उध्दवराव, भाजपाला पराभूत करता येते.. ही हिंमत तुम्ही दिलीत हेच तुमच सगळ्यात मोठ यश...
उध्दवराव, भाजपाला पराभूत करता येते.. ही हिंमत तुम्ही दिलीत हेच तुमच सगळ्यात मोठ यश...
-------------------------------------------------------------------
मधुकर भावे
------------------
उध्दवरावांच्या सरकारला दोन वर्षे पूर्ण झाली. लोकशाहीमध्ये कोणतेही सरकार पाच वर्षाकरीता असते. हे सरकारही पाच वर्षाकरिता आहे. दोन वर्षे यशस्वी झाली. प्रशासनाचा तसा फारसा अनुभव उध्दवरावांजवळ नव्हता. मुंबई, औरंगाबाद, ठाणे, या महानगरपालिका त्यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला सातत्याने जिंकून दिल्या. त्यामुळे त्यांचे राजकीय नेतृत्व-कौशल्य सिध्द झालेच होते. मुंबई महापालिकेच्या एका निवडणुकीत तर त्यावेळचे मुख्यमंत्री फडणवीस आणि त्यांचे अख्खे सरकार, वाघाच्या जबड्यात हात घालण्याची भाषा करत होते. पण त्यांची ती हिंमत नव्हती, नुसती भाषणबाजी होती. मुंबई महापालिका त्यावेळी फडणवीस सरकारच्या विरोधात उभे राहून उध्दवरावांनी शिवसेनेला जिंकून दिले. ५0 वर्षापूर्वी बाळासाहेब नेतृत्व करीत असताना शिवसेनेला त्यांनी महापालिका जिंकून दिली आणि डॉ. हेमचंद्र गुप्ते हे शिवसेनेचे पहिले महापौर झाले. प्रमोद नवलकर, वामनराव महाडिक शिवसेनेचे पहिले आमदार झाले. त्याला आता ५0 वर्षे झाली. बाळासाहेब सत्तेपासून दूर राहीले. त्यांनी म्हटल असतं तर पहिले महापौर तेच होवू शकले असते. उध्दवरावांनी ठरवलं असतं तर, तेही महापौर होवू शकले असते. पण नियतीच्या मनात वेगळे असते. २0१९च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रावर असा बाका प्रसंग आला होता की,... उध्दवरावांनी मुख्यमंत्रीपद घ्यायला नकार दिला असता तर हे सरकारच बनले नसते. त्याला दोन चाकी म्हणा, चार चाकी म्हणा, कोणत्याही नावाने म्हटलत तरी उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वामुळेच हे सरकार दोन वर्षापूर्वी अधिकारावर आले आणि कावळ्यांनी कितीही शाप दिले तरी, टिकून आहे आणि पुढची ३ वर्षे टिकून राहील.
श्री. नारायण राणे यांनी मार्च २0२२ चा मुहूर्त काढला असून सरकार पडेल असे त्यांचे म्हणणे आहे. यापूर्वीही त्यांनी असे मुहूर्त सांगितले होते. पण आता जयंतराव साळगावकर नसल्यामुळे त्यांचे सगळे मुहूर्त आणि तारखा चुकत आहेत. मोदी आणि शाह यांनी कितीही ठरवलं तरी, सरकार पाडण्याचा अधिकार केंद्रसरकारच्या हातात असला तरी,.. मोदी-शाह महाराष्ट्रच सरकार पाडू शकणार नाहीत. याच कारण महाराष्ट्रातल आजच जे भाजपाच नेतृत्व आहे ते फार थिट आहे. फडणवीस अपघाताने मुख्यमंत्री झाले, ते महाराष्ट्राचे नेते नाहीत. दुसरे चंद्रकांत पाटील नावाचे जे कोणी आहेत, त्यांना त्यांच्या जिल्ह्यात (कोल्हापूर) येथेही कोणी विचारत नाही. बाकी जे नेते भाजपामध्ये आहेत, ते उधार उसनवारीचे आहेत. त्यांच्यात राज्याच नेतृत्व करण्याची धमक नाही. मोदी, शाह, राज्यातल्या नेतृत्वाची कुवत ओळखून आहेत. प्रत्येक विधानसभा निवडणुक मोदींनी ती अंगावर घ्यावी आणि राज्यभर प्रचार त्यांनीच करावा. एवढी उर्जा आता त्यांच्याजवळ नाही. शिवाय महाराष्ट्र वेगळा आहे, हे त्यांना समजते. जाहिराती देवून,किंवा आदित्यनाथच्या खांद्यावर हात टाकलेला फोटो जाहीरातीत टाकून उत्तरप्रदेशच्या मतदारांना मूर्ख बनवता येईल, महाराष्ट्र तसा नाही. महाराष्ट्र, पंजाब आणि बंगाल हेच तर देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे प्रांत आहेत. जर, सरकार पाडल्यावर पूर्ण बहुमताने भाजपाच सरकार आणण्याची ताकद फडणवीस, पाटील यांची असती तर मोदी, शाह यांनी हे सरकार कधीच पाडल असतं. त्यांच्याकडे महाराष्ट्राच्या नेतृत्वाचा आणि त्या नेतृत्वाच्या आवाक्याची किर्द खतावणी बरोबर आहे. केंद्रातले एक भंपक मंत्री प्रकाश जावडेकर यांचा महाराष्ट्रातल्या भाजपासाठी काही उपयोग नाही हे लक्षात आल्याबरोबर मेकअप करुन कॅमेºयासमोर येणाºया या प्रकाशच्या हातात मोदींनी नारळ देवून त्यांना घरी पाठवले. फडणवीस, पाटील यांनी कितीही आदळ-आपट केली तरी ते महाराष्ट्रात भाजपाच सरकार आणू शकत नाहीत याची केंद्रीय नेत्यांना खात्री आहे. त्यामुळे उध्दव सरकार पाच वर्षे १00 टक्के टिकणार.. ही पहिली गोष्ट... समजा विनाशकाले विपरीत बुध्दी होवून... मोदींनी हे सरकार पाडले तर... आजच सांगून ठेवतो... नंतर होणाºया निवडणुकीत फडणवीसांनी महाराष्ट्रात भाजपाचे ५0 आमदार निवडून आणून दाखवावेत. ज्या मुख्यमंत्र्यांला पाच वर्षे सरकार चालविल्यानंतर बहुमत मिळविण्याच सोडा... १२२ वरुन १0५ वर भाजपाची संख्या घसरली. पाच वर्षे मुख्यमंत्री असलेला माणूस नागपूरात पेशव्यांच्या वॉर्डात आशिष देशमुख या तरुणाच्या विरुध्द जेमतेम १२, ५00 मतांनी निवडून येतो... आणि पक्षाचे अध्यक्ष
चंद्रकांत पाटील कोल्हापूरातून पळून ते पुण्यात पेशव्यांच्या आश्रयाला येतात. ही दुक्कल महाराष्ट्रात येथुन पुढे कुठच्याही निवडणुकीत भाजपाला बहुमत मिळवून देण्याची गोष्ट विसरा. ज्यांनी त्यांच्या पक्षातील निष्ठेच्या नेत्यांचे ठरवून खच्चीकरण केलं मग ते विनोद तावडे असोत, नाहीतर बावनकुळे असोत.. केलेल्या पापाची नोंद होतेच होते. उधार उसनवारीनं कॉंग्रस राष्ट्रवादीतली माणसं फडणवीसांनी पळवली. पदासाठी लाचार असलेले पळाले. पक्षात काही मिळाल तर पक्षाची निष्ठा... मिळाल नाही तर निसटा...असे निसटणारे आता हात चोळीत बसलेत, पस्तावलेत. भास्करराव पाटील खतगावकर मूळघरी परत आले, चांगले झाले. पण पहिली प्रतिष्ठा राहत नाही...
तर विषय होता उध्दवरावांचा. शिवसेनेने भाजपाबरोबर २५ वर्षे काढली. त्या भाजपाने सेनेवर अविश्वास दाखवला. विखे पाटलांवर विश्वास टाकला. उध्दवराव, तुम्ही दोन वर्षांत किती काम केलंत.. कोरोना काळात मुंबई आणि महाराष्ट्रानं जगात आदर्श वाटेल अशी काम करुन दाखवली. विकासाच्या संदर्भात तुमच्या झपाट्याला तोड नाही. तुमचा महापालिकेमार्फत होणारा कोस्टल मार्ग झाला की, अख्खी मुंबई तुम्ही जिंकाल. मुंबईसाठी तर शिवसेनेशी मुकाबला करणं तर कोणालाच शक्य नाही. तुम्ही मुख्यमंत्री नव्हतात तेव्हाही आणि आता मुख्यमंत्री झाल्यावर तुमच्या अंगात सत्ता भिनली नसल्यामुळे आजही.. शिवाय.. तुम्ही दहा रुपयात शिवभोजन सुरु केलंत. केंद्रात यु.पी.ए सरकार असताना श्रीमती सोनिया गांधी यांनी गरीब माणसाला महिन्याला दोन रुपये किलो गहू, तांदूळ देण्याची योजना एवढी प्रभावी होती. पण मोदी सरकार आल्याबरोबर या योजना गुंडाळून ठेवल्या आणि अंबानी आणि अदानीला देश विकायला सुरुवात झाली. कोण गौतम अदानी, काय कमाई होती आणि आज कुठे आहे? तुम्ही १0 रुपयात शिवभोजन दिलंत, कोरोनाच संकट, महापुराच संकट, अतिवृष्टी, कोरोनामुळे गेलेले रोजगार... जीएसटीचा केंद्राकडून महाराष्ट्राला येणारा ५0 हजार कोटी रुपयांचा वाटा केंद्राने बुडवल्यानंतरसुध्दा... तुम्ही सरकार चालवलतं. काही कठोर निर्णय केलेत. त्याची गरज होती. तुम्ही केलेल्या कामाची यादी मोठी आहे. लोक दोन डोळ्यांनी पाहत नाहीत, लाखो डोळ्यांनी पाहतात, त्यामुळे तुमची किर्दखतावणी कोणी कशीही तपासली तरी अगदी हच्यासकट उद्याची ‘श्री शिल्लक’ खूप मोठी आहे. त्यामुळे कोडी आॅडीट करो, न करो... प्रशासनाचा, मंत्रीपदाचा, मुख्यमंत्रीपदाचा कसलाही अनुभव नसताना तुम्ही खूप प्रभावीपणे सरकार चालवलेलं आहे. २५ वर्षे जे तुमच्या विरोधात होते ते कॉंग्रेसवाले किंवा राष्ट्रवादीवाले अचंबित आहेत. शिवाय तिनही पक्ष एकदिलाने काम करीत आहेत. सोनिया गांधीबद्दल तुम्हाला आदर आहे. तुमच्या वागण्यात नम्रता आहे, शरद पवार यांची राजकीय प्रतिष्ठा, देशव्यापी नेतृत्वाची त्यांची प्रतिमा याचा आदर तुम्ही करता... कोणत्याही सभेतील भाषणाकरीता.... अगदी सूटबुटवाल्या हायफाय कॉन्फरन्समध्येही.. तुम्हाला पीआरओने लिहून दिलेल्या भाषणाची गरज वाटत नाही. कागद हातात घेवून तुम्ही दोन वर्षांत मुख्यमंत्री होवून कोणतेही भाषण केलेलं नाही. शंकरराव चव्हाण, राजारामबापू, यशवंतराव मोहिते यांच्या जन्मशताब्दी वर्षात या तीनही नेतृत्वाशी तुमचा फारसा संबंध आलेला नसताना तुम्ही त्या त्यावेळी केलेली भाषण... जिवंत वाटली.
सांगायचा मुद्दा एवढाच आहे की, दोन वर्षांत कामे किती केली याला मी महत्व देत नाही. उदयाचा महाराष्ट्र आणि उद्याचा भारत... भाजपाची सत्ता उलटवता येते... समविचारी असोत, नसोत, भाजपाविरोधात एकत्र येवून सरकार चालवता येतं, ते पाडण्याची हिंमत मोदी, शाह यांची होत नाही. हीच तुमची दोन वर्षांतली सगळ्यात मोठी कमाई आहे. भाजपाविरोधात आत्मविश्वास पूर्णपणे गमावलेल्या महाराष्ट्रातल्या राजकीय कार्यकर्त्यांना तुमच्या दोन वर्षांच्या नेतृत्वाने नवी हिंमत, नवी पे्ररणा तुम्ही दिलीत. फडणवीस मुख्यमंत्री असताना ज्यांना असं वाटत होतं की, तहहयात आता हेच मुख्यमंत्री ते फडणवीस नुसते बोलघेवडे आणि त्यांना आणि त्यांच्या पक्षाला पराभूत करता येतं, हे तुम्ही दाखवून दिलंत. माझ्या दृष्टीने या आत्मविश्वासाची गरज होती. चार काम होतील, चार काम राहतील... राजकारणात हा हिशोब महत्वाचा नाही. पुरोगामी महाराष्ट्र भुरट्या लोकांच्या हातात जाता कामा नये, हे सूत्र महत्वाचं आहे. त्यासाठी लागणारं नेतृत्व तुम्ही सिध्द केलं आहे. दोन वर्षांची तुमची ही सगळ्यात मोठी कमाई आहे, असं मी मानतो. तुमच अभिनंदन... असेच लढत राहा...
शेवटची विनंती ऐवढीच.. गरीबाची आठवण ठेवून १0 रुपयांत जशी ‘शिवभोजन’ थाळी दिलीत. त्याचप्रमाणे मुंबई महाराष्ट्रात जो गरीब माणूस आहे... जो सायकलने फिरतो, रिक्षामध्ये बसून प्रवास करतो.. जी तरुणपिढी बाईकवर धावते आहे, अशांसाठी आता मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, कोल्हापूर, सोलापूर सर्व शहरात उडडाणपूल बांधा. तिथं पाटी लिहा ‘चारचाकीवाल्या मोटारवाल्यांसाठी प्रवास करायला बंदी...’ उध्दवराव हे करुन तर पहा... शहरांमध्ये मिजास पैसेवाल्यांची झालेली आहे. रिक्षावाले, सायकलवाले ट्राफीकमध्ये मेले काय, अडकले काय, घामाघूम झाले काय? हे पूल फक्त गाडीवाल्यांच्या पैशाने बांधले गेलेले नाहीत. तुम्ही हा प्रयोग करुन बघा उध्दवराव.... महाराष्ट्र तुम्हाला डोक्यावर घेईल.
तुमचे अभिनंदन करुन सध्या थांबतो.
Comments
Post a Comment