*संघटनेतील खुर्ची साठी खेळाडूंचे भविष्य टांगणीवर*....?मनोजकुमार मस्के :-

*संघटनेतील खुर्ची साठी खेळाडूंचे भविष्य टांगणीवर*....?
मनोजकुमार मस्के :-
मनोजकुमार मस्के  9890291065

गेले बरेच दिवस झाले महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेत फार मोठे रणकंदन चालू असलेचे संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे. परंतु खरे पाहता यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रातील तमाम खेळाडूंचे नुकसान आहे. पदासाठी आणि शासनाचे चार पैसे कसे हडप करता येतील यासाठी या कुस्ती परिषद व कुस्ती संघ नावाचं वादळ सध्या महाराष्ट्रात गाजताना दिसत आहे.  पवारांची परिषद काहींच्या मते स्वच्छ काम करत नाही? हे जरी खरे असले तरी रामदास तडसांचा कुस्ती संघ सुद्धा उत्कृष्ट काम करेल असा विश्वास तमाम महाराष्ट्रातील पैलवानांना ठाम नाही. खरं पाहता वर्षानुवर्ष जागा अडवून ठेवणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी जागा खाली करून नवीन लोकांना संधी देणे गरजेचे असताना निव्वळ पदासाठी आणि प्रतिष्ठेसाठी खिळे ठोकल्यासारखे खुर्चीसी चिकटून बसणे हे जसे धोक्याचे आहे तसेच ब्रुजभूषन यांनी भारतीय कुस्ती महासंघाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कुस्तीक्षेत्रात लक्ष घालने हे ही धोक्याचे आहे. आज महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त करणाऱ्या ब्रुजभूषण यांनी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद अन् कुस्तीसाठी नेमकं काय केलं हा प्रश्न खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या पैलवानांना पडलेला आहे.   खरं पाहता हा मुद्दाच महाराष्ट्रसाठी महत्त्वाचा नसून महाराष्ट्रात कशी फूट पडेल हे प्रामुख्याने दिसून येत आहे.  यामध्ये खऱ्या अर्थाने नुकसान झाले ते मात्र खेळाडूंचे .
    खरं पाहता 2022 ची महाराष्ट्र केसरी झाली. यामध्ये कोल्हापूरच्या प्रृथ्वीराजने मानाची गदा मिळवली. त्याचे महाराष्ट्राने भरभरून कौतुक केले. पेपरमध्ये फोटो छापले, एवढेच काय तर महाराष्ट्र शासनाने त्याला बक्षीसही दिले. पण खरी खंत ही आहे , ज्यावेळी त्याच पृथ्वीराजने देशाला जागतीक मिडल मिळवून दिले त्यावेळी मात्र महाराष्ट्र शासनाने त्याला काहीच दिले नाही, उलट पेपरवाले, न्युजवाले यांनीही त्याचा गाजावाजा केला नाही. त्यामुळे भारतातल्या स्पर्धेपेक्षा महाराष्ट्राची स्पर्धा खेळाडूंना मोठी वाटू लागली त्याला नेमकं कारणीभूत कोण? त्याच पृथ्वीराजने आपले लक्ष महाराष्ट्र केसरी होण्याचे नसून भारतासाठी ऑलिम्पिक सुवर्ण देण्याचे आहे इतका प्रचंड विश्वास दाखवला.  हीच महाराष्ट्राची परंपरा आहे. आणी ईथं राज्य व केंद्र शासनाची खरी जबाबदारी आहे. परंतु हल्ली पृथ्वीराज ही मातीत मैदाने घेऊ लागला त्यामुळे ऑलिंपिक पर्यंत पोहोचण्याची त्याचे स्वप्न पुरे होणार का हा मात्र प्रश्न नेहमीच उत्तराच्या अपेक्षित राहिला.

        आज महाराष्ट्रातील पैलवानांच्यावर उत्तेजक द्रव्याची परिस्थिती उदभवली याला जबाबदार फक्त न फक्त महाराष्ट्र केसरी स्पर्धा आहे. आज शालेय सामान्यांपासून ते महाराष्ट्र केसरी पर्यंत याचीच लागण झाली आहे. याला कारणीभूत कोण?  हे स्वतःच्या मनाला विचारणे गरजेचे आहे. एवढंच काय तर अनेक पैलवान वय कमी करून स्पर्धेला खेळतायेत ही फार मोठी धोक्याची बाब आहे.  ज्या कुस्तीसी आज आपण गद्दारी करतोय तीच कुस्ती आपले नाव आणि प्रतिष्ठा मिळवून देणारी होती हेच आम्ही विसरून जातोय. आज तमाम पैलवानांचा प्रवास महाराष्ट्र केसरीच्या पुढे जाताना दिसत नाही कारण महाराष्ट्र केसरी ही सर्वात मोठी स्पर्धा असल्याचे या खेळाडूंना दाखवले जात आहे. इथेच तीन वेळा महाराष्ट्र केसरी झालं की मोठ्या पदाची नोकरी मिळते मग कशाला पुढची स्पर्धा खेळायची एवढेच ध्येय महाराष्ट्रातील मुलांना दाखवण्यात आले आहे. आणी शासनही डोळेझाकुन बसले आहे. 
आता तर प्रत्येक वर्षी दोन संघटनेच्या दोन महाराष्ट्र केसरी स्पर्धा होऊ लागल्या.. मग काय सगळा बट्ट्याबोळ... म्हणजे आम्हाला  वर्षाला दोन महाराष्ट्र केसरी आणि चार उपमहाराष्ट्र केसरी पाहायला मिळणार वा..ह.. खरंच हा खेळ आपण वाढवतोय का बुडवतोय हेच नेमकं कळत नाही. त्यात आता भर पडली ती महिला कुस्तीची.. बरं त्यातही आता दोन महाराष्ट्र केसरी.. कुस्ती क्षेत्रात नेमकं काय चाललंय कुणालाच कळेना. २०२३ सालात तर तब्बल सात महाराष्ट्र केसरी झाल्या..  लोकांच्या डोक्याचा भुगा- भुगा झाला.. नेमकं कोण महाराष्ट्र केसरी झालं आणि कोण उपमहाराष्ट्र केसरी झालं कळण्याचा पत्ताच नाही.. संपूर्ण स्पर्धेची हवाच निघून गेली आणि खेळाडूंचे मात्र नुकसान झालं.. राजकीय पुढाऱ्यांनी आपली हवा करून घेतली. आणि कुस्तीची मात्र हवा घालवून टाकली...
   आज विविध प्रकारचे खेळ महाराष्ट्रात आहेत किंबहुना ऑलिंपिक पर्यंत मजल मारणारे इतर खेळातील खेळाडू आहेत. परंतु महाराष्ट्र केसरी ही फक्त कुस्तीतच आहे, त्यामुळे कुस्ती महाराष्ट्राच्या बाहेर जातच नाही.  इतर कोणत्याही खेळात महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेतली जात नाही. महाराष्ट्र केसरी मुळे इथल्या कुस्तीला भलेली वैभव प्राप्त झालं असेल मात्र आता हीच महाराष्ट्र केसरी इथल्या कुस्तीची अडचण ठरत आहे. आज महाराष्ट्र केसरी स्पर्धेत ओपन गटाचा खेळाडू खेळला तर तो महाराष्ट्र केसरी. या शिवाय त्याला शासकिय नोकरी, मग खालील जे गट आहेत त्या प्रत्येक गटातील खेळाडूचे काय? त्यांना का नाही नोकरी! हा अन्याय नाही का? तीन वेळा महाराष्ट्र केसरी झाला म्हणून  महाराष्ट्र शासनाने डीवायएसपी पद दिले. मग त्या खेळाडूने  महाराष्ट्राला काय दिले हा खऱ्या अर्थाने प्रश्न विचारला जातो. बरं कमी वजन गटात अनेक वेळा नॅशनल झालेल्या खेळाडूंचं काय चुकतं ?का महाराष्ट्र शासन बोलवून त्यांचा सन्मान करत नाही. का एखादी शासकीय कोठ्यातील नोकरी देत नाही. हा खेळाडूंवर अन्याय नाही का ? शालेय क्रीडा स्पर्धेची सर्टिफिकेट दोन दोन वर्षे मिळत नाहीत.. बर एवढं सगळं होऊन देखील क्रीडामंत्री मात्र गप्प. या अनधिकृत स्पर्धा नेमक्या होतात तरी कोणाच्या आधारे.. आणि का? काही कोणाचा कोणाला पत्ता नाही..

   आज कुस्तीगीर परिषद मिळावी यासाठी झटणाऱ्या अनेक महान पैलवानांना विनंती आहे  कोण अध्यक्ष कोण उपाध्यक्ष यापेक्षा माझ्या महाराष्ट्रातला खेळाडू कसा ऑलम्पिक पर्यंत पोहोचेल हे पाहणे गरजेचे आहे .  आज महाराष्ट्रातून गेलेला पैलवान यांच्यावर सातत्याने अत्याचार होताना आम्ही अनेक वेळा पाहिले आहे. त्यांना न्याय देण्यासाठी सर्वांनी एकजूट असणे हेच गरजेचे आहे. सगळे एकत्र असतील तर महाराष्ट्रात पुन्हा एकदा खाशाबा जाधव तयार व्हायला वेळ लागणार नाही. ज्या पद्धतीने खाशाबा जाधव सरांनी भारताला पहिले कास्यपदक दिलं त्याचप्रमाणे याच मातीतील अनेक हिरे ऑलिंपिकच सुवर्णपदक आणू शकतात ही वस्तुस्थिती आहे. त्यासाठी मातीशी नातं न तोडता ते जोडणं खरंच गरजेचं आहे.

Comments

Popular posts from this blog

*अनाथ मुलांचे स्वीकारले स्वामी धामने पालकत्व*

संजय गणपती पाटील उर्फ संजू दादा भावपूर्ण श्रद्धांजली

*रात्री माझं गाव विकताना पाहिलं*