उसतोड लेकरांना शोधावा लागत नाही कशाचा आधार
चिखली - मनोजकुमार मस्के
कधी पावसाच्या ढगांनी दाटलेलं .. तर कधी उन्हाच्या तडाख्याने फाटलेलं ...डोक्यावर नेहमी उभा असलेलं आभाळ... गारठ्याची उठलेली लहर... उसाच्या पालात थाटलेला संसार.. दिवसभर कोयता घेऊन थकलेल्या हातांना एक क्षणभरही विश्रांती न देता आपली लेकरं उसाचं खोपट करून त्याच्या आडोशाला ठेवून त्यांची माय लगबगीने ऊस तोडायला सुरुवात करते.
पोटाची खळगी भरण्यासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी, मुलीच्या लग्नासाठी म्हणून अनेक कुटुंब मराठवाडा विदर्भ येथून ऊस तोडण्यासाठी शिराळा तालुक्यात दाखल झाली आहेत. दिवाळीच्या अगोदर आलेली ही कुटुंब रानावणातच आपली खोपट घालून मुलाबाळांना घेऊन राहत असतात.
अशाच एका उसाच्या फडात पावसाच्या सरी पासून आणि वाऱ्यापासून आपली लेकरं वाचावीत म्हणून एका मायने ऊसाचं आणि वाड्याचं उभारलेले हे खोपटं. हे चित्र आहे शिराळा तालुक्यातील सागाव आणि मांगले परिसरातील. आठ दिवसापुर्वीच दिवाळी हा आनंदाचा सन झाला. पण या कष्टकऱ्यांच्या वाट्याला मात्र दिवाळीचा आनंद आलेला नाही. उसाच्या फडातच त्यांची दिवाळी साजरी होत आहे.
खऱ्या अर्थानं या लोकांच्याकडे पाहिलं की जगण्याची एक नवी उमेद येते. शिवाय आजच्या आधुनिक जगात याही परिस्थितीत जगणारी लोक पहिली की जगण्याचा खरा अर्थ समजतो.
चौकट
सणसूद आमच्या नशिबी नाही. राबणं हाच आमचा सण झालाय. आम्हाला पण वाटतं सर्वांसारखं दिवाळी आनंदात साजरी करावी. फराळ, कपडे घ्यावे; पण घेतलेले कर्ज फेडायचे आहे. त्यामुळे थोडी मुरड घालावी लागते.
- ऊसतोड कामगार
Comments
Post a Comment