लक्ष्मी आनंदा कुंभार भावपूर्ण श्रद्धांजली....
*कुंभारवाड्यावरची मायेची सावली हरपली*… *मनोजकुमार मस्के, मांगरूळ* आज सकाळी जशीच बातमी कानावर आली, तसं मन एकदम सुन्न झालं. “कुंभाराची नानी राहिली नाही…” हे शब्द ऐकून अंगावर अक्षरशः काटा आला. पाय जणू थबकले. दुकानावर जाण्याचा विचार तिथेच थांबला. मनाला पटत नव्हतं, म्हणून फोन लावला… पण बातमी खरीच होती. आणि त्या क्षणी जाणवलं — *कुंभारवाड्याचा आधारवड कोसळला*… नानी म्हणजे फक्त एक व्यक्ती नव्हती, ती एक भावना होती… मायेचा ओलावा होता… कष्टाचं जिवंत उदाहरण होती. आयुष्यभर काबाडकष्ट करत तिनं संसाराचा गाडा ओढला. कितीही थकली असली तरी “काम” हा तिचा श्वासच होता. हात कधीच थांबले नाहीत. अंगात ताकद उरली नसली तरी मनानं ती नेहमीच खंबीर उभी राहिली. कुंभारवाड्यावर गेलं की नानी दिसायचीच — कधी भाकरी थापताना, कधी गुरं सांभाळताना, तर कधी कुणाच्या तरी मदतीला धावून जाताना. तिच्या चेहऱ्यावरचा साधेपणा आणि डोळ्यातली माया… ते दृश्य आजही डोळ्यासमोर उभं राहतंय. *“बाळा…”* हा तिचा शब्द अजूनही कानात घुमतोय. कोण आपलं, कोण परकं — हा भेद तिनं कधीच केला नाही. गावातलं प्रत्येक मूल तिच्यासाठी “बाळा”च होतं. आ...