*साहेब...! एक देवमाणूस*...

*साहेब...! एक देवमाणूस*...
*लेखन – मनोज मस्के, मांगरूळ, 9890291065*
शिराळा तालुक्याच्या मातीतील एक तेजस्वी सूर्य... प्रभावी नेतृत्व, समाजाभिमुख विचार, कार्यकर्त्यांच्या पाठिशी असणारा आधारस्तंभ... चेहऱ्यावर कायमस्वरूपी एक निर्व्याज हास्य असलेला, मनाच्या शुद्धतेने भारलेला नेता – स्व. शिवाजीराव देशमुख साहेब.
*आज साहेबांची जयंती आहे... आणि मन भरून येतंय*.
जसं आम्हाला एकेकाळी त्यांच्या वाढदिवसाची आतुरतेने वाट बघायची, तशीच आज त्यांच्या जयंतीला त्यांची आठवण प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात दाटून येते. त्यांचे जीवन म्हणजे खरं तर एक प्रेरणास्रोत! एक असा नेता, ज्याने पद, पैसा, प्रतिष्ठा यापेक्षा लोकांचा विश्वास जपला. ज्यांचं नाव घेताना आजही गावकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणि चेहऱ्यावर समाधान दिसतं – असं किती जणांबद्दल आपण म्हणू शकतो?
शिराळा तालुक्याच्या राजकीय इतिहासात जेव्हा ‘साहेब’ म्हणायचं, तेव्हा ते नाव होतं – शिवाजीराव देशमुख. आजवर महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब ठाकरे, शरद पवार यांना जसे ‘साहेब’ ही आदराची पदवी लाभली, तशीच ती आपल्या देशमुख साहेबांनाही लाभली – ती त्यांच्या माणुसकीच्या राजकारणामुळे.
*पहिली भेट... आणि आयुष्यभराची प्रेरणा*
साहेब विधानपरिषद सभापती असताना त्यांची पहिली भेट झाली. मी कोण? कुठला पक्ष? ओळखही नव्हती... पण त्या तेजस्वी व्यक्तिमत्वासमोर मी पोहोचलो आणि त्यांचं निर्व्याज हास्य पाहून क्षणात मन जिंकलं गेलं. गाव विचारलं, चहा विचारला, आणि अगदी आपुलकीनं सांगितलं – "काही अडचण असेल तर सांग, वरचेवर येत जा..."
त्या एका भेटीतच ‘साहेब’ म्हणजे काय, हे कळून गेलं. राजकारणाच्या पलिकडचा हा माणूस होता – कार्यकर्त्यांचा खंबीर आधार. कोणत्याही पक्षाचा असो, मतदारसंघातला माणूस म्हणजे आपला माणूस – ही त्यांची शिकवण होती.
*स्मरणरंजन आणि सेवाभाव*
२००५ साली एक प्रसंग... नवरात्रोत्सवाच्या वेळी मांगरूळमध्ये फराळ वाटप सुरू करायचं ठरवलं. भेटीसाठी गेलो तेव्हा साहेबांनी अत्यंत विचारपूर्वक सल्ला दिला –
"सुरुवात कुणालाही करता येते, पण ती टिकवणं कठीण असतं. हाती घेतलेलं काम टिकवा."
याचवेळी साहेबांनी स्वतःच्या खात्यावरील ५००० रुपयांचा चेक दिला. आज जवळपास दोन दशके झाली – पण हा उपक्रम अखंड सुरू आहे. त्यांचा सल्ला, त्यांची ती कृपा, आजही आमच्या कामाला दिशा देते.
*साहेबांचं नेतृत्व – माणूस घडवणारा नेता*
शिराळा तालुक्यात प्रत्येक गावात २५–३० कार्यकर्त्यांना नावानिशी हाक मारणारा नेता... अशी ओळख फार कमी लोकांना मिळते. साहेबांनी कधीच स्वार्थाने विचार केला नाही. त्यांच्या मंत्रिपदाच्या काळात, कोणालाही अडथळ्याशिवाय नोकऱ्या मिळाल्या. आजही अनेक पोलीस, एसटी कर्मचारी, सरळपणे सांगतात – "साहेबांनी हात दिला म्हणून आज आम्ही इथं आहोत."
ते नातं पक्षाशी नव्हतं, पदाशी नव्हतं, ते होतं माणसाशी. त्यामुळेच साहेब आजही हजारो लोकांच्या हृदयात घर करून आहेत.
*एक स्वप्न… आणि त्याची पूर्तता*
साहेब गेल्यानंतर त्यांचा अर्धपुतळा उद्घाटनाच्या प्रतीक्षेत होता. पण नियतीला काहीतरी वेगळंच मंजूर होतं. आज त्यांच्या चिरंजीव, आमदार सत्यजित देशमुख यांच्या हस्ते त्यांच्या अर्धपुतळ्याचं उद्घाटन होतंय – त्यांच्या जयंतीदिनीच! हे एक स्वप्न पूर्ण होण्यासारखं आहे. आणि आज साहेब वरून पाहत असतील – समाधानाने, अभिमानाने.
*नवीन पिढीला देशमुख साहेब समजले पाहिजेत*
आज देशमुख साहेब नाहीत, पण त्यांनी लावलेला काँग्रेसचा दीप रवी पाटील सारखे कार्यकर्ते तेवत ठेवत आहेत. तरीही एक प्रश्न मनात घर करून राहतो – आपण देशमुख साहेबांना पुरेसे समजून घेतलं का?
नवीन पिढीला त्यांच्या कार्याचं, त्यागाचं, संघर्षाचं आणि नितिमत्तेचं महत्त्व समजलं पाहिजे. साहेबांच्या कार्यावर आधारित ग्रंथ तयार होणे ही काळाची गरज आहे.
*कारण*...
राजकारणात सत्ता मिळवणं सोपं, पण लोकांच्या मनात जागा मिळवणं – ते फक्त देशमुख साहेबांसारख्या 'देवमाणसालाच' जमलं!
*भावपूर्ण श्रद्धांजली*
आज त्यांच्या जयंतीनिमित्त, या असामान्य व्यक्तिमत्वाला माझी विनम्र आदरांजली. साहेब, तुम्ही आमच्यातून गेले असलात, पण आमच्या रक्तात अजूनही तुमचं नाव वाहत आहे.
*साहेब, तुम्ही आहात... आजही... प्रत्येकाच्या मनात*.
|| *विनम्र अभिवादन* ||
Comments
Post a Comment