शिराळा तालुक्यात एसटीच्या शालेय फेऱ्या अनियमित
शिराळा तालुक्यात एसटीच्या शालेय फेऱ्या अनियमित
शाळा- कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे हाल!
विद्यार्थी पास योजनेअंतर्गत शिराळा आगाराकडून विविध शाळेतील विद्यार्थ्यांना एसटी पास देण्यात आले, पण एसटी महामंडळाच्या शालेय फेऱ्यांचे नियोजन योग्य नसल्यामुळे शिराळा तालुक्यातील विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहेत.
शिराळा येथील न्यु इंग्लिश स्कुल येथील विद्यार्थ्यांसाठी रा.प. विभागाच्या अधिकाऱ्यांनी मासिक पास वाटपाची योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गत शिराळा तालुक्यातील खेडेगावातील अनेक विद्यार्थ्यांनी पास काढून घेतले होते. परंतु गेले आठवडाभर झाले एकतर एसटी वेळेवर येत नाही, किंबहुना आलेल्या एसटीमध्ये विद्यार्थ्यांसाठी जागाच नसते.
शिराळा आठवडा बाजाराच्या दिवशी म्हणजे सोमवारी तर सकाळच्या दोन्ही एसटी मांगरुळ येथील स्टॉपवर थांबल्याच नाहीत. यासंदर्भात शिराळा आगार येथे फोन केला असता उडवाउडवीची उत्तरे मिळाली. सोमवारी विद्यार्थी एसटी अभावी शाळेतही जाऊ शकले नाहीत. असे सातत्याने घडत आहे. याबाबत विद्यार्थी आणि पालकांमध्ये तीव्र रोष आहे. तरी शिराळा तालुक्यातील शालेय फेऱ्यांच्या प्रश्नांबाबत रा.प. आगार आणि जबाबदार शासन, प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
चौकट:
"तुमच्या कडे गाड्या असतील तर द्या..."
शिराळा आगारामध्ये शालेय फेऱ्यांच्या अनियमिततेबाबत विचारणा केली असता, "तुमच्याकडे गाड्या असतील तर द्या", असे उर्मट उत्तर आगार व्यवस्थापिका विद्या कदम यांनी दिले. शिराळा सारख्या डोंगरी भागातील शेतकरी, कष्टकरी, कामकरी वर्गातील विद्यार्थ्यांच्या पालकांकडे गाड्या असत्या, तर पालक रा.प. आगाराकडे आले असते का? एसटी महामंडळ आणि शिराळा रा.प. आगाराने याचा संवेदनशीलपणे विचार करून विद्यार्थी व पालकांना न्याय द्यावा.
- विजय मस्के, पालक
Comments
Post a Comment