पुरोगामी विचारांचे जागरण करणारा जयसिंगपूरचा विचारमंच- मधुकर भावे
पुरोगामी विचारांचे जागरण करणारा जयसिंगपूरचा विचारमंच- मधुकर भावे
१२ अॅाक्टोबरला जयसिंगपूरला गेलो होतो. रत्नाप्पाण्णा कुंभार यांची ११४ वी जयंती होती. रत्नाप्पाण्णा कोण? महराष्ट्रातील नवीन पिढीला माहितीही नसेल... गेल्या १०० वर्षांत देशाचे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी तुरुंगवास आणि सर्व काही हाल-अपेष्टा भोगलेले कितीतरी काळाच्या पडद्याआड आहेत. त्यांची आठवणही नाही. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाच्या आणि या महाराष्ट्राच्या बांधणीसाठी ‘सेवा-समर्पण आणि त्याग’ या मंत्रावर ज्यांनी आयुष्ये झोकून दिली... असे अनेक दिग्गज या महाराष्ट्रात आहेत. ती राजकीय क्षेत्रात आहेत... सामाजिक क्षेत्रात आहेत... आजचे स्वातंत्र्य किंवा आजचा महाराष्ट्र कोणी कसा उभा केला... हे नवीन पिढीला सांगणाऱ्या तरुणांच्या संघटनाही फार नाहीत. ज्या संघटना किंवा जे कार्यकर्ते तळमळीने अशा विषयांत काम करतात त्यांच्या निष्ठेला वंदनच केले पाहिजे. त्याग करणारे नेते आता जसे नाहीत... त्याचप्रमाणे अशा निष्ठा ठेवून या जुन्या िपढीला नवी पिढीसमोर आदर्श ठेवणारे दुर्मिळ आहे. जयसिंगपूरचा ‘रत्नाप्पाण्णा विचार मंच’ हा आता पुरोगामी विचारांचा मंच आहे. तीच गोष्ट मला फार महत्त्वाची वाटते. आणि त्या संस्थेमधील बंडा मणियार, बाबा परीट, अॅड. सुरेश कुर्हाडे यांच्यासारखे कायंकर्ते गेली १६ वर्षे अशा त्यागी नेतृत्वाची स्मृती जागवतात. एक कार्यक्रम केला, तेवढ्यापुरताच हा भाग मी मानत नाही... तर अशा त्यागी नेत्यांची तरुणपिढीला माहिती होणे हे तेवढेच महत्त्वाचे आहे. आतापर्यंत त्या संस्थेने रत्नाप्पाण्णांची जयंती साजरी करताना महाराष्ट्रातील जवळपास ८० क्षेत्रांतील ख्यातनाम लोकांना गौरवांकित केले आहे. ‘देशभक्त रत्नाप्पाणा जीवन गौरव’ पुरस्कार देवून त्यांना सन्मानित केले आहे. मला या कार्यक्रमाचे सर्वात जास्त महत्त्व असे वाटले की, हा कार्यक्रम एका मोकळ्या मैदानावर हजारो लोकांच्या गर्दीत अगदी देखणा होतो. सामान्यपणे पुरस्कारांचे कार्यक्रम छोट्या मर्यादित हॉलमध्ये होतात. पण, या विचारमंचने कार्यक्रमाचे स्वरूप अित भव्य असे ठेवले आहे. जणू त्यादिवशी जयसिंगपूरात दिवाळीच साजरी होते आहे, असा भास व्हावा... रोषणाई... फटाके... वाजंत्री, भव्य व्यासपीठ.... सुयोग्य नियोजन... समोर बसलेले हजारो लोक... चार-चार तास कार्यक्रम चालल्यानंतर एकही माणूस जागचा हलत नाही... हा आजच्या काळातील चमत्कार आहे. राजकीय पक्षांना मोठ्या सभा करताना कशी दमछाक होते हे आपण पाहतो आहोत. एका माणसाला काय कबूल करावे लागते.... त्याचाही आकडा अाता सगळ्यांना माहिती आहे. ही माणसं गप्प बसली आणि सभा मोठी झाली तरी, टाळ्या वाजवत नाहीत... मग टोळीवाला विचारतो की, ‘अरे तुम्ही एक बी टाळी मारली नाहीय...’ तो साधा माणूस सांगतो... ‘सभेला येण्याचे ३०० रुपये ठरले होते... टाळीचे काही ठरले नव्हते...’ अशा होणाऱ्या सभा खूप आहेत. जयसिंगपूरची सभा मला विलक्षण वाटली. बाबा परिट किंवा बंडा मणियार यांचे नियोजन कमालिचे शिस्तबद्ध.... देखणे आणि आण्णांवरच्या िनष्ठेचे ते फार मोठे प्रतिक होते. अण्णा जावून आता २५ वर्षे झाली. त्यावेळी हे दोघे किती लहान असतील.... पण काही व्यक्तिमत्त्व अशी काही जीव लावतात... समारंभ करण्यापेक्षाही अशी जीव लावणारी व्यक्तिमत्त्वे मला अधिक मोलाची वाटतात. आज-काल कोणत्याही क्षेत्रात 'निष्ठा’ या शब्दाची किंमत राहिलेली नाही. पैसा हा आजचा परवलीचा शब्द आहे. पण त्या पलिकडेही तरुण आहेत... विचारी आहेत... प्रभावी बोलणारेही आहेत... आपला विचार ठामपणे मांडणारे आहेत. याचं केवढं मोठं अप्रूप वाटलं... म्हणून सर्वप्रथम या ‘विचारमंच’चे मन:पूर्वक अभिनंदन. विचार या शब्दाऐवजी आज सगळ्या बाजूंनी अविचारांचे आणि अतिरेकाचे वातावरण आहे. मग तो अतिरेक धर्मिक असेल... सामाजिक असेल... किंवा राजकीय असेल... आजची चाललेली पोस्टरबाजी आणि जाहिरातबाजी हा अविचाराचाच भाग आहे. या वातावरणात जयसिंगपुरातील विचारमंचची सगळी टीम मला खूप मोठ्या सामाजिक उंचीवरची वाटली. गेल्या १६ वर्षांत लता मंगेशकर यांच्यापासून अनेक दिग्गजांना त्यांनी सन्मानित केले आणि त्यासाठी जयसिंगपूरला आणले. आताही इंद्रजीत देशमुख, अशोक नायगावकर ही काही लहान माणसं नाहीत. यांच्या उपस्थितीत रत्नाप्पाण्णांच्या कार्याचा गौरव त्या निमित्ताने आण्णांच्या कार्याचे स्मरण झालेले आहे.
मला महाराष्ट्राचे वैशिष्ट्य हेच वाटते की, या पश्चिम महाराष्ट्रात राजकीय त्यागाचे... सामाजिक समर्पणाचे आणि आध्यात्मिक सेवेचे असे कितीतरी उंचच उंच नेते आहेत. नवीन पिढीला हे सगळं सांगणे गरजेचे आहे. आणि त्या मानाने विचार केला तर रत्नाप्पाणांची माहिती या विचारमंचमुळेच जागृत आहे. रत्नाप्पा नेमके कोण? मी जे काही समजतो त्यात आयुष्यभर ‘काँग्रेस’ या एकाच पक्षात शेवटच्या श्वासापर्यंत काम करणारा हा नेता आहे... हा त्यांचा पहिला गुणविशेष... स्वातंत्र्याच्या चळवळीत स्वत:ला झोकून देवून एल.एल.बी.चे शिक्षण सोडून चळवळीत उतरलेला हा नेता. स्वातंत्र्य मिळाल्यावर देशाची घटना तयार करण्यासाठी डॉ. राजंेद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली जी २०४ दिग्गज नेत्यांची समिती नेमण्यात आली त्यात रत्नाप्पाण्णांचे नाव आहे. घटनेचा आराखडा तयार करणाऱ्या कृती समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे होते. म्हणून तर त्यांना ‘घटनेचे शिल्पकार’ म्हटले जाते. या घटना समितीत देशभरातील अनेक नेत्यांप्रमाणे महाराष्ट्रातील मराठी नेते प्रामुख्याने बापूजी आणे, केशवराव जेधे, रत्नाप्पा कुंभार, दुर्गाबाई देशमुख, दादा धर्माधिकारी, बॅरिस्टर एम. आर. जयकर, गणेश वासुदेव मावळणकर, स. का. पाटील हे नेते होते. ९ डिसेंबर १९४६ रोजी घटना समितीच्या २०४ सदस्यांची पहिली बैठक झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली घटना मसूदा समितीची एक उपसमिती केली. २९ अॅाग्ास्ट १९४७ रोजी ती मसूदा समिती स्थापन झाली. म्हणजे स्वातंत्र्या नंतर १४ दिवसांनी ३० अॅागस्ट १९४७ राजी मसूदा समितीची पहिली बैठक झाली. १४१ दिवसांत घटनेचा आराखडा तयार करण्यात आला. त्यात २४३ कलमे आणि १३ परिशिष्ट होती. ती कलमे नंतर ३८६ झाली. ७ हजार ७६५ या उपसूचना होत्या. त्याचा विचार करण्यासाठी ६८ बैठका झाल्या. त्या सर्वच बैठकांना दोघांचीच हजेरी सतत राहिली. त्यात एक होते डॉ. बाबासाहेब आंबेडकर... आणि दुसरे रत्नाप्पाण्णा कुंभार (संदर्भ : भारताची राजघटना डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाषण २५/११/१९४९) पृष्ठ १२४.) तेव्हा आण्णांचे पहिले मोठे काम म्हणजे ज्या भारतीय घटनेवर दिग्गज लोकांच्या स्वाक्षऱ्या आहेत, त्यात शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूरच्या या नेत्याची स्वाक्षरी आहे. आण्णांच्या जयंती दिनाला होणारी गर्दी, पुरस्कार कोणाला दिले, यासाठी नाही. देशाच्या घटनेवर आपल्या तालुक्यातील आपल्या नेत्याची स्वाक्षरी आहे... एकवेळा खासदार आणि सहा वेळा आमदार, चार वेळा मंत्री असलेल्या अण्णांची स्वाक्षरी आहे... हे भाग्य जयसिंगपूरच्या, कोल्हापूरच्या वाट्याला आले. कोणत्याही परिस्थितीत कोल्हापूर, जयसिंगपूर, शिरोळ तालुक्यातील ती जनता आपल्या नेत्याची स्वाक्षरी असलेल्या घटनेची तोड-फोड करू देणार नाही... हा निर्धार व्यक्त करणारी ती गर्दी आहे. असा मला त्या गर्दीचा अर्थ समजला. आण्णा गेल्याला २५ वर्षे झाल्यानंतर हजारो माणसं काय उगाच जमतात?
स्वातंत्र्यानंतरच आण्णांचे दुसरे मोठे काम म्हणजे संस्थानं विलिन करण्याकरिता सरदार वल्लभभाईंनी जो आटापिटा केला त्याला साथ देवून ‘प्रजा परिषद’ स्थापन करणारा नेता. या प्रजापरिषदेमार्फत २१ संस्थानं विलीन करण्यात आण्णांचा मोठा सहभाग होता. जत, कोल्हापूर, अक्कलकोट, सावंतवाडी अशी संस्थाने विलिन करण्याकरिता लोक चळवळ उभारणारा नेता.... १९५२ च्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्याने ज्याला काँग्रेसचे खासदार बनवले असा हा पहिला नेता. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राजकारणात खासदार... आमदार होतानाच विकासाची भूमिका घेवून कोल्हापूरात अनेक सहकारी संस्था उभारणारा नेता... पंचगंगा सहकारी साखार कारखाना असो... इचलकरंजीची सूतगिरणणी असो... अशा विधायक काम करणाऱ्या आण्णांना १९८५ साली पद्मश्री पुरस्काराने सन्मािनत करण्यात आले. आणि त्याच वर्षी पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाने आण्णांना सन्मानाने ‘डी.लिट’ ही पदवी प्रदान करण्यात आली.
महाविद्यालयात शिकत असताना आण्णांनी गांधीजींची ‘चलेजाव’ची हाक ऐकली आणि त्यांच्या डोक्यावर टिचकी मारून त्यांनी विचारलं, ‘वकील होऊन काय करू? गांधीजी हाका मारत आहेत.’ ८ जुलै १९३८ रोजी आण्णांना अटक झाली. त्यांच्यासोबत माधवराव बागल होते. ‘चलेजाव’आंदोलनात आण्णा भूमिगत होते.... या भूमिगत चळवळीत आण्णांना पकडण्यासाठी २० हजारांचे बक्षीस जाहीर झाले होते.
स्वातंत्र्य चळवळीतील आणि नंतरच्या देशाच्या बांधणीत अशा नेत्यांचे फार मोठे काम आहे. ते इितहासाच्या पानात आहे. पण, समाज या माणसांना विसरलेला आहे. अशावेळी बाबा परीट किंवा बंडा मणियार यांच्यासारखी वैचारिक उंचीने काम करणारी माणसं विचाराने आणि आचाराने मोठी वाटतात. त्यांचा कोणी सत्कार करो, न करो प्रसिद्धीसाठी हे तरुण धडपडत नाहीत. पण जी मूल्ये जुन्या िपढीने जपली तो प्रवाह नवीन पिढीपर्यंत पोहावण्याचे काम हे ‘वेड’ही स्वातंत्र्याच्या चळवळीएवढेच मोठे अहे. असे मी मानतो. आताच्या पिढीला जे काही स्वातंत्र्य उपभोगायला मिळालेले आहे. त्यासाठी असंख्य नेत्यांचा त्याग अाणि बलिदान कारणीभूत आहे. एका दिवसात स्वातंत्र्य मिळाले नसले तरी मिळालेले स्वातंत्र्य टिकवणे आणि देशाच्या घटनेचे पावित्र्य राखणे... हा देश सर्व जाती-धर्मंांना बरोबर घेवुन गुण्या-गोविंदाने चालवणे... देशाचे संवविधान... स्वातंत्र्य समता... आणि बंधूता... ही मुलभूत तत्त्वे हा देशाचा प्राण आहे. एका जाती-धर्माचा देश कधीही होऊ शकत नाही. काँग्रेस संस्कृतिचा अर्थच असा की,... गंधाचा टिळा लावलेले मदन मोहन मालविय, त्यांचा डावा हात हातात धरलेले मौलाना अबुल कलम आझाद त्यांचा उजवा हात हातात धरलेले काश्मीरी ब्राम्हण पंडित नेहरू... त्यांचा हात धरलेले गुजराती सरदार पटेल, आणि सरदारांचा हात पडकलेले पारशी वीर नरिमन आणि त्यांचा हात पकडलेले दाक्षिणात्य राजगोपालाचारी आणि त्यांच्या बाजूला असलेल्या परदेशी अॅनी बेझंट... अशा एकात्मकतेची संस्कृती ही काँग्रेस संस्कृती आहे. गांधी- नेहरू आणि काँग्रेस हा कोणताही राजकीय पक्ष नाही. देशाला एक ठेवणारा हा विचार आहे. यशवंतराव, वसंतदादा, क्रांतिसिंह नाना पाटील, माधवराव बागल ते रत्नाप्पांच्यापर्यंत हे सगळे नेते या विचाराची पालखी वाहणारे आहेत. आणि म्हणून ते मोठे आहेत.
जयसिंगपूरचा तो समारंभ ज्या तरुणांनी खांद्यावर घेतलाय तेही नवीन पिढीतील... या तिघांचीही भाषणं अतिशय उत्कृष्ठ झाली. पुरोगामी विचार हाच त्यांच्या भाषणाचा आत्मा होता. याच विचारांची पालखी घेवून निघालेले आहेत. म्हणूनच बाबा परिट, बंडा मणियार सुरेश कुऱ्हाडे आणि हजारांची जनता यांना मन:पूर्वक अिभवादन आणि अभिनंदन...
Comments
Post a Comment