शाहुवाडी तालुक्याचे दानतदार व्यक्तीमत्व व दत्त सेवा उद्योग समुहाचे संस्थापक मा. *आनंदराव माईंगडे (दादा) यांच्या वाढदिवसानिमित्त हा लेख
शाहुवाडी तालुक्याचे दानतदार व्यक्तीमत्व व दत्त सेवा उद्योग समुहाचे संस्थापक मा. *आनंदराव माईंगडे (दादा) यांच्या वाढदिवसानिमित्त हा लेख
*....................................................................*
*शब्दांकन* :- *मनोज मस्के , पत्रकार*
*....................................................................*
खऱ्या अर्थाने शाहुवाडी तालुक्यातील विकासाची माळ गुंफत असताना आनंदराव माईंगडे दादा यांच्या विना ही माळ पुर्णच होऊ शकत नाही हे तितकेच खरे आहे.
कोल्हापुर जिल्ह्यातील शाहुवाडी तालुक्यात अत्यंत डोंगराळ भागातील तुरूकवाडी हे दादांचे गाव. याच गावात दादा लहानाचे मोठे झाले. तुरूकवाडी विद्या मंदिर या शाळेत ते शिकले. घरची परिस्थीती तशि बेताचीच असल्याने पुढील शिक्षण त्यांना कामधंदा करत मुंबईत घ्यावे लागले. दिवसभर काम करायचे व रात्री डिलाईलरोड येथे रात्रशाळेत अभ्यास करायचा. तसं दादा परिस्थीती मुळे फार शिकले नाहीत जेमतेम १२ वी पर्यंतच त्यांनी शिक्षण घेतले . १२ वी नंतर त्यांना जिल्हाधिकारी मुंबई उपनगर जिल्हा बांद्रा यांचे कार्यालयात नोकरी लागली. २०१६ रोजी शासकिय नोकरीत असतानाच ते याच कार्यालयातुन मंडल अधिकारी या पदावरुन सेवानिवृत्त झाले.
नोकरीची कारकिर्द संपल्यानंतर कसलाही आराम न करता समाजासाठी काहीतरी करावे, या उद्देशाने दादांनी दत्तसेवा उद्योग समुह वाढविण्यास सुरुवात केली. बघताबघता दत्तसेवा सहकारी पतपेढीचे काम आपल्या गावापर्यंत पोहचवले. आपल्या गावातील व भागातील लोकांना लगेच व सुलभ पद्धतीने कर्जपुरवठा व्हावा या उद्देशाने त्यांनी मुंबईपासुन खेडेगावापर्यंत पतपेढीचे जणु जाळेच विणले. त्याच प्रमाणे ग्रामीण विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे या हेतुने दत्तसेवा विद्यालयाची निर्मिती झाली. खेडोपाड्यातील मुलं या विद्यालयात शिक्षण घेऊ लागली. कमी खर्चात शिक्षण उपलब्ध करून दिल्याने अनेकांनी आपली मुलं याच शाळेत शिकविण्याचा जणू ध्यासच घेतला आहे. दत्तसेवा उद्योगामुळे अनेक तरूणांच्या हाताला काम मिळाले हे मात्र सत्य असल्याचे अनेकांनी सांगीतले.
आनंदराव माईंगडे दादांनी अनेक मोठी पदे भुषविले. दत्तसेवा पतपेढीचे संस्थापक अध्यक्ष, जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष, सर्वेदय बॅंकेचे उपाध्यक्ष व संचालक, मुंबई सहकार बोर्डाचे संचालक, दत्त शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, दत्तसेवा चारीटेबल ट्रस्टचे अध्यक्ष, मुंबई विभागीय सहकारी पतसंस्था फेडरेशनचे संचालक, मुंबई उपनगरे कर्मचारी पतसंस्था संचालक, अशि अनेक पदे त्यांनी भुषविले आहेत.
सहकार क्षेत्रात उत्तुंग झेप घेऊन अनेक क्षेत्रात काम करणारे आनंदराव माईंगडे यांना अनेक पुरस्कारांनी सुद्धा सन्मानित करण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री सुरेश प्रभु यांचे हस्ते सन १९९८ मध्ये पराज सर्वोत्तम पुरस्कार मिळाला. २००१ मध्ये साथसंगत मानपत्र, २००५ मध्ये कृष्णगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले. २००६ ला शिक्षण क्षेत्रात उल्लेखनिय काम केल्याबद्दल शिक्षणरत्न पुरस्कार मिळाला, २००७ मध्ये राष्ट्रीय निर्माण रत्न पुरस्कार केंद्रिय मंत्री यांच्या हस्ते, २००७ महाराष्ट्र पत्रकार संघातर्फे सहकार भुषण पुरस्कार, २००७ महाराष्ट्र जर्नलिस्ट पुणे यांचे तर्फे भास्कर अॅवार्ड, या प्रकारे १५ ते १६ पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
कुस्ती क्षेत्रात सुद्धा माईंगडे दादांचे मोठे योगदान आहे. प्रत्येक वर्षी तुरूकवाडी या त्यांच्या गावी यात्रेनिमीत्त महाराष्ट्रातील नामवंत पैलवानांच्या लढती ग्रामीण कुस्तीशौकीनांना पहायला मिळतात. तसेच कुस्ती क्षेत्रात, सामाजीक क्षेत्रात काम करणाऱ्या होतकरू तरुणांना प्रत्येक वर्षी कुस्ती मैदानात पुरस्कार दिला जातो. एवढंच काय दत्तसेवा विद्यालय तुरूकवाडी विद्यालयात मुलांना व्यायामाची आवड लागावी व कुस्तीचे डावपेच समजावे या हेतुने कुस्ती आखाडा बांधला. मुलांना मातीतील कुस्तीबरोबर मॅटवरील कुस्तीचे सुद्धा ज्ञान मिळावे या हेतुने मातीबरोबर मॅटचीही व्यवस्था त्यांनी विद्यालयात करून दिली. आज अनेक विद्यार्थी येथे कुस्तीचे धडे घेताना दिसत आहेत. त्याच बरोबर यावर्षी त्यांनी मुलांच्यासाठी कुस्ती हेच जीवन च्या माध्यमातून उन्हाळी कुस्ती शिबिराचे आयोजनही अतिशय उत्कृष्ट पद्धतीने केले होते. या शिबिराचे कौतुक कोल्हापूर, सांगली तसेच महाराष्ट्रातही झाले. या समर कॅम्प मुळे मुलांना कुस्ती क्षेत्रात नवीन डावांची माहिती मिळाली. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षण मिळाले.
संपुर्ण शाहुवाडी व शिराळा तालुक्यात आनंदराव माईंगडे दादांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत असल्याचे दिसून येते आहे. त्यांच्या या कार्याला कुस्ती हेच जीवन महाराष्ट्र राज्यातर्फे सलाम व आनंदराव माईंगडे दादांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
शब्दांकन :- *मनोज मस्के , पत्रकार*
*अध्यक्ष शिराळा तालुका*
कुस्ती हेच जीवन, महाराष्ट्र राज्य
९८९०२९१०६५
Comments
Post a Comment