असं झपाटून काम करणारा नेता, मंत्री, उपमुख्यमंत्री पाहिला नाही
श्री अजित पवार आज ६१ वर्षाचे झाले आहेत. ६१ वर्ष म्हणजे पूर्ण अनुभवाच वर्ष समजलं जात. पुढची २५-३0 वर्ष तरी अजित पवार या व्यक्तिमत्वाला गेल्या ३0-४0 वर्षातील झपाटलेल्या कामाची उर्जा नक्की पुरेल आणि उरेलसुध्दा. महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवार यांचा थेट प्रवेश तसा ३0 वर्षापूर्वीचा. पण त्यापूर्वी किमान १५ वर्ष तरी १0 संस्थांचे संचालक आणि नंतर पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष अशा अनेक संस्थांमधून अनुभव आणि उर्जा घेत दादा ६१ व्या वर्षी त्याच उर्जेन काम करत आहेत. ही उर्जा बारामतीच्य पवार घराण्याचीच उर्जा आहे. श्री. शरद पवार साहेबांच्या मातोश्री आदरणीय शारदाताई यांच्यामुळेच शरद पवार असोत किंवा अजितदादा असोत. हा उर्जेचा स्त्रोत अखंड आहे.
मी ६0-६२ वर्षे पत्रकारितेत आहे. अजितदादांशी माझा तसा रोजचा परिचय नाही. रोजच जाण-येण नाही. दादा महाराष्ट्राच्या राजकारणात आल्यापासून म्हणजे गेल्या ३0 वर्षात दादांची भेट ५-१0वेळासुध्दा झाली नसेल. जी झाली असेल ती अशी उडती... घाईघाईची याच कारण दादा निवांत बसले आहेत असं कधी पहायला मिळालच नाही. गेल्या ६0 वर्षांत शरद पवारांची भेट न मोजता येईल इतक्यावेळा झाली आहे. माझ्या अनेक कार्यक्रमांना ते आले, चर्चाही होते. तेही प्रचंड उर्जेने काम करतात. त्यांचा दिवसही सकाळी ७ वाजता सुरु होतो. इतर राजकिय नेते जेव्हा उठून कामाला लागतात. तेव्हा शरद पवार साहेबांचे चार तास काम झालेले असते. पण, तुलना करायची म्हणून नाही. शरद पवारांच्या तोडीचा आणि वकुबाचा नेता मला देशात दिसत नाही. पण काहीवेळा अस वाटत की अजितदादा शरद पवार साहेबांच्या मैलभर पुढे आहेत. कारण, या महाराष्ट्रातला कोणत्याही पक्षाचा ज्येष्ठ नेता सकाळी ८ वाजता पक्षाच्या कार्यालयात जात असेल, असं एकही उदाहरण देशात नसेल. ९ वाजता मंत्रालयात पोहोचणारा मंत्री दादांशिवाय दुसरा कोणी असेल असं वाटत नाही. कोरोना काळातली जी माहिती आहे, ती अशी आहे की, मंत्रालयात सर्वात अगोदर पोहोचणारा मंत्री आणि सर्वात शेवटी मंत्रालय सोडणारा मंत्री... त्याच नाव अजितदादा. एवढा झपाटुन काम करणारा मंत्री मी काय पाहिलेला नाही. मी त्यांच्या तसा अजिबात जवळ नाही. मी त्यांना लांबूनच पाहतो आहे आणि लांबूनच लिहीतो आहे. तसं म्हटल तर दादांचा लांबून पाहिलेला स्वभाव असा आहे की, ते कोणाला फारसे जवळ करत नाहीत आणि काम होण्यासारखं असेल तर खेपा घालायला लावत नाहीत. काम होईल म्हणाले तर होईल... नाही म्हणाले तर जन्मात होणार नाही. स्वभाव काहीसा फटकळ पण, मनाने हा माणूस नेता नाही, कार्यकर्ताच आहे. पवार साहेबांबद्दलचा त्यांच्या मनातला आदर कल्पना येणार नाही इतका खोल आहे. मंत्रालयात फाईलवर नजर टाकली की ज्याला फाईल समजते असे जे दोन-चार मंत्री असतील त्यात दादा पहिले आहेत. आणखी एक गूढ प्रश्न मनात असतो. झपाटून काम करणारा हा माणूस आजच्या काळातल्या राजकिय मार्केटिंगपासून खूप लांब आहे. प्रसिध्दीसाठी ते हापापलेले आहेत असे कधी बघितले नाही.
त्यांचा आणखी एक गुणविशेष आहे. कोणतही काम तडाकुन कसं करावं हा मंत्रालयातला अंतुले साहेबांनतरचा विशेष दादात पहायला मिळतो.
एक व्यक्तिग अनुभव सांगतो. माझी पुतणी डॉ. संगिता वेलणकर हिचे पती डॉ. महेश वेलणकर रत्नागिरी शासकीय रुग्णालयात आ.एम.ओ होते. एके दिवशी रुग्णालयात शिरत असताना रुग्णालयातून येणाºया वॉटर टँकरने त्यांना उडवले आणि जागीच ठार झाले. त्यांच्या जागेवर अनुकंपा तत्वावर विलासराव मुख्यमंत्री असताना मी, माझ्या डॉक्टर पुतणील ११-११ महिन्यांच्या तात्पुरत्या नोकरीवर लावली. ११ महिन्यांनंतर नोकरी थांबायची. पुन्हा पिच्छा पुरवला की आॅर्डर निघायची. या कामा विलासराव ते अशोक चव्हाण आणि आरोग्यमंत्री दिग्विजय खानविलकर, विमल मुंदडा, सुरेश शेटटी या सर्वांनी मदत केली. २0१0 ला पृथ्वीराजबाबा आले. त्यावेळी पुतणीची नोकरीत खंड होता. मी बाबांकडे अर्ज दिला. ते म्हणाले,... ‘मधुकरराव, आपल्याला आता ताकसुध्दा फुंकुन प्याव लागेल‘.... त्यांच्या हातातला अर्ज त्यांनी खाली ठेवून दिला. तेवढ्यात अजितदादा तिथे आले. मला खुणेनेच विचारले काय काम काढलत? मी काहीच बोललो नाही. मी बाहेर पडलो, पाठोपाठ दादा बाहेर पडले. माझा हात धरुन म्हणाले ‘चला कार्यालयात’ मी त्यांच्यासोबत गेलो. त्यांनी मुख्यमंत्र्याकडे काय काम होत विचारलं, मी विषय सांगितला. त्यांनी फोन उचलला. ‘ आरोग्य संंचालकांना फोन लावा...’ फोन लागला, दादांनी तपशील सांगितला. फोन ठेवला मला म्हणाले ‘४ वाजता ११ महिन्यांची आॅर्डर घेवून जा, आणि ४ वाजता त्यांची आॅर्डर आली. दादांच्या कामाचा तडाखा हा असा...
शेवटचा मुद्दा : शरद पवार साहेबांना ७0 वर्षे झाली तेव्हा त्यांच्यावर ‘एकमेव’ ग्रंथ केला. काही मुलाखती घेण्यासाठी बारामतीला गेलो होतो. अजितदादांच्या मातोश्रींनाही भेटलो. सहज विचारल, ‘अजितदादा घरी किती दिवस येतात..’ मातोश्री म्हणाल्या... ‘येतोय असा निरोप येतो, मग वाट पहात दारात उभी राहते, तास-दोन तासांनी आला तर सांगायला लागतो घाईत आहे, नमस्कार करतो, दोन मिनीट टेकतो पुन्हा धावपळीत जातो..... तो गेला की पुन्हा पाठमोºया आकृतीकडे मी आपली पहात राहते....
केवळ काम आणि काम यासाठी एवढा झपाटलेला हा विरळ राजकारणी आणि प्रेमळ आईची त्याच झपाटलेपणात भेट घेवून जाणारा हा सुपुत्र.
Comments
Post a Comment