आईवडीलांनी रोजगार करून पोराला आणि आजीने भाजी विकुन नातवाला शिकवले
शिराळाः- मनोजकुमार मस्के 9890291065
लोकांची घरे उभा करत असताना आपले छप्पर मात्र उघडे राहिले. दगडावर दगड रचत बांधलेल्या भिंती माझ्या बापाप्रमाणेच मजबुत होत्या. उन वारा पाऊस याचा सामना करत माझा बाप अनेकांची घरे उभा करत होता. मिळेल ते पोटालाच लागत होते. घरची परिस्थिती हालाकीची आई दुसर्याच्या शेतावर रोजंदारी करी आणि त्या पैशावर आमचं कुटूंब चाले. असे उदगार सध्याचे उपशिक्षण अधिकारी आणि नुकतीच डी.वाय.एस.पी पदाची परीक्षा उत्तीर्ण झालेले अमरसिंग मानसिंग मोहिते यांनी काढले.
नागज ता. कवठेमहंकाळ येथील मराठी शाळेत अमर यांचे 7 वी पर्यंत शिक्षण झाले. अमर मोहिते यांचे वडील गवंडी काम करत असत. आणि त्यातून मिळणार्या तुटपुंज्या रकमेवर आपला घरखर्च भागवत असत. आपल्या बापाच्या हाताचे फोड अमर बघत असे त्या फोडांच्या वेदना अमरला असाह्य हात असे. अमरला ही परिस्थिती बदलायची होती. गरीबीची जाण आणि जिद्दीने महान असणारे अमर मोहिते हे लहानपणापासून अभ्यासात हुशार होते. वडिलांचे अपार कष्ट एकीकडे चालू होते आणि दुसरीकडे अमर यांची अभ्यासातील घोडदौड. पण नियातीला हे मान्य नव्हते. अत्यंत हलाकीची परिस्थिती असल्याने अमर मोहिते हे आपल्या आजीकडे म्हणजे आजोळी आले.
शिराळा तालुक्यातील मांगरूळ हे अमर मोहिते यांचे आजोळ. अमर यांची आजी इंदुताई महादेव पवार ही भाजीपाला विकते. आजोबा गवंडी काम करतात त्यामुळे कसंबसं त्यांचं घर चालत होते. अमर आपल्या आजीकडे पुढील शिक्षणासाठी आला. 8 वी ते 10 वी त्यांने बिळाशी येथील वारणाप्रसाद विद्यालयात शिक्षण घेतले. लहानपणापासूनच अमर हे हुशार, शांत, संयमी असल्याने त्यांनी 10 नंतर पुढील शिक्षण आष्टा येथे घेतले.
त्यांनी कोणताही क्लास न लावता स्पर्धा परीक्षा तयारी सुरू केली. दररोज 14 तास अभ्यास केला आणि पहिल्याच प्रयत्नात 2018 ला त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत परिक्षा पास होऊन उपशिक्षण अधिकारी म्हणून काम पाहिले. उपशिक्षण अधिकारी पदाचे प्रशिक्षण चालु असतानाच त्याने पुन्हा 2019 ला महाराष्ट्र लोकसेवा परिक्षा दिली. अजून मोठ्या पदावर आपणाला काम करायचे आहे ही मनाशी जिद्द बाळगून त्यांनी या वर्षी 2019 मध्ये पुन्हा परिक्षा पास करून डी. वाय. एस.पी. परिक्षा पास होऊन आपले मुळ गाव व आजोळचे नाव मोठे केले. आईवडीलांचा विश्वास आणि आजीची माया अमरने अमर केली.
अमरला प्रेरणादायी ठरले ते मांगरूळचे नालंदा अभ्यास केंद्र या आभ्यासकेंद्राची निर्मीती ही डी.वाय.एस.पी दिपक कांबळे सरांनी केली. दिपक कांबळे हे सध्या सिंधुदुर्गला कार्यरत आहेत. गावातील मुलांनी एकत्र येऊन अभ्यास करावा त्यांना योग्य वळन लागावे या हेतुने त्यांनी ही अभ्यासिका केली. या अभ्यासिकेचा व दिपक कांबळे सरांचा अमरला मोठा फायदा झाला. अमरची परिस्थिती पुस्तक विकत घेऊन अभ्यास करण्याची नव्हती त्यामुळे या अभ्यासकेंद्राचा त्याला मोेठा फायदा झाला.
अमर मोहिते यांनी मोठ्या शाळेत प्रवेश मिळाला तरच प्रगती साधता येते हे वाक्यच जणू खोडून काढले. बुद्धी ही विकत घेता येत नसते ती डोक्यातच असावी लागते. हे अमरने सिद्ध केले. गरीब आईवडिलांच्या पोटी जन्म घेऊन पुन्हा एकदा या जगासमोर दाखवून दिले की गरिबीचे चटके खाल्याशिवाय ध्येय गाठता येत नाही. येणार्या पिढीपुढे अमर मोहिते हा एक आदर्श ठरला आहे.
आईवडीलांनी रोजगार करून पोराला आणि आजीने भाजी विकुन नातवाला शिकवले याचे कौतुक सगळीकडेच होत आहे. यश मिळाले की अनेकजन पुढे येतात पण या यशाच्या मागे अनेक हात लागले ते अमर कधीही विसरला नाही. परिक्षा पास झाल्यानंतर अमरने प्रत्येकाचे आभार मानले. आणि येवढे मोठे यश मिळवुन पाय मात्र जमीनीवरच ठेवले.
मस्त
ReplyDelete