पवारसाहेब, निवृत्त व्हा... पण १६ महिन्यांनंतर...

पवारसाहेब, निवृत्त व्हा... पण १६ महिन्यांनंतर...
- मधुकर भावे

श्री. शरदपवार साहेबांनी  आठ दिवसांपूर्वी ‘भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे...’ असे सूचित केले होते. आठ दिवसांत त्यांनी भाकरी फिरवली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद सोडले. नवीन अध्यक्ष नेमण्यासाठी एक समिती नेमली. पवारसाहेबांचे सर्वच निर्णय पटापट असतात. त्याचा थांगपत्ता लागत नाही. त्यांच्या या निर्णयामुळे महाराष्ट्राला धक्का बसला.  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात हलकल्लोळ झाला. सुरुवातीलाच मुद्याला हात घालून सांगतो की, ‘पवारसाहेब तुमची निवृत्तीची घोषणा अवेळी झाली. अवकाळी पावसामुळे जशी पिकाची हानी होते, तुमच्या या निर्णयाने अशीच महाराष्ट्राच्या राजकारणाची मोठी हानी होणार आहे. तुम्ही िनर्णय योग्य केलात... पण तो १६ महिन्यांनंतर लागू होईल, असे जाहीर करा... लोकसभेच्या निवडणुका पुढच्या २५ मे पर्यंत आटोपलेल्या असतील... विधानसभेच्या निवडणुका महाराष्ट्रात अॅाक्टोबर २०२४ अखेर पर्यंत संपलेल्या असतील... तुम्ही त्यानंतर निवृत्त व्हा. 
हाता-तोंडावर ही लढाई आलेली आहे. जे २०१९ साली जमणे शक्य नव्हते ते २०२४ साली निदान महाराष्ट्रात आणि दक्षिणेतील जवळपास सर्व राज्यात भाजपाच्या पराभवाचे वातावरण आहे. अशावेळी तुमच्यासारखा योद्धा आणखी १६ महिने दोन दांडपट्टे हातात घेवून महाराष्ट्राला हवा आहे... देशाला हवा आहे... तुमचं वय झालं... निसर्ग नियमाने काही बंधने आली... दुर्धर आजारावर मात करून, तुम्ही तुमच्या प्रचंड इच्छाशक्तीने आजच्या तारखेपर्यंतची लढाई अशा टिपेवर आणून ठेवली आहे की, आताच्या या घटकेला तुम्ही अध्यक्षपदावरून दूर होणे म्हणजे भाजपामध्ये दसरा- दिवाळी साजरी होणे आहे... तुमच्या इच्छाशक्तीवर तुम्ही सर्वकाही रेटून नेले... सकाळी ७ वाजता तयार होणारा आणि दिवसभरात शेकडो लोकांना अॅापॉईटमेंटशिवाय भेटणारा तुमच्यासारखा दुसरा नेता देशात नाही...  ४० संस्थांचे तुम्ही प्रमुख आहात. राजकारणाच्या पलिकडचे तुम्ही आहात.... सत्ता असो... नसो... तुमच्या भोवती गर्दी आहे. खरा नेता तोच असतो... सत्ता नसताना ज्याच्याभोवती गर्दी असते. आज देशात तुमच्याएवढा आवाका असलेला दुसरा नेता कोणीही नाही. पदावरचे नेते पदामुळे मोठे वाटतात... पद गेले की, त्यांची समाजात ‘पत’ काय आहे, हे पाच मिनीटांत समजून येते... तुमचे तसे नाही आणि म्हणून तुम्हाला हात जोडून सांगणे आहे.... पुढचे १६ महिने तुम्ही ज्या ज्या संस्थांचे प्रमुख आहात, त्या सर्व संस्थांचे काम थांबवा. १६ महिने महाराष्ट्राच्या राजकारणाला आणि देशाच्या राजकारणाला द्या. तुम्ही जाहीर केले आहे, राजकारणातून बाजूला झालो असलो तरी समाजकारणात राहणार आहे. साहेब, हे वाक्य भावनात्मक आहे. तुम्ही आता ज्या जागेवर आहात त्या जागेवर १६ महिने राहिल्याशिवाय हाता-तोंडाशी आलेले हे वातावरण उचकटून जायला वेळ लागणार नाही. आता महाराष्ट्रात तरी सध्याच्या सरकाराविरोधात जबरदस्त वातावरण आहे. तुमच्या सततच्या प्रयत्नाने महाविकास आघाडी झालेली आहे.  या आघाडीला तुमच्याशिवाय पुढचे १६ महिने सांभाळणे जवळपास अशक्य आहे. आघाडीतील कोणी चुकले तर, त्याला दोन शब्द सुनावण्याची ताकद, त्याचा कान धरण्याची ताकद फक्त तुमच्याकडे आहे. आघाडीचे सोडून द्या. आघाडी सरकारात तब्बल दोन वर्ष राहिल्यावर ज्या एकनाथ शिंदे यांना काँग्रेस- राष्ट्रवादीबरोबर सत्तेत सहभागी झाल्याचा पश्चाताप झाला त्या मुख्यमंत्री शिंदे यांना कोकणातल्या रिफायनरी प्रकल्पाबद्दल तुमच्याशी चर्चा करण्याकरिता उद्योगमंत्र्याला पाठवावे लागले. हा जो उद्योगमंत्री तुम्हाला भेटायला आला... तोही असा की, ज्याला राजकारणात तुम्हीच आणलेत... विधानसभेत तुम्हीच पहिले तिकीट दिलेत... निवडून तुम्हीच आणलेत... राज्यमंत्री तुम्हीच केलेत... नगरविकास खाते तुम्हीच दिलेत... पण, कृतघ्न निघाले... अशी कितीतरी माणसं तुम्ही घडवलीत... मोठी केलीत... ती पळून गेली. १९८० साली तुमच्या पक्षाचे ५० आमदार तुम्हाला सोडून झटकन सत्ताधारी बाकावर बसले. तुम्ही क्षणभरही अस्वस्थ झाला नाहीत... पाच आमदारांना घेवून तुम्ही लढाई लढलीत... १९८५ च्या निवडणुकीत पुन्हा नव्याने ५५ आमदार निवडून आणलेत... आजही महाविकास आघाडीतील तुमच्या पक्षाचे  ५४ आमदार आहेतच... स्वतंत्र पक्ष काढून ५०-५५ आमदार निवडून आणणे ही ताकद फक्त तुमची आहे. शिवसेनेचे जे आमदार विजयी होतात, ती उद्धव ठाकरे यांना मिळालेली बाळासाहेबांची विरासत आहे... तुम्ही स्वतंत्र पक्ष काढलात... महाराष्ट्रात उभा केलात... १९९९ साली तुमच्या पक्षाचे जास्त आमदार असताना तुम्ही विलासराव देशमुख यांना मुख्यमंत्री व्हायला मान्यता दिलीत... राजकारणात कुठे लवचिक असावं, कुठे कणखर असावं, एकहाती निवडणूक कशी लढवावी... कशी जिंकावी... पावसात भिजल्यानंतर महाराष्ट्राला वाटले.... सह्याद्री पावसात भिजला...  २०१९ च्या निवडणुकीनंतर निर्माण झालेले सरकार तुमच्या  राजकीय ताकदीवरच आकाराला आले. नाही तर ते शक्य नव्हते. पवारसाहेब... आता जर या लढाईच्या ऐन मोक्याला तुम्ही बाजूला होण्याची भूमिका घेतलीत तर आताच सांगून ठेवतो... भाजपाला मोकळं रान आहे... महाराष्ट्रातील आजचे सरकार हे स्टेपनी सरकार आहे. मुख्यमंत्र्यांना भाजपाने खाऊन टाकलेले आहे. त्यांनी काढलेली जी शिवसेना आहे... ती निवडणुकीच्या आगोदरच भाजपामध्ये विलीन होणार आहे. तुम्ही एकमेव नेते असे आहात... की तुम्ही एकट्याने काढलेला पक्ष महाराष्ट्रात टिकला. यापूर्वी विविध कारणांनी काँग्रेसशी मतभेद होवून जे  जे नेते बाहेर निघाले त्यापैकी कोणी ‘म. स. का. काढला (महाराष्ट्र समाजवादी काँग्रेस- शंकरराव चव्हाण), कुणी भा. रि. का. (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस- बॅ. अंतुले)..  महादेव जानकर नावाचे एक मंत्री होते... त्यांनी त्यांचा एक पक्ष काढला... तुमच्या नेतृत्त्वाची हीच ताकद आहे. शिवाय राजकारण सुसंस्कृतपणे, सभ्यतेने कसे करावे, हा यशवंतराव चव्हाण यांचा संस्कार तुम्ही नुसता पचवला नाही तर तो महाराष्ट्रात वाढीला लावला. आज अशा संस्कांरावरच टोळधाड आलेली आहे. अशावेळी विकासाचा महाराष्ट्र, संसंस्कृत राजकारणाचा महाराष्ट्र,  राजकारणाच्या बाहेर सर्वविषयांमध्ये सर्वांना मदत करण्याची भूमिका  घेणारा महाराष्ट्र... त्यासाठी लागणारा नेता म्हणून महाराष्ट्र तुमच्याकडे पाहतोय... तुम्ही केवळ राजकीय नाहीत..  राजकारणाच्या बाहेरचे ५० विषय असे आहेत की, जिथे तुम्ही तुमची पाऊले उमटवली आहेत.  एक महिन्यापूर्वी विनोद कांबळी याचे निवेदन होते, ‘घरी आर्थिक परिस्थिती बिकट झाली असताना आज जे काही जगतोय ते शरद पवारसाहेब क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष असताना त्यांनी दिलेल्या महिना ३० हजार रुपयांच्या अनुदानामुळे....’ तुम्ही कुठे-कुठे आहात.. २५ मे २०१९ ला लोकसभा निवडणूक झाली...  २६ मे च्या रात्री महाराष्ट्रातील जवळपास सर्व राजकीय पक्षांचे नेते कोणी सिंगापूरला गेले... कोणी जिनेव्हाला गेले... २७ मे २०१९ च्या वृत्तपत्रात पहिल्या पानावर एक फोटो प्रसिद्ध झाला.... ४३ डिग्री तापमानात सांगाल्यातील शेतात एका शेतकऱ्याच्या खांद्यावर हात टाकून एक नेता शेतीतील आलेल्या संकटाची चर्चा भर उन्हात करतोय.... बाकी नेते थंड हवेच्या ठिकाणी पोहोचले होते. आणि तुम्ही सांगोल्याच्या शेतात भर उन्हात उभे होतात. इतर नेते आणि तुम्ही, यात हाच मोठा फरक आहे. त्यामुळे तुम्ही िनव्वळ राजकारणी नाही... सर्व क्षेत्रातील लोकांना तुम्ही हवे आहात... अनेकांना  कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून हवे आहात. अनेक लेखकांना पुस्तकाचे प्रकाशन करायला तुम्ही हवे आहात... शेतकऱ्यांना तुम्ही शेती प्रदर्शनाचे उद्घाटन करायला हवे आहात... तुमची कार्यक्रमाची डायरी मला माहिती आहे.... सतीश राऊत प्रत्येक दिवशी ते कार्यक्रम टाईप करून तुमच्यासमोर ठेवतात. पुढच्या चार-चार महिन्याच्या सर्व तारखा तुमचे कार्यक्रम ठरलेले आहेत. याचीही कल्पना आहे... आता ते सर्व कार्यक्रम १६ महिने बाजूला ठेवा... फक्त महाराष्ट्राच्या राजकारणासाठी आिण यशवंतरावांच्या कल्पनेतील महाराष्ट्राची पुन्हा स्थापना करण्यासाठी हे १६ महिने तुम्ही आम्हाला द्या. मला हे माहिती आहे की,  तुमच्या शारिरीक मेहनतीची आणि होणाऱ्या त्रासाची प्रतिभावहिनींना, तुमची लाडकी लेक सुप्रिया ताईला, अजितदादांना कल्पना आहे. दोन महिन्यांपूर्वी सुप्रिया ताईंच्या मतदारसंघात खडकवासला येथे एका सभेला गेलो होतो. तिथे ताईला म्हणालो... ‘साहेबांचे कार्यक्रम आता थोडे कमी करा... खूप दगदग होते आहे...’ सुप्रिया ताई म्हणाली की, ‘आम्ही सांगून थकलो... आता तुम्ही सांगा...’ शिर्डी येथे राष्ट्रवादी पक्षाचे शिबिर झाले.. त्या शिबिरात जयंतराव पाटीलयांनी मला बोलावले होते. अिजत दादाची भेट झाली. तुमच्या सततच्या कार्यक्रमाच्या दगदगीबद्दल दादांशी बोललो. दादा तेच म्हणाले, ‘साहेब ऐकायला पाहिजेत ना.....’ मला ही गोष्ट मान्य आहे... घरात बसून राहिले तर आजारपण वाढते... मी तुलनेसाठी सांगत नाही... मी आता चार महिन्यांनी ८४ वर्ष गाठेन... घरात बसलो तर आजारपण येते... कामाला बाहेर पडलो तर प्रकृ़ती ठणठणीत राहते. काम करत रहा.... प्रकृती उत्तम राहते, हे ही मान्य.. पण, तुम्ही सध्या बाकी सगळे कार्यक्रम बाजूला ठेवण्याचे जाहीर करा आणि पुढचे १६ महिने फक्त महाराष्ट्राच्या राजकारणाकरिताच द्या. भाकरी  फिरवली पाहिजे, हे मान्य... नाहीतर करपणार... ‘नवीन पिढीला संधी दिली पाहिज,’, हेही मान्य. पण हे सगळं १६ महिन्यांनंतर. आता तुमचे या क्षणाला बाजूला होणे, तुम्हीच मेहनत करून निर्माण केलेल्या भाजपाविरोधी वातावरणाला छेद  देणारे ठरेल. उत्तराधिकारी नेमा... पण, १६ महिन्यांनी. शिवाय खरं सांगू का... तुम्ही कोणाचेही नाव घ्या... कोणालाही अध्यक्ष करा... ‘शरद पवार’ या नावाची ताकद ... आवाका... महाराष्ट्रात आज तरी कोणाकडेही नाही. उद्धव ठाकरे यांच्या जागी तुम्ही आघाडीचे मुख्यमंत्री असता तर हे सरकार पडलेच नसते. राज्याच्या प्रमुखाला ५० आमदार पळून अर्धा रस्ता गाठेपर्यंत पत्ता लागत नाही... तुम्ही तुमच्या ‘लोक माझ्या सांगाती...’ दुसऱ्या भागात  या दुखण्यावर नेमके बोट ठेवले आहे.
आणखीन एक गोष्ट सांगतो... महाविकास आघाडी तीन पक्षांची आहे. पण या आघाडीत सध्यातरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष शिवसेनेच्या मागे फरफटत चालले आहेत. असे दृष्य आहे.  पुण्याचे माजी महापौर आणि प्रभावी कार्यकर्ते अंकुशराव काकडे  यांनी याच विषयावर नेमके बोट ठेवले आहे. बी. के. सी. तील सभा झाली. दुसऱ्या दिवशीचा ‘सामना’ पाहिल्यावर ही सभा शिवसेनेचीच होती, असे वाटले. अजितदादा, बाळासाहेब थोरात, नाना पटोले, सगळे आतल्या पानावर.. हे तुम्ही आज अध्यक्ष असताना... तुम्ही अध्यक्ष पदावरून बाजूला झालात की, कोणालाच कोणाचाही, कसलाही धाक राहणार नाही.
आज दुर्दैवाने काँग्रेसजवळ तगडा नेता नाही. कोणाला खरे वाटणार नाही.. १९६७ साली संपूर्ण देशात नऊ राज्यांत काँग्रेसचा पहिल्यांदा पराभव झाला. त्यावेळच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसचे २०२ आमदार निवडून आले. त्यात प्रथम निवडून आलेले तुम्हीही होतात. १९७२ साली २२२... आज काँग्रेस ४४ आमदारांवर आहे. ते यशवंतराव नाहीत... वसंतराव नाईक नाहीत... प्रदेश काँग्रेसचे तेव्हा अध्यक्ष असलेले वसंतदादा नाहीत. विलासराव होते... तेही काळाने निघून गेले... पतंगरावही गेले.... भाजपामधील गोपिनाथ मुंडे गेले... आपले आर. आर. आबा गेले... लोकांमध्ये स्थान असलेली ही चांगली माणसं गेली. अशावेळी एकखांबी नेते म्हणून पवारसाहेब, तुम्ही आहात. कि्रकेटचा सामना एकहाती  जिंकून देण्याची ताकद आजही फक्त धोनीजवळ आहे. राजकारणातील कोणताही सामना एक हाती जिंकून देण्याची ताकद फक्त तुमच्यामध्ये आहे. महाविकास आघाडीमधील ऐक्य टिकून राहण्यासाठी फक्त तुम्ही आणि तुम्हीच, हे काम करू शकाल.  तुम्हीच दूर झालात तर होणार कसे?
.... आणि म्हणून हात जोडून विनंती करतो.. पवारसाहेब, निवृत्त व्हा ... पण, १६ महिन्यांनंतर...  आणि आणखीन एक सांगू का..... तुम्ही निवृत्तीची घोषणा केलीत तरी तुम्हाला घरात बसवणार नाही. सामाजिक काम तुम्ही करणारच आहात... प्रतिष्ठानमध्ये तुम्ही बसणारच आहात... दौरे करणारच आहात... रोज शेकडो लोकांना भेटणारच आहात... मग हे सगळं करणारच आहात तर १६ महिने पक्षाचे अध्यक्ष राहून तेवढे महिने महाराष्ट्रासाठी द्या.  महाराष्ट्रात परिवर्तन होतेय की नाही ते पहा... पण, तुम्ही निर्णय बदलला नाहीत तर, हाता-तोंडाशी आलेले लोकशाही वाचवण्याचे हे काम भलते पेंढारी पीक कापून घेवून जातील... आणि त्याचा दोष तुमच्या पदरात पडेल... ऐन लढाई समोर आली असताना  फक्त १६ महिन्यांसाठी तुम्ही मैदानातून दूर होऊ नका.  एवढेच हात जोडून तुम्हाला  सांगणे.    📞9892033458

Comments

Popular posts from this blog

*अनाथ मुलांचे स्वीकारले स्वामी धामने पालकत्व*

संजय गणपती पाटील उर्फ संजू दादा भावपूर्ण श्रद्धांजली

*रात्री माझं गाव विकताना पाहिलं*