ज्या शेतकर्याने आणि कामगाराने हा लढा लढवला, ते आज किती भीषण अवस्थेत आहेत? महाराष्ट्र होता कुठे आणि चालला कुठे?
आयुष्यात योगायोग असावा लागतो. ठरवून काही होत नाही. सर्वकाही योगायोगानेच होते, असेच मानावे लागते. 1975 साली दैनिक ‘मराठा’ नाइलाजाने बंद करावा लागला. त्याची कारणेच तशी घडली. त्यानंतर मी ‘लोकमत’मध्ये आलो. ‘लोकमत’ची 30-32 वर्षे अशी काही धावपळीत गेली की, हातातला पारा जणू निसटून जावा. दिवस कसे संपले, कळलेच नाही. ‘मराठा’मध्ये काम करताना कामाच्या तासांचा हिशेब नव्हता. पगाराची चर्चा नव्हती. एक झिंग आल्यासारखे झपाटलेले ते दिवस होते. आचार्य अत्रे यांच्या सहवासात दिवसाचे अनेक तास राहायचे, ही कल्पना केवढी रोमांचक होती. त्यांच्यासोबत प्रवास, त्यांच्या सभा, त्यांची भाषणे, त्यांची विधानसभेतली सिंहगर्जना, त्यांचे दौरे, त्यांचे अग्रलेख, त्यांच्या सभांचे रिपोर्टिंग हे काम करताना अंतर्बाह्य मोहरून गेल्यासारखे वाटायचे.
बघता-बघता 12 वर्षे संपली. साहेब अचानक गेले. नंतर 5-7 वर्षे शिरीषताई-व्यंकटेश पै यांनी ‘मराठा’ जोमाने चालवला. त्या 5-7 वर्षांतही साहेबांच्या सहवासातील ‘मंतरलेल्या दिवसांवर’ लिहावयास उसंतच मिळाली नाही. नंतर ‘लोकमत’मध्ये आल्यावर मुंबई, जळगाव, औरंगाबाद, नाशिक, नगर, दिल्ली (विशेष प्रतिनिधी), नागपूर आणि 1998 साली पुन्हा मुंबई... अशा ‘लोकमत’च्या आवृत्त्यांसाठी संपादनाचे काम करताना वर्षे कशी उलटली ते समजलेच नाही. हातचे राखून कुठे काम करायचे नाही, ही संस्काराची शिकवण होती. ‘मराठा’त त्याच भूमिकेने एक तप काम केले आणि ‘लोकमत’मध्येही वेळेचे घड्याळ हातावर नव्हते. ‘मराठा’प्रमाणेच ‘मला पगार किती मिळणार’, असे ‘लोकमत’मध्ये कधी म्हटले नाही.
या दोन्ही वृत्तपत्रांत कामाचा फार मोठा आनंद, हेच मोठे धन होते. कितीतरी दिग्गज माणसे जवळून पाहता आली. ‘मराठा’ आणि ‘लोकमत’ या दोन्ही वृत्तपत्रांत मला कमालीचे स्वातंत्र्य मिळाले, हे नि:संकोचपणे कबूल केलेच पाहिजे. पण, या दैनिकांच्या दैनंदिन कामामध्ये चिंतनाला कमी वेळ मिळाला. बैठक मारून लिहायला बसावे, अशी फुरसतही मिळाली नाही. सारखे असे वाटायचे की, काहीतरी भक्कम लिहावे.
‘मराठा’त 12 वर्षांत 400-500 लेख प्रसिद्ध झाले. त्या वेळी असे जाणवले नाही की, आपल्या लेखांचे कात्रण ठेवावे. संदर्भालाही आता ‘मराठा’तील लेख माझ्या हातात नाहीत. नाहीतर, त्या लेखांचेही एक पुस्तक झाले असते. ‘लोकमत’मध्ये गेल्या 30-32 वर्षांत नावाने आणि ‘कॅमेरावाला’ या टोपण नावाने, तसेच ‘विहंग’ या नावाने एकूण चार हजार लेख लिहून झाले. त्याची बरीच कात्रणे ठेवली गेली. त्या कामात ‘लोकमत’च्या संपादकीय विभागातील कर्मचार्यांनी मदत केली. ‘लोकमत’मधून निवृत्त झाल्यावर ‘प्रज्ञा’ साप्ताहिक सुरू केले. ‘प्रज्ञा’ कार्यालयातील कर्मचार्यांनी ‘लोकमत’मधील लेख महिनावार शिस्तीत लावून ठेवले. त्यामुळे ते लेख हाताशी आहेत; पण बैठक मारून पुस्तक स्वरूपात लिहावे, असा योग काही येत नव्हता. श्री. नितीनजी गडकरी सतत सांगत असायचे की, मी काय हवी ती मदत करतो, तुम्ही पुस्तके लिहा. पण लिहिणे काही होत नव्हते. दिनकर गांगल, बाळ करमरकर, डॉ. अनिल वाकणकर, एस.एम. देशमुख, श्रीकांत बेणी, दिलीप शिंदे हे मित्र सतत सांगायचे की, तू बैठक मारून लिही. ‘हो-हो’ म्हणायचो, पण बैठक काही जमत नव्हती. पुस्तक लिहिणे काही होत नव्हते.
आचार्य अत्रे यांच्या सहवासातील प्रत्येक घटना अशी डोळ्यांसमोर होती. महाराष्ट्रातच्या 45 वर्षांतील सर्व राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक घटना तर माझ्या डोळ्यांसमोरच्याच आहेत. विधानसभेतील पत्रकार गॅलरीत मुंबई आणि नागपूर अशा दोन्ही ठिकाणी, सलग 30 वर्षे बसलेला, मी एकमेव पत्रकार आहे. दिल्ली लोकसभा पत्रकार कक्षातही 2 वर्षे सलग बसलो. देशातली सगळ्या राजकीय पक्षांची राष्ट्रीय अधिवेशने, सगळ्या पक्षांचे दिग्गज नेते, त्या नेत्यांच्या मुलाखती, अनेक दिग्गज नेत्यांच्या महा अंत्ययात्रा, या सगळ्यांमध्ये आयुष्याच्या शेवटच्या ओव्हर्स कधी जवळ आल्या, हे लक्षातसुद्धा आले नाही. वारा खात, गारा खात, बाभूळ झाड, घट्ट पाठीने ताठ उभे राहावे, असा 45 वर्षे या पत्रव्यवसायात सगळी शक्ती पणाला लावून काम करत गेलो.
आयुष्याची 66 वर्षे पूर्ण झाल्यावर मागे वळून पाहिले तर, भरतीचे पाणी निघून गेले होते. काहीसे भकासही वाटत होते, काहीसे उदासही वाटत होते. ‘प्रज्ञा’ हे छोटे साप्ताहिक सुरू करून माझ्यातला पत्रकार जिवंत ठेवण्यासाठी त्यानंतरही लिहीत राहिलो आहेे. पण, पुस्तक लिहिणे काही होत नव्हते आणि एक दिवस बेळगावच्या वाचनालयाचे पत्र आले.
बेळगावमधील प्रख्यात मराठी सार्वजनिक वाचनालयाने आचार्य अत्रे यांच्या जन्मदिनी वाचनालयातर्फे 2005 सालापासून ‘आचार्य अत्रे पुरस्कार’ जाहीर केला. पहिला पुरस्कार ‘पानिपत’ आणि ‘संभाजी’ कादंबर्यांचे लेखक श्री. विश्वास पाटील यांना द्यायचे बेळगावच्या वाचनालयाने ठरविले. तो पुरस्कार माझ्या हस्ते द्यावा, असे बेळगाव वाचनालयाचे अध्यक्ष अॅड. तातेरी यांनी मला पत्र पाठवून सुचविले होते. माझा हा मोठा गौरव होता. 13 ऑगस्ट रोजी सकाळी डेक्कन एअरच्या विमानाने मी आणि माझी पत्नी मंगला बेळगावला जायला निघालो. त्याच विमानात पुरस्कार विजेते श्री. विश्वास पाटील होते. विमानात आम्ही जवळच बसलो होतो. बेळगाव येईपर्यंत एकच विषय होता — ‘आचार्य अत्रे.’ विमानाची चाके बेळगावच्या विमान तळावर टेकेपर्यंत मी त्यांना ‘आचार्य अत्रे’ सांगत राहिलो. श्री. विश्वास पाटील ऐकत राहिले. विमानातून उतरल्यावर त्यांनी मला म्हटले की, “मी तुमचे सर्व ऐकले, आता मला एक शब्द द्या. 13 ऑगस्ट, 2006 च्या आत, तुम्ही आता मला जे सांगितले; ते जसेच्या तसे लिहून पुस्तकरूपाने महाराष्ट्राच्या हातात देईन. अहो, तुम्ही जे सांगितले, ते महाराष्ट्राचे फार मोठे धन आहे...”?
मला काय वाटले, कुणास ठाऊक... मी मंगलाच्या साक्षीने विश्वास पाटील यांना शब्द दिला... “लिहीन. 13 ऑगस्ट, 2006 कशाला? बेळगावहून परत गेलो की, 8 दिवसांत तुम्हांला पुस्तक हातात देतो...”
बेळगावहून आलो मात्र; आणि चौथ्याच दिवशी पुस्तक ‘सांगायला’ बसलो. 4 दिवसांत हे पुस्तक तयार झाले आहे. हातात कोणताही संदर्भ नसताना, जेवढे आठवले तेवढे सांगितले. हे पुस्तक वाचताना ज्या अत्युत्कट भावना निर्माण होतील, त्याचे श्रेय आचार्य अत्रे यांचे आहे. जे खटकेल, चुकले आहे असे वाटेल, ते माझे आहे. ‘बे दुणेे चार’ जमले नसले तरी ‘बे निम्मे एक’ इथपर्यंत जमवण्याचा प्रयत्न केला आहे. श्रीमती शिरीषताई यांनी एका दमात पुस्तक वाचले आणि सद्गदित होऊन त्या मला म्हणाल्या की, ‘इतके छान झाले आहे...’ त्यांच्या या आशीर्वादाने हत्तीचे बळ मिळाले. त्यांनी अर्ध्या तासात प्रस्तावना लिहिली. मूळ पुस्तकापेक्षा प्रस्तावना अधिक प्रभावी ठरावी, तशीच शिरीषताईंची प्रस्तावना आहे. माझ्यावरील प्रेमापोटीच त्यांनी इतक्या मोकळेपणाने माझे कौतुक केले. त्यात त्यांच्या विशाल मनाचाच अधिक प्रत्यय येतो. आज त्या 77 वर्षांच्या आहेत. 75 वर्षे पूर्ण झाली म्हणजे आयुष्य काटे नसलेल्या गुलाबासारखे असले पाहिजे, अशी भावना त्यांनी ‘प्रज्ञा’तर्फे सत्कार झाला तेव्हा व्यक्त केली होती. त्या गुलाबाच्या मुक्त सुगंधासारखेच त्यांच्या प्रस्तावनेतील शब्द मला खूप मोठी शक्ती देऊन गेले आहेत.
श्री. विश्वास पाटील यांनी पुरस्कार लिहिण्याचे मान्य केले आणि चांगला पुरस्कार लिहिला. त्यांच्या आग्रहामुळेच हे पुस्तक लिहून पूर्ण झाले. त्यांचाही मी मन:पूर्वक आभारी आहे. पुस्तक कसे आहे ते वाचकांनीच ठरवायचे आहे. या पुस्तकासोबतच ‘पुष्पांजली’ हे आगळेवेगळे पुस्तक तयार झाले आहे. त्याचप्रमाणे ‘यशवंतराव ते विलासराव’ (महाराष्ट्राची 45 वर्षे) हे पुस्तक वाचकांच्या हाती लवकरच देत आहे.
आचार्य अत्रे यांच्यावरील हे पुस्तक, माझे पहिलेच पुस्तक आहे. त्याचा आनंद वेगळाच आहे. पुस्तकाचे कच्चे टाचण तयार झाल्यावर माझी पत्नी मंगला हिने ते टाचण प्रथम वाचले आणि त्यातला काही भाग दुरुस्त करण्याच्या सूचना केल्या. त्यामुळे या पुस्तकाला अधिक निटनेटके होण्यास घरातूनही मोठा हातभार लागला.
एकही संदर्भ हातात न घेता हे पुस्तक मी लिहू शकलो; हासुद्धा आचार्य अत्रे यांंच्या कृपाप्रसादाचाच भाग आहे. माझ्या कार्यालयातील सहकारी श्री. दत्ता जाधव, रघुनाथ मस्के, मनोज मस्के, मुद्रितशोधक सनतकुमार सिद्धेश्वर, राजेश चव्हाण या सगळ्या मित्रांनी पुस्तक तयार होण्याकरिता मनापासून मदत केली. ‘परचुरे प्रकाशन’चे श्री. अप्पा परचुरे यांनी कोणतीही खळखळ न करता हे पुस्तक लगेच स्वीकारले. आचार्य अत्रे आणि ग. पां. परचुरे यांचा स्नेह विलक्षण होता. आचार्य अत्रे यांच्या नवरत्न दरबारात जी मोठी माणसे होती; त्यांत अनंत काणेकर होते, दत्तो वामन पोतदार होते, वसंत देसाई होते, त्यातच ग. पां. परचुरे हेही होते. आचार्य अत्रे आणि वि. दा. सावरकर या दोन महान लेखकांचे सर्व महान साहित्य परचुरे प्रकाशनच्या शिरपेचातील मोत्याचे तुरे आहेत. आपल्या प्रकाशन संस्थेला ‘मंदिर’ समजून निष्ठेने प्रकाशन व्यवसाय करणारे श्री. ग. पां. परचुरे (दादा) ‘मराठा’ कार्यालयात आले की त्यांची भेट व्हायची, तेव्हा एका तेजस्वी पुरुषाचे दर्शन झाल्यासारखे वाटायचे. त्यांच्या चेहर्याचे तेज त्यांच्या प्रकाशन व्यवसायात उतरले. त्यांचे चिरंजीव अप्पा आणि त्यांचा नातू नरेन यांनी त्याच निष्ठेने ‘परचुरे प्रकाशन मंदिर’ ही संस्था अधिक मोठी केली.
ज्या मराठी जनतेने संयुक्त महाराष्ट्रासाठी प्रचंड लढा दिला, ज्या आचार्य अत्रे यांनी महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी सगळी शक्ती पणाला लावली, तो संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाल्यावर आज कुठे चालला आहे? ज्या शेतकर्याने आणि कामगाराने हा लढा लढवला, ते आज किती भीषण अवस्थेत आहेत? महाराष्ट्र होता कुठे आणि चालला कुठे? एवढाच प्रश्न आज या 40 वर्षांकडे पाठ फिरवून पाहिल्यानंतर मनात तीव्रपणे येत आहे. हा लढा लढवणार्या मुंबई महाराष्ट्रातील तमाम कामगार आणि शेतकर्यांनी आणि मराठी जनतेलाच हे पहिले पुस्तक ‘मनोभावे’ अर्पण करीत आहे.
शिवजयंती/ दि. 19 फेब्रुवारी, 2006
Comments
Post a Comment