काँग्रेस : नाबाद १३८
: काँग्रेस : नाबाद १३८
- मधुकर भावे
२८ डिसेंबर २०२३ रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १३८ वर्षांची होत आहे. माणसाचे आयुष्य जास्तीत जास्ती १०० वर्षांचे झाले तर तो मनुष्य खूप जगला असे मानले जाते, राजकीय पक्षांना हा नियम लागू नाही. काँग्रेसला तर अजिबातच नाही. काँग्रेस पक्षाचे राज्य देशात आहे का? किंवा किती राज्यांत आहे... हा हिशेब काँग्रेससाठी लागू नाही. ‘राजकीय पक्ष’ आणि ‘राजकीय सत्ता’ या दोन भिन्न गोष्टी आहेत. मूळात काँग्रेस हा ‘पक्ष’ आहे, असे मानू नका. काँग्रेस या नावात एक ‘विचार’ आहे. भारत हा खंडप्राय देश आहे. तिथे एका धर्माचे लोक राहत नाहीत. अनेक धर्म, अनेक जाती, अनेक पोटजाती, बऱ्याच प्रमाणात अंधश्रद्धा, रूढी, जादूटोना, अशांवर विश्वास असलेले इथे कोट्यवधी लोक इथे राहात होते, आणि अजूनही काहीप्रमाणात आहेतच... जाती आणि पोटजातीला तर हिशेबच नाही. आताच्या महाराष्ट्राच्या राजकारणात जातीचा विचार केला तर आता इथून पुढे जाती अधिक घट्ट होणार आहेत. आणि ‘विविधतेतील एकते’वरचे सगळ्यात मोठे संकट हेच आहे. काँग्रेस हा पक्ष कधीच नव्हता. देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठीचा तो विचार होता. सत्य-अहिंसा, सदाचार ही काँग्रेसची शस्त्रे होती. िटळकांपासून विचार केला तर काँग्रेसमध्ये त्यावेळीही मतभिन्नता होती. आजही मोठ्या प्रमाणात आहे. पण, ‘काँग्रेसचा विचार हा राष्ट्रीय विचार’ आहे. देशाला एकत्र ठेवण्याचा विचार आहे. सर्व जाती-धर्माच्या समाजाला एकत्र घेवून पुढे जाण्याचा विचार आहे. स्वातंत्र्यानंत या देशाची जी काही बांधणी झाली ती काँग्रेसच्या विचारपूर्वक आखलेल्या ध्येय-धोरणातून झालेली आहे. स्वातंत्र्याच्यावेळी देशावर आलेल्या संकटांचा मुकाबला करताना, खंडप्राय देशाच्या आकाराचा विचार करताना, इथल्या जाती-धर्मातील अंधश्रद्धा आणि रूढीचा विचार करताना, राजकीय आणि सामाजिक आघाडीवर काँग्रेसने या देशातील ‘विविधतेमधील एकता’ जपली आणि वााढवली. हे कोणालाही अमान्य करता येणार नाही. त्यामुळे काँग्रेस हा एक विचार आहे. तो गावांगावांत आहे. खेड्या-पाड्यांत आहे. काँग्रेचा विचार, काँग्रेसचा झेंडा, हा खेड्यापाड्यांत इतक्या खोलवर रूजलेला आहे, तो विचार कोणालाही मारता येणार नाही. महात्मा गांधी यांचा खून करून गांधीजींना मारता आलेले नाही. त्यांचा विचार जगाने स्वीकारलेला आहे. त्याचप्रमाणे ‘सत्ता हातातून गेली म्हणजे, काँग्रेस संपली,’ हा विचारच मुळात कोत्या स्वरूपाचा आहे. राजकीदृष्ट्या निवडणुकीत काँग्रेस पराभूत झाली असेल.. राजकारणात विजय-पराजय असू शकतो. त्यामुळे सत्ता येईल किंवा जाईल... पण, काँग्रेसचा मुलभूत विचार सर्वकाळात देशाला पुढे घेऊन जाणारा आहे. जी घटना डॉ. बाबासाहेबांनी लिहिली... जी घटना काँग्रेसने आणि देशाने स्वीकारली... त्याच घटनेनुसार कोणत्याही एका धर्माचे वर्चस्व या देशात अपेक्षित नाही. ‘सर्व धर्म समान’ अशी या देशाची नैितक बैठक आहे. काँग्रेसने हा विचार स्वीकारला आणि जोपासला. घटनेने हा विचार मान्य केला आणि ती घटना सरकारने स्वीकारली. त्या घटनेच्या विरोधातील आजचा धार्मिक उन्माद किंवा देव धर्माच्या नावाने वातावरण तयार करून निर्माण केलेला हा उग्रवाद देशाला विनाशाकडेच घेवून जाईल. जगातील सगळ्यात मोठ्या देशाची लोकशाही ती आदर्श व्यवस्था काँग्रेसने जपली आणि वाढवली. आता ती राजकीय सत्ता का टिकली नाही, त्याची कारणे काय? हा फार व्यापक असा विषय आहे. त्यासाठी असलेले या खंडप्राय देशातील त्या-त्या वेळचे नेते.... म्हणजे गांधी-नेहरूंपासून विचार केला तर सर्वच नेत्यांनी लोकशाही, सर्वधर्मसमधाव , समाजिक चारित्र्य आणि घटनेचे पावित्र्य याच आधारावर काँग्रेसचा विचार देशात गावागावात रूजवला होता. या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी झालेला जवळपास ६० वर्षांचा संग्राम, हा जगातील कोणत्याही संग्रामापेक्षा सर्वश्रेष्ठ शांततामय मार्गाचा संग्राम होता. जगाच्या पाठीवर अवघ्या ‘दोन श्ाब्दांनी’ देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारा जागात कोणताही देश नाही. हे दोन शब्द म्हणजे ‘चले जाव’, ‘जय हिंद’ स्वातंत्र्याचा महामंत्र होता... त्याच्या जोडीला सेवा, त्याग आणि समर्पण हे आदर्श होते. देशात संवादाची साधाने नसताना, आजच्या इतका देश आधुनिक साधनाने सज्ज नसतानाही, स्वातंत्र्यासाठी कसा लढला जे हे खेड्यातील शेवटच्या माणसांना समजले. स्वातंत्र्यासाठी भारलेल्या वातावरणाचा तो परिणाम होता. काही क्रांतिवीारांनी बलिदान केले. अनेकांनी सशस्त्र क्रांतीचा प्रयत्न केला. भगतसिंग, राजगुरु, सुखदेव शहीद झाले. ते सर्व मार्ग अवलंबल्यानंतरही शेवटी ‘चले-जाव’या मंत्र्ाात केवढे मोठे सामर्थ्य आहे. आणि ते स्वातंत्र्य मिळवण्याकरिता काँग्रेसने काय केले, याची जाहिरात करण्याची गरज नाही. काँग्रेसशिवाय बाकी कोणी काय केले, याचा हिशेब विचारता येईल. ज्या गांधी-नेहरू घराण्याला आज इितहासातून नामशेष करण्याची स्पर्धा लागलेली आहे त्या गांधी-नेहरू घराण्याने स्वातंत्र्यासाठी देशाच्या विविध तुरुंगामध्ये किती वर्षे कारावास भोगला... हे सगळा देश आणि जग जाणते. स्वातंत्र्य चळवळीत ज्यांनी भागच घेतला नाही, त्यांना असे वाटले होते की, गांधींना मारल्यावर गांधी संपतील. पण, गांधींच्या शरिराला नामशेष केले तरी गांधीविचार नामशेष झाला नाही. आणि काँग्रेसचा सर्व धर्म समभाव मुलभूत विचार किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरचे पंडित नेहरू यांचे तटस्थचे धोरण हा विचारही कोणाला बदलता आलेला नाही. त्यामुळे लोकशाहीच्या परिभाषेत काँग्रेस आज अनेक ठिकाणी बहुमतात नसली तरी काँग्रेसचा मूळ विचार अल्पमतात कधीही जाऊ शकणार नाही. म्हणून १३८ वर्षांनंतर आज सत्तेत बसलेल्या राजकीय पक्षाला त्यांचा सगळ्यात मोठा शत्रू काँग्रेस हाच पक्ष वाटतोय... अजूनही गांधी-नेहरू आणि काँग्रेस यांचा विचार कधी इकदा संपवून टाकतो, अशा हातघाईला अनेक नेते आलेले आहेत. त्यांचा तात्पुरता विजय होत आहे. निवडणुकीत सत्ता मिळवली जात आहे. पण त्यांच्या विजयाला तात्विक आणि सामाजिक समतेची बैठक कुठेही नाही. धार्मिक उन्मादाचा फायदा घेऊन आज मिळवलेले विजय गोड वाटत असले तरी देशात सगळेच काही विचित्र चाललेले आहे.
अशावेळी काँग्रेसजवळ समर्थ नेता नाही. आक्रमक नेता नाही. हा आजचा दोष आहे. तो देशपातळीवरही आहे आणि महाराष्ट्रात राज्य पातळीवर आहे. देशातील सगळी वृत्तपत्रेही एकांगी झालेली आहेत. आणि ज्या विज्ञानाच्या जोरावर आधुनिक समाजमाध्यमांचा बोलबाला झाला आहे. ती समाजमाध्यमे आज सत्ताधाऱ्यांच्या चरणावर वाहिलेली आहेत. त्यामुळे घटनेची शपथ घेवून सत्तेवर बसलेले, आज घटनेची पायमल्ली करतात. लोकशाहीतून मिळालेले बहुमत हुकूमशाहीकडे चालले आहे. धर्मवादाचे उदात्तीकरण होऊ लागले. संसदेच्या नवीन वास्तुचे लोकार्पण करताना देशाच्या राष्ट्रपतींनाही आमंत्रण न देण्याचा मुजोरपणा केला गेला. होम-हवन चालू झाली. धार्मिक वातावरणाचा आधार घेऊन लोकशाहीच्या मुलभूत तत्त्वाचे उल्लंघन झाले. शिवाय राजकारणाची सगळी दिशा बदलली.
कोविडसारख्या संकटात देश भरडला जात असताना सत्ताधाऱ्यांचे मित्र जागतिक श्रीमंतांच्या यादीत चमकले... वर्षाला २ कोटी रोजगार देण्याचे आश्वासन वाहून गेले. काळा पैसा बाहेर काढण्याचे आश्वासनही हवेत विरले. शासकीय संस्था खाजगीकरणाला अांदण देण्यात आल्या. २३ कोटी लोक दारिद्रय रेषेखाली गेले. हा सगळ्याचा जमा-खर्च पाहिला तर, आज भलत्या मार्गाने देश निघालेला आहे. १३८ व्या वर्षात पाऊल ठेवणाऱ्या काँग्रेसने शांततामय मार्गानेच पण ठामपणे आक्रमक होण्याची गरज आहे. भले आज निवडणुकीत विजय मिळत नसेल... आजचे सत्ताधारी अनेक वर्षे सत्तेबाहेरच होते. काँग्रेसला सत्तेची इतकी सूज आली की, लोकांपासून काँग्रेसचे नेते तुटले... लोक काँग्रेसपासून तुटलेले नाहीत. काँग्रेसचा पराभव काँग्रेसमधील नेत्यांनीच अधिक प्रमाणात केलेला आहे. शिवाय काही चुकीच्या गोष्टी काही नेत्यांनी निश्चितपणे केल्या. जुन्या नेत्यांचे चारित्र्य काँग्रेसमधील नवीन पिढीला झेपले नाही. चैन, चटक आणि चंगळवाद यातही अनेक नेते फसले. त्याचा फायदा विरोधकांनी उठवला. हे अमान्य करण्यात अर्थ नाही. लोक आणि काँग्रेसनेते यांच्यात अंतर पडले. त्याग-सेवा आणि समर्पण या शब्दांचा अर्थ ८० च्या दशकानंतर काँग्रेस नेत्यांच्या हातून हळूहळू निसटत गेला. त्यामुळे जातीयवाद, धर्मवाद, प्रांतवाद यांनी उचल खाल्ली आणि राष्ट्रीय पक्षाची पिछेहाट झाली. त्याचा सगळ्यात मोठा फटका काँग्रेसला बसला. शिवाय काँग्रेसने आणि काँग्रेसच्या नेत्यांनी प्रबोधनाच्या भूमिकेपासून माघार घेतली. नवीन कार्यकर्ते तयार करण्याकरिता जी एक त्यागाची आणि सेवेची परिभाषा वातावरण निर्माण करते त्यापासूनही काँग्रेसनेते वेगळे झाले. अशा अनेक चुकांचा परिणाम काँग्रेसच्या पूर्वीच्या साधेपणाला मारक ठरला. खादीचे महत्त्वच काँग्रेसच्या नवीन नेत्यांना कळले नाही. शिवाय खानदानी श्रीमंतीचा त्याग करून नेहरू घराण्याने खादीचे कपडे अंगावर चढवले. या आदर्शाचा विसरही अनेक नेत्यांना पडला. त्यामुळे जे साधे होते तेही झटपट श्रीमंत झालेले दिसू लागले. त्यामुळे अनेक काँग्रेस नेते पराभूत होऊ लागले. सेवा आणि समर्पणाचे आदर्श संपले. जीवनशैलीत बदल झाला. जो सामान्य माणसांना जाणवू लागला. त्यामुळे ही सामान्य माणसे त्या नेत्यामुळे दूर गेली. अशा अनेक काँग्रेस नेत्यांचा पराभव झाला. पण हा काँग्रेसचा पराभव नाही. ज्यांचा पराभव झाला त्यांच्यामध्ये सामान्य माणसांना त्याग आणि सेवा, समर्पणाची काँग्रेस दिसली नाही. त्याचा तो पराभव होता. आणि आजही १३८ वर्षात पक्षाचा वाढदिवस साजरा करताना काँग्रेसच्या नेत्यांनी तेच वातावरण तयार करण्याची गरज आहे. कारण काँग्रेसची मूळ धोरणे हेच देशाचे सामर्थ्य आहे.
एक घटना नेहमी लक्षात ठेवा... या देशाचा राष्ट्रपती महान शास्त्रज्ञा ए. पी. जे. अब्दुल कलाम हे होते. त्यांचा धर्म मुस्लीम आहे. राष्ट्रपती म्हणून ते कलामसाहेब पंतप्रधान पदाची शपथ कोणाला देत आहेत...? तर अर्थतज्ञा असलेल्या डॉ. मनमोहन सिंग यांना. ते शीख धर्माचे आहेत. आणि काँग्रेसचे उमेदवार आहेत. त्या काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी आहेत. आणि त्या मूळच्या ख्रिश्चन आहेत. जगात हे असे कुठेही घडणार नाही. काँग्रेस संस्कृतिचा अर्थच हा आहे. स्वातंत्र्याच्या चळवळीतही काश्मीरी ब्राह्मण असलेल्या पंडित नेहरू यांनी मुस्लीम असलेल्या मौलाना अबुल कलाम आझाद यांचा हात हातात धरलेला होता. आणि आझाद यांचा हात कपाळाला उभे गंध लावणारे कट्टर हिंदू मदनमोहन मालवीय यांचा हात धरला होता. आणि मदनमोहन यांचा हात धर्माने पारशी असलेल्या वीर नरिमन यांच्या हातात होता. देशाचे नेतृत्त्व त्याचवेळी होऊ शेकते... जेव्हा सर्वधर्म समभावाची समर्पणाने जपणूक होते. काँग्रेसच्या या विचाराला ज्या दिवशी धक्का लागूला... गटबाजी, जाती-पाती, याचा शिरकाव झाला. निवडणुकीची तिकिटे देताना उमेदवाराला प्रश्न विचारला जाऊ लागला. ‘तुझ्या जातीची मते किती? आणि तू किती खर्च करू शकशील..?’ काँग्रेसची घसरण तेव्हापासून सुरू झाली. पुढे भाजपा हे निमित्त झाले.
एक काळ असा होता की, महाराष्ट्रात लाेकसभा निवडणुकीचे तिकीट वाटप होत असताना १९६२ साली सोलापूरचे तुळशीदास जाधव यांना तिकीट द्यायचे राहिले. ते उभे राहून म्हणाले की, ‘यशवंतरावसाहेब, माझं काय झालं’ यशवंतराव म्हणाले, ‘अरे हो... तुळशीदास दादा राहिले... नांदेडला उभे राहता का?’ तुळशीदास दादा म्हणाले, ‘राहतो...’ आणि सोलापूरचे तुळशीदासदादा जाधव १९६२ साली नांदेड लोकसभेसाठी उभे राहिले आणि विजयी झाले. याचे कारण मतदारांचा नेत्यांवर विश्वास होता... नेत्यांचे मतदारांशी नाते होते. नाडीवर हात होता. आज काँग्रेस नेत्यांनी आपले नेमके काय चुकले आहे, याचे चिंतन करावे. भाजपाने शंभर चुका केल्या, पण रेटून कारभार केला. लोकांची डोकी खराब करूनसुद्धा मते मिळवली. भावनात्मक वातावरण तयार करण्यात ते यशस्वी झाले. हे सगळे मान्य केल्यावरसुद्धा काँग्रेसचे काही चुकले आहे, ते कुठे चुकले, काय चुकले, नेते कुठे कमी पडले, याचे चिंतन होत नाही, तिथपर्यंत थोडीशी माघार घ्यावी लागणार... पण त्याचा अर्थ काँग्रेसच्या विचारांचा तो पराभव नाही. आजचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकसभा निवडणुक जवळ आल्यावर आठवण होऊन... ‘राखी पौर्णिमेला मुस्लीम भगिनींना राखी बांधा.... ’ हा संदेश भाजपा कार्यकर्त्यांना द्यावा लागला. हा भाजपाचा वैचारिक पराभव आहे. आणि काँग्रेसच्या मूळ तत्वाचा तो विजय आहे. आता दोन दिवसांपूर्वी ख्रिश्चन समाजाच्या भेटी-गाठी घेण्यासाठी भाजपा नेते बाहेर पडले आहेत. ही सगळी शिकवण काँग्रेसच्या चौथी इयत्तेच्या धड्यात आहे. काँग्रेसवालेच ते धडे आता विसरले आहेत. आणि म्हणून लोकांपासून दूर राहिले. १३८ व्या काँग्रेसच्या वाढदिवसाला या साऱ्याचे चिंतन व्हायला हवे.
२८ डिसेंबर रोजी सोनिया गांधी... राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष खरगे यांची नागपूरला मोठी सभा होत आहे. सभा मोठ्या होतीलच... टाळ्याही वाजतील... पण, ज्या नागपूरात सभा होत आहे. त्या नागपूरात लोकसभा निवडणूक लढण्यासाठी नितीन गडकरी यांच्याविरुद्ध प्रभावी उमेदवार आहे का? तो का नाही...? पूर्वी याच नागपूरातून १९७७ च्या जनता लाटेत लोकसभा निवडणुकीत गेव अवारी या काँग्रेस पक्षाच्या पारशी तरुणाला संघाची राजधानी असलेल्या नागपूरनेच निवडून दिले होते. कुठे चुकले आहे, याची उत्तरे शोधायला काही पाने मागे उलटून पहा... काँग्रेसला पुन्हा सोनेरी दिवस येतील. आज मुंबईमध्येही लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे तगडे सहा उमेदवार कोण? पुण्यात कोण? औरंगाबादमध्ये कोण? सोनियाजी, राहुल यांच्या सभांना गर्दी होईल... पण, महाराष्ट्र पातळीवर असा नेता सांगा... ज्याच्या सभेला पाच-पंचवीस हजार माणसे जमतील... उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्या सभांना गर्दी जमणार आहे... त्यांच्या तोडीचा नेता आज काँग्रेस जवळ नाही... हे सत्य नाकारता येत नाही. लोक काँग्रेस सोबत आहेत... नेते कुठेतरी हरवले आहेत... काँग्रेस १३८ व्या वर्षी नाबादच आहे आणि नाबादच राहिल..
सध्या एवढेच...
Comments
Post a Comment