पुरस्कार... - विश्वास पाटील यमुनाकाठ आजच्या पिढीसमोर पुन्हा साकारला आहे.

पुरस्कार...
महाराष्ट्राला संत तुकोबा-ज्ञानोबांनंतर साध्या सोप्या, सुटसुटीत आणि लडिवाळ मराठीचे धडे साने गुरुजी आणि आचार्य अत्रे यांनी दिले. एखाद्या पर्वतासारखे प्रचंड कर्तृत्व आणि चतुरस्र व्यक्तिमत्त्व असलेला आणि मराठी मातीवर जिवापाड प्रेम करणारा आचार्य अत्र्यांसारखा साहित्यिक कोणी विसरणे अशक्य. त्यांच्या शब्दांच्या सावलीतच मी माझे महाविद्यालयीन जीवन वेचले. खर्‍या अर्थाने आचार्यांची आणि माझी पुनर्भेट झाली ती मधुकर भावे यांच्यामुळे.
गेल्या जुलैमध्ये रायगड जिल्ह्यावर कोसळलेले पावसाचे प्रलय संकट. मातीआड गाडलेल्या मुलखाच्या मदतीसाठी महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री विलासराव देशमुख महाडवासीयांच्या मदतीला धावलेले. त्यांच्यासमवेत आलेल्या भावेेसाहेबांची आणि माझी तेव्हा प्रथमच भेट झाली. बेळगाववासीयांकडून सुरू केल्या जाणार्‍या प्रथम वर्षाच्या साहित्यिक पुरस्कारासाठी माझी निवड झालेली. आम्हां दोघांना त्यासाठी आमंत्रित केले गेले होते. कामाच्या घाईमध्ये आम्हां दोघांनाही तिकडे जाणे शक्य नव्हते. मात्र एकमेकांच्या ओढीनेच की काय, आम्ही दोघांनी तिकडे जायचा निर्धार केला.
विमानप्रवासामध्ये मधुकर भावेसाहेब भेटले. सोबत सौ. भावेवहिनी होत्या. भावेसाहेबांनी ‘अत्रे’ या एकाच विषयावर विमानात सलग बोलायला सुरुवात केली. आषाढाच्या जलधारा सतत कोसळाव्यात, तसे ते बोलतच राहिले. त्यांनी मैफल छान रंगवली होती. एकदा नौशादसाहेबांच्या बंगल्यामध्ये राम कदमांसोबत रंगलेली बहारदार मैफल आणि त्यांनी जागवलेल्या लाहोरच्या जुन्या चिजा आठवल्या. भावे बोलत होते आणि संयुक्त महाराष्ट्र व त्या निमित्ताने आचार्य अत्रे यांनी छेडलेला महासंग्राम डोळ्यांसमोर उभा राहत होता. 
आमच्या भेटीच्या आधीच मी  म.गो. तथा बाबा पाठकांचे ‘गदिमांच्या सहवासात’ नावाचे अतिशय सुंदर पुस्तक वाचले होते. एका प्रतिभावंताचा जीवनसंघर्ष त्याच्या निकटतम सहकार्‍याने खूपच नेटक्या आणि सहजसुंदर शैलीत टिपला होता. विमान एकदाचे बेळगावला थांबले. मी भावेसाहेबांचा हात हाती धरून त्यांना सांगितले, “भावेजी, तुम्ही-आम्ही एका अत्रे कविकुळातले आहोत. आपण सांगितलेले अनुभव, आचार्यांच्या आठवणी आणि संघर्षपर्व हवेत तसेच विरून जायला नको. ते 
लवकरात लवकर शब्दबद्ध करा.” आश्चर्य म्हणजे, काही दिवसांतच हे कार्य भावेसाहेबांनी तडीस नेले.
या स्मरणपर्वातला पहिला भाग भावे यांचे बालपण, रोह्याचा रम्य परिसर आणि अत्रे-भावे प्रथम भेटीबाबतचा आहे. संपादक आचार्य अत्रे यांनी तरुण मधुकर भाव्यांमधील गुण ओळखून त्यांना ‘मराठा’चे बातमीदार नेमले. मात्र, कोणाच्यातरी खोडसाळपणामुळे ‘मराठा’सारख्या पत्रातील आपली बातमीदारी आणि अत्रेंसारख्या महागुरूपासून ताटातूट होण्याचा प्रसंग भावेंच्या कोवळ्या आयुष्यात उद्भवला. तेव्हा एक प्राथमिक शिक्षक त्यांच्या मदतीला धावले. त्यांनी बोटभर चिठ्ठी लिहून अत्र्यांमधील मूळ शिक्षकाला हाक दिली. शिक्षकाच्या पत्रातल्या त्या शब्दांवर भरवसा ठेवून भाव्यांना पुन्हा ‘मराठा’त घेण्यात आले, नव्हे त्यांना बढतीही मिळाली. ती थोर आदर्श शिक्षकी परंपरा आज अस्तित्वात उरलेली नाही. आम्ही जिल्हा परिषदेमध्ये एका शिक्षकाला ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार दिला आणि पुढच्याच आठवड्यात त्याने एका महिलेचा विनयभंग केला. ही सत्यकथा आहे.
‘मराठा’साठी भावेंनी केलेली धावपळ, महत्त्वाच्या कोर्ट-केसेसचा दिलेला वृत्तान्त, अत्र्यांचा सहवास, अत्रेसाहेबांच्या अफाट कर्तृत्वाचे आणि बिलंदरपणाचेही अनेक नमुने, त्यांचे किस्से अशा अनेक गोष्टींचा समावेश या पुस्तकामध्ये आहे. मात्र, आचार्य अत्रे हे कमालीचे महाराष्ट्रभक्त होते. ‘लोक माझे चित्रपट, नाटके विसरले तरी चालतील; पण संयुक्त महाराष्ट्रासाठी मी खाल्लेल्या खस्ता लोकांना विसरता येणार नाहीत,’ असे साहेबांनी कुठेतरी लिहिल्याचे मला आठवते. आचार्यांचा वाड्.मयीन आलेख पाहिला तर खरेच त्यांनी पंधरा वर्षे संयुक्त महाराष्ट्रासाठी आपली लेखणी म्यान केली होती. मात्र, वक्तृत्वाच्या आणि पत्रकारितेच्या तलवारी उपसून हा जनांचा साहित्यिक उघड्या मैदानावर झुंजला होता. त्या धगधगत्या कालखंडाचे साक्षीदार मधुकर भावे आहेत.
संयुक्त महाराष्ट्रविरोधी वक्तव्य करणार्‍या आचार्य विनोबांची त्यांनी ‘वानरोबा’ म्हणून संभावना करायलाही मागेपुढे पाहिले नाही. मात्र, संयुक्त महाराष्ट्र निर्मितीचे आपले धर्मकृत्य संपताच ते पवनारला गेले. स्वराज्यप्राप्तीनंतर दिल्लीत सत्तेच्या सारीपाटात हिंदुस्थानच्या राजकारणातील हरिहर मश्गुल होते; तेव्हा गांधीजी नौखालीची जळती आग विझवण्यासाठी पूर्व बंगालमध्ये रवाना झाले होते. त्या प्रसंगाची या निमित्ताने भावेंना सय होणे साहजिकच आहे. आचार्य अत्र्यांच्या मनाचे पापुद्रे भावे सहज उलगडून दाखवतात.
तुकडोबांच्या निधनानंतर त्यांचे अभंग गात रडणारे अत्रे, आपण निवडणूक हरलो तरी आपल्यामुळे दुसर्‍या मतदारसंघात स.का. पाटील पडले या ईर्षेपायी आपल्या पत्नीस ओवाळ म्हणून सांगणारे ईर्षेबाज अत्रे, अशी अत्र्यांची नानाविध रूपे भावेंनी आपल्या समर्थ लेखणीने दाखवून दिली आहेत. राजकारण हे सदैव सज्जनांची सत्त्वपरीक्षा पाहते की काय कोण जाणे. एखाद्या महायुद्धात जिवापाड जंग करणार्‍या लढवय्यासारखेच संयुक्त महाराष्ट्रासाठी अत्रेसाहेबांनी तन-मन वेचले. परंतु, तत्कालीन राजकारण्यांनी आपल्या चळवळींची उद्दिष्टे गाठण्यासाठी अत्र्यांमधील महान वक्त्याचा, पत्रपंडिताचा उपयोग करून घेतला. तो सामर्थ्यवान वारा आपल्या शिडात भरून आपली गलबते स्वार्थाच्या किनार्‍याकडे वळवली. परंतु, अत्र्यांनी ज्या प्राणतत्त्वांसाठी अस्मानी-सुलतानी लाटांशी दोन हात केले; ती तत्त्वे बाजूलाच राहिली. त्यांच्या स्वप्नातला सामर्थ्यवान संयुक्त महाराष्ट्र प्रत्यक्षात अवतरला नाही. एक विकलांग महाराष्ट्रच हाताशी लागला. संयुक्त महाराष्ट्र समिती फुटली. अत्रेंना विरोधी पक्षनेतेपद मिळणे शक्य असतानाही ते जाणूनबुजून मिळवून देण्यात आले नाही. उलट, त्यांची कोंडीच केली गेली. या आठवणी वाचल्यावर कोणाही अत्रेभक्ताचे, नव्हे महाराष्ट्रभक्ताचे हृदय गलबलून येईल.
अत्रेसाहेबांचे खोटे मृत्युपत्र, ‘जगातील कामगारांनो एक व्हा’, असा कंठारव करणार्‍या मंडळींनीच अत्र्यांची मालमत्ता हडप करण्यासाठी रचलेली कुभांडे, संपत्तीच्या आशेने केलेला मित्रद्रोह, ‘मराठा’त घडवून आणलेला संप, अत्रे नावाच्या महापुरुषाच्या कवयित्री असलेल्या लाडक्या लेकीची दुष्ट जगव्यवहाराने केलेली कोंडी... हा खरे तर एका महानाट्याचाच विषय आहे. हे महानाट्य आचार्य अत्रे नावाच्या महान नाटककाराच्याच वाट्याला यावे, याला काय म्हणायचे! या दुष्टपर्वाची संगती आमच्या आजच्या पिढीला लागत नव्हती. त्या रिकाम्या जागा भावेसाहेबांनी भरून काढल्या आहेत. उद्याच्या अभ्यासकांसाठी मधुकर भावे वाटाडे ठरले आहेत. अत्र्यांच्या जीवनाचे अस्पष्ट अप्रकाशित कंगोरे त्यांनी पुनर्प्रकाशात आणल्याबद्दल त्यांना शतश: धन्यवादच द्यायला हवेत.
कृष्णाच्या वास्तव्याने गोकूळ पावन झाले. पंचमीच्या, गौरीच्या सणात पूर्वी गीते गाताना कृष्णाच्या आठवणी काढून नाचत, खेळत अश्रू पुसणार्‍या अनेक माहेरवाशिणी मी खेड्यापाड्यांत पाहिल्या आहेत. कोणी मानो वा न मानो; परंतु या मराठी मातीमध्ये आचार्य अत्र्यांनी एक नवे गोकूळ नांदवले होते. अत्रे पत्रकारितेच्या क्षेत्रात सूर्यासारखे तळपले. ‘श्यामची आई’सारखी अभिजात चित्रकृती त्यांनी तयार केली. त्या चित्रपटाला प्रथम राष्ट्रीय पुरस्कार मिळवून देऊन मराठी सिनेमा अक्षरश: अटकेपार नेला. थंडावलेल्या नाट्यसृष्टीला त्यांनी नवसंजीवनी दिली. आचार्यांनी रंगमंच, राजकारण, पत्रकारिता अशी कैक मैदाने गाजवून सोडली होती. वीरशूर, संतजनांचे अखंड चिंतन-मनन करण्यासाठी जागरणाच्या पेठा उघडल्या होत्या. तो सिद्ध साहित्यिक आज आमच्यामध्ये नाही. आता ते गोकूळ उरले नाही. परंतु, मधुकर भावे यांनी आपल्या लेखनसामर्थ्याने तो ओला यमुनाकाठ आजच्या पिढीसमोर पुन्हा साकारला आहे.
धन्यवाद, भावेसाहेब !
                                     
- विश्वास पाटील

Comments

Popular posts from this blog

अभ्यास करून पोराला IAS, IPS बनवायचं अन् कराड-खोक्याभाई त्याची नियुक्ती करणार?, मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र व्हायरल

शिरशी गावच्या लोकनियुक्त पहिल्या सरपंच – सौ. स्मिताताई बापूराव भोसले

*केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याशी झालेली भेट आणि आलेला अनुभव*....