*नवसाला पावणारा हाकेला धावणारा चिंचेश्वर यात्रा मांगरूळ*

*नवसाला पावणारा हाकेला धावणारा चिंचेश्वर यात्रा मांगरूळ*
*मनोजकुमार मस्के , मांगरूळ* 

मांगरूळ , तालुका शिराळा , सांगली येथील श्री . चिंचेश्वर देवाची यात्रा दि .२० एप्रिल २०२४ रोजी सुरु होत आहे , त्यानिमीत्ताने देवस्थानाची माहिती देणारा हा लेख .
सांगली जिल्ह्यातील शिराळा तालूक्यातील मांगरुळ गावी पर्वतरांगांच्या कुशीत दाट झाडीत अगदी उंच डोंगरावर चिंचेश्वर देवाचे मंदिर निसर्ग सानिध्यात वसले असून , गावच्या लोकांनी व सर्व भक्तांनी हातभार लावून हे मंदिर गावाच्या उंच टेकडीवर बांधले आहे . मंदिराच्या समोर दिपमाळ असून , मागे वडाचे मोठे झाड आहे . पाठीमागील बाजूस चिकू , आंबा , फणस , पपई अशी अनेक झाडे आहेत . मंदिरापासून काही अंतरावर बारमाही वाहणारी वारणा नदी आहे व मंदिराजवळ जाताच गार वारा व आजूबाजूला फुललेला हिरवागार शिवार , समोरच मांगरूळ गाव अशा निसर्ग सानिध्यात हे मंदिर वसलेले आहे . मंदिराच्या गाभाऱ्यात चिंचेश्वराची मूर्ती आहे . आजही या देवाची आख्यायिका लोक मोठ्या भक्तीभावाने सांगतात . 
देवाची आख्यायिका 
श्री चिंचेश्वर देव हे मूळचे कर्नाटकचे . त्यांना शिकार करण्याची खूप आवड होती . ते शिकारीसाठी आपले सैन्य घेऊन शिकार शोधत वाकुर्डे गावाच्या डोंगरावर आले . तेथे आई जुगाईमातेची व त्यांची भेट झाली . चिंचेश्वराचं प्रेम जुगाईवर वसले व त्यांनी दसऱ्याच्या शुभमुहुर्तावर विवाह केला . श्री चिंचेश्वर तेथून परत आपल्या गावी निघाले असता , चिंचेश्वराची बहीण भागाईभक्तीन भेटली ती मुळची मांगरूळची असल्याने चिंचेश्वराला घरी येण्यास तिने आग्रह केला . चिंचेश्वराने बहिणीच्या आग्रहाला मान देऊन येण्याचे कबूल केले . परंतु देवाने एक अट घातली जोपर्यंत आम्ही घरात येत नाही तोपर्यंत तू मागे वळून पाहायचे नाहीस , बहीणीने ते कबूल केले व ती चिंचेश्वराच्या पुढे चालू लागली . खूप वेळ चालून झाल्यावर भागाईभक्तीनीला असं वाटलं की , आपला भाऊ पाठून येतो की नाही , तिने मागे वळून पाहिले , त्याचवेळी चिंचेश्वर त्याच ठिकाणी स्थायिक झाले व त्याच ठिकाणी चिंचेश्वर मंदिर उदयास आले . प्रत्येक वर्षी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर चिंचेश्वर देवाला पालखीत बसवून मांगरूळचे भक्तजण वाकुर्डेच्या डोंगरावरती घेऊन जातात. जुगाईमातेचे चिंचेश्वराबरोबर लग्न लाऊन पालखी परत गावात आणतात . देवाचा प्रमुख वार रविवार असून , या दिवशी देवळात गर्दी असते व संध्याकाळी भजन असते . तसेच चिंचेश्वर मंदिरात दररोज सकाळी ५.३० लावलेल्या भक्तीसंगीताचा आनंद संपूर्ण गावाला मोहून टाकतो . 
देवाची यात्रा 
श्री चिंचेश्वराची यात्रा यावर्षी २० एप्रिलला भरत असून , ती २१ एप्रिल रोजी संपत आहे . या यात्रेसाठी चाकरमानी लोक , माघारणी तसेच परिसरातील लोक व इचलकरंजी , तडवळे परिसरातील भाविक या यात्रेसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करतात . या यात्रेला राष्ट्रीय एकात्मता  यासाठीच म्हणावी लागेल की , सगळ्या जाती - धर्मातील लोक मिळून मिसळून काम करतात . यात्रे दिवशी गावातील प्रत्येक शेतकऱ्याच्या घरातील बैलगाडी आंबील घेऊन देवाला जातात . अशा १०० ते १५० बैलगाड्या सजवून , बँड , बँजो , लेझीम घेऊन सर्वजण देवाला जातात . या बैलगाड्यांचा कार्यक्रम सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत चालतो . त्यानंतर लोक देवाचं दर्शन घेतात . या यात्रेत विविध संस्था तसेच श्रीमंत लोक वेगवेगळया तऱ्हेने आपले नवस बोलतात . श्री स्वामी समर्थ सामाजिक संस्था मांगरुळ यांच्यातर्फे या आदीच मंदिरास ५० किलो वजनाची घंटा अर्पण केली आहे . तसेच याच संस्थेतर्फे गेली अनेक वर्षापासून विविध उपक्रम राबवले जात असतात . मंदिरामध्ये सरबत वाटप, पालखी दिवशी भंडारा, नवरात्रीत नऊ दिवस फराळ वाटप,  असे विविध कार्यक्रम स्वामी समर्थ संस्थेने चालू केलेले आहेत. चिंचेश्वर हा तडवळे व ईचलकरंजी गावचा कुळस्वामी असल्यामुळे या यात्रेसाठी तडवळे व इचलकरंजीवरून खुप भक्त मंडळी येतात . तिथेच दगडाच्या चुलीवर नैवेद्य करतात . देवाला नवस बोलतात . यादिवशी रात्री मानाच्या पालख्या निघतात , मोरेवाडी येथील पवारांची पालखी , गावातील खवरे यांची पालखी , तसेच कुंभारांची पालखी अशा पालख्या प्रत्येक पालखींना भेटतात . फटाक्यांची आतषबाजी , गुलाल खोबऱ्यांची उधळण , व चिंचेश्वराच्या नावे चांगभला अशा  गजरात ही मिरवणून पहाटे ३ वाजेपर्यंत चालते . 

यात्रा व भव्य कुस्त्यांचे मैदान 
दुसऱ्या दिवशी सकाळी २१ एप्रिल रोजी मोठी यात्रा भरते . यादिवशी लोकांचे थवेच्या थवे देवळाकडे येताना दिसतात . लोकांच्या हातात नारळ , गुलाल खोबरे , फुलांचे हार असे बरेच साहित्य पहावयास मिळते . तसेच गावातील पैलवान यादिवशी आपल्या आखाड्यात महादेवाची पिंड तसेच हनुमानाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करतात . देवळाच्या सभोवती खेळणी , मिठाई , आईस्क्रीम , सरबतवाले अशी बरेच रेलचेल असते . यादिवशी दुपारी ४ वाजता कुस्त्यांचे मैदान असते . या कुस्त्यांसाठी मुंबई , कोल्हापूर , सांगली , सातारा या ठिकाणाहून पैलवान आपली हजेरी लावतात . या कुस्त्या दोन ते तीन तास चालतात . १०० रुपये ते १००००० रू . पर्यंत या कुस्त्या लावल्या जातात . हा यात्रेचा कार्यक्रम पार पाडण्यासाठी सरपंच , उपसरपंच , सदस्य ग्रामपंचायत मांगरूळ तसेच गावातील स्थानिक मंडळे , तसेच गेली अनेक वर्ष श्री स्वामी समर्थ बहुउद्देशीय सामाजिक संस्था , अशा अनेक लहान थोर मंडळींचा यात्रेत सहभाग असतो.

Comments

Popular posts from this blog

*अनाथ मुलांचे स्वीकारले स्वामी धामने पालकत्व*

संजय गणपती पाटील उर्फ संजू दादा भावपूर्ण श्रद्धांजली

*रात्री माझं गाव विकताना पाहिलं*