स्पर्धात्मक कुस्ती काळाची गरज... गावोगावी होणारी मैदाने खेळाडुंसाठी घातक...
स्पर्धात्मक कुस्ती काळाची गरज... गावोगावी होणारी मैदाने खेळाडुंसाठी घातक...
*मनोजकुमार मस्के, मांगरूळ* 9890291065
कुस्ती ही प्राचीन काळापासून चालत आलेली असल्याने कुस्तीला फार मोठं महत्त्व महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात दिले जाते. हा खेळ तसा ताकतीचा आणि डाव प्रतिडाव करण्याचा आहे. तसं पाहिलं तर सर्वच देश हे कुस्तीमध्ये अग्रेसर असल्याचे पाहायला मिळते. परंतु महाराष्ट्राची कुस्ती आणि त्यातल्या त्यात कोल्हापूरची कुस्ती ही जगभर प्रसिद्ध असल्याने महाराष्ट्रातल्या कोल्हापूरला आणि कोल्हापुरातल्या पैलवानाला एक वेगळा दर्जा दिला जातो. एकेकाळी संपूर्ण जगभरातील पैलवान सुद्धा कोल्हापूरच्या आखाड्यात खेळण्यासाठी अतुरलेले होते. ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. आज मात्र या कोल्हापूरची कुस्ती पुण्याकडे सरसवली आणि तांबड्या मातीचा रंग हळूहळू फिका पडू लागला. महाराष्ट्राचा पैलवान हा महाराष्ट्र केसरीतच अडकला. आज ऑलिंपिकचं स्वप्न बघणारा पैलवान सुद्धा कुस्तीचे मैदानी खेळू लागला. देशासाठी मिडल आणणार असं ठामपणे न्यूज चॅनेल च्या समोर सांगणारा महाराष्ट्र केसरी पैलवान आज लाखो रुपयेच्या कुस्त्या मैदानावर घेऊ लागला. मैदानावर खेळणाऱ्या पैलवानाला कालांतराने लोक विसरतात परंतु देशासाठी मिडल मिळवणाऱ्या पैलवानाला हा देश अस्तीत्वात असेपर्यंत विसरू शकत नाहीत. हा आहे कुस्ती मैदान आणि कुस्ती स्पर्धा यातील फरक. अलीकडे महाराष्ट्रातील कुस्ती ही स्थानिक मैदानाच्या बाहेर जाताना फारसं पाहायला मिळत नाही. लाखो रुपयांचा चुराडा हा मैदानात होतोच परंतु अनेक पैलवानांच्या करिअरचा सुद्धा चुराडा याच मैदानात होतो याचं भान कुठेतरी ठेवणं गरजेचं आहे. आज भारत सरकार कोट्यावढी रुपये ऑलम्पिक लेव्हलचे खेळाडू घडवण्यासाठी खर्च करते. परंतु हा निधी खरंच देशातील स्पर्धक घडवण्यासाठी खर्च होतो का हे पाहणे गरजेचे आहे. तसं पाहिलं तर यावर्षी एकूण 117 खेळाडू ऑलिंपिक साठी पात्र झाले आहेत परंतु यामध्ये कुस्तीतील किती याचा विचार करणे खरच गरजेचे आहे. खेलो इंडिया च्या माध्यमातून अनेक राज्यात खर्च केलेला निधी आणि त्या राज्यातून ऑलिंपिक साठी पात्र झालेले अनेक खेळाडू पाहिलं तर यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचे दिसून येते.
ऑलम्पिक साठी भारतातून तब्बल 117 खेळाडू गेले होते. त्यातले 2 खेळाडू गुजरातचे होते. 24 हरियाणाचे होते, तर 18 पंजाबचे होते. खेलो इंडिया चा फंड जो होता तो एकून 3000 74 कोटी ऐवढा त्यातले गुजरातला मिळाले 606 कोटी एकूण फंडाचे 20% तर हरियाणाला मिळाले 96 कोटी केवळ 3% एकूण हरियाणाचे 24 खेळाडू ऑलिंपिक साठी पात्र झालेले आहेत. पंजाबला 106 कोटी मिळाले परंतु पंजाबचे एकूण 18 खेळाडू ऑलिंपिक साठी पात्र झाले आहेत.
हरयाणातून 24, तर पंजाबमधून 18 खेळाडूंची निवड झाली आहे. उत्तराखंडमधून 4, उत्तर प्रदेशमधून 8, राजस्थानमधून 2, मध्य प्रदेशमधून 3, बिहारमधून 1, पश्चिम बंगालमधून 3, सिक्किममधून 1, आसामधून 1, मणिपूरमधून 2, झारखंडमधून 1, ओडिशामधून 2, गुजरातमधून 2, महाराष्ट्रातून 5, तेलंगाणातून 4, आंध्र प्रदेशमधून 4, कर्नाटकमधून 7, तामिळनाडूतून 13 आणि केरळमधून 5 जण आहेत. शेवटी कोणत्या राज्याला किती फंड मिळाला हा एक संशोधनाचा भागच आहे परंतु ज्या राज्यांना कमी फंड मिळाला त्या राज्यातून अनेक खेळाडू ऑलम्पिक साठी पात्र ठरलेत हे मात्र मानावे लागेल. महाराष्ट्रातून तिरंदाजीत प्रवीण जाधव, शूटिंगमध्ये स्वप्नील कुसले, एथलॅटिक्समध्ये अविनाश साबळे आणि सर्वेश कुशारे, तर बॅडमिंटनमध्ये चिराग शेट्टीची निवड झाली आहे. महाराष्ट्रातून एकही कुस्ती खेळाडू ऑलिंपिक साठी पात्र झाला नाही हे दुर्दैव म्हणावे लागेल. खरं पाहिलं तर सर्वाधिक पैलवान हे महाराष्ट्रातच पाहायला मिळतात शिवाय कुस्ती मैदाने सुद्धा महाराष्ट्रात सर्वाधिक असल्याचे बोलले जाते. परंतु महाराष्ट्रातील पैलवान महाराष्ट्र केसरीलाच ऑलम्पिक समजून मैदानात उतरत असतो हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. याला कारणीभूत आहे गावोगावी होणारी कुस्ती मैदाने आणि या कुस्ती मैदानात भरमसाठ मिळणारा पैसा. तीन तासाच्या करमणुकीसाठी असंख्य पैशाचा चुराडा करणे आणि मैदानाव्यतिरिक्त स्पर्धेला बगल देणे एवढीच कुस्ती महाराष्ट्रात राहिली का? असा प्रश्न उभा राहतो. आज कोल्हापूर व पुण्यातील तालमीत वजन वाढवणे आणि मोठी जोड करणे या व्यतिरिक्त पैलवानांच्या, वस्तदांच्या, एवढेच काय पालकांच्याही डोक्यात फक्त पैसा असतो. कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील ने आंतराष्ट्रीय स्तरावर मिडल मिळवले त्यावेळी एका कोपऱ्यात वृत्तपत्राने बातमी छापली होती. परंतु त्याच पृथ्वीराजने जेव्हा महाराष्ट्र केसरीची गदा आणली त्यावेळी मात्र याच वृत्तपत्रांनी पानभर फोटोसह बातमी छापून प्रसिद्धी दिली. काय केलं पाहिजे आणि कोणत्या गोष्टीला प्रसिद्धी दिली पाहिजे याचं गांभीर्य सुद्धा आज वृत्तपत्र व सोशल मीडियाने ठेवणे गरजेचे आहे. महाराष्ट्राची कुस्ती वाचवायची असेल, ऑलिंपिक पर्यंत पोहोचवायची असेल. तर गावोगावी कुस्ती मैदाना व्यतिरिक्त कुस्ती स्पर्धा होणे काळाची गरज आहे.
चौकट
पॅरिस ऑलम्पिक मध्ये 6 पैलवान बाजी मारतील गेल्या ऑलिम्पिकपासून कुस्ती महासंघात गोंधळ सुरू असतानाही भारतातील 6 कुस्तीपटूंनी खेळ महाकुंभात स्थान मिळवले. विनेश फोगट, अंतिम पंघाल, अंशू मलिक, यांच्यासह आणखी 2 महिला कुस्तीपटू रीतिका हुडा आणि निशा दहिया पात्र ठरल्या. पुरुष गटात अमन सेहरावत हा एकमेव उमेदवार आणि पदकाचा दावेदार आहे.
Comments
Post a Comment