50% सवलती मुळे, वडापाचालक १००% टक्के काळजीत....
50% सवलती मुळे, वडापाचालक १००% टक्के काळजीत....
मनोजकुमार मस्के -मांगरूळ
राज्य शासनाच्या अर्थसंकल्पामध्ये एसटीच्या महिलांच्या तिकीट आकारणीमध्ये ५० टक्के सवलत देण्याच्या निर्णयामुळे शिराळा,वाळवा, शाहुवाडी तालुक्यातील वडाप चालक चिंतेत पडले आहे. त्यांचा व्यवसाय निम्म्याने घटणार असून नवे प्रवासी मिळवण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे.
राज्य शासनाच्या या निर्णयाचा मोठा परिणाम खाजगी वाहतूक करणाऱ्या तसेच शेअरिंग वाहतूक करणाऱ्या वडापचालकांवर होणार आहे. तालुक्यात शिराळा, वाळवा, शाहूवाडी, कराड तालुका तसेच शिराळा व शाहुवाडी तालुक्याच्या पश्चिम , दक्षिण भागामध्ये खाजगी जीप, रिक्षा याद्वारे वडाप वाहतूक मोठ्या प्रमाणात केली जाते.
एसटी व वडाप तिकीट एक सारखेच आहे. आता एसटीमध्ये ५० टक्के सवलत मिळत असल्याने महिला लालपरीचा आधार घेणार आहेत. परिणाम वडाप चालकांचा ग्राहकांचा मोठा आधार तुटला असल्याने त्यांना चिंता लागून राहिली आहे.
-
नोकऱ्या नसल्याने अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी शेती गहाण ठेवून परवाना असणारी वाहने खरेदी केली. वृद्धांना मोफत, महिलांना 50 टक्के असे आरक्षण असल्यामुळे, आम्ही कर्ज काढून घेतलेल्या वाहनात बसणार तरी कोण? त्यातच पुरुषवर्ग आपापल्या मोटरसायकल घेऊन प्रवास करत असल्याने वडाप करणाऱ्या प्रत्येकावर उपासमारीची वेळ येणार हे मात्र नक्की.
- जयसिंग खांडेकर - वडाप ड्रायव्हर
कृपया शासनाने वडापावल्यांना किमान आपली बायका मुलं व पोट भरणे इतपत नोकरी द्यावी! अन्यथा आम्हाला कर्जबाजारी होऊन जीवन संपवण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. आधी कोरोनाने मारलं त्यात आता आमच्या जखमेवर सरकार मीठ चोळून पाहत आहे. आमच्या पोटापाण्याचा प्रश्न सरकारने मार्गी लावावा एवढीच एक प्रांजळ इच्छा उरली आहे.
- विकास जांबळे - अध्यक्ष वडाप संघटना कोकरूड शिराळा
Comments
Post a Comment