‘शब्द सम्हारे बोलिए... शब्द को हाथ न पाँव एक शब्द करे औषधी... एक शब्द करे घाव...’
‘शब्द सम्हारे बोलिए... शब्द को हाथ न पाँव
एक शब्द करे औषधी... एक शब्द करे घाव...’
महान तत्त्ववेत्ते संत कबीर यांचा एक दोहा आहे.
‘शब्द सम्हारे बोिलए...
शब्द को हाथ न पाँव
एक शब्द करे औषधी
एक शब्द करे घाव...’
तत्त्ववेत्ते संत तुकाराम आिण संत कबीर यांच्या तोडीचे जगात कोणी असेल की नाही, याची शंका आहे. जिथे जिथे मानवी स्वभावाला दुरूस्त करण्याची गरज आहे तिथे तिथे या दोन्ही तत्त्ववेत्त्यांचे मनन-िचंतन आयुष्यभर उपयोगी पडणार आहे.
संत कबीर यांच्या दोह्याची आठवण झाली ती नाना पटोले यांच्या वाक्यामुळे.... नाना अलिकडे थोडेसे घसरत चालले आहेत. अनावधानाने असेलसुद्धा... पण, असे चुकीचे शब्द उच्चारल्यावर ते नानांच्याच लक्षात यायला हवे होते. त्यांनीच तिथे दिलगिरी व्यक्त करायला हवी होती. एखादा शब्द बोलण्याच्या ओघात मागे-पुढे होऊ शकतो... पूर्वीच्या नेत्यांचेही झाले असेल... पण त्या काळात समजूतदारपणा असलेला समाज होता आिण वृत्तपत्रे होती. अशा चुकांसाठी टपलेली माध्यमे नव्हती... त्यामुळे चुकांची चर्चा कमी व्हायची... कामाची चर्चा चांगली व्हायची. आज उलटे झाले आहे. मूळात सामाजिक कामे होतच नाहीत. शिवाय सोशल मीडीयाला चघळण्याकरिता कायम एखादा असा विषय हवाच असतो आिण असे पुढारी जेव्हा विषय पुरवतात तेव्हा ती चूक व्यक्तीपुरती रहात नाही. पक्षालाही अडचणीत आणते... नानांबद्दल सध्या तसेच काहीसे झाले आहे. तो कोणी गुंड मोदी त्याच्या नावाचा नानांनी साकोली (भंडारा) येथे उल्लेख केला... तीथेच त्यांनी खुलासा केला असता की, ‘मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल बोलत नसून, मोदी नावाच्या गावगुंडाबद्दल बोलत आहे.’ तर नंतरचा अकारण निर्माण झालेला वाद आिण पक्षाची बदनामी टळली असती. आताही नानांच्या तोंडून ‘गांधीवध’ हा अत्यंत चुकीचा शब्द आला आिण संघवाले-भाजपावाले खूष झाले. ३० जानेवारी १९४८ पासून ३० जानेवारी २०२२ पर्यंत- म्हणजे नानांच्या तोंडून हा शब्द जाईपर्यंत- सगळे संघवाले, जनसंघवाले-नंतर झालेले भाजपावाले तोच शब्द वापरत होते. आिण तो शब्द वापरताना आतून खूष होत होते. गांधीजींच्या समाधीसमोर यांच्यापैकी कोणीही कितीहीवेळा, अगदी रोज सकाळी, उभे राहून आदरांजली अर्पण केली तरी, दूध आिण पाणी यातील फरक लोकांना कळतो. पण प्रदेश काँग्रेस अध्यक्षांनी चुकून का होईना, असा शब्द वापरणे कधीही मान्य होणार नाही. चूक झाली हे खरेच... पण नानांनी त्याबद्दल लगेच िदलगिरी व्यक्त करायला हवी... माफीच मागयला हवी... गांधीजींबद्दल चुकीचे बोलल्यवर माफी मागण्यात काय कमीपणा आहे...? प्रदेश काँग्रेच्या प्रवक्त्याने ‘नानांच्या तोंडून अनावधानाने बोलले गेले... नरेंद्र मोदीही असेच बोलत असताना ‘बेटी पढाओ... ऐवजी पटाओ’ शब्द बोलून गेले...’ असा खुलासा करणे अिजबात शोभणारे नाही... पटणारेही नाही... त्यामुळे नानांच्या शब्दाचे समर्थन होऊ शकत नाही. कोण काय बोलले? हे आपल्या चुकीचे उत्तर होऊ शकत नाही. किंवा कोणी काय बोलावे, याच्यावर प्रदेशाध्यक्षाचे बोलणे ठरत नाही. जी आपली चूक आहे, ती आपली चूकच आहे. ‘ते तसे बोलले म्हणून आम्ही असे बोललो...’ हे अशावेळी समर्थनाचे उत्तर असू शकत नाही. नानांनी पटकन िदलगिरी व्यक्त करून टाकली असती तर, विषय लवकर संपला असता. शिवाय इथून पुढे फार संयमाने बोलणे गरजेचे आहे. म्हणून कबीराच्या दोह्याचा सुरुवातीलाच उल्लेख केला. शिवाय काँग्रेच्या कोणत्याही कार्यकर्त्याने, नेत्याने पुढची वर्षे फार काळजीपूर्वक िनवेदने केली पाहिजेत. सध्या चारही बाजूंनी काँग्रेसला घेरण्याचे काम सूरू आहे. काँग्रेस पक्ष आज सरकारात आहे. त्यामुळे ज्या नेत्यांना असे वाटते की, आपले काही आता वाकडे होऊ शकत नाही... त्यांनी एका गोष्टीची जाणीव ठेवावी की, आजच्या महाराष्ट्रातील सरकारला २०२४ पर्यंत तुमची गरज आहे म्हणून तुम्हाला वापरून घेतले जात आहे. २०२४ ला एखादवेळेस एका फटक्यात ‘सेना-राष्ट्रवादीची आघाडी’ होऊनसुद्धा जाईल आिण मग काँग्रेस एकाकी असेल. देश पातळीवरही काँग्रेसला घेरण्याचे काम सुरूच आहे. अनेक राज्यांत काँग्रेस नाही... लोक काँग्रेसबरोबर आहेत... प्रत्येक गावात काँग्रेस आहे, कार्यकर्ता आहे. काँग्रेसचा विचार आहे. काँग्रेसचा झेंडा आहे. अडचण आहे लोक आिण काँग्रेस नेते यांच्यातच अंतर पडले अाहे. असे असले तरी काँग्रेसचाच विचार देशाला तारणारा आहे... काँग्रेसनेच गेल्या ५० वर्षांत देश उभा केला आहे. केवळ विकासांच्या कामापुरते नाही. धरणे, वीज, रस्ते, तंत्रज्ञाान एवढ्यापुरताच हा विषय नाही. सर्व जाती-धर्मंाना एक ठेवण्याचा आिण देशाची ‘विविधतेतील एकता’ जपण्याचे काम काँग्रेच्या विचारामुळेच झालेले आहे. वाजपेयी सत्तेवर होते तेव्हा धार्मिक उन्मादाचा धोका नव्हता... आता तोच धोका सर्वात मोठा आहे. अशावेळी काँग्रेसने, काँग्रेसच्या नेत्यांनी फार जपून वागले पाहिजे... फार जपून बोलले पाहिजे. पुढचे िदवस कठीण आहेत. शिवाय सत्ता येवो िकंवा न येवो, काँग्रेसचा विचार मरूच शकत नाही. जसे नथुरामच्या गोळीने महात्मा गांधी मरू शकले नाहीत, म्हणजे त्यांच्या शरीरातील प्राण गेला... पण विचार मेला नाही.... तो मरूच शकत नाही. संघ-जनसंघवाल्यांना आिण आताच्या भाजपावाल्यांना तो कधीही मारता येणार नाही. जगातील ७०० विद्यापीठांत गांधी शिकवले जातात. एकाही विद्यापीठात हेडगेवार किंवा गोलवळकर गुरुजी िशकवले जात नाहीत. त्यांच्याबद्दल अनादराने हे लिहीत नाहीत. त्यांना ज्या पद्धतीने जीवन जगायचे होते... संघटना बांधायची होती... त्या पद्धीतीने त्यांनी काम केले. पण, या देशात कोणीही गांधींपेक्षा मोठा होऊ शकत नाही. सध्याचे पंतप्रधान यांना पंतप्रधान झाल्यावर सरदार पटेल यांच्याबद्दलचे प्रेम फारच उफाळून आलेले आहे. (ते गुजरातचे मुख्यमंत्री असताना हे प्रेम कधी दिसले नव्हते.) पण त्याच्यामागचे रहस्य सगळ्यांना माहिती आहे. महात्त्मा हे महात्माच आहेत. पंडीतजी हे पंडीतजीच आहेत. आिण सरदार हे सरदारच आहेत. तिनही फार मोठे... पण महात्माजींचे मोठेपण जगात कोणाशीही तुलना न करता येणारे आहे. पंडीतजी आिण सरदार यांनी हे मोठेपण नेहमीच मान्य केले होते. एवढेच नव्हे तर त्यांचे ‘महात्मा’पण स्वीकारले होते. सरदार यांनी तर पंडितजींना एक पत्र लिहिले होते... सरदार जेव्हा गृहमंत्री झाले त्यावेळी त्यांना ‘१, औरंगजेब रोड’ हा दिल्लीतील शासकीय मोठा बंगला दिला गेला. तिथे रहायला आल्यावर पंडित नेहरूंना सरदार यांनी हे पत्र लिहिले. त्यात त्यांनी म्हटले होते... ‘या संपूर्ण देशावर राज्य करणारा औरंगजेब दिल्लीत एका रस्त्यापुरता मर्यादित झालेला आहे. त्याच रस्त्यावर मी रहायला आलो आहे. बापू (महात्मागांधी) मात्र जगात मावणार नाहीत, इतके त्यांचे मोठेपण जगभर पसरले आहे.’
ज्या महात्म्याला दक्षिण आफ्रिकेच्या पीटरबर्ग रेल्वे स्टेशनवर पहिल्या वर्गातून धक्का मारून खाली ढकलून दिले गेले... त्याच स्टेशनवर दक्षिण आफ्रिकेच्या सरकारने महात्त्माजींचा पुतळा उभा केला. गेल्याच महिन्यात दक्षिण आफ्रिकेत भारतीय क्रिकेट संघासोबत दक्षिण आफ्रिका संघाचे समाने झाले.. आपण कसोटी मालिका हरलो... एक दिवसीय मालिकाही हरलो... हार-जीत होतच असते. पण या सामन्यांसाठी जो करंडक होता, त्यावर महात्मागांधी आिण त्यांचे शिष्य नेल्सन मंडेला यांची छायाचित्रे होती. गांधी जगात कुठे-कुठे आहेत, हे ज्यांना समजले आहे त्यांनाच गांधी समजलेले आहेत. याच देशातील अनेकांना ते अजून समजून घ्यायचे आहेत. काँग्रेसवाल्यांनी तर अधिक काळजीपूर्वक त्यांना समजून घेतले पाहिजे.... गांधी विचारांिशवाय हा देश उभा राहू शकणार नाही. गांधी कोणाला पटो न पटो, गांधी विचार हा सर्वश्रेष्ठ विचार आहे. जाती-धर्म आिण देश याच्या सीमा ओलांडणारा विचार आहे. त्यामुळे ३० जानेवारी रोजी नथुरामच्या गोळीने गांधींचा प्राण गेला.... पण, गांधी विचारांनी जगात जो प्राण फुंकला गेला आहे, तो कोणत्या नथुरामच्या गोळीने मारता येणार? या देशात राम सर्वंानाच प्रिय आहे. काहीजणांनी सत्तेसाठी ‘राम’ वापरला... पण, त्यांना खरा प्रिय आहे तो नथुराम...
गांधींचा मारेकरी नथुरामची जयंती किंवा पुण्यतिथी साजरी करणारेही याच देशात आहेत. पण आज महात्त्मा गांधी असते तर त्यांनी, अशा लोकांनाही क्षमाच केली असती. गांधींचे मोठेपण यातच आहे. आणि म्हणून त्यांचा विचार मारला जात नाही. काँग्रेसवाल्यांनी हे समजून घ्यावे. गांधी विचारांवर आज पक्ष उभा राहत नाही... तो पैशांवर उभा राहतो... हा कशाचा पराभव आहे? आिण कोणाचा पराभव आहे? या प्रश्नाचे उत्तरही गांधी विचारांतच आहे. पण आजची परिस्थिती पाहिल्यावर एक भीषण विचार मनात येतो की, आज गांधी असते तर... आिण लोकसभा निवडणुकीला उभे राहिले असते तर... आज करोडो रुपयांभोवती िफरणाऱ्या पैशांच्या निवडणुकीत त्यांचाही पराभव झाला असता की काय?... डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भंडारामध्ये पराभव झालाच होता.
परवा एका मित्राजवळ चर्चा करत होतो... तो सहज म्हणाला की, गांधीजींच्या एकाही पुतळ्यावर चष्मा नाही... आिण गांधीजी तर नेहमीच चष्मा लावायचे... भाजपाच्या केंद्रातल्या सरकारने स्वच्छ भारत अिभयानासाठी गांधीजींच्या चष्म्याचाच आधार घेतला.... मी गंमतीने म्हणालो... ‘गांधीजींच्या कोणत्याही पुतळ्यावर चष्मा नाही, याचे कारण वेगळे आहे... या देशातील आजची परिस्थिती त्यांना पाहावलीच नसती... म्हणून चष्मा नसेल...’ गमतीचा भाग सोडून द्या, पण देश चालवताना गांधी विचार जेवढा बाद करण्याचा प्रयत्न होईल, तेवढाच हा दे नैतिदृष्ट्या अधिक कमकूवत होत जाईल, हे कधीही विसरता कामा नये.
गांधींना मारणारे मेले... गांधी अमर आहेत...
- मधुकर भावे
Comments
Post a Comment