‘मागे वळून पाहताना’- मधुकर भावे

‘मागे वळून पाहताना’
- मधुकर भावे
आज २७ एप्रिल.
बरोबर दोन महिन्यांपूर्वी म्हणजे २७ फेब्रुवारीला याच जागेवर लेख होता... ‘तात्या तुम्हाला वंदन करून’... २८ फेब्रुवारीला ‘मराठी भाषा दिन’ होता. त्या संदर्भात त्या लेखात विश्लेषण होते. गेले दोन महिने या जागेवरून काही लिहिले नाही. अनेक वाचक मित्रांनी गेल्या महिन्याभरात चौकशी केली.... ‘लेख का येत नाहीत...’, ‘तब्बेत ठीक आहे ना?’... एका मित्राचा तर फोन आला... त्याने चक्क विचारले, ‘काही दबाव आहे का?’... या सर्व वाचकांचा मनापासून आभारी आहे. आपली कोणीतरी वाट पहात आहे, याचा तरुण वयात एक आनंद असतो, असे म्हणतात. 'आपल्या लेखाची  वाचक वाट पहात आहे,' याचा आनंद त्याहीपेक्षा अधिक मोठा आहे. त्या सर्व वाचकांचा मी आभारी आहे. 
गेले दोन महिने एका वेगळ्या कामात स्वत:ला गाडूनच घेतले होते. १ मार्चला पहाटे अवचित जाग आली... आणि पहाटे डोळ्यांसमोर विषय आला की, ‘येणाऱ्या १ मे २०२४ रोजी महाराष्ट्र राज्य निर्मितीला ६४ वर्षे पूर्ण होतील. आणि महाराष्ट्र राज्य ६५ व्या वर्षात पाऊल ठेवील. त्याचवेळी हेही जाणवले की, माझ्या छोट्याशा पत्रकारितेलासुद्धा याचवर्षी ६५ वर्षे पूर्ण झाली आहेत. पहाटे गॅलरित बसलो असताना ती ६५ वर्षे अशी डोळ्यांसमोरून गेली. तो काळ, कोकण कृषीवलला बातम्या पाठवण्याची ती सुरुवात होती.... रोहा-पोयनाड खेपा होत होत्या..... त्याचवेळी सुरू असलेली संयुक्त महाराष्ट्राची चळवळ... त्याचवेळी मराठामध्ये वार्ताहर म्हणून प्रवेश... संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीने पेटलेली मराठी मने... त्या सभा.. ते मोर्चे, त्या घोषणा, ते सत्याग्रह... ते गोळीबार... हायस्कूलमधील विद्यार्थी दशेत ते वाचले होते. पुढच्या वर्षांत (१९५९) प्रत्यक्षात ती चळवळ पाहात होतो. वातावरण पहात होतो. आणि ‘मराठा’मध्ये काम करण्याची संधी मिळाली. आचार्य अत्रे यांचा परीसस्पर्श मिळाला. सगळंच काही स्वप्नवत घडले. मराठा’मधील १४ वर्षे.... त्यात दहा वर्षे साक्षात अत्रेसाहेबांचा सहवास, त्यांच्यासोबतचा प्रवास, तयांच्या लाखोंच्या सभांचे वार्तांकन करण्याची संधी... मुंबई-नागपूर येथील विधानसभा अधिवेशनाचे वृत्तसंकलन करण्याची संधी. राजकारण, समाजकारण, साहित्य, संगीत, क्रीडा अशा सगळ्यां क्षेत्रांतील दिग्गज म्हणजे कमालीच्या दिग्गज... नेते, कार्यकर्ते, कलावंत, अशा मोठ्यातील मोठ्या लोकांच्या भेटी होतील, हे कधी स्वप्नातही वाटले नव्हते. नंतरचा लोकमतमधील ३४ वर्षांचा मोठा कालखंड... नंतर ‘एकमत’, ‘रामप्रहर’,  ‘प्रहार’.... १९५९ ते २०१६ आणि नंतरची आठ वर्षे मुक्त पत्रकारिता... किती सभा संकलन केल्या त्याचा हिशेब नाही... किती कॉलम लिहिले त्याची मोजदाद नाही. किती लेख लिहिले त्याची िगणती नाही. किती अग्रलेख लिहिले तेही माहिती नाही. जशी संधी मिळाली त्या-त्या वेळी लिहित गेलो... वाचक वाचत गेले... काहींना आवडले... काहींना आवडले नाही. जसे जमले तसे लिहित गेलो. पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र आणि यशवंतराव चव्हाणसाहेब यांच्यापासून पुरोगामी महाराष्ट्र आणि त्याची झालेली बांधणी पाहात होतो.... या सर्व ६५ वर्षांच्या असंख्य घटना, प्रसंग, आठवणी गॅलरित बसल्या बसल्या डोळ्यांसमोरून सरकत होत्या. किती आठवले आणि का आठवले तेही आता विसरून गेलो. किती मोर्चे, किती सभा.... मनात येऊन गेले की, हे सगळे कागदावर का उतरू नये. पहाटे ३ वाजता गॅलरित बसलो होतो. बघता-बघता सकाळ कधी झाली कळली नाही. जग निर्माण होऊन किती वर्षे झाली. लाखो... पण रोजची सकाळ कशी ताजी वाटते. मग मनात विचार आला की, जर रोजची सकाळ ताजी वाटते, पारोशी वाटत नाही. तर ६५ वर्षांत जेवढे काही आठवले आहे तेही ताजेपणाने लिहिता येईल का? आणि ठरवले की, ‘लिहायचे.... जसे जमेल तसे सांगायचे...’ अर्थात हे आत्मचरित्र नव्हे... आत्मकथनही नव्हे... तेवढा मोठा मी नाही. हे ६५ वर्षांतील निखळ ‘निवेदन’ आहे. त्यात साहित्यिक मूल्ये किती, पत्रकारितेचे मूल्य किती? किंवा कोणतेही मोजमाप न लावता, आठवले तेवढे सांगून टाकायचे... वाचकांना आवडो.... न आवडो... स्वत:च्या समाधानासाठी का होईना... पण, ‘मागे वळून पहायचे’...
६५ वर्षे कशी गेली ते समजायच्या आतच सकाळ झाली. घाई-घाईनेच कार्यालयात पोहोचलो. माझा सहकारी संदीपला कल्पना दिली. मी सांगतो आणि तोच डिक्टेशन घेतो. वाचकांपर्यंत जे जाते ते शब्द माझे डिक्टेशन घेणारा सहाकारी संदीप. त्यानेही म्हटले ‘सर, नक्की छान होईल...’ पुस्तक होण्यापूर्वीच शेरा मिळाला... आणि गेल्या ४० दिवसांत ही २८० पाने ‘मागे वळून पाहताना’ लिहिली गेली आहेत. त्यात असंख्य प्रसंग, घटना, व्यक्ती, गंमती-जमती, जसे घडले.... आठवते गेले तसे सांगत गेलो... नकळत महाराष्ट्राची बांधणी कशी झाली, हा विषय आला. ते ते प्रसंग माझ्या परिने मी उभे केले आहेत. वाचकांना किती आवडेल माहिती नाही. शिवाय ६५ वर्षांतील असंख्य घटना... विषय, मर्यादित पानांत बसवायचे हे नियोजनच कठीण होते. काय सांगायचे आणि काय वगळायचे... हा निर्णय कठीण होता. पण एक आधार होता... दिल्लीच्या लाल किल्ल्यात ‘साऊंड अॅण्ड म्यूझिक’ असा एक कार्यक्रम रोज संध्याकाळी असतो. ४०० वर्षांचा या देशाचा इितहास अतिशय नेमकेपणाने एक तासात दाखवला जातो. जर ४०० वर्षे ६० मिनीटांत बसवता येत असतील, तर ६५ वर्षे २८० पानांत बसवता येतील, या विश्वासाने सुरुवात केली. हळूहळू जमत गेले. क्रमवार घटना, प्रसंग, व्यक्ती सांगत गेलो आणि त्यातूनच हे पुस्तक तयार झाले आहे... ते कसे झाले हे वाचक ठरवतील... पण, कसेही झाले तरी जे लिहिले गेले ते फक्त आणि फक्त माझ्या समाधानाकरिता आहे. ज्यांना आवडेल त्यांचा ऋणी आहे. ज्यांना आवडणार नाही, त्यांच्याबद्दल तक्रार नाही. पण, ६५ वर्षे उभी करण्याचा हा प्रयत्न ‘बे दुणे चार’जमला नसला तरी, ‘बे निम्मे एक’ जमवण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात पहिली ७५ पाने ‘मराठा’च्या कालखंडातील आहेत. नंतरची ६०-७० पाने ‘लोकमत’ची आहेत. आणि नंतरच्या वृत्तपत्रांची आहेत. याशिवाय २००० ते २०२४ या २४ वर्षांत माझ्या हातून जे काही लेखन झाले, त्या पुस्तकांबाबत चर्चाही यात आहे आणि काही ‘साठवणीच्या माठात’ ठेवलेले किस्सेही  नवीन पिढीला समजावेत म्हणून रांजणातून बाहेर काढले आहेत.  मुंबईतील ‘मराठा’मधील पत्रकारिता, जळगाव, दिल्ली, नागपूर येथील ‘लोकमत’मधील पत्रकारिता. त्या काळातच महाराष्ट्रात घडलेल्या भीषण घटना... महाराष्ट्रावरील संकटे, पानशेतचे फुटलेले धरण(११ जुलै १९६१), कोयनेचा भूकंप (११ डिसेंबर १९६७), किल्लारीचा भूकंप (३० सपटेंबर १९९३), मुंबई-महाराष्ट्र पाण्याखाली (२६ जुलै २००५), मुंबईवरील दहशतवादी हल्ला (२६ नोव्हेंबर २००८) अशा संकटात मुंबई-महाराष्ट्रातील जनता किती खंबीरपणे उभी राहिली... त्यावेळचे प्रशासन, त्यावेळचे नेते.. यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्षातील १०० भाषणे असे असंख्य विषयांचा जमा-खर्च मांडला गेलेला आहे. 
‘साठवण’ या सदराखाली लिहिलेले जवळजवळ २५-३० किस्से... त्यात चिंतनही आहे... गंमतीही आहेत आणि व्यक्तिमत्त्वांची उंची किती होती, याचेही दिग्दर्शन आहे.  निवडणुकांचा हंगाम सध्या चालू आहे.  घृणास्पद स्पर्धा आहे. निकोप राजकारण संपलेले आहे. राजकारणात  दोन बाजू असतात... पण शत्रूत्त्वाची भूमिका न घेता राजकारण किती समजूतदारपणे आणि सुसंस्कृपणे करता येते, याचेही काही किस्से आहेत.  एकच उदाहरण सांगतो.. 
आता लोकसभेची निवडणूक चालू आहे. दोन टप्प्यांतील मतदान झाले. तीन टप्पे अजून बाकी आहेत. १९६२ साली अहमदनगर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार स्व. आण्णासाहेब शिंदे होते. त्यांना पंडित नेहरूंनी थेट उमेदवारी दिली होती. पुढे ते १२ वर्षे नेहरू आणि इंिदराजींच्या मंत्रिमंडळात कृषी मंत्री होते. १९६२ च्या निवडणुकीत त्यांच्या विरोधात विरोधी पक्षाचे म्हणून रिपब्लिकन पक्षाने अॅड. दादासाहेब रुपवते यांना उभे केले होते. दोन्हीही नेते अत्यंत सुसंस्कृत... एकाच जिल्ह्यातील आण्णासाहेबांनी दादासाहेब रूपवते यांना सांगून ठेवले की, ‘तुमची जेव्हा माझ्या श्रीरामपूर गावात सभा असेल तेव्हा सभेनंतर दुपारचे किंवा रात्रीचे जेवण माझ्या घरी...’ आणि एका दुपारी दादासाहेब रुपवते यांची श्रीरामपुरात सभा झाली. सभा झाल्यावर दादासाहेब आण्णासाहेबांच्या घरी जेवायला गेले. चांगले तास-दीड तास गप्पा मारत बसले. जेवण झाल्यावर निघाले तेव्हा हसत-हसत म्हणाले की, ‘तुम्हाला पराभूत करण्याकरिता पुढच्या सभेकरिता निघतो...’ आण्णासाहेबांनीही शुभेच्छा दिल्या. निवडणूक झाली. आण्णासाहेब शिंदे लोकसभेसाठी निवडून आले. त्यांना पहिला हार घालायला दादासाहेब रूपवते त्यांच्या घरी गेले होते. 
असे नेते... असे राजकारण आणि असा सुसंस्कृत चारित्र्याचा महाराष्ट्र आज कुठे सापडणार आहे. म्हणून ‘मागे वळून पाहताना’ जमला तसा वेध घेतला आहे. 
आचार्य अत्रेसाहेब यांच्यासोबतची १० वर्षे आणि लोकमतमधील आमच्या बाबूजींसोबतची २२ वर्षे... खूप काही शिकता आले. प्रत्येकजण आयुष्यभर विद्यार्थी असतो. मी आज ८५ व्या वर्षीही विद्यार्थीच आहे. पण, मराठा आणि लोकमतमधील जवळपास ५० वर्षांचा काळ विद्यापीठासारखा होता.  याच काळात खूप काही वाचता आले... खूप काही लिहिता आले... खूप काही बोलता आले... बघता-बघता ३० पुस्तके झाली. किती हजार लेख-अग्रलेख प्रसिद्ध झाले ते माहिती नाही... महाराष्ट्रात किमान ५०० कार्यक्रमांना वक्ता म्हणून उपस्थित राहिलो आहे. 
१९५९ साली ‘मराठा’साठी रोह्याहून निघालो तेव्हा माझ्या आईने मला एक कंदिल दिला होता. तिने तिथपर्यंत मुंबई पाहिली नव्हती. मला म्हणाली होती, ‘बाळा, कंदिल असू दे... काळोखात उपयोगी पडेल...’ तो कंदिल मी २४ वर्षे मी माझ्या कार्यालयात ठेवला होता.  नंतर तो मुंबईच्या हवेने गंजला. गेल्या ६५ वर्षांची वाटचाल त्याच कंदिलाच्या प्रकाशात चालू आहे, असे मी मानतो. म्हणून पुस्तकाच्या मुखपृष्ठावर तेच चित्र टाकले आहे. आणि आयुष्यातील एका छोट्याशा अपघाताने असा क्षण आला होता.... ‘आता मी जगणार नाही,’ असे वाटत होते.... त्या क्षणाला जोधपूरचे विख्यात अॅस्टोपॅथ धन्वंतरी डॉ. गोवर्धनलाल पाराशर यांच्या दोन अंगठ्यांनी मला नवजीवन दिले आणि आयुष्यात एक नवी दृष्टी दिली. त्यामुळे या पुस्तकात त्यांना सुरुवातीला ‘अभिवादन’ करून मग ‘वाचकार्पण’ केले आहे.  सामान्य रुग्णांसाठी गेल्या चार वर्षांत जे काही करता आले त्याचे समाधान कोणत्याही तागडीत तोलता येणार नाही. ‘मागे वळून पाहताना’ हे सगळे आठवले तेवढे लिहिले. आणि गोष्टी राहून गेल्या असतील... अनेक विषय राहिले... अनेक व्यक्ती राहिल्या... पुन्हा कधी खूप पहाटे उठून गॅलरित बसल्यानंतर... 
सध्या तरी एवढेच... 
टीप : पुस्तकाचे प्रकाशन महाराष्ट्र दिनाच्या ६४ व्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला मुंबई मराठी पत्रकार संघात संध्याकाळी ५.३० वाजता पत्रकारसंघ, डिम्पल प्रकाशन आणि मनीषा प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केले आहे. डॉ. सदानंद मोरे, पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, बाळासाहेब अनास्कर, अशोक हांडे आदींची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाभलेली आहे. याशिवाय पुस्तकाचे प्रकाशन व्यासपीठावरील पाहुणे करणार नसून, पाच वाचकांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे.  आणि ज्या वृत्तपत्रांत मी काम केले त्या चारही वृत्तपत्रांच्या प्रतिनिधींचा ‘कृतज्ञता सत्कार’ आयोजित केला आहे. ते सर्व माझ्या मनाच्या समाधानासाठी. आयुष्यात नेहमी कृतज्ञा असावे म्हणून. 📞9869239977

Comments

Popular posts from this blog

*अनाथ मुलांचे स्वीकारले स्वामी धामने पालकत्व*

संजय गणपती पाटील उर्फ संजू दादा भावपूर्ण श्रद्धांजली

*रात्री माझं गाव विकताना पाहिलं*