर असे अनेक नामवंत साहिति्यक आहेत. अतुल देऊळगावकर हे तर आता मराठवाड्यापुरते नाहीत. तर महाराष्ट्राच्या पर्यावरणाचा त्यांच्याखवढा कोणाचा अभ्यास आहे, याचा शोध घ्यावा लागेल.महाराष्ट्रातील २४९ नद्यांचे पाणी विषारी झाले आहे, हा त्यांचा अभ्यासपूर्ण लेख म्हणजे उद्याच्या भीषण भविष्याचा आलेख आहे. नरहर कुरुंदकर यांच्यासारख्या एक स्वत:च विद्यापीठ असलेला ज्ञाानमहर्षी हे मराठवाड्याचे सगळ्यात मोठे भूषण होते. जसे विदर्भात राम शेवाळकर होते.
मराठवाड्यातील साहित्यिकांना या अमृत महोत्सवात सामावून घेण्याचे कार्यक्रम व्हायला हवे होते. राजकीय नेतेच परिवर्तन करू शकतात, हा भ्रम आहे. समाजाचे परिवर्तन करण्याची क्षमता आणि वातावरण निर्मिती करण्याची क्षमता... साहित्यिक, पत्रकार, कलावंत या सर्वांमध्ये अधिक मोठ्या प्रमाणात आहे. आज महाराष्ट्रात ‘मराठीपण’ संपुष्टात येत आहे. ज्या मुंबईसाठी लढा झाला त्या मुंबईमध्ये मराठी भाषिक अल्पसंख्य झाला. सध्या असि्तत्वात नसलेल्या मुंबई महानगरपालिकेत, पालिका बरखास्त होण्यापूर्वी ५३टक्के बिगर मराठी नगरसेवक होते. आता महापालिका आणि इतर निवडणुका विसरा... पण त्या कधी झाल्याच तर मुंबईचे मराठीपण अधिक झाकोळेल.... याला कारण मुंबईतील मराठी माणसं आणि सरकार आहे. मुंबईतील मराठी मालकांची सर्व हॉटेल बंद पडली. काका तांबे बंद पडले... वीरकर बंद पडले... हिंदमाता, भारतमाता, चित्रपटगृहे बंद पडली... मराठी शाळा बंद होत चालल्या. मराठीचा आग्रह धरणाऱ्या सर्व नेत्यांची मुले कॉन्व्हेंटमध्ये शिकत आहेत. परदेशात गेलेल्या तरुणांच्या संख्येत मराठी मुलांची संख्याच अधिक आहे. मराठी भाषेला ‘अभिजात’ दर्जा द्या, अशी मागणी करणाऱ्यांच्या घरातील मुले ‘मम्मी, आपला इंडिया किती ग्रेट आहे गं... ’ असं मराठी बोलतात. परवा एका मित्राच्या आईला अपघात झाला. तो धावत चालला होता. मी थांबवून विचारले... ‘का धावतोस रे...’ तो म्हणाला, ‘मम्मीला अॅक्सीडेंट झालाय.... लिलावतीत अॅडमीट केलेय... आय.सी.यूमध्ये आहे. उद्या अॅापरेशन आहे...’ किती अभिजात मराठी आहे! मराठीची गळचेपी ही मराठी माणसांनीच केलेली आहे. आणि हे लोण आता मुंबईतून बाकी महाराष्ट्रातही हळूहळू सरकत चालले आहे. अशा अनेक विषयांवर मराठी माणूस सगळ्यात बाजूने मागे पडत चालला. राज्याचे किंवा विभागाचे जेव्हा महोत्सव होतात तेव्हा लोक जागरण होणे गरजेचे आहे. पण, त्याची कुणाला गरज वाटत नाही. महाराष्ट्र इतका कर्म दरिद्री कधीच नव्हता. आज राहून राहून खंत तिच आहे की, राजकीय आघाडीवरचे नेतृत्त्व बाजूला ठेवा. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, सामािजक आणि चारित्र्याच्या आघाडीवरही कोणाकडे पहायचे, हाच प्रश्न आहे. त्यामुळे मराठवाडा असो... विदर्भ असो... उत्सव- महोत्सवाचे उपचार होत राहतील... घोषणा... जाहिरातबाजी सगळं काही होईल.. पण महाराष्ट्राची राजकीय, सांस्कृतिक आणि सामाजिक धूप थांबत नाही. एवढे मात्र नक्की.
सध्या एवढेच
श्रद्धेवर जगणारा आमचा कोकणी गणेशभक्त
गणपती उत्सव आला की, कोकणातील माणसं जीव टाकत गावी जायला ज्या ऊर्जेने धडपडतात ती ऊर्जा म्हणजे त्यांची श्रद्धा. कोकण रेल्वे झाली नसती तर काय झाले असते, ही कल्पनाही करवत नाही. जगभरातील सगळे रस्ते चकाचक झाले तरी कोकणाचा रस्ता आणखी दोन-पाच िपढ्या तरी होत नाही... आणि झाला नाही तरी गर्दी काही थांबत नाही. हा एक विलक्षण श्रद्धेचा प्रवास आहे. तुम्ही रस्ते करा.... न करा... कोणी रवींद्र चव्हाण नावाचे बांधकाम मंत्री आहेत... दोन महिन्यांपूर्वी त्यांनी सांगून टाकले की, ‘गणपतीच्यावेळी कोकणात जायला खड्डेमुक्त रस्ते असतील...’ पण हे चव्हाण यशवंतराव चव्हाण थोडेच आहेत...? तेही बोलून टाकायचं आणि निघून जायचं.... याच माकसिकतेत...
रस्त्याची हालत कशीही असली तरी डोक्यावर बोजा घेवून आमचा कोकणी माणूस बाप्पाच्या पुजेसाठी गावाला पोहोचणारच... कोकणात चार खासदार... शिवसेनेचे दोन... राज्यसभेचा एक, दादागटाचा एक... पण कोणाला काय पडलेय? या कोकणातील खासदारांनी कोकणच्या राष्ट्रीय महामार्गासाठी लोसकभेचे कामकाज बंद पाडून हा प्रश्न ऐरणीवर आणला, असे कधी वाचायला मिळाले नाही. त्यांनी कोकणासाठी काय काम केले, हे ही लोकांना माहिती नाही. कोकणचे लोकही अाता यांच्याकडून काही अपेक्षा ठेवत नाही. सगळ्यांची आश्वासने वाऱ्यावर गेली आहेत. गणपती संपले की, पुन्हा ठेचा खात मुंबई गाठायची. आणि पुढच्या वर्षी पुन्हा बॅगा डोक्यावर घ्यायच्या... जग कुठे चाललंय... कोकणातील माणूस श्रद्धेवर जगतोय, एवढं मात्र खरं. पंढरपूरला आषाढीला जाणारा वारकरी आणि आमच्या कोकणातला गणेशभक्त... श्रद्धा हेच त्यांचे बळ. रस्ता असो नसो...
Comments
Post a Comment