राष्ट्रीय पातळीवर कॉंग्रेसला अपमानित करुन महाराष्ट्रापुरते गोंजारणे सत्तेसाठी सहन करु नका..!


मधुकर भावे

मोदी सध्या खुशीत आहेत. शेतकरी विरोधी तीन कायदे मागे घ्याव्या लागलेल्या नाच्चकीतून मोदी देशभर बदनाम झाले असताना ममता बॅनर्जी यांनी नवीन वाद सुरु केला. तो वाद मोदी आणि भाजपाच्या फायद्यातला आहे. २0१४ चे मोदी आता राहीलेले नाहीत. २0१९ चेही मोदी आता नाहीत. त्यांनी भाजपचा कब्जा केल्यापासून वाजपेयीचा भाजपा कधीच संपला होता. पण मोदी-शाह दुकलीने देशभर सोशलमिडीयाला हाताशी धरुन हवा बनवली आणि भारतीय मतदारांनी मोठ्या अपेक्षेने त्यांना सत्तेवर बसवलं. २0१४ ते २0२१ पर्यंत सर्व आघाड्यांवर- महागाई असो, रोजगार जाणं असो, खोट्या घोषणा असो, सर्व विषयात मोदींनी शंभर वर्षे मागे नेलं. धार्मिक उन्माद वाढवून ठेवला. घटना, लोकशाही, लोकसभेतली प्रश्नोत्तरे, हिंमतीनं पत्रकारांना सामोरे जाण, हे सर्व टाळून, ‘मन की बात’, ‘दिल की बात’ असले मार्ग निवडले. एवढा भित्रा नेता आजपर्यंत कुणीच नव्हता, जो पत्रकारांना सामोरा गेला नाही. इंदिराजींचा, कॉंग्रेसचा मोदींनी सतत व्देष केला. पण इंदिराजींची आणि त्यांची तुलनाच होउच शकत नाही. किंबहुना सोनिया गांधीसुध्दा भारतीय संस्कृतीच्या स्त्रिचा सगळ्यात मोठा आदर्श त्याच आहेत. या देशात, या संस्कृतीत त्या जेवढ्या एकरुप झाल्या तेवढ्या हिंदुत्वाचा जयघोष करणाºया राजकीय स्त्रियाही झाल्या नाहीत. मोदींनी सोनियांजींची सतत हेटाळणी केली आणि आता ममता बॅनर्जी नावाच्या एका आक्रस्तळी महिलेला कॉंग्रेसला वगळून भाजपाशी लढायच आहे, पराभूत करायचं आहे. त्यामुळे ‘यु.पी.ए’ आहेच कुठे?’ असा प्रश्न विचारुन त्यांनी सोशलमिडीयाच्या हातात आयत कोलित दिलं. कॉंग्रेसच नाव घ्यायला त्या तयार नाहीत. कॉंग्रेसला सोबत न घेता भाजपाविरोधातली लढाई त्यांना लढायची आहे.  पण एका बंगालपुरत्या मर्यादित असलेल्या या आक्रस्ताळी बाई प्रत्यक्षात जेव्हा आघाडी करतील तेव्हा त्यांच्यातला आक्रस्ताळीपणा त्यांना महागात पडेल. एक राज्य जिंकल्यानं भाजपाचा देशपातळीवर पराभव करु शकू असं त्यांना वाटतयं. कॉंग्रेस पक्षाला वगळून भाजपाच्या विरोधात लढाई या देशात कोणीही लढू शकणार नाही. ममताबार्इंच्या बाजूला बसून शरद पवार यांनी सावध भूमिका मांडली. ‘सर्वांना बरोबर घेवूनच लढाई लढावी लागेल..’ असं पवारसाहेब म्हणाले. कारण... ममताबाई जेवढ्या बंगालपुरत्या मर्यादित आहेत. तेवढाच पवारसाहेबांचा पक्ष महाराष्ट्रापुरता मर्यादित आहे. ममताबाई मनातलं जे बोलतात. पवारसाहेब मनातल्या अनेक गोष्टी बोलत नाहीत एवढाच फरक आहे. पण खरी गोष्ट अशी आहे की, दोघांनाही कॉंग्रेस सोबत आघाडी नको आहे. कॉंग्रेसला वगळून ही ते लढाई कशी लढणार? खरी गोष्ट अशी आहे की, या देशात भाजपाविरोधात लढू शकणारा राष्ट्रव्यापी पक्ष फक्त कॉंग्रेस पक्षच आहे. त्यामुळे ‘कॉंग्रेसला सोबत घेवून लढाई लढू’ असं जे जे म्हणतात, ते ही चुकीच बोलतात. त्या वाक्यामध्ये कॉंग्रेसच स्थान दुय्यम दाखवलं जातं. खरं म्हणजे ममता असो, ममताची तृणमूल कॉंग्रेस असो, शरद पवार असो कि त्यांचा राष्ट्रवादी पक्ष असो.. या दोन्ही पक्षांना कॉंग्रेस सोबत येवून (च) ही लढाई लढावी लागेल. कॉंग्रेसला सोबत घेवून ही लढाई लढता येणार नाही, कॉंग्रेस दुय्यम पक्ष नाही. बंगाल मधील तृणमूल किंवा महाराष्ट्रातला राष्ट्रवादी हे कॉंग्रेसच्या राष्ट्रीय परिभाषेत दुय्यम पक्ष आहेत, ही पहिली गोष्ट. 
दुसरा विषय असा की... तृणमूल असो, राष्ट्रवादी असो... याचे आजचे नेते मूळचे कॉंग्रेसवालेच आहेत. त्यांना मिळालेले मोठेपण कॉंग्रेसमुळेच मिळालेले आहे. कॉंग्रेसपासून वेगळ होताना त्यांच्या पक्षाच्या नावातून त्यांना ‘कॉंग्रेस’ हा शब्द वजा करता आलेला नाही.  तो शब्द वजा करुन पाहा. मग, किती जागा मिळतात त्याचा हिशोब करा. ममता असो, पवार असोत... दोघांच मोठेपण कोणीही अमान्य करीत नाही. पवार ममतांपेक्षा अधिक मोठे नेते आहेत. पण कॉंग्रेस पक्ष या दोघांपेक्षा मोठा आहे. हे विसरण्याची गफलत करु नका. सोनियाजींचा त्यागा त्याहून मोठा आहे. बॅ.नाथ पै यांच्या पत्नी क्रिस्टल पै.. नाथच्या निधनानंतर आठ दिवसात आॅस्ट्रेलियात परत गेल्या. राजीवच्या भीषण हत्येनंतर दोन लेकरांना कुशीत घेवून सोनियाजी हिंमतीन उभ्या राहील्या. २00४ च्या निवडणुकीत ६५ हजार किलोमीटर फिरल्या. डोक्यावरचा पदर ढळू दिला नाही. आज एका असाध्य रोगाशी मुकाबला करताना देशातील गरीब जनतेला २ रुपये किलोने गहू आणि तांदूळ मिळावा म्हणून त्यांनीच योजना आणली. ती सफल होवू दिली गेली नाही. कॉंग्रेस पक्षाला फार मोठं यश निवडणुकीत मिळवता आलं नसेल याचा अर्थ देशातून कॉंग्रेस पक्ष संपला, असं मानणारे जे जे कोणी आहेत. ते भ्रमात आहेत. प्रत्येक गावात कॉंग्रेस आहे, कॉंग्रेसचा झेंडा आहे, सर्वधर्मसमभावाचा कॉंग्रेसचा विचार आहे,  कॉंग्रेसचा कार्यकर्ता आहे. आजच्या निवडणुकीत लागणारा अफाट पैसा कॉंग्रेसजवळ आज नसेल तरी कॉंग्रेसला डावलून एखादी भूमिका घेतली गेली की या देशातील जनता कशी उसळून उठेल बघा... इंदिराजींनी आणीबाणी आणली असेल, त्यात चूक झाली असेल पण जी आणीबाणी आणली ती कायद्यानं आणली. लोकशाहीच्या धर्मानुसार ती मागं घेवून निवडणुका लावल्या. पराभव स्वीकाला. लोकांनी पुन्हा कौल दिल्यानंतर सत्तेत आल्या. त्यांच्या दोन पिढ्यांनी देशासाठी बलिदान केलं. सोनिया गांधींना किती ही नाव ठेवा. तो दिवस आठवा... २४ मे २00४ कॉंग्रेसच्या खासदारांनी संसदीय कॉंग्रेस पक्षाच्या नेत्या म्हणून.. म्हणजे पंतप्रधान म्हणून सोनियाजींच नाव ठरवलं असताना.. सोनियाजी राष्ट्रपतीकडे जातात आणि मग पंतप्रधान म्हणून शपथविधी कोणाचा होतो?.. देशाचे त्यावेळचे राष्ट्रपती महान वैज्ञानिक डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम शपथ कोणाला देतात... देशाच्या एका अर्थतज्ञाला..जो अर्थतज्ञ शीख धर्माचा आहे. शपथ कोण देतयं... नियमितपणे भक्तीभावाने कुरान पढणारा एक  वैज्ञानिक.. आणि पंतप्रधान पदाचे मनमोहन सिंग यांचे नाव कोण सुचवित आहे.... एका राष्ट्रीय पक्षाची धर्मान ख्रिश्चन असलेली अध्यक्षा. श्रीमती अ‍ॅनी बेझंट नंतर भारतीय जीवनात सोनियाजींनी हा जो इतिहास घडवला तो या देशाच्या सर्वधर्मसमभाव संकल्पनेचा सर्वोच्च बिंदू होता. मिडीयानं त्याची दखल घेतली नाही. पण जसा महात्माजींवर चित्रपट निर्माण करण्याची क्षमता एकाही भारतीय दिग्दर्शकामध्ये नव्हती.. ते काम एका परदेशी दिग्दर्शकाला करावं लागलं... त्याचप्रमाणे सोनियाजींच्या कारकिर्दीतील लोकशाहीच्या या परमोच्च बिंदूच वर्णन करायला स्पॅनिश लेखक हाविएर मोरो यांनी ते काम केलं, अनुवाद झाले ते नंतर...
...तर कॉंग्र्रेसने आता निर्णायक भूमिका घ्यावी. लेचीपेची भूमिका घेवू नये. ममताचं महत्व त्या सत्तेवर आहेत म्हणून आहे. कॉंग्रेसने निर्णय करावा की... भाजपाविरोधात जी लढाई लढायची आहे. ती कॉंग्रेसच लढणार आहे.. ज्यांना हा विचार मान्य असेल त्यांनी कॉंग्रेससोबत यावं. एकदा होवुन जावू द्या. कॉंग्रेसचं जे काही राजकीय नुकसान झालं आहे ते भरुन निघायच असेल तर कॉंग्रेसने झेंडा खांद्यावर घेवून आता पक्ष म्हणून रस्त्यावर उतरावं.  ते दिवस आठवा ज्या दिवशी इंदिराजी रस्त्यावर उतरल्या होत्या.  १९७७ साली कॉंग्रेस सत्तेतून पराभूत झाल्यावर रस्त्यावर उतरुन इंदिराजी पवनारला विनोबांच्या भेटीला निघाल्या तेव्हा रस्त्याच्या दुतर्फा हजारो लोक त्यांच्या स्वागताला उभे होते. नंतरचा इतिहा सगळ्यांना माहिती आहे. कॉंग्रेसने हीच भूमिका घ्यावी. कोण सोबत येवो, न येवो.. कॉंग्रेसने रस्त्यावर उतरावं. बघा परिणाम काय होतो. एवीतेवी आज देशात कॉंग्रेसची भूमिका दुय्यम आहे. महाराष्ट्रात कॉंग्रेस सत्तेचा एक भाग आहे. पण तो भागही वळचणीला उभा राहण्यासारखा आहे. महत्व सेना आणि राष्ट्रवादीला आहे. ही लाचारी आता सोडून द्या. जर देशपातळीवरचे भाजपाविरोधातील नेते कॉंग्रेसला खिजगणतीत धरत नसतील तर त्यापैकी कुणाचीही पर्वा न करता कॉंग्रेसनं एकट्यानं रस्त्यावर उतरावं. एका राज्यात सत्ता मिळाली म्हणून, ज्या पक्षानं मोठं केल, त्याच पक्षाला लाथा घालण्याची भूमिका असेल तर अशा नेत्यांना त्यांची जागा दाखवली पाहिजे.
महाराष्ट्रापुरत बोलायच झालं तर.. पुरोगामी महाराष्ट्रात भाजपासारखा धार्मिक उन्माद असलेला पक्ष सत्तेवर येवू नये म्हणून आघाडी झाली. पण देशपातळीवर कॉंग्रेसला हिणवायचं, महाराष्ट्रात सत्ता टिकावी म्हणून कॉंग्रसला गोंजारायचं.. ही वागणूक सहन करु नका. नाही तर जी काही सत्ता आहे. ती औरंगजेबाने छत्रपती शिवरायांना दरबारात बोलावून ५ हजाराच्या मनसबदारीत उभं केलं, महाराजांनी हा अपमान सहन करता औरंगजेबाला कुर्निसात न करता पाठ दाखवून दरबार सोडला... आज महाराष्ट्रात सत्तेत असलेला कॉंग्रेस पक्ष ५ हजाराच्या मनसबदारीतच उभा आहे. द्या सोडून सत्ता... नाना, तुम्ही पुढाकार घ्या, बाळासाहेब, अशोकराव तुम्ही सत्ता खूप भोगली आहे. कॉंग्रेस पक्षाच्य राष्ट्रीय सन्मानासाठी पद फेकून द्या आणि उतरा मैदानात... पहा काय परिणाम होतो तो. नाना, जिल्हावार शिबीर घ्या. कार्यकर्त्यांना विश्वास द्या. वयाच्या ८२ व्या वर्षी महाराष्ट्र घुसळून काढायला तुमच्यासोबत आहे. स्वाभिमानी महाराष्ट्राने गोंजारण्याची भाषा आता सहन करु नये.. एवढेच सांगण.

Comments

Popular posts from this blog

अभ्यास करून पोराला IAS, IPS बनवायचं अन् कराड-खोक्याभाई त्याची नियुक्ती करणार?, मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र व्हायरल

शिरशी गावच्या लोकनियुक्त पहिल्या सरपंच – सौ. स्मिताताई बापूराव भोसले

*केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याशी झालेली भेट आणि आलेला अनुभव*....