*वडापच्या गाडीवर उभा केला संसार.... कमांडर गाडीचा २५ वा वाढदिवस साजरा.. संपूर्ण गावात जेवणाचे नियोजन*....
*वडापच्या गाडीवर उभा केला संसार.... कमांडर गाडीचा २५ वा वाढदिवस साजरा.. संपूर्ण गावात जेवणाचे नियोजन*....
मनोजकुमार मस्के - मांगरूळ
काही वर्षांपूर्वी अशी गाडी होती. जिचे पाचही दरवाज्यातून खुली हवा खात लोक प्रवास करत होते. हल्लीच्या पिढीला हे पटणार नाही. महेंद्र कंपनीची कमांडर गाडी होती ती. खऱ्या अर्थाने या गाडीने अनेकांचे संसार उभा केले. ग्रामीण भागातील अनेक तरुण आपल्या उदरनिर्वाहाचे साधन म्हणून या गाडीकडे बघत होते. शासनाने या वडाप करणाऱ्या गाड्यांवरती निर्बंध आणले आणि अनेकांनी आपल्या गाड्या तोटा सहन करून विकल्या. अनेकजण या गाडीमध्ये कर्ज काढून ते परतफेड न करू शकल्याने बुडाले... परंतु याला अंत्री खुर्द येथील धोंडीराम वरेकर अपवाद ठरले. व्यवसायाच्या दृष्टिकोनातून घेतलेल्या त्यांच्या कमांडर गाडीला चक्क २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. खऱ्या अर्थाने या गाडीच्या जोरावर धोंडीराम त्यांनी आपला संसार उभा केला. नोकरीमध्ये अयशस्वी होत असल्याने आणि व्यवसायाची आवड असल्याने गाडीच्या जोरावर त्यांनी मुलांचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचा एक मुलगा मुंबई येथे बेस्ट मध्ये चालक म्हणून काम करत आहे. दुसरा मुलगा सोलापूर येथे महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. याच व्यवसायात स्वत:ला सिद्ध करून त्यांनी शिराळा येथे घर बांधले... मुंबईसारख्या ठिकाणी दोन घरे घेतली. अशा अनेक गोष्टी त्यांनी या कमांडर गाडीच्या जीवावरच केल्या. याच कमांडर गाडीने त्यांना भरपूर साथ दिली. त्याच गाडीचा वरेकर हे दरवर्षी वाढदिवस साजरा करतात पण यंदाच्या वर्षी २० ऑगस्ट रोजी या गाडीला २५ वर्ष पूर्ण होत असल्याने अंत्री खुर्द येथील त्यांच्या गावात मोठ्या धुमधडाक्यात वाढदिवस साजरा करणार आहेत.
सध्याच्या धक्काधकीच्या आयुष्यात आणि आधुनिकीकरणाच्या वळणावर सार्वजनीक जीवन जगत असताना अनेकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अनेकजण बेरोजगार आहेत... अनेकजणांना करिअर म्हणून कोणता पर्याय निवडावा याचे भानही नसते... जबाबदारी आणि नियोजन यात गुरफडून जाऊन स्वत:ला सिद्ध करणे फार कमी जणांना जमले... आपले ध्येय आणि कर्म योग्य असेल तर कोणतेही काम करण्याची धमक ठेवल्यास आयुष्यात कोणीही कधी कमी पडत नाही. आपण ज्या कामात स्वत:ला झोकून देतो... ते काम प्रामाणिकपणे केल्यास आपण नक्की यशस्वी होतो... शिराळा तालुक्यातील आंत्री गावातील एका ध्येयवेड्या माणसाकडे पाहिल्यास याचा प्रत्यय आल्याशिवाय राहत नाही. त्या ध्येयवेड्या माणसाचे नाव धोंडीराम वरेकर आहे.
शालेय जीवनापासूनच वरेकर यांना ड्रायव्हिंग करण्याचे वेड लागले. त्यात त्यांनी एस.टी. चालक या पदासाठी अनेक ठिकाणी अर्जही केले.. पण नोकरी मिळवण्यात ते अयशस्वी ठरले. घरात व्यवसायाची परंपरा असलेल्या वरेकर यांना घरात बसून राहणे शक्य नव्हते. त्यांनी घरात आपले विचार मांडले आणि एक कमांडर जीपगाडी घेण्यासाठी विनंती केली. गाडी घेवून कर्जाचे हप्ते कसे फेडायचे... ज्यांनी गाडी घेतली त्यांच्या घरी जाऊन चौकशी करा.... किती कर्ज आहे... कर्जाचे हप्ते वेळेत न गेल्यास बँका गाडी जप्त करतात, गाडी घेवून वडाप करणारे किती चुकीच्या मार्गाला लागले... अनेकजण त्यात बुडाले... ते क्षेत्र बरोबर नाही.. असल्या प्रश्नांचा सर्वांनी भडीमार केला. वरेकर यांनी घरात सगळ्यांना विश्वासात घेवून समजावून सांगितल्यानंतर मात्र सगळयांनी त्यांना साथ देवून गाडी घेण्याचे ठरले. शिराळा ते वाकुर्डे असे वडाप करण्याचे त्यांनी ठरवून कर्ज काढून गाडी घरी आणली. वडाप करून आपले भागणार आहे का? गाडीचे हप्ते कसे जाणार? आणि आपल्याला हाती काय राहणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे न शोधता वरेकर हे कामाला लागले... शिराळा-वाकुर्डे असे वडाप सुरू केले. पहिले दोन-तीन महिने हप्ते जाण्यासाठी त्रास झाला... आणि हे सर्वांना माहिती होते तसेच झाले... पण वरेकर यांनी जिद्द सोडली नाही... त्यांनी मनात एक ध्येय ठेवले की, गाडी तीन वर्षांत कर्जमुक्त करायची... आणि तसे त्यांनी करूनही दाखवले. अनेकदा गाडीतच झोप घेतली. पण गाडीचा हप्ता वेळेत जावून आपल्या हाती शिल्लक राहण्यास सुरुवात होवू लागली. हळूहळू परिस्थितीत बदल होवू लागला. आणि तीन वर्षांत कर्जमुक्त करण्यासाठी धडपडणारे वरेकर यांनी गाडी अडीच वर्षांतच कर्जमुक्त केली. या गाडीमुळे अपघात झालेल्या लोकांना तातडीने रुग्णालयापर्यंत पोहोचवणे... अनेक गर्भवतींना वेळेत उपचारासाठी रुग्णालयात पोहोचवणे... अनेकांना देवदर्शन करणे... असे अनेकांच्या सुख-दु:खाचे प्रसंग पाहणारी ती गाडी आहे. वरेकर यांना कोणतेही व्यसन नाही... कोणतेही वाईट काम नाही... कोणालाही दुखावले नाही.... रात्री-बेरात्री कोणाच्याही मदतीला गाडी घेवून हजर राहणारे वरेकर आज आपल्या गाडीचा २५ वा वाढदिवस थाटामाटात साजरा करत आहेत. होय... दरवर्षी आपल्या गाडीच्या वाढदिवसाला सजवून तिला समोर ठेवून केक कापणे यात कधीही खंड पडला नाही. नवल वाटेल... पण हेच खरं आहे की, आपल्या गाडीची पोटच्या मुलासारखी काळजी घेणारे वरेकर हे दरवर्षी आपल्या गाडीचा वाढदिवस साजरा करतात. या वर्षी गावजेवण घालून ज्या गाडीने आपल्या वैभवात भर पाडली, आपलं वैभव वाढवलं, मुलांची शिक्षण पूर्ण केली, मुलांना नोकरी लागल्या इथपर्यंतचा प्रवास केला. त्या गाडीला सजवून तिची गावातून मिरवणूक काढणार आहेत. खरंच आपला व्यवसाय करत असताना ज्या गाडीने आपल्याला मोठं केलं त्या गाडीचा वाढदिवस साजरा करणार. खरंतर एका सजीव व्यक्तीने एखाद्या निर्जीव वस्तूवर प्रेम केले तर समाजाला काहीतरी शिकवून जाते एवढे मात्र धोंडीराम च्या गाडी प्रेमावरून समजते हे मात्र नक्की.
Comments
Post a Comment