जनतेचा रेटा, एकीचा सोटा धडकी भरलीय सरकारा...खुशाल कोंबडं झाकून धरा..’

‘जनतेचा रेटा, एकीचा सोटा धडकी भरलीय सरकारा...खुशाल कोंबडं झाकून धरा..’
१५० दिवस ..... ३५७० किलोमीटर..... १२ राज्ये

९२ वर्षांनंतर आणखी एक गांधी पदयात्रा करत निघाला आहे.  १५० दिवस.... ३,५७० किलोमीटर. आणि १२ राज्ये असा हा ५ महिन्यांचा पदयात्रेचा कार्यक्रम ‘भारत जोडो’ कार्यक्रम आहे. गेल्या ८ वर्षांत या देशातील लोकशाही उचकटून टाकण्यात आली आहे. सर्व धर्म समभावाचे आणि गाव पातळीपर्यंतच्या गोडी गुलाबीने या  देशात राहण्याचे सगळे वातावरण खराब करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पैसा, राजकीय फोडाफोडी यांच्या कंपन्या देश पातळीवर स्थापन झाल्या. प्रत्येक राज्यात तोडफोडीसाठी कार्यकारी संचालक नेमले गेले. त्या तोडफोडीचे मुख्य कार्यालय दिल्लीत आहे. प्रत्येक राज्यात एक-एक कार्यकारी संचालक नेमला आहे. जी राज्ये भाजपाची नाहीत ती तोडायची-फोडायची.... जिथं आवश्यक आहे तिथं शासकीय यंत्रणा वापरून धाक दाखवायचा... अशा पद्धतीने भाजपा विरोधी पक्षांना घेरण्याचा कार्यक्रम जोरात सुरू भाजपाच्या नियुक्त अध्यक्षांनी शाहीर करून टाकले आहे की, या देशात प्रत्येक राज्यात फक्त भाजपाचे सरकार राहील.  विरोधी पक्ष नावाला शिल्लक राहिल. एक पक्षीय हुकूमशाहीची ही भूमिका आहे. देशातील जनता ही भूमिका कधीही मान्य करणार नाहीत. जे जे बोलले जात आहे ते ते सामान्य माणसं कानात साठवून ठेवित आहेत.  त्यांची किर्द- खतावणी म्हणजे लाल चोपड्या नाहीत. प्रत्येक गोष्ट मनावरच कोरून ठेवली जात आहे. योग्य वेळी आज सगळा हिशोब शांततामय मार्गाने व्यक्त झाल्याशिवाय राहणार नाही. हा विश्वासही याच जनतेजवळ आहे. 
देशातील सगळ्या वृत्तवाहिन्या आणि बरीचशी वृत्तपत्रे भाजपच्या नळावर पाणी भरत आहेत.  त्यामुळे ८ वर्षांतील महागाई, ८ वर्षांतील बेकारी, ८ वर्षांतील रोजगाराच्या घोषणा किती पोकळ ठरल्या... हे बेराजगार तरुण पहात आहे... ८ वर्षांतील रुपयाची झालेली वाताहात, ८ वर्षांतील खोटी आश्वासने.... काळा पैसा बाहेर काढण्याच्या नावावर केलेली नोटाबंदी.... त्यातून गेलेले रोजगार.... अशा सर्व पातळ्यांवर देशाला हैराण करून, एक दहशतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. आणिबाणीच्या काळात जे साहित्यिक रस्त्यावर उतरले होते, त्यांना याची खात्री होती की, या देशात लोकशाही असल्यामुळे आपल्याला शांततेच्या मार्गाने निषेध नोंदवता येईल. त्यामुळे पु. ल. देशपांडे यांच्यापासून साहित्यिक रस्त्यावर आले. मेणबत्तीवाले रस्त्यावर आले. आता गेल्या आठ वर्षांत सगळे गायब आहेत. साहित्य संमेलनात ८ वर्षांपूर्वी होणारे ठराव अाता बासनात गुंडाळून ठेवलेले आहेत. सगळ्या बाजूंनी लोकशाही आक्रसल्यासारखी वाटते. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सासणे त्यांच्या जाहीर भाषणात सांगतात ८ वर्षे घुसमट होत आहे... प्रश्न एवढाच आहे की, घुसमट का सहन करता? बोलत का नाहीत... इंदिरा गांधीच्या राजवटीविरुद्ध बोलत होतात.... रस्त्यावर उतरत होतात... शांततामय मार्गाने मतं व्यक्त करत होतात.. मग आताच साहितय संमेलनाचे अध्यक्ष होईलपर्यंत घुसमटीला वाट का फुटली नाही? असे सामान्य माणसांचे प्रश्न आहेत. गेल्या ८ वर्षांत विरोधात कोणी बोलायला तयार नव्हते. रस्त्यावर उतरायला तयार नव्हते. सगळी वृत्तपत्रे शरणागतीच्या पागोळीखाली उभी होती. सगळ्या वाहिन्या आरत्या करण्यासाठी आतूर होत्या. या आशा आक्रसलेल्या वातावरणात राहुल गांधी यांनी शांतपणे, गांधी घराण्याला शोभेल असा अहिंसक मार्गाच्या पदयात्रेचा रस्ता शोधला.  ७ सप्टेंबरला ते बाहेर पडले... अर्धे अिधक अंतर त्यांनी कापले आहे... १२ राज्यांत ते चालत जाणार.... ज्या तरुण नेत्याची संभावना गेल्या गुजरात निवडणुकीत ‘पप्पू’ म्हणून केली होती, आता हाच ‘पप्पू’ लाखो लोकांना आपल्या मागे घेवून देशातील संविधान आणि लोकशाही, महागाई आणि बेरोजगारी यांनी हैराण झालेल्या जनतेला आवाहन करून चालत निघालेला आहे. सुरुवातीला या पदयात्रेची टिंगल झाली होती....  देशातील तमाम वाहिन्या या पदयात्रेवर अघोषित बहिष्कार घातल्यासारख्या होत्या. देशातील बहुसंख्य वृत्तपत्रे- आणि महाराष्ट्रातीलसुद्धा यांच्याही व्यवस्थापनाने स्पष्ट सूचना दिल्या होत्या की.... राहुल गांधी यांच्या पदयात्रेला प्रसिद्धी द्यायची नाही... जी वृत्तपत्रे काँग्रेसच्या जिवावर मोठी झाली..... त्या वृत्तपत्रांच्या व्यवस्थापनानेसुद्धा अघोषित बहिष्कार घातला...  पण, या देशातील सामान्य माणूस रस्त्यावर उतरला नव्हता तरी अस्वस्थ आहे. दोन डोळ्यांनी तो बघत नाही... देशातील राजकीय परिस्थितीकडे लाख डोळयांनी बघणारे समाजमाध्यमातील सदस्य आपल्याच हातातील आधुनिक साधने घेवून या पदयात्रेच्या मागे ठाम उभे राहिले. त्यांनी देशातील वाहिन्यांना तोंडघशी पाडले. देशातील आणि महाराष्ट्रातील वृत्तपत्रे तोंडावर आपटली...  समाज माध्यमांनी राहुल गांधींच्या या पदयात्रेला एवढी प्रचंड प्रसिद्धी दिली की, वृत्तपत्रांना कोण विचारतो? अशी त्यांची अवस्था झाली. वृत्तपत्रे समाजाचे नेतृत्त्व करू शकत नाहीत.... हे ही या निमित्ताने सिद्ध झाले. ‘कोणत्याही परिसि्थतीत कोणतीही बातमी मारायची नाही... ’ अशी धोरणे असलेली वृत्तपत्रेही राहुल गांधींच्या पदयात्रेच्या बातम्या दाबून टाकयला लाग्ाली. पण, समाजमाध्यमांचा रेटा, जनतेचा एकीचा सोटा... असा काही प्रभावी ठरला आहे... वृत्तवाहिन्या, वृत्तपत्रे सर्वांना उघडे पाडून या पदयात्रेला मिळालेला प्रतिसाद एवढा तुडुंब आहे की, वृत्तपत्रांच्या विश्वासर्तेलाच आता जबरदस्त तडाखा मिळालेला आहे. जसजशी पदयात्रा पुढे सरकेल त्या प्रमाणात काँग्रेस पक्षातील देश्ाव्यापी मरगळ झटकली जाईल. 
महाराष्ट्रात यात्रा पोहोचत आलेली आहे. ७ नोव्हेंबरला ती नांदेड येथे येईल... तिथून १३ दिवस ही पदयात्रा महाराष्ट्रात आहे.  १५ नोव्हेंबर रोजी वाशीम येथे जाहीर सभा आहे. गर्दीचे सर्व उच्चांक ही सभा मोडेल.... जनतेची घुसमट झालेली आहे. कोणीतरी पुढाकार घ्यायला हवा होेता. ब्रिटीशांच्या विरोधातील लढाई महात्मा गांधी लढले.... गांधी- नेहरू- गांधी घराण्याला  कोणीही, कितीही शिव्या घातल्या आणि बदनाम करण्याचा प्रयत्न केला तरी, या घराण्याचा त्याग सामान्य लोक विसरू शकणार नाहीत. एक महात्मा जातीयवाद्यांच्या नथूच्या गोळीला बळी पडतानाही त्याच्या तोंडून ‘राम’ शब्द आला. दोन पंतप्रधानांना अनेक गोळ्या आणि बॉम्बने उडवले. तरीही या घराण्याची बदनामी जेवढी करणे शक्य आहे, त्याचा खटाटोप सुरू आहे. जगातील कोणत्याही देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत ती चळवळ लढवणाऱ्या नेत्याच्या घरातील प्रत्येक सदस्याने त्यावेळच्या त्या त्या देशातील सरकारविरोधात तुरुंगवास भोगल्याचे एकही उदाहरण नाही.  नेहरू- गांधी कुटुंबातील ११ च्या ११ सदस्यांनी एक- दोन वर्षे नव्हे तर तब्बल १६ वर्षे तुरुंगवास भोगला. त्यात एकट्या पंडीत नेहरूंचा तुरुंगवास सव्वा नऊ वर्षांचा होता. दोन पंतप्रधानांचे देशासाठी बलिदान... भाजपावाल्यांनी कसाही आणि कितीही अपप्रचार केला तरीही गांधी-नेहरू- गांधी घराण्याचा त्याग त्यांना पुसून काढता येणार नाही. म्हणून बदनामीची मोहीम हाती घेतली गेली. एका तरुणाची टिंग्गल झाली... त्याच्याच पाठिमागे लाखभर लोकं रोज चालत आहेत.... हे आगळेवेगळे चित्र आहे. दिल्लीत बसलेल्या काही लोकांनी या पदयात्रेला प्रसिद्धी मिळणार नाही, यासाठी अकांत केला... पण,   सर्व गोष्टी सत्ता- पैसा याच्या प्रभावापुढे शरणागती पत्करत नाहीत, हे सामान्य जनतेने दाखवून दिले आहे.  
६५ वर्षांपूर्वीची एक आठवण झाली... १९५५ ते १९६० या पाच वर्षांत महाराष्ट्रात लढवला गेलेला ‘संयुक्त महारष्ट्राचा लढा’  त्यावेळच्या मोरारजी सरकारने चिरडून टाकण्याचा प्रयत्न केला होता.  १०५ जणांनी हौतात्म्य पत्करले... त्यावेळच्या केंद्र सरकारातील अर्थमंत्री चिंतामणराव देशमुख यांनी मुंबईत झालेल्या गोळीबाराचा निषेध करण्यासाठी, अर्थमंत्रीपदाचा राजीनमा दिला. सरकारात बसलेले काही नेते जेव्हा संवेदनाशील असतात तेही सत्तेपुढे झुकत नाहीत. सामन्य माणूस तर नाहीच नाही.... म्हणूनच तर ब्रिटीशांच्या विरुद्ध झालेल्या लढ्यात ज्ञाात- अज्ञाात हजारो लोकांनी  केवढा मोठा त्याग केला आहे. त्या नेतृत्त्वाचा त्याग कोणालाच पुसून टाकता येत नाही. गांधी- नेहरू यांची बदनामी करूनही भाजपाला पुढच्या निवडणुकीची धास्ती वाटत आहे. दोनदा यश मिळाल्यनंतरही अनेक उचापती केल्याशिवाय तिसऱ्यांदा यश मिळेल की नाही, या संशयाने ते घेरलेले आहेत. सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा कितीही उंच बांधला तरी  गांधी- नेहरू यांची उंची कमी होत नाही..  संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतही महाराष्ट्राच्या चळवळीला बदनाम करण्याची  एकही संधी मोरराजी देसाई आणि सदोबा पाटील यांनी सोडली नाही. पण, चळवळीचा रेटा एवढा होता की,  चळवळ बदनाम होवू शकली नाही. त्या काळात शाहीर अमर शेख, शाहीर आत्माराम पाटील, शाहीर गव्हाणकर, शाहीर गजाभाऊ बेणी आणि अमरशेख पथक यांनी सगळा महाराष्ट्र दणाणून टाकला.  त्या काळात शाहीर आत्माराम पाटील यांनी एक पोवाडा लिहिला....  संयुक्त महाराष्ट्राची चळवळ चिरडून काढण्याकरिता कितीही प्रयत्न केले तरी संयुक्त महाराष्ट्र होणारच.... मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची घोषणा करावी लागणारच... या निर्धाराने लिहिलेल्या पोवाड्यात आत्माराम पाटील गरजले होते की, 
‘जनतेचा रेटा, एकीचा सोटा 
धडकी भरलीय सरकारा...
‘खुशाल कोंबडं झाकून धरा.... 
आरं उठा, शेतकरी- कामकरी
शाळकरी- माळकरी
दर्याचा सारंग- वल्हकरी- डोलकरी
रानकरी- मोलकरी, आगरी- भंडारी
कुंभार- लोहार, ब्राम्हण नि सुतार
कॉलेजचं कुमार
उठा, इतिहास राखून धरा, 
खुशाल कोंबडं झाकून धरा... 

आज त्या इितहासाची आठवण होत आहे.  
हम अकेले चले थे... 
देखते देखते कारवॅा बन गया... 
अशी या पदयात्रेची आजची स्थिती आहे.... संपूर्ण देशाला एका सूत्रात बांधणारी... जात- धर्माच्या पलिकडचा विचार करणारी आणि सत्ता- संपत्ती याला शरण न जाणारी, एका भारतीयाची ही यात्रा आहे. 
२०२४ च्या निवडणुकीला २ वर्षे असली तरी आणि या दोन वर्षांत फाटाफूट, फोडाफोडी हे सगळे प्रकार अधिक प्रभावीपणे होणार असले तरी, ही फाटाफूट राजकीय नेत्यांची आहे... पैसा- खोका- सत्ता- संपत्ती याच्याशी आम माणसांचा काहीही संबंध नाही. वृत्तपत्रांची पहिली पाने या सगळ्या घाणेरड्या राजकारणाला वाहिली असली आणि सामान्य माणसांचे प्रश्न वाऱ्यावर सोडले असले तरी, आज सामान्य माणूस मजबूत आहे.... त्याला कोणी विकत घेऊ शकणार नाही.... तो कोणाची दहशत मानणार नाही.... ज्या वेळी ही लाखो सामान्य माणसं देशात जे काही घडते आहे , ते शांतपणे बघत असतात. त्या दिवशी त्यांच्या मनाचा निर्धार असतो...  आणि तो त्या मतपेटीच्या दिवसाची वाट पहात असतो. आज देशाची स्थिती तीच आहे आणि त्याचा परिणाम हाच सामान्य माणूस दाखवल्याशिवाय राहणार नाही. 
याच महाराष्ट्राने स्वातंत्र्याच्या चळवळीत सगळ्यात मोठी झेप घेतली. गोवा मुक्ती आंदोलनात हाच महाराष्ट्र आग्रभागी होता. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत याच महाराष्ट्रातील सामान्य जनतेने लोकशाहीचे सूत्र अधिक घट्ट केले.  जात- धर्म- पंथ या सर्वांवर मात करून त्यावेळी फार शिक्षित नसलेल्या महाराष्ट्राने ७० टक्के मतदान करून भल्याभल्यांची जिरवली.  आज तोच महाराष्ट्र आणि त्या महाराष्ट्राची पत्रकारिता कुठेतरी वळचणीला उभी आहे... 
राहुल गांधी यांची पदयात्रा तीन महिन्यांनी संपेल. नंतर काँग्रेसच्या अन्य नेत्यांना पूर्व-पश्चिम अशी यात्रा करावी लागेल. त्यासाठी एक टीम तयार करावी लागेल. सर्वच यात्रा राहुल यांनी कराव्या, ही भूमिका मदत करणार नाही.. शांततामय मार्गाने अन्य नेत्यांनाही आपली जबाबदारी लक्षात घेवून रस्त्यावर उतरावे लागेल.  एका यात्रेनंतर २०२४ पर्यंत पुन्हा काँग्रेसचे सर्व नेते  गप्प बसले तर अपेक्षित परिणाम साधता येणार नाही. आणि त्या काळात भाजपाचे नेतृत्त्व भावनात्मक पातळीवरचे असे काही डावपेच खेळेल... या देशातील मतदार सत्यापेक्षा भावनेकडे वाहून जात असतो. हे लक्षात ठेवून सतत  जनजागर कार्यक्रम हातात घेतला पाहिजे. 
सागर हटविण्याचे प्रयत्न झाले, पण हटवलेला समुद्र कुठेतरी उफाळून वर येतोच, हा निसर्ग नियम आहे. महाराष्ट्राचे थोर कवी यशवंत यांनी आपल्या चार ओळींमध्ये निसर्गाचे सत्य सांगून टाकलेले आहे. 
हटून हटतो... काय सागर... 
हटेल एकीकडे.... 
उफाळेल तो... दुसरीकडून
गिळून डोंगर-कडे....
ज्वालामुखीला बघता लिंपू
काय कल्पना खुळी
तोच अनावर तुम्हास होईल
उद्याच्या शहाण्णव कुळी... 
सध्या एवढेच.... 
- मधुकर भावे

Comments

Popular posts from this blog

*अनाथ मुलांचे स्वीकारले स्वामी धामने पालकत्व*

संजय गणपती पाटील उर्फ संजू दादा भावपूर्ण श्रद्धांजली

*रात्री माझं गाव विकताना पाहिलं*