वसंतदादांच्या जयंतीनिमत्ताने ‘सहकार’ चिंतन

वसंतदादांच्या जयंतीनिमत्ताने ‘सहकार’ चिंतन

मधुकर भावे
सोमवार, दिनांक १७ नोव्हेंबर रोजी वसंतदादांची १०६ वी जयंती आहे. त्याच दिवशी महाराष्ट्रात ‘सहकार दिन’ साजरा केला जाणार आहे. १९९२ साली सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री असताना त्यांनी दादांच्या जयंतीचा दिवस शासनातर्फे  ‘सहकार दिन’ म्हणून साजरा करण्याचे जाहीर केले होते. काही दिवस त्या ‘सहकार दिना’ची आठवण सरकारला राहिली. मग, तीन वर्षे सहकार दिन आणि दादांचाही आठवण राहिली... मग विसर पडला. यावर्षी पुन्हा ‘सहकार दिन’ साजरा होणार आहे. म्हणजे नक्की काय करायचे, हे कोणालाच माहिती नाही. पण, वसंतदादांची त्यानिमित्ताने आठवण होईल, हेसुद्धा खूप झाले! कारण, पवारसाहेबांमुळे यशवंतराव चव्हाण यांची आठवण रोज ताजी असते. पण, दादांना महाराष्ट्र तसा विसरलाच.  दादांची २० वर्षे सेवा करणारे यशवंत हाप्पे हे दादांना विसरले नाहीत. त्यांच्या धडपडीतूनच दरवर्षी जयंती-पुण्यतिथी साजरी होते. 
महाराष्ट्राच्या घराघरात सर्वांना आपलेसे वाटणारे वसंतदादा आहेत. वसंत नावापुढे ‘दादा’ हे विशेष नाम दादांनाच शोभून दिसते. ‘दादा’ या शब्दात जो प्रेमळपणा, आपलेपणा,  मनाचा ओलावा असणारा, आदर या सगळ्या भावना ज्या नावासमोर अगदी नेमक्या शाेभून दिसतात ते नाव ‘वसंतदादा’ हेच आहे. महाराष्ट्रात अलिकडे  अनेक कार्यकर्ते, नेते आपल्या नावापुढे ‘दादा’ हे विशेषण लावत आहेत.  ३० वर्षांच्या कार्यकर्त्याचे वाढदिवसाचे फलक ६० फूट उंचीचे लागत आहेत. त्यात हे सगळे ‘दादा’ ‘कार्यसम्राट’ आहेत. त्यांचे ‘कार्य’ काय माहित नाही... आणि ‘सम्राट’ कुठले हे ही माहिती नाही. 
महाराष्ट्रात अत्यंत अादराने घराघरात आपला माणूस वाटणारे असे एकच दादा ते वसंतदादा. हे दादा आणि ते ‘भाऊ’....  भाऊ म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील. दोघेही फार न शिकलेले. पण ज्यांनी समाजाला शिकवले, असे हे दोघे. या दोघांच्या कामाचे मोल महराष्ट्राने फारसे केले नाही. दादा मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचले तरी सत्तेत न रमलेला नेतासुद्धा हे वसंतदादाच आहेत. स्वातंत्र्य चळवळीत छातीवर गोळी झेललेला माणूस... स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेच जीवनाचा क्रांतीकारी सांधा बदलून ‘सहकारा’चा पुरस्कार करतो. हा सांधेबदल फार न शिकलेल्या पण, वैचारिक उंची असलेल्या नेत्याचा आहे.
१९५२ साली आमदार झालेले दादा १९७२ पर्यंत सत्तेच्या वाटेला जात नाही. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे  ते अध्यक्ष होते. प्रदेश काँग्रेसचेही अध्यक्ष होते. ‘मला मंत्री करा’, असे सांगायला ते कोणाकडे गेले नाहीत. संघटनेमध्ये काम उभे करतो... सहकार उभा करतो.... सहकारी कारखाने उभे करतो... ऊस असो.... कापूस असो... एका व्यवसायातून अनेक व्यवसाय उभे करून हजारो लोकांना जीवनात उभे करून रोजगार देतो... अर्थात दादांचे महत्त्व महाराष्ट्राला कळले नाही तरी दादांना त्यामुळे काही उणेपणा येतो, असे अजिबात नाही.  दादा चारवेळा मुख्यमंत्री झाले.... राज्यपालही झाले... पण, या पदांमुळे दादांना मोठेपण मिळाले नाही. त्या पदांना मोठेपण मिळाले. आमदार, मंत्री, मुख्यमंत्री होण्यासाठी जीव टाकणारे शेकडो लोक आपण पाहतो... ती जीवघेणी स्पर्धा रोज सुरूच आहे. मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी  कुठच्या टोकाला आजचे नेते जातात... हेही आपण पाहत आहोत.  पण, मिळालेले मुख्यमंत्रीपद भिरकावून देणारा कोणता  दुसरा ‘दादा’ महाराष्ट्राला दिसला नाही. ते वसंतदादाच आहेत. राज्यपालपद एका क्षणात सोडणारेही  हेच दादा आहेत. दादांनी किती प्रकल्प उभे केले... किती सहकारी संस्था उभ्या राहिल्या... किती रोजगार निर्माण झाले... हे सगळे पश्चिम महाराष्ट्रातील हिरवे गार चित्र ज्या यशवंतराव यांच्यापासून अनेक नेत्यांनी उभे केले, त्यात वसंतदादा अग्रणी आहेत. महाबळेश्वर येथे १९६१ साली काँग्रेसचे शिबीर झाले. यशवंतरावांच्या पुढाकाराने झाले. त्या एका शिबिराने कृषी-औद्योगिक क्षेत्रात काम करण्यासाठी कार्यकर्त्याने स्वत:ला कसे झोकून द्यावे, याचे प्रशिक्षण देणारे ते शिबीर होते. राजकीय कार्यकर्ता तयार व्हायला १० वर्षे लागतात. त्या एका शिबिराने विधायक कामासाठी अनेक कार्यकर्ते तयार झाले... असे ते शिबीर होते. आताच्या नेत्यांना अशा शिबिरांची कल्पनाही करता येणार नाही. कारण आता यशवंतराव नाहीत... पागे नाहीत... दादा नाहीत... यशवंतराव मोहिते नाहीत... मधुकरराव चौधरी नाहीत.  महाराष्ट्राचा सगळा भार आज फक्त शरद पवारसाहेब यांच्यावर आहे.  त्या वैभवसंपन्न काळाचे तेच एकमेव प्रतिनिधी आणि नेते आहेत. 
या छोट्याशा लेखात दादा मावणार नाहीत... त्यांचे काम मावणार नाही... त्यांच्यासारखा मोठ्या मनाचा माणूस तर अजिबात मावणार नाही. दादांचे चरित्र सांगावे, अशासाठी हे लिहित नाही. किमान नवीन पिढीतील राजकीय कार्यकर्त्यांना आपण कोणापासून काय शिकावे, याची आठवण करून अभ्यास करायचे जे दिवस आहेत, त्यात १३ नोव्हेंबर हा दिवस आहे. दादांचा जन्मदिन आहे. म्हणून हे चिंतन आहे. २० वर्षे आमदार राहिलेले दादा, मंत्री होण्यासाठी कधी धडपडले नाहीत. संघटनेत रमले.... सहकारात रमले... १९६७ आणि १९७२ या पाच वर्षांच्या प्रदेश काँग्रेस अध्यक्ष पदाच्या काळात महाराष्ट्रात काँग्रेसची पाळंमुळं खोलपर्यंत रुजवली ती दादा आणि मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी थोडी आठवण म्हणून सांगतो... १९६७ साली देशातील ९ राज्यांत काँग्रेसची सरकारे पराभूत झाली होती. त्या निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसचे २०२ आमदार निवडून आले. १९७२ च्या निवडणुकीत २०२ चे २२२ झाले आणि २०१९ च्या निवडणुकीत ४४ संख्येवर काँग्रेस आमदरांचा आकडा आला. ही घसरण का झाली, याचे चिंतन करण्याचासुद्धा  १७ नोव्हेंबर हाच दिवस आहे. मग ते यशवंतराव चव्हाण असतील... वसंतदादा असतील.. किंवा विलासराव असतील... महाराष्ट्र काँग्रेसला दादा यश मिळवून देत होते.  कारण दादा लोकांमध्ये होते.  ज्या पदावर बसले, ती पदे त्यांनी मिरवली नाहीत. सामान्य माणसाला दूर केले नाही. मुख्यमंत्री जेवायला बसलाय.... आणि कार्यकर्ता दार ढकलून ‘राम-राम दादा’ असं सहज पणे म्हणू शकतो... हातात घेतलेला घास थांबवून.... ‘अरे बैस... दोन घास खावून जा...’ दादांचे मोठेपण अशा विलक्षण साधेपणाचे होते. सत्ता मिरवण्यात नव्हते. त्यामुळे दादांमुळे पदं मोठी झाली... दादा कामगार संघटनेत होते, हेही अनेकांना आता आठवत नसेल.... ‘इंटक’ या बलाढ्य कामगार संघटनेचे दादा अध्यक्ष होते, याचीही आज कोणाला आठवण नाही. मराठी माणसांच्या नावावर उभ्या राहिलेल्या शिवसेनेच्या आगोदर, मराठी माणसांचे आधार दादाच होते.हेही अनेकजण विसरले असतील... दादा शिकलेले नव्हते म्हणून अभिजनांनी त्यांची फारशी दखल घेतली नाही. पण, दादांना त्याची खंत नव्हती.  ‘मी फार शिकलो नाही,’ हे ते मोकळेपणाने सांगत... ‘मी फारशी पुस्तके वाचत नाही’, हे ही सांगत. पण ‘मी माणसं वाचू शकतो... त्याचे मन वाचू शकतो...’ त्याचे दु:ख समजू शकतो...’ या त्यांच्या शब्दांत जगातील सगळं तत्त्वज्ञाान सामावलेले हाेते. ते कृषीविद्यापीठाचे पदवीधर नव्हते. कोणत्याच विद्यापीठाचे पदवीधर नव्हते. पण, कृषी विद्यापिठातील ज्ञाानाची सगळी पुस्तकं एका तागडीत टाकली आणि दादांचा एक सोपा मंत्र... ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’  दुसऱ्या तागडीत टाकला तर, दादांची तागडी भारी होत होती. महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना दादांचा हा मंत्र समजला नाही. त्यामुळे झालं काय की, ‘पाणी आडवा-पाणी जिरवा...’ या मंत्राऐवजी ‘आपल्याच पक्षाच्या  माणसाला आडवा आणि त्याची जिरवा’  यावरच सगळी शक्ती पणाला लावली गेलीे. दादा शिकले नव्हते, हे खरं आहे... त्यांना कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापिठाने जेव्हा ‘डी. लिट’  ही सन्माननीय पदवी प्रदान केली तेव्हा दादांनी भाषण केले... त्या भाषणात ते म्हणाले की, ‘अरे मित्रांनो, तुम्ही दिलेली पदवी नावाच्या मागे लावायची की, पुढे लावायची, हे सुद्धा मला माहिती नाही रे... पण मला समजलेला अर्थ असा आहे की, ग्रामीण भागातील गरिबांची मुले शिकली पाहिजेत, यासाठी मी जे काही केलं ते तुम्हाला पटल्यामुळे  हे डि. लिट का बि. लिट तुम्ही मला चिटकवलेय.... असे मी मानतो.’ त्यावेळी उसळलेला हशा... आजही आठवताे.  दादांनी आयुष्यात त्यांच्या कोणत्याही लेटरहेडवर ‘डॉ.’ ही पदवी लावली नाही. दादांच्या घराच्या पाटीवरही लावली नाही. त्यांनी कधी ‘माजी मुख्यमंत्री’ म्हटले नाही, िकंवा कोणाला पत्र देताना  मुख्यमंत्री, राज्यपाल असा कसलाही उल्लेख केला नाही. दादांचा मोठेपणापुढे सगळ्या पदव्या खूप लहान झाल्या... आणि दादांचे मोठेपण पदवीमुळे मोठे झालेच नाही. उलट त्या पदव्यांना महत्त्व आले. दादा आणि श्रीमती इंिदरा गांधी यांचे जन्मशताब्दी वर्ष एकाच वर्षी म्हणजे २०१७ सालीच सुरू झाले. कशी गंमत पहा... महाराष्ट्रातील जे मोठे म्हणून नेते आहेत... त्यात बाळासाहेब देसाई, यांचा जन्म १९१० चा. यशवंतराव चव्हाण- १९१२,  वसंतराव नाईक-१९१३, वसंतदादा-१९१७, राजाराम बापू, यशवंतराव मोहिते आणि शंकरराव चव्हाण-१९२०.... म्हणजे त्या दहा वर्षांत महाराष्ट्रातील ७ मोठे नेते जन्माला आलेले आहेत.  आणि यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर महाराष्ट्रच्या नेतृत्वामध्ये दादांच्या तोडीचा दुसरा नेताही नाही.  हेही मान्यच करावे लागेल. 
१९७५ साली मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी त्यांच्या मंत्रीमंडळातून दादांना कमी केले.  तेव्हा दादांनी राजकीय सन्यास जाहीर केला... पद्माळा या त्यांच्या गावी दादा जाऊन बसले. १९७७ च्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष देशभर पराभूत झाला. दादा पुन्हा सक्रिय झाले...  पत्रकारांनी विचारले... ‘तुम्ही राजकीय सन्यास घेऊन घरात बसला होतात... आता परत काँग्रेसमध्ये कसे आलात...’ दादा क्षणात म्हणाले, ‘अरे, काँग्रेस माझे घर आहे... घरालाच आग लागली... घरात कसा बसू...’ दादांचे हे उत्तर देशभर गाजले.... दादा अशा नेमक्या शब्दांत बोलायचे... 
आज सहकारात काही महत्वाचे प्रश्न निर्माण झाले आहेत. सहकारात काम करणारेच नेते खाजगी साखर कारखाने चालवायला घेत आहेत. एकीकडे सहकार.... दुसरीकडे खाजगीकरण, यात सहकार गुदमरतोय... सहकारी कायदा मुळात पतपेढ्यांसाठी सुरू केलेला कायदा होता. सावकाराच्या पिळवणुकीतून गरिब शेतकरी-कष्टकरी यांची सुटका करण्याकरिता हा कायदा इंग्रजांनी १२० वर्षांपूर्वी केला. अाज त्या कायद्याचा उद्देश दूर होताना दिसत आहे. सहकारात सभासदाला महत्त्व अाहे. सहकारामध्ये धर्माच्या आणि जातीच्या नावाने सहकारी संस्था स्थापन होऊ लागलेल्या अाहेत आणि त्याला शासन मान्यता देत आहे. ‘भांडणाशिवाय सहकार नाही’, अशी आजच्या सहकाराची अवस्था आहे. आज राज्य सहकारी बँकेचे प्रमुख प्रशासक बाळासाहेब अनासकर हे एकमेव अभ्यासू व्यक्तिमत्त्व आज असे आहे की, त्यांना सहकाराचा नेमका अर्थ कळलेला आहे. त्यामुळेच कोट्यावधी रुपये तोट्यात गेलेली राज्य सहकारी बँक त्यांनी फायद्यात आणून दाखवली. या राज्य सहकारी बँकेची परंपरा विठ्ठलदास शामलजी, वैकुंठभाई मेहता, धनंजयराव गाडगीळ, वसंतदादा पाटील यांच्या नंतर त्याच निष्ठेने बाळासाहेब अनासकर चालवत आहेत. पण, महाराष्ट्रातल्या बाकी सहकारी चळवळीला इतके नेमके नेतृत्त्व मिळालेले िदसत नाही. 
५ सप्टेंबर १९९२ रोजी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक अमृत महोत्सवात भाषण करताना श्री. शरद पवारसाहेब म्हणाले होते की, ‘नाही रे’ वर्ग या चळवळीत किती टक्के आहे? शिवाय अनेक वर्षांपूर्वी उभ्या राहिलेल्या कमी खर्चातील संस्था तोट्यात का जात आहेत? आणि सरकारकडे आर्थिक मदत मागण्याची वेळ त्यांच्यावर का येत आहे ? ५०-६० वर्षे कारखाना चालवल्यानंतर मदतीकरता सरकारकडे जायचे असेल तर, संस्थाचालकांनी नेमके काय केले? असाही प्रश्न शरद पवार यांनी विचारला होता. ५० वर्षांपूर्वी जे कारखाने सहकारात शिस्तबद्ध चालू होते, ती शिस्त का बिघडली?  भारतात क्रमांक १ वर असलेला सहकारातील साखरेचा उद्योग अडणीत का येतोय? महाराष्ट्रातील सहकारी बँका आणि सहकारी कारखाने खाजगी भांडवलदारांच्या घशात घालण्याचा मोठे उद्योग कोण दिल्लीत कोण करत आहेत?  महाराष्ट्रातील साडे चार कोटी सभासद या चळवळीत आहेत. म्हणून सहकारी डळमळीत होता कामा नये... साखर व्यवसायाप्रमाणेच सहकारातील दुग्ध व्यवसायही महाराष्ट्र देशात क्रमांक २ वर आहे.  सहकारातील शिरलेले दोष काढून टाकण्याच्या निर्धारानेच काम करणारे कार्यकर्ते पुन्हा तयार करावे लागतील.. वसंतदादांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने... ‘सहकार... का बिघडला?’ असा परिसंवाद ठेवून त्यातील दोष दूर करण्याची आज गरज आहे. दादांची जयंती साजरी करताना चळवळीचे शुद्धीकरण करावे लागेल... एकटे बाळासाहेब अनासकर तोट्यातील राज्य सरकारी बँक मोठ्या प्रमाणात फायद्यात आणू शकतात.... मग बाकीच्या सहकारी उद्योजकांना त्यांच्या सहकारात उणीवा का भासतात? एक चिपळूण नागरी सहकारी पतपेढी २५ वर्षांत ५० शाखा उभ्या करू शकते... १००० कोटी ठेवी जमा करू शकते.... सहकारातील आदर्श पतपेढी होऊ शकते... अन्य संस्थांना हे का जमत नाही? हा विचार करून दादांना अपेक्षित असलेला सहकार अधिक शुद्ध आणि स्वच्छ करणे हीच त्यांच्या जयंतीदिनी सहकाराची अपेक्षा आहे. सहकारी कार्यकर्त्यांनी तो निर्धार करावा.... तरच ‘जयंती दिन’ साजरा केला... आणि ‘सहकार दिन’ साजरा केला, त्याचे समाधान वाटेल... नाही तर हाही एकदिवसाचा उत्सव होईल... 
सध्या एवढेच...

संपर्क : 9869239977

Comments

Popular posts from this blog

*अनाथ मुलांचे स्वीकारले स्वामी धामने पालकत्व*

संजय गणपती पाटील उर्फ संजू दादा भावपूर्ण श्रद्धांजली

*रात्री माझं गाव विकताना पाहिलं*