ती २४ वर्षे... ही २४ वर्षे....

मधुकर भावे


बघता-बघता २४ वर्षे झाली. बाबूजींचा आज २४ वा स्मृतीदिन. बाबूजींच्या सोबत - दिवस उगवल्यापासून दिवस मावळेपर्यंत- २४ वर्षे वावरलो. माणूस म्हणून बाबूजी किती मोठे आहेत. हे त्या २४ वर्षांतील प्रत्येक दिवशी अगदी सहजपणे समजत होते. त्यांच वागण्यातल मोठेपणं त्यांनी कधी स्वत:हून सांगितलं नाही, त्यांनी मदत केलेली शेकडो माणसं समोर आहेत, त्यांच्यामुळे घरकुल मिळालेली कित्येक माणसं आहेत, त्यांच्यामुळे बॉम्बे हॉस्पिटलसारखया दर्जेदार रुग्णालयात उपचार घेवून बरे झालेले शेकड्यांनी आहेत. पण त्यांनी डाव्या हाताच, उजव्या हाताला कळू दिलं नाही. अस बाबूजींचं हे मनाचं मोठेपण २४ वर्षे पाहिलं अगदी शेवटच्या दिवसापर्यंत. प्रत्येकाला एक दिवस जायचे आहे. मृत्यू हा महोत्सव आहे असे विनोबा सांगत आणि बाबूजी त्याचाच उच्चार करतं. मी ज्या २४ वर्षांत बाबूजींना पाहिलं, त्या २४ वर्षांत लोकमतचा वटवृक्ष झाला. त्याच्या पारंब्या महाराष्ट्रभर पसरल्या. बाबूजी मंत्री म्हणून सगळ्याच मुख्यमंत्र्यांना हवे होते. त्या काळात त्यांनी केलेल्या कामाची यादी एवढी मोठी आहे. आज अशी काम होत नाहीत. कार्यकर्त्यांच्या खांद्यावर कोणी हात टाकत नाही. पक्ष न बघता  मदत करण्याचा विषय आता सोडूनच द्या. बाबूजींनी ना कधी जातीचा विचार केला, ना कधी पक्षाचा विचार केला. त्यांनी कामाचा विचार केला. स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी त्यागाच काम केलं. ज्या माणसांन १८ महिने तुरुंगवास भोगला. त्याच स्वातंत्र्यसेनानीला विधानसभेत ‘स्वातंत्र्यसैनिक नसल्याबद्दल’ भयानक  टीका सहन करावी लागली... स्वातंत्र्यासाठी तुरुंगात राहण्याच्या त्यागापेक्षाही ही जहरी टीका शांतपणे पचवणं, यासाठी लागणारी स्थितप्रज्ञता फार मोठी असावी लागते, हे सोपं काम नाही. ‘ज्या समोरच्या बाकावरील मित्रांनी स्वातंत्र्य चळवळीत कसलाही भाग घेतलेला नाही, त्यांना मी १८ महिने तुरुंगास भोगला, हे सांगण्याची मला गरज वाटत नाही’.. बाबूजींच्या या एका वाक्याने सारे सभागृह अवाक् झाले. आणि दुसºया दिवशी त्यांच्या भोगलेल्या तुरुंगवासाबद्दल सभागृहात केलेले आरोेप चुकीच्या माहितीवर केल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करायलाही हेच आमदार आले तेव्हा कालचा विषय विसरुन त्यांना हात धरुन नाश्ता करायला बसवणारे बाबूजी मी पाहिलेले आहेत.
आज टीका केलेली माणसं लक्षात राहीली नाहीत. बाबूजींचा त्याग लक्षात राहीला. स्वातंत्र्य मिळाल्यावर ते सांगायचे... ‘हे स्वातंत्र्य कोणाकरीता...’ त्यांचा हा १९४७ सालच्या १५ आॅगस्टचा ‘नवे जग’ या मासिकातील पहिलाच अग्रलेख बाबूजींची मानसिकता सांगून गेला होता. त्याच बाबूजींनी १५ आॅगस्ट १९९७ ला...म्हणजेच स्वातंत्र्याला ५0 वर्षे पूर्ण झाली तेव्हा लिहीलेला अग्रलेख त्यांच्या सामाजिक उंचीची साक्ष देतो. दुर्दैवाने महाराष्ट्राला बाबूजींची सामाजिक, वैचारीक उंची समजली नाही आणि चिंतनशील प्रकृतीही समजली नाही... 
आज बाबूजी नाहीत. तसे ते अकाली गेले. ७४ वर्षे वय हे जाण्याच वय नव्हतं. या गोष्टी कोणाच्याच हातात नाही. गेले २३ वर्षे यवतमाळच्या प्रेरणास्थळावर २५ नोव्हेंबरला जातोय. आज २४ व वर्ष. या २४ वर्षांत समाधी स्थळावर, प्रेरणास्थळावर प्रत्येक वर्षी महाराष्ट्रातली चौफेर माणसं आली. आदरांजली वाहून गेली. बाबूजींच मोठेपण सांगून गेली. 
२५ नोव्हेंबर १९९८ ला त्यावेळचे मुख्यमंत्री मनोहर जोशी आले,  सुधाकरराव नाईक आले, त्यावेळचे बांधकाम मंत्री नितीन गडकरी आले, पत्रकार कुमार केतकर आले आले, २५ नोव्हेंबर १९९९ साली दुसºया स्मृतीदिनाला त्यावेळचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख आले, अरुण गुजराथी आले, प्रमोद नवलकर आले. पुढच्या स्मृतीदिनाला मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री दिग्विजय सिंह आले, नरपत भंडारी आले, चौथ्या स्मृतीदिनाला छत्तीसगडचे मुख्यमंत्री अजित जोगी आले आणि नौदलप्रमुख विष्णू भागवत आले. पाचव्या स्मृतीदिनाला उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री नारायणदत्त तिवारी आले, सहाव्या स्मृतीदिनाला उद्योगपती गौतम सिंघानिया, अभिनेत्री माहिमा चौधरी, अभिनेता अरबाज खान यांची उपस्थिती होती, सातव्या स्मृतीदिनाला सतारवाद निलादरकुमार होते. आठव्या स्मृतीदिनी विख्यात वैज्ञानिक रघुनाथराव माशेलकर आणि उस्ताद राशीद खान होते. नवव्या स्मृतीदिनाला देशाचे उपराष्ट्रपती भैरवसिंह शेखावत होते, त्यावेळचे गृहमंत्री आर.आर.आबा आणि मंत्री मनोहर नाईक होते, दहाव्या स्मृतीदिनाला तिरुपती बालाजी संस्थानचे अध्यक्ष, केंद्रीय राज्यमंत्री सुब्बारामी रेडडी होते, अकराव्या स्मृतीदिनाला पंडीत हरिप्रसाद चौरसिया होते. बाराव्या स्मृतीदिनाला पंडित राजन मिश्रा आणि साजन मिश्रा यांनी संगीत रजनी गाजवली. तेराव्या स्मृतीदिनाला त्यावेळचे आणि आजचे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यासोबत पंडित जसराज होते. १४ व्या स्मृतीदिनाला ओरिसाचे राज्यपाल मुरलीधर भंडारे होते, पत्रकार सुरेश व्दादशीवार, आमदार निलेश पारवेकर होते, पंधराव्या स्मृतीदिनाला कविता सेठ होत्या. सोळाव्या स्मृतीदिनाला बिहारचे राज्यपाल डॉ.डी.वाय.पाटील होते. सतराव्या स्मृतीदिनाला त्यावेळचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते आणि लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर सलग तीन कसोटी सामन्यात शतक झळकवण्याचा पराक्रम करणारे एकमेव दिलीप वेंगसरकर होते. एकोणिसाव्या स्मृतीदिनाला महाराष्ट्राचे त्यावेळचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार होते, विसाव्या स्मृतीदिनाला प्रख्यात गायक महेश काळे होते, एकविसाव्या स्मृतीदिनाला कवी रामदास फुटाणे होते. बाविसाव्या स्मृतीदिनाला पंडित विश्वमोहन भट होते, तेविसावा स्मृतीदिन (२0२0) कोरोनाच्या भयानक वातावरणात प्रेरणास्थळावर फक्त प्रार्थना होवून साजरा झाला आणि आता या वर्षी २0२१ रोजी महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल श्री.भगतसिंह कोश्यारी, देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री, आंध्रचे माजी राज्यपाल, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सदाप्रसन सुशीलकुमार शिंदे येत आहेत आणि त्यांच्यासोबत आहेत. हजारो रुग्णांना केवळ आपल्या ‘दोन अंगुठ्याच्या’ उर्जेने सगळ दुखणं बरं करणारे प्रखयात धन्वंतरी डॉ. गोवर्धनलाल पाराशर येत आहेत. तीन दिवसांचं त्यांच आरोग्य शिबीर हजारो रुग्णांना... गोळ्या, इंजेक्शन, एक्सरे, एम.आर.आय यापासून दुर नेवून एक वेगळी अनुभूती देणार आहे...
बाबूजींच्या सोबत गेलेली २४ वर्षे डोळ्यासमोर आहेत, जणू बाबूजीच समोर आहेत आणि ते गेल्यावरची ही २४ वर्षे.... आयुष्याची ही ४८ आगळी वेगळी आहेत.

Comments

Popular posts from this blog

*अनाथ मुलांचे स्वीकारले स्वामी धामने पालकत्व*

संजय गणपती पाटील उर्फ संजू दादा भावपूर्ण श्रद्धांजली

*रात्री माझं गाव विकताना पाहिलं*